'तिला कळलं तर ती येणार म्हणजे येणारचं.. आणि एकदा का ती आली मग कोणाचेच काही खरे नाही..शरयू तिच्यासमोर काहीच नाही ; शर्वरीचा सामना कोणीच करू शकत नाही.. कोणीच म्हणजे कोणीच नाही.. '- माधवराव बोलून गेले होते पण त्याचा अर्थ कोणालाच लागत नव्हता..
----------
'शरयुला तातडीने ऑपरेशनसाठी नेण्यात आले होते.. तिच्या पोटातील अल्सर फुटला होता.. डॉक्टरांचे निदान ऐकून सारेजण हादरले होते.. आवश्यक फॉर्मवर आशिषच्या सह्या घेत; डॉक्टरांनी सर्जरीची तयारी सुरू केली होती..
'देवा माझ्या शरयुला लवकर बरं कर रे.. तिला काहीही झालं तर शर्वरीला थोपवण्याची ताकद माझ्यात तरी नाही रे...'- माधवराव पुन्हा एकदा मोठ्याने पुटपुटले होते..
'सर, शर्वरी कोण?'- आशिषने न राहवून अस्वस्थ माधवरावांना विचारलं..
'कळेलच तुम्हांला लवकरच.. सध्या तरी एवढंच सांगू इच्छितो, की शरयुला जितकं जपता येईल तितकं जपा.. कारण जर ती आली तर तिच्या प्रकोपापासून केवळ शरयूच तुम्हाला वाचवू शकते.. धार्मिक भाषेत सांगायचे तर शरयू भवानी असेल तर शर्वरी महाकाली आहे.. महाकाली..'- माधवरावांनी हॉस्पिटलमधल्या दुर्गेच्या प्रतिमेसमोर हात जोडले होते..
त्यांच्या अशा गूढ खुलाश्याने सर्वजण अजूनच गोंधळात पडले होते..
'मि. आशिष कोण? तुम्ही ना??'- जरा माझ्यासोबत केबिनमध्ये या..'- डॉक्टरांनी आशिषला केबिनमध्ये बोलवून घेतलं होतं..
'डॉक्टर मी..मी तिचा दुर्भागी बाप.. मी.. मी पण सोबत आलो तर चालेल?'- माधवराव..
'या तुम्हीपण..'- डॉक्टर
मधल्या वेळेत, घडलेल्या प्रसंगाची माहिती साटम काकांनी आशाला आणि आशाने संध्याला कळवली होती..
सारा प्रकार ऐकून संध्या मुळातून हादरली होती.. शर्वरी नावाचा उल्लेख ऐकताच क्षणी तिच्या घशाला कोरड पडली होती.. क्षणात तिने केबिनबाहेर येत; ट्रिटमेंटसाठी वाट बघत असलेल्या पेशंट लोकांशी संवाद साधत; त्यांची माफी मागत; पुढील सर्व अपॉइंटमेंट रद्द केल्या होत्या.. परत केबिनमध्ये येऊन ती कपाळाला हात लावून बसली होती.. थरथरत्या हाताने तिने मोबाईल उचलला होता.. नंबर डायल केला होता..
'हॅलो ताई.. ताई..'- संध्या
'पुढे काही बोलणार आहेस की ठेवू फोन..'- पलिकडून..
'ताई.. शरयू..शरयुला..'- संध्याला भीतीने शब्द फुटत नव्हते..
'संध्या, शरयुला काय?? लवकर थोबाड उघड तुझं.. नाहीतर मी इंडिया मध्ये आली तर ऑन द स्पॉट फोडून टाकेन मी ते..'- पलिकडून..
'ताई, शरयुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे.. तिचा पोटातला अल्सर फुटला आहे.. आज ऑपरेट करणार आहेत तिच्यावर..'- संध्याने कसंबसं बोलून टाकलं..
'ठीक आहे.. ठेव फोन.. जर तिला काही झालं तर मी कोणालाच सोडणार नाही एवढं लक्षात ठेव.. मी आत्ताच निघतेय.. उद्या पर्यंत पोहचेल.. मला हॉस्पिटलची डिटेल्स पाठवून ठेव.. आणि जेव्हा मी तिथे पोहचेल तेव्हा मला तिथे तु आणि तुझा तो आशिक; दोघेही तिथे हजर हवेत.. क्लिअर??'- संध्याने काही बोलण्याच्या आतच पलिकडून फोन कट झाला होता..
संध्या पुन्हा हताशपणे डोक्याला हात लावून बसली होती.. शेवटी तिने हंसबाईनां सारं काही समजावून तडक हॉस्पिटल गाठलं होतं..
तिला अस अचानक तिथे पाहून साटम काका-काकी आश्चर्यचकित झाले होते..
इकडे आशिष आणि माधवराव, गंभीर चेहऱ्याने डॉक्टरांसमोर बसले होते..
'मला खरं खरं सांगा... यांना कधीपासून त्रास होतोय हा?? कारण अल्सर काही काल झाला आणि आज फुटला अशातला प्रकार नसतो.. एकतर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे किंवा त्यांनी तुमच्यापासून लपवल आहे... त्यांना हा त्रास किमान आठ-नऊ महिन्यांपासून असावा असा माझा अंदाज आहे..'- डॉक्टरांनी विचारलं तसे आशिष आणि माधवराव एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले..
'नाही डॉक्टर.. आम्हांला तर ती काही त्रास होतो अस कधीच बोलली नाही.. हा.. अधूनमधून तिला पोटात दुखायचे.. तेव्हा ती शिळं अन्न खाल्लं म्हणून दुखतं असे बोलून वेळ मारून न्यायची.. आम्ही मागे लागून लागून डॉक्टरांकडे नेलं होतं तिला.. पण डॉक्टरांनीसुद्धा नेमकं तेच निदान केलं होतं..'- आशिषने आठवून सांगितलं..
'अजून उलटी वगैरे? अंगदुखी..'- डॉक्टरांनी अजून चौकशी केली..
'हा उलट्यांचा त्रास होता तिला.. त्याच्यासाठी गोळ्या पण घ्यायची ती.. मला शंका आलीच होती म्हणून मी घेतलंय ते पॉकेट सोबतच..'- आशिषने बोलता बोलता खिश्यातून एक गोळ्यांचं पॉकेट काढून डॉक्टरांसमोर ठेवलं..
गोळ्यांचं नाव वाचून डॉक्टर अधिकच गंभीर झाले होते..
'मि. आशिष आणि मि. माधव; खूप मोठा प्रॉब्लेम आहे.. माझ्यामते पेशंट एकतर केअरलेस आहे किंवा त्यांना जगण्याची इच्छा नाही आहे..'- डॉक्टरांचे शब्द ऐकून दोघेही उडाले होते..
'म्हणजे??'- दोघेही एकत्र उत्तरले..
'या पेनकिलर आहेत.. याने त्यांना फक्त टेम्पररी आराम भेटेल.. पण त्यांना कधी बरं वाटणार नाही.. माझा संशय खरा ठरला.. चला म्हणजे मला आता माझ्या उपचारांची दिशा ठरवता येईल.. पण तरीही यांत जर पेशंटच्याच मनात जगण्याची उर्मी नसेल तर आम्हीही काही करू शकत नाही हे ध्यानात ठेवा..'- डॉक्टरांचा निरोप घेऊन दोघेही केबिनबाहेर पडले होते..
बाहेर पडतानाच, आशिषने आशाला फोन लावून ; अश्विनीला हॉस्पिटलमध्ये आणण्याची विनंती केली होती..
बाहेर आल्यावर आशिषने डॉक्टरांशी झालेलं बोलणं सगळयांना सांगितलं होतं.. आता सगळ्यांनाच तिच्यातल्या सकारात्मक बदलांचा अर्थ उलगडला होता.. शरयू जाणूनबुजून आजाराकडे दुर्लक्ष करत होती.. सर्वांचे डोळे पाण्याने भरले होते..
माधवराव निराश मनाने तिथेच बेंचवर बसले होते.. त्यांना असं स्ट्रेस पाहून संध्या त्यांच्याकडे पोहचली होती.. तिने त्यांच्या खांद्यावर हात ठेवताच; ते तिचा हात धरून रडू लागले होते..
'काका सांभाळा स्वतःला.. काही होणार नाही आपल्या शरयुला.. ती अशी हार मानण्यातली नाही.. तिचा गैरसमज झाला असेल लक्षणाबद्दल किंवा जुन्या डॉक्टरच निदान चुकीच झालं असेल..'- संध्या त्यांचं सांत्वन करत होतीच तितक्यात तिचा फोन वाजला.. नंबर पाहताच तिला घाम फुटला होता..
'हॅलो ताई.. बोल..'- संध्या..
'तुला हॉस्पिटलची डिटेल्स पाठवायला सांगितली होती.. अजून पोहचली नाहीत..'
'सॉरी ताई.. एक मिनिटांत पाठवते.. मी..मी हॉस्पिटलमध्येच आहे आता..'- संध्याने कसाबसा रिप्लाय दिला..
यावेळेस पण पलिकडून फोन लगेच कट झाला होता.. संध्याच्या चेहऱ्यावरची भीती बघून सर्वांच्या नजरा तिच्या उत्तरासाठी खिळल्या होत्या..
'काका, ताई उद्या सकाळी पोहचतेय..'- संध्याने माधवरावांना सांगितलं..
'म्हणजे युद्ध अटळ आहे.. शरयू.. बेटा.. लवकर बरी हो.. तूच थांबवू शकतेस तुझ्या बहिणीला...'- माधवरावांनी उद्गार काढले तसे सर्वजण अवाक झाले..
'शरयूची बहीण?? '- सर्वांनाच धक्का बसला होता.. कारण आजपर्यंत शर्वरी हे नाव संपूर्ण साटम परिवाराच्या कधीच कानावर पडले नव्हते..
'संध्या, तु तरी सांग.. कोण आहे ही शर्वरी?? आम्ही कोणी कधीच कसं ऐकलं नाही..'- आशिषने परत एकदा विचारलं होतं...
संध्याने एकवार माधवरावांकडे बघत त्यांच्या परवानगीने बोलायला सुरुवात केली होती..
'शर्वरी माधव देशपांडे.. शरयूची मोठी बहीण.. आणि माझी पण..'- संध्याने सुरुवात केली होती..
'तुझीपण?'- साटम काकांनी विचारलं..
'हो खरंतर ती हंसा आणि अरविंद शिर्केंची मुलगी.. पण बहिणीच मानसिक स्वास्थ्य लवकर सुधारावे म्हणून अरविंदरावांनी मनाचा मोठेपणा दाखवत तिला आमच्या पोटी घातलं.. पुढे मागे त्यांना तिच्यावर हक्क दाखवायची इच्छा होऊ नये म्हणून त्यांनी आम्हांला ती कायदेशीररित्या दत्तक दिली होती..'- माधवरावांनी बोलायला सुरुवात केली होती..
'लहानपणापासूनच भयंकर तापट मुलगी होती... पण माझी मंदा ती आल्यावर मानसिकरित्या सुधारायला लागली होती.. शर्वरीने तिला तिचं सगळं दुःख विसरायला लावलं होतं.. सगळं काही मार्गावर यायला लागलेच होते.. शरयू मंदाच्या पोटात होती आणि तिला तिच्या भूतकाळाची सत्यता कळली आणि ती पुन्हा बिथरली ती कधीच न सावरण्यासाठी.. ती गेली तेव्हा शर्वरी दहा वर्षाची होती आणि शरयू तीन.. तेव्हापासून तिने शरयूचा हात पकडला आहे तो आजतागायत सोडलेला नाही.. वयाच्या पंधराव्या वर्षी तिला मी तिच्या खऱ्या आई-बाबांबद्दल सांगितलं.. तेव्हापासून तिने संध्यालाही आपल्या मायेखाली घेतलं.. दोघींवर तिच अफाट प्रेम आहे.. दोघींपैकी एकीलाही काही झालं तरी ती सगळं आकाशपाताळ एक करून टाकेल..'- बोलता बोलता माधवराव थांबले..
'मग ती मागच्या पाच वर्षांत कुठेच नाही दिसली??'- आशिष..
'आमच्यामुळे..म्हणजे मी आणि शरयू.. शरयूचा माझ्या बाबांवर प्रचंड राग होता.. आय मिन आहे.. त्याच रागातून ती कायम आमचा राग करायची.. मी समोर आली की भांडायची.. एक दिवस आमची अशीच भांडण सुरू होती.. आणि असाच एकाने आमच्या भांडणाचा गैरफायदा घेत; आम्हां दोघींना चुकीचा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता.. आम्ही घाबरलो तसा तो माणूस अधिकच पुढे आला.. तो जसा पुढे आला तस कोणीतरी मागून त्याच्या डोक्यात फुलांची कुंडी घातली होती.. तो माणूस रक्तबंबाळ होत; जागीच बेशुद्ध झाला होता.. आम्ही पाहिलं तर ती ताई होती.. कोणीतरी पोलिसांना बोलवलं.. पोलिस येईपर्यंत तिने आमचीपण थोबाडं सुजवली होती.. तिला अटक झाली.. काकांनी आणि बाबांनी वजन वापरून तिला त्या प्रकरणातून सोडवलं... ती बाहेर तर आली पण त्यानंतर तिने आम्हां दोघींना भेटून समोरासमोर बसवलं.. तिने आम्हांला धमकी दिली की जर यापुढे कधी आमच्यात भांडण झाली तर ती आमचं कोणाचेच थोबाड बघणार नाही म्हणून.. आमच्या दोघींचं तिच्यावर प्रेम होतंच त्यामुळे आम्हीपण भांडण न करण्याच ठरवलं.. काही महिने गेले आणि एक दिवस आमचे इगो आडवे आलेच.. आम्ही खूप भांडलो. इतके की अगदी हाणामारीवर आलो.. ताईला कळलं.. झालं.. तिच असपण एम.एस. पुर्ण झालंच होतं...तिने तडक आम्हांला न सांगता यु.एस. गाठलं.. आम्ही तिला कितीवेळा सॉरी बोललो.. एकत्र बसून फोन लावले पण ती आलीच नाही..कधीच नाही..'- संध्याला अश्रू आवरेना झाले तशी ती थांबली..
नवा ट्विस्ट ऐकून, साटम परिवार जागीच स्तब्ध झाला होता..
'आम्ही दोघी, कधी नव्हे ते एकत्र यु.एसला जाऊन तिला रिक्वेस्ट करून आलो..पण नाही ऐकली ती.. ती आली ती थेट पप्पा गेल्यावरच.. पण तेव्हापन ती इथून लवकर निघून गेली होती.. पण जाता जाता तिने आम्हां दोघींना वॉर्निंग दिली होती..'- संध्याला तिचे शब्द आठवून थरथरायला झालं होतं..
'वॉर्निंग??'- आशिष..
'हो..बाबांनी त्यांच्याकडून झालेली चुकी तिच्या कानावर घातली होती.. त्यांनी तिची त्यासाठी माफ़ीसुद्धा मागितली होती.. पुढे शरयूने तुझ्याशी लग्न केलं तेव्हा ती तिच्यावर भयंकर चिडली होती.. तेव्हा तिचा काहितरी महत्वाचा प्रोजेक्ट चालू होता म्हणून त्यावेळेस शरयू वाचली होती .. तिने शरयुला तुझ्यापासून दूर राहायला सांगितलं होतं.. पण शरयुलासुद्धा तू आवडतच होतास आणि त्यात तुझ्यापासून तिला दिवस गेले हे कळताच ती शरयू बाबत काहीशी मवाळ झाली होती.. मग तिने मला धारेवर धरलं.. मला तुझ्यापासून दूर राहायला सांगितलं.. पण..पण मी तुझ्यापासून दूर राहणे शक्यच नव्हतं.. तरीही ताईच्या सांगण्यावरून तीन वर्षे मी तुझ्यापासून दूर राहिले.. राहुलच्या निमित्ताने आपण भेटलो नसतो तर कदाचित अजून जास्त काळ राहिली असती.. पण जगली नसती रे मी... '- संध्याने आपलं बोलणं थांबवलं होतं.. ती माधवरावाच्या कुशीत शिरून रडू लागली होती...
'आपण दोघांनी पुन्हा भेटायला सुरुवात केल्याची तक्रार शरयूने ताईला केली होती.. तिचा मला जाब विचारण्यासाठी फोनसुद्धा आला होता.. मी यावेळेस तिला चांगलाच विरोध केला होता.. तुझ्यावरचा हक्क सोडणार नसल्याचे तिला ठणकावून सांगितलं होतं.. त्यामुळे ती चिडली होती.. पुढे मागे शरयूच काही बरं-वाईट झालं तर मला आणि तुला देशोधडीला लावण्याची धमकी तिने मला तेव्हाच दिली होती.. मला..मला.. त्याचीच जास्त भीती वाटतेय आशु.. माझ्यामुळे तुला त्रास नाही झाला पाहिजे..'- रडणाऱ्या संध्याला माधवरावांनी धीर देत शांत केलं होतं..
'म्हणजे तुझे बाबा, आपण समजतो तसे व्हिलन नव्हते तर..'- आशिषने विचारलं तसे माधवरावांनी छताकडे पाहत हात जोडले होते..
'देवमाणूस होता तो.. माझ्यासाठी तरी.. आयुष्यभर खलनायक बनून राहीला फक्त आणि फक्त त्याच्या बहिणीसाठी.. स्वतःच्या बायकोच्या, स्वतःच्या मुलीच्या सुखाची, स्वप्नांची आहुती दिली त्यांनी.. फक्त आपल्या बहिणीच आयुष्य सावरण्यासाठी..'- काकांच्या तोंडून शब्द निघताच संध्याला विस्मय वाटला होता..
'काका?? काय म्हणताय तुम्हीं??'- संध्याला आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता..
'हो बाळा.. तुझ्या बाबांना दिलेल्या वचनाला मी बांधिल आहे म्हणून मी सांगू शकत नाही.. तुझी आई सुद्धा त्याच कारणांसाठी सत्य सांगू शकत नाही.. पण.. पण तुझी ताई सांगेल.. ती सांगणारच.. तुझे आणि शरयूचे डोळे फक्त तिच उघडू शकते.. फक्त एकच सांगतो... तुझ्या बापाने तुझ्यावर आणि तुझ्या आईवर अन्याय केला तो निव्वळ त्याच्या बहिणीच आयुष्य सावरण्यासाठीच ग.. जमलं तर माफ करा त्या देवमाणसाला..'- माधवरावांनी संध्यासमोर हात जोडले होते..
क्रमशः
© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा