Login

अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 48

This part is in continuation with earlier series.

वाटेत येता येता; या मोमेंट्स साठी आशा आणि राहुलला धन्यवाद द्यावं म्हणून दोघेही त्यांच्या खोलीवर गेले होते..  दरवाजा उघडाच असल्यामुळे; नॉक करून त्यांनी दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून दोघेही जागीच थिजले होते.. आशा आणि राहुल, दोघेही  भान हरपून एकमेकांच्या मिठीत हरवले होते.. एक-दुसऱ्यावर चुंबनाचा वर्षाव करता करता त्यांना संध्या आणि आशिषच्या प्रवेशाचा देखिल विसर पडला होता.. त्यांना तस बघून संध्या तात्काळ मागे फिरत आपल्या रूममध्ये परतली होती..

मागोमाग आशिषही त्या दोघांच्या रूमचे दार बंद करून रूम मध्ये परतला होता...
                             ------------

खोलीत येताच संध्याचा श्वासोच्छ्वास तेज झाला होता.. बेडवर बसूनसुद्धा; तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते.. वारंवार फुसूनही ते परत वेगळ्या ठिकाणी प्रगट होत होते..

मागे उभा राहून आशिष तिची चलबिचल पाहत होता.. रूममध्ये येत त्याने दार लावून घेत; A. C. फास्ट केला तशी संध्याची नजर त्याच्यावर गेली आणि तिला अगदीच अवघडल्यासारखं झालं.. ती आहे त्याच ठिकाणी आपलं शरीर एकत्र दुमडून बसली होती..

आशिष जसजसा तिच्या जवळ येऊ लागला तशी तिच्या हृदयाची स्पंदने वाढू लागली होती.. आशिषकडे पाहताना आज पहिल्यांदाच तिला तिच्या घश्याला कोरड पडल्यासारखं जाणवत होतं.. तो अगदीच जवळ आला तशी ती हळूहळू बेडवरून मागे सरकू लागली होती; त्याच्या चेहऱ्याकडे सुद्धा पाहण्यासाठी तिची हिम्मत होत नव्हती..

'संध्या..'- आशिषने तिच्या हनुवटीला आपल्या हाताने पकडत, तिची नजर वर केली तशी त्याला ती आतून बिथरल्यासारखी वाटली होती..

'का ग एवढी का घाबरून बसली आहेस?? एवढापण विश्वास नाही  माझ्यावर?? '- आशिषने विचारताच तिने पुन्हा मान खाली घातली होती..

'ठीक आहे.. तु झोप इथे.. पण बिनधास्त झोप..मी आहे बाहेर...'- आशिष एवढं बोलून बाहेर निघाला होता..

'बाहेर कुठे??'- संध्याने अचानक मागून त्याचा हात पकडत विचारलं..

'अग, तिथे बाहेर लॉबीमध्ये एक कोच आहे... मगाशीच मी त्या नाईट शिफ्टवाल्या रिसेप्शनिस्ट मुलाशी सेटिंग लावली आहे मी.. तिकडे बसून डुलकी काढायला कोणाची काही हरकत नाही..'- आशिषने तिचा हात सोडवत पुन्हा बाहेर पडण्याचा प्रयत्न केला..

'आय एम सॉरी ना आशु.. मला तुला असं हर्ट नव्हतं रे करायचं... पण..'- संध्याच्या डोळयातून गंगा-यमुना वाहायला सुरुवात झाली होती..

'अग ये रडुबाई...तुला काय निव्वळ निमित्त लागतं का ग रडण्यासाठी??'.. अग साहजिकच आहे ना, कोणत्याही घरंदाज स्त्रीला स्वतःची अब्रू प्रिय असणारच ना?? त्यात तुझा काय दोष?? आणि मी माझ्या संध्याला चांगलंच ओळखतो.. माझ्यासाठी वेळप्रसंगी स्वतःचा जीव देईल पण तिचं शरीर हे तिच्या हक्काच्या माणसाच्याच मालकीचं असेल.. आणि बरं का; माझं ही तेच मत आहे.. जर माझ्या बहिणीच्या बाबतीत एखाद्याने संयम पाळण्याची माझी अपेक्षा असेल तर दुसऱ्याच्या बहिणीबाबत मी स्वतः संयम का पाळू नये?? बरोबर ना?? डोन्ट वरी.. माझ्यापासून तुझ्या अब्रूला काहीच धोका नाही आणि पुढेही नसेल.. तुझ्या मनावरचं दडपण दूर करण्यासाठीच मी बाहेर जातोय ग.. नाहीतर उद्या म्हणशील, तु खोलीत होतास म्हणून मी रात्रभर झोपले नाही म्हणून..'- आशिषने डोळा मारत संध्याला चिडवलं तशी ती लटक्या रागाने त्याला चापट्या मारू लागली..

'आशु बाहेर खूप थंडी आहे रे.. सॉरी माझं चुकलं.. मी..मी तुझ्याबाबतीत असा संशय घ्यायला नको होता.. तु इथेच सोफ्यावर झोप.. बाहेर नको..'- संध्याने त्याचा हात धरत त्याला विनवले..

'अहं.. काय तर म्हणे संशय घ्यायला नको.. मग सोफ्यावर का? बेडवर झोपायला परवानगी नाही...'- आशिष तिला चिडवण्याचा एकही चान्स सोडत नव्हता..

'बरं सोना.. झोप बेडवर.. खुश??'- संध्यानेही मुद्दाम नाटकी  हावभावात बेड बोलून सोफ्याकडे हात दाखवला तसे दोघेही हसू लागले होते.. 

इतका वेळ संध्याच्या मनात असलेला तणाव आता निवळू लागला होता.. तशी ती आशिषशी मनमोकळेपणाने गप्पा मारू लागली होती...  आशिषच्या समजूतदारपणाचं तिने मनापासून कौतुक केलं होतं.. 

'अग शिवाजी महाराज नुसते मनात नाही ठेवलेत; आचरणातसुद्धा आहेत आमच्या..'- मोबाईलवर असलेल्या शिवरायांच्या वॉलपेपरकडे बोट दाखवत आशिषने उत्तर दिलं होतं..

'दुर्मिळ आहेत अशी लोक रे..'- संध्या..

एकमेकांच्या थट्टामस्करीत मध्यरात्री उलगडली होती.. शेवटी झोप अनावर झाली तसे दोघेही रूममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झोपी गेले होते..

दुसऱ्या दिवशी दोघेही लवकरच उठले होते.. आपलं सारं आटपून दोघेही फिरायला बाहेर पडले होते.. नेहमीप्रमाणे दोघेही एक-दुसऱ्याशी न बोलता, एकमेकांचा हात धरून चालत होते... काहीही बोलण्यापेक्षा; दोघांना एकत्रितपणाचे क्षण जगायचे होते.. शब्दांच्या भाषेपेक्षा त्यांची नजरेची भाषा त्यांना आजही हृदयातून जोडून होती.. काही वेळ रिसॉर्टच्या आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेतल्यानंतर दोघेही आपल्या रूमकडे परतत होते.. वाटेतच त्यांना राहुल आणि आशा भेटले होते.. 

'आशु, अरे लोकं किती बदमाश असतात ना रे?? आपल्या दोघांच्या नावाखाली लोकांनी स्वतःचा हनिमून उरकून घेतला ना??'- संध्याने दोघांना चिडवायला सुरू केलं होतं..

'हो ना.. आपल्याला डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला लावून; लोक स्वतः मात्र रासलिलेमध्ये तल्लीन झाले होते.. आणि एवढे तल्लीन की दरवाजा बंद करण्याचे सुद्धा भान नाही..'- आशिषनेपण मौके पे चौका मारला होता..

आशिष अन संध्याच्या चौफेर हल्ल्यापुढे आशा अन राहुलचे काहीच चालण्यासारखे नव्हते तसे दोघांनीही लाजत आपआपले कान पकडले होते.. 

उर्वरित दिवस चौघांनी फुल्ल धम्मालमस्तीमध्ये व्यतीत केला होता.. संध्याकाळी परततानादेखिल चौघांनी एकमेकांची मस्करी करता करताच प्रवास संपवला होता.. आशिष आणि संध्याला त्यांच्या घरी ड्रॉप करून; आशा अन राहुल त्यांच्या घरी पोहचले होते..

                                 ---##---

'ओह, आशु डार्लिंग वेलकम.. वेलकम.. कुठे होतात कालपासून?'- शरयूने आशिष दरवाज्यातून आत येताच त्याला विचारलं होतं..

'माझ्यामते तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे.. आणि मला माझ्या वेळेचा हिशोब; अटलिस्ट तुलातरी देण्याची गरज नाही.. मी ऑलरेडी थकून आलोय.. प्लीज लिव्ह मी अलोन..'- आशिष कपडे चेंज करत बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेला होता..

'आशु, मी काय विचारतेय तुला?? कुठे होतास तु?? बायको आहे तुझी आणि हक्क आहे मला तुझ्याबद्दल जाणून घेण्याचा.. कळलं?? सांग बऱ्या बोलाने; कुठे होतास तो??'- शरयू आशिष फ्रेश होऊन बेडरूममध्ये जाताच; त्याच्या मागून पोहचत, त्याला डीचवू पाहत होती..

'तरीही माझं उत्तर सेम असेल शरयू.. मी कुठे होतो, कोणासोबत होतो; या गोष्टींचा तुझ्याशी काहीही सबंध नाहीये.. आणि तु कितीही आदळआपट केलीस तरी मी तुला काहीच सांगणार नाही आहे..क्लीअर??'- आशिष तिला पुन्हा एकदा झिडकारून; झोपलेल्या लेकीची पप्पी घेत ; बेडवर झोपला होता..

'तुला वाटतं तितक सोप्प नाही आशु.. तुला, तुझ्या फॅमिलीला खूप भारी पडणार हे सर्व.. हे जे तुम्ही मला तुमच्यापासून बाजूला काढणं, मला निग्लेक्टं करणं आणि.. आणि स्पेशली तु माझ्यासोबत अस मिसबीहेव्ह करणं.. मी..मी ना हे सर्व सूदसमेत तुम्हांला रिटर्न करणार.. जस्ट वेट..'- शरयूने रागाच्या भरात पुन्हा त्याला धमकावले होते..

'जा ग.. काय करायचं ते कर.. मी नाही घाबरत..'- आशिष तिच्या विरुद्ध तोंड फिरवून झोपी गेला होता.. 

दुसऱ्या दिवशी आशा तिच्या माहेरी; तिची काही जुनी सर्टिफिकेटस घेण्यासाठी आली होती.. नेमकी शरयू तेव्हा खरेदीसाठी बाहेर होती... साटम काकींनी मागच्या काही दिवसांपासून घरी चालू असलेल्या कटकटी लेकीच्या कानावर टाकल्या तशी ती आश्चर्यचकित झाली होती..

'अरे, दादा दोन दिवस आमच्यासोबत होता.. पण एका शब्दाने बोलला नाही ग?? काय ग ही शरयू..हिला थोडं पण मन नसेल का ग??'- साऱ्या घटना ऐकून आशाला वाईट वाटलं होतं..

आशामार्फत या सर्व गोष्टी संध्याला कळल्या तशी तीसुद्धा चिंतीत झाली होती.. एवढं सारं आपल्यापासून लपवल्याबद्दल तिने आशिषची चांगलीच खरडपट्टी काढली होती.. तसेच यापुढे शरयुच्या प्रत्येक आगळीकीची माहिती तिलाही कळवण्याबद्दल तिने आशिष आणि आशा; दोघांनाही बजावले होते...

सर्वसाधारण एक आठवडा असाच शांततेचा गेला होता..

                                   --##--

'आई, आशिष कुठे आहे?? आशिष?? आशिष बाहेर ये?'- शरयू जोरजोरात ओरडत त्याला शोधत होती..

'अग पण झालं काय?? अश्विनी झोपली आहे ते तरी माहिती आहे ना तुला??'- साटम काकींनी वैतागून विचारलं..

'अश्विनी गेली खड्ड्यात.. आधी तुमच्या मुलाला माझ्यासमोर हजर करा..आत्ताच्या आत्ता..'- शरयू रागाने थरथरत उभी होती..

तिचा रुद्रावतार पाहून साटम काकींना काहीच सुचत नव्हते... तेवढ्यात आशिष बाहेरून घरी आला होता..

'या साहेब या.. कुठे होतात मागच्या शनिवारी आपण??'- शरयूचे डोळे मोठे तर आवाज रागीट झाला होता..

'तुला काय करायचंय?? एकदा सांगितलं ना नाही सांगणार तर नाही सांगणार...'- आशिषने चिडून म्हटलं तशी तिने धावत जाऊन त्याची शर्टाची कॉलर पकडली होती..

'हाऊ डेअर यु मि. आशिष?? तु.. तुझी हिम्मतच कशी झाली माझ्याबरोबर चिट करण्याची?? तु..तु तुझ्या रखेल सोबत मज्जा मारत होतास ना लास्ट विकेंडला??'- शरयूच्या आवाजातला राग वाक्यगणिक वाढत चालला होता.. 

साटट.. शरयूचा वाक्य पुर्ण होण्याआधीच आशिषच्या पंज्याचे निशाण तिच्या गालावर उमटले होते.. अनपेक्षित थप्पडीने शरयू कोलमडली होती..

'संध्या माझं प्रेम आहे.. तुझी डेअरिंगच कशी झाली तिला अपशब्द वापरण्याची?? तुला तर..'- आशिष चिडून पुन्हा तिच्या अंगावर धावून गेला तशा साटम काकू मध्ये आल्या होत्या..

'आशिष, बऱ्या बोलाने मागे हो.. नाहीतर मी तुझं कानशिल सुजवेन.. तु कोणत्या हक्काने तिच्यावर हात उचललास?? हे साटमांच्या घरचे संस्कार नाहीतच .. काहीही झालं तरी ती तुझी बायको आहे.. तिने कितीही आपल्याशी वाईट वागो, आपलं अशुभ चिंतो; आपण आपले संस्कार सोडू नयेत.. कळलं? आणि तु शरयू.. एवढं आकांडतांडव करण्याऐवजी सरळ मुद्द्याचे बोलशील तर आम्हांलापण कळेल..'- साटम काकींनी आक्रमक पवित्रा घेताच दोघेही काहीसे निवळले होते..

'हे.. हे बघा, तुमच्या मुलाचं बाहेरख्यालीपण.. स्वतःच्याच डोळ्यांनी बघा.. बाबा, तुम्ही पण बघा.. म्हणजे तुम्हालाही माझा राग कळेल..'- शरयूने फेसबुकवर  टाकला गेलेला एक व्हिडीओ प्ले केला होता.. व्हिडीओ पाहताच आशिषसकट घरातले सर्वजण शॉक झाले होते..

संध्या आणि आशिषचा रिसॉर्टमधल्या डान्सचा व्हिडीओ 'मिस्टर अँड मिसेस साटम यांचा बेधुंद डान्स' ; अशा टायटलने फेसबुकवर व्हायरल झाला होता.. 

'आम्ही फक्त एकत्र डान्सच केला आहे.. आणि मला वाटतं त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे'- आशिषने शांत आवाजात शरयुला म्हटलं तशी ती अधिकच चिडली..

'मला नेलंस कधी कुठे?? माझ्याशी केलास कधी असा डान्स?? मी बायको आहे ना तुझी?? '- शरयूने त्रागा चालूच ठेवला तस आशिषने मध्येच तिला थांबवलं..

'कागतोपत्री बायको आहेस तू.. बाहेर नेण्यासाठी, तुला सोबत नाचवायला तु माझं प्रेम नाही आहेस.. माझ्या घरच्यांना फसवून माझ्याशी लग्न केलं आहेस तू.. आठवतं ना??'- आशिषच्या प्रत्युत्तरावर शरयूच्या रागाचा पारा अधिकच वर चढला होता..

'ठीक आहे मि. आशिष.. बघून घेईन तुला.. तुला माहीत नाही; केवढी मोठी चुकी केली आहेस तू.. तु विचार पण केला नसशील तेवढं तुला भोगायला लावेन मी.. इतके दिवस तु आणि तुझ्या फॅमिलीने मला गृहीत धरलं होतं ना.. आता कळेल तुला मी; शरयू काय चीज आहे ते..'- सर्वांना धमकावत शरयू बेडरूममध्ये निघून गेली होती.. 

दुसऱ्या दिवशी, शरयू आपल्या समानासहित; छोट्या अश्विनीला घेऊन घराबाहेर पडली होती.. साटम काका-काकींनी तिला विनंती करुनसुद्धा तिने त्यांना दाद दिली नव्हती.. आशिष असाही तिच्यावर वैतागलेला असल्याने; त्याने तिला फक्त अश्विनीला इकडे सोडून जा एवढंच म्हटलं होतं.. परिणामी ती जाता जाता सुद्धा चांगलीच भडकून गेली होती..

'आशिष, भीती वाटतेय रे.. ही पोरगी काही शांत बसणाऱ्यातली नाही आणि तिच्या बाबांनी तर आधीच आपल्याला स्पष्ट इशारा दिला होता.. जे काही चालू आहे ते आपल्यासाठी नक्कीच चांगलं नाही..'- साटमकाकांनी आपली भीती व्यक्त केली होती..

'मला पण तिच धडकी भरली आहे ओ.. या पोरीचा खरंच काही नेम नाही.. देव आता अजून कोणते दिवस दाखवतो ते माहीत नाही..'- साटम काकी..

'नका एवढी काळजी करू.. होईल सर्व ठीक..'- आशिष त्यांना आश्वस्त करत असला तरी तोही मनातून घाबरलाच होता.. शरयूच्या क्रोधाची, तिच्या कारस्थानी डोक्याची भीती त्याच्या मनाला जाणवत होतीच..

त्या सगळ्यांची भीती,संध्याकाळी खरी ठरली होती.. माधवरावांनी आशिष आणि त्याच्या कुटुंबियांचीं झाल्या प्रकाराबाबत निर्भत्सना केलीच होती शिवाय यासाठी होणाऱ्या गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी करण्याची धमकी त्यांनी दिली होती..

साटम परिवाराची रात्र त्याच विचारांत गेली होती.. आशिषने झाला प्रकार राहुल आणि संध्याला कळवला होता तसे तिथेही सर्व चिंतेत पडले होते..

'साटम.. साटम, दरवाजा उघडा..'- सकाळीच कोणीतरी दरवाज्याबाहेरून मोठ्याने आवाज देत होते..

आवाजाने सर्व साटम परिवार हॉलमध्ये एकत्र आले होते तर आशिषने पुढे होत दरवाजा उघडला होता..

'तुम्ही??'- दारात पोलिस पाहून आशिष आणि साटम काका-काकींना धक्का बसला होता..

'हो आम्ही.. तुमची वरात काढण्याची ऑर्डर आहे आम्हांला.. चला बसा गाडीत गप्पगुमान..'- हवालदाराने खड्या आवाजात दरडावल तस साटम काकींना रडू कोसळलं..

'पण कशासाठी??'- आशिषने कळूनसुद्धा उसनं अवसान दाखवत त्यांना विचारलं..

'म्हणजे?? तुम्ही मिळून मिसेस शरयू यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत आहात अशी तक्रार आली आहे आमच्याकडे.. तुमच्या अटकेचं वॉरंट आहे आमच्याकडे.. आता मुकाट्याने गाडीत बसा नाहीतर आम्हांला जबरदस्ती करावी लागेल... चला लवकर आटपा..'- हवालदारांनी पुनः एकदा आवाज वाढवत म्हटलं..

आशिष काय समजायचं ते समजून गेला होता.. शरयूने शेवटी सुड  उगावलाच होता.. कसंबसं आई-वडिलांना सावरून तो पोलिसांच्या गाडीत बसला होता..

 एक वकील आज स्वतः एक आरोपी झाला होता..

क्रमशः

प्रिय वाचकहो,

एक समाज म्हणून तुमचे विचार ऐकावेसे वाटतात.. एक प्रश्न..

एक त्रयस्थ म्हणून तुम्हाला काय वाटतं?? भले आशिष आणि संध्या एकमेकांच्या आकंठ प्रेमात असले तरी लग्नानंतरही त्यांनी अस एकत्र येणे योग्य आहे?? 

© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all