माधवराव सकाळी नऊ वाजताच साटम कुटुंबीयांच्या घरी पोहचले होते.. त्यांची मुखचर्या रागीट भासत होती.. आल्या आल्याच त्यांनी शरयुला रागाने हाक मारली होती..
त्यांचा आवाज ऐकून सारेजण हॉलमध्ये धावत आले होते..
------------
'या या माधवराव, बर झालं तुम्ही शक्य तितक्या लवकर आलात..'- साटम काकांनी त्यांचं स्वागत करत, साटम काकूंना त्यांच्या साठी चहा-पाण्याचं बघायला सांगितलं..
'सर, तुम्ही अचानक?? मी तुम्हांला फोन करणारच होतो..'- माधवरावांना पाहून आशिषला आश्चर्य वाटलं होतं..
'म्हणजे, तु यांना नाही बोलवलं??'- साटम काका चाट पडले होते..
'अहो बाबा, मी एवढया अपरात्री त्यांना कसा फोन करू शकतो?? म्हणून मी सकाळी फोन करणार होतो.. पण सर तर त्याआधीच..'- आशिषही गोंधळला होता..
'डॅड.. थँक्स डॅड.. माझ्या एका कॉलवर तुम्ही धावपळ करत आलात.. आय मिस्ड यु अलॉट डॅड..'- शरयूने अचानक मागून येत माधवरावांना मिठी मारली होती..त्यांच्या मिठीमध्ये शिरून ती रडू लागली होती..
'माझ्या बेटीने एवढ्या टेन्शनमध्ये मला फोन केला आणि मी येणार नाही असं होऊ शकता का?? आता मी आलोय ना बेटा.. सर्व ठीक होईल बच्चा.. मी आहे ना.. रडायचं नाही शरू.. शरू.. ये शरू.. असं रडू नकोस..'- माधवरावांनी आपल्या हातांनी शरूच्या चेहऱ्यावर ओघळणारे अश्रू फुसत तिला शांत केले होते..
बाप लेकीची भेट बघून साटम कुटुंबीयांच्या काळजात धस्स झाले होते.. शरूने त्या सर्वांआधीच डाव साधला होता.. आता सर्वांना प्रतीक्षा होती ती शरयूने माधवरावांच्या मनात भरून ठेवलेला क्लेश उघडकीस येण्याची..
'साटम, आशिष मला तुमच्याशी बोलायचं आहे.. स्पेशली आशिष तुझ्याशी...'- माधवरावांनी साटम कुटुंबियांना हातानेच बसण्याची विनंती करत संभाषण सुरू केले होते..
'मला काल रात्री दिड वाजता शरूचा फोन आला आणि मी दचकलोच.. इतक्या वर्षांत पहिल्यांदाच तिने असा मध्यरात्री मला फोन केला.. मी फोन उचलताच सुरवातीची माझी वीस मिनिटं तिचं रडणं आवरण्यातच गेली होती.. फोनवर पलीकडे माझी अवस्थाही काहीशी तशीच होती.. असो, ते महत्वाचं नाही..'- माधवरावांनी उसासा सोडला..
'आशिष, मान्य आहे की शरूने; तिच्या वैयक्तिक सुडापोटी तुझ्या आणि संध्याच्या प्रेमावर अन्याय केला.. तिने जे केलं ते माझ्यासाठी कायमच चूक असेल.. नो डाऊट अबाऊट दॅट.. पण आता तिच्याबरोबर साडेतीन वर्षे संसार केल्यानंतर; तुला मध्येच असं वाईटपण का सुचतय? तेही तुम्हां दोघांना एक मुलगी असतानासुद्धा? तुझं लग्न शरयू सोबत झालेलं असतानासुद्धा तु संध्यासोबत विवाहबाह्य सबंध ठेवून आहेस?? हा काय प्रकार आहे आशिष? मला कळेल का? आणि काय कमी आहे माझ्या शरयूत? असं कोणतं सुख आहे की जे तुला फक्त संध्याकडूनच मिळू शकतं आणि शरूला त्याबाबत तुला एक संधीही द्यावीशी वाटू नये?? आशिष, मला आज माझ्या प्रशांची उत्तर हवी आहेत.. तुझ्याकडून.. तुझ्या आई-वडिलांकडून..'- माधवरावांनी आपलं बोलणं थांबवलं तस आशिषने एकवार त्यांच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहिलं..
'संसार?? मी शरयूसोबत कधीच संसार केला नाही सर.. मी जन्मठेप भोगलीय तिच्या सोबत एक एक क्षण काढत... काळ्या पाण्याची शिक्षा बोललात तरीपण कमीच.. आणि सर, तुम्ही शरयू आणि संध्यामध्ये तुलना करूच तरी कसे शकता?? एकीने आपल्या लोकांसाठी स्वतःच्या प्रेमाची तिलांजली दिली.. ती..ती संध्या सर... आणि दुसरी तुमची शरयू...जिने स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या लोकांच्या आनंदाचा बळी दिलाय.. संध्या कायम दुसऱ्यांसाठी जगत आली आहे तर तुमची लेक फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करत आली आहे.. अहो, अशी किती तरी उदाहरण मी तुम्हांला देऊ शकतो.. संध्यासोबत मी घालवलेले मिनीटभराचे क्षण; मला दिवसभर जगण्याची उर्मी देतात सर.. पण.. पण हिला बघितलं की माझ्या मनात नैराश्य आणि दुःखच येतं.. आपली चुकी नसतानासुद्धा संध्याने कधी वडीलधाऱ्या माणसांना प्रत्युत्तर केली नाहीत; पण तुमच्या मुलीने काल माझ्या आई-वडिलांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली होती सर... हे सांगितलं का तिने तुम्हांला?? '- आशिषने शरयूकडे रागाने कटाक्ष टाकत माधवरावांना उत्तर दिलं..
'माधवराव, आजपर्यंत आम्ही सुद्धा तिच्या आणि आशिषच्या मिलनासाठीच प्रयत्नशील होतो.. तिला आयुष्यात कधी न मिळालेलं आईच प्रेम; तिला मरेपर्यंत देण्याचं ठरवलं होतं मी... तिच्यासोबत माझ्या पोटच्या गोळ्याची होणारी घुसमट, तिच्यावर विश्वास टाकून संध्याच्या प्रेमाचा आमच्याकडून झालेला अपमान, संध्याची आम्ही केलेली अवहेलना; सारं सारं विसरून आम्ही तिला आमची सून नाही; लेकच मानली.. पण तिने आपला स्वार्थीपणा काही सोडला नाही.. तिच प्रेम कुचकामी ठरलं असं मी कधीच बोलणार नाही पण संध्याच्या प्रेमापुढे ते कधीच वरचढ झालं नाही, आणि ती काल ज्या प्रकारे अमच्यासोबत वागली त्यावरून ती आम्हांला परत कधी जिंकू शकेल असं मला तरी वाटत नाही..'- साटम काकींनी माधवरावांसमोर चहाचा कप पुढे करत आपली बाजू मांडली..
'ताई, मी तुम्हांला एक प्रश्न विचारू का?? '- माधवरावांनी कप हातात घेता घेता साटम काकूंना प्रश्न केला होता..
'विचारा ना..'- साटम काकू..
'समजा, माझ्या जागी शरयू तुमची मुलगी असती तर?? अजून एक, संध्या तुमची मुलगी असती तर??'- माधवरावांनी प्रश्न विचारताच साटम काकू काही वेळ शांत झाल्या होत्या..
'तुमच्या प्रश्नांचा रोख मला अचूक कळलाय माधवराव..थोडं अवघड आहे विचार करणं.. पण ते संध्याच्या बाबतीत.. शरयूसाठी नाही..'- साटम काकींनी ठामपणे उत्तर दिलं..
'म्हणजे??'- माधवराव..
'जर मला शरयूसारखी लेक असती तर मी वेळेतच तिच्या आक्रमकपणाला आवर घातला असता.. तिला लोकांच्या भावनांचा विचार करायला शिकवलं असतं... आणि हे सर्व शिकवण्याचा तुम्ही प्रयत्न केलाच असाल यात मला शंका नाहीच.. पण मी त्यापुढे जात तिची ही असली दुष्कर्म ऐकून; तिला चांगलीच ठेचून काढली असती.. मी स्वतः तिला आशिषच्या आयुष्यातून बाहेर केली असती.. लग्न झालं याचा अर्थ असा नाही की कोणी एकाने मन मारून जगावं... गेले ते दिवस माधवराव.. समाजाची भीती कोणाच्या जीवापेक्षा जास्त महत्वाची नाही.. समजा, उद्या आशिषने तुमच्या मुलीच नाव घेत; स्वतःच काही बरं वाईट करुन घेतलं तर?? त्याला जबाबदार कोण?? समाज तर माझ्या मुलालाच पळपुटा म्हणेल ना? का पुरुषाला भावना नसतात? त्याने कायमच आपल्या स्वप्नांना कुर्बान करावं? मी..मी शरूची आई किंवा बाप असती तर, रोखलं असतं तिला..'- साटम काकींनी उद्विग्नतेने उत्तर दिलं तशी माधवरावांनी मान खाली घातली..
'पण संध्या.. संध्याची आई असती तर.. तर कदाचित मी तिलाही अडवलंच असतं.. स्वतः विवाहित असताना; तिने दुसऱ्याच्या सांसारिक त्रुटींचा आधार घेत, त्यांच्या वैवाहिक जीवनात दखल देणं चुकीचं आहे.. तिने स्वतःला आवरायला हवं..एकदा लग्न झालं की व्यक्तीने आपला भूतकाळ विसरायला हवा.. पण मी आशिष आणि संध्यासाठी वेगवेगळे नियम नाही बनवणार.. खरंतर दोघांनीही आपल्या नवीन नात्याला योग्य त्या संधी देणं अपेक्षित होतं.. आपला भूतकाळ विसरता नाहीं आला तरी किमान त्यांनी तो बाजूला तरी सारायला हवा होता.. पण ते कोणालाच जमलं नाही.. शरयू आणि रवी दोघेही आपआपले जोडीदार जिंकायला कमी पडले.. जर ही दोघेही खरंच आपापल्या जोडीदारांवर प्रेम करत असतील तर त्यांनी स्वतःहुन त्यांना आपल्या नात्याच्या बेडीतून मुक्त करावे..'- साटम काकींनी अगदी त्रयस्थपणे आपला निर्णय व्यक्त केला होता..
त्यांचं मत ऐकून सर्वजण चकीत झाले होते..
'पण माझ्यामते आशिषने, शरयुला धोका देत, अस विवाहबाह्य संबंधात अडकणे चुकीचे आहे.. एक बाप म्हणून मी कधीही माझ्या मुलीच्या डोळ्यांत अश्रू पाहू शकत नाही.. आणि जर आशिषमुळे जर तिच्या डोळयातून पाण्याचा एक थेंबही बाहेर पडला तर माझ्यापेक्षा दुसरा वाईट कोणीच नाही.. आज ही कायदे स्रियांच्याच बाजूने आहेत, हे लक्षात असू द्या..'- माधवरावांनी साटम कुटुंबियांना अप्रत्यक्षपणे इशारा देत तिथून निघून गेले होते..
आश्चर्य म्हणजे ज्या व्यक्तीवरून हे सर्व रामायण घडलं होतं, ती शरयू संपुर्ण बैठकीत एक चकार शब्द बोलली नव्हती...
शरयूशी आता कोणीच स्वतःहुन बोलत नव्हते.. साटम परिवाराने तिला जणू वाळीतच टाकले होते.. ती देखिल कोणामध्ये फारशी दखल देत नव्हतीच... नाही म्हटलं तरी अधून मधून आशिषला डीचवणे तिने कायम ठेवले होते.. तो एकटा सापडला की मुद्दाम त्याच्या अंगचटीला जाण्याचा एक चान्स ती सोडत नव्हती.. मग तो पण तिच्या उपस्थितीतच संध्याला फोन लावून तासंतास तिच्याशी बोलत बसे.. त्या वेळेस शरयू बाजूलाच बसून त्यांच्या गप्पा ऐकत बसे, अधून मधून त्यांच्या बोलण्यावर हसून आशिषला वेंगाडून दाखवे.. आधीसारखी तिची आदळआपट आता पूर्णपणे बंद झाली होती.. तिचं वागणं आशिषला अधिकच गोंधळात टाकणार होतं.. त्याला राहून राहून ती वादळापूर्वीची शांतता वाटत होती..
---##---
आज संध्या आणि आशिष, दहा-बारा दिवसांच्या अंतराने भेटले होते.. भेटल्या भेटल्या काही काळ त्यांनी एकमेकांच्या मिठीत व्यक्त केला होता.. संध्याने रवीचा निर्णय आणि त्यांच्यातले ऍग्रिमेंट आशिषला सविस्तरपणे ऐकवले होते.. आशिषनेदेखिल तिला मानसिक धीर देत, आपण कायमच सोबत करण्याची ग्वाही तिला दिली होती..
---##---
राहुलच्या तब्येतीत आता खूप छान सुधारणा होत होती.. संध्याच्या अपेक्षेपेक्षा राहुलला पूर्णपणे ठीक होण्यासाठी दोन महिने अधिक लागले होते; परंतु आता राहुलला नैराश्याचा त्रास जाणवत नव्हता.. मधल्या काळात आशाने तिच्या सासरची धुरा एकहाती सांभाळून ठेवली होती.. या साऱ्या गोष्टींचे श्रेय आशा आणि राहुलने संध्याला दिले होते.. तिच्याप्रति आभार व्यक्त करण्यासाठी; त्या सर्वांनी मिळून रिसोर्टला फिरायला जाण्याचे आणि धम्माल करण्याचे ठरवले होते..
---##---
ठरल्या दिवशी चौघेजण शनिवारी संध्याकाळी एकत्र जमले होते..
निळ्या रंगाचा टॉप आणि पांढरी लेगीन्स घालून आलेली संध्या; साध्या रुपातसुद्धा आशिषला लावण्यवती वाटत होती.. कितीतरी वेळ तो तसाच तिच्याकडे टक लावून बघत बसला होता..
संध्याची स्थितीसुद्धा काही वेगळी नव्हती.. नियमित व्यायामाने आजही पिळदार शरीर ठेवलेला आशिष आज पिकनिक म्हणून टी-शर्ट आणि थ्री-फोर्थ घालून आला होता.. टी शर्ट मधून त्याचे बॉडी कट्स चांगलेच भरीव वाटत होते.. आधीच गोंडस चेहरा असलेला आशिष, आज फुल्ली मस्कुलर मॅन वाटत होता..
दोघांची एकमेकांवरून न हटणारी नजर पाहून आशा आणि राहुलला हसू आवरत नव्हतं..
'राहुल, अरे पिकनिकला जायचं की इकडेच एकमेकांची तोंड बघत बसायची रे..'- आशाने दोघांकडे न बघताच राहुलला म्हंटलं तसे दोघेही भानावर आले.. आशाच्या पाठीवर, मस्तीमध्ये धपाटा घालत संध्या मागच्या सीटवर जाऊन बसली तशी आशाने आशिषलाही मागच्या सीटवर पिटाळले होते..
गाडी रिसॉर्टच्या दिशेने वेगात निघाली होती.. आशाने मुद्दाम रोमॅंटिक गाणी लावली होती.. गाण्याच्या बोलाबरोबर आशिष आणि संध्याची मागे बसून होणारी नजरानजर पाहून आशा आणि राहुल एन्जॉय करत होते..
'राहुल, गाडी नीट चालव हा.. नाहीतर आमच्यावर लक्ष ठेवण्याच्या नादात ठोकशील कुठेतरी..'- आशिषने असं म्हणताच गाडीत हास्याचे फवारे उडाले होते..
'आणि हो, दुसऱ्या कपलकडे बघत बसण्यापेक्षा स्वतः पण एक कपल आहात हे विसरू नका हा.. तो गिअर चेंज करण्याआधी बायकोच्या हाताला हात नाही लावला तरी गिअर चेंज होईल बर का??'- संध्याने हसून टोमणा मारला तसे आशा आणि राहुल चोरी पकडली गेल्यासारखे खजील झाले..
'आता कशाला लाजायची एकटिंग करतेस आशा?? तु पण मुद्दाम हात तिथेच ठेवून बसली आहेस ना?? बघ अजून तरी कुठे हात बाजूला काढला आहेस ?'- संध्याने आक्रमण चालूच ठेवलं तसे आशाने मागे वळून स्वतःचे कान धरले..
हास्यविनोद करता करता, गाडी रिसॉर्टला येऊन पोहचली होती..
आशा आणि राहुल पटकन त्यांच्या रूम मध्ये शिरले होते.. आशिष आणि संध्याच्या नावे एकत्रच रूम बुक होती.. हे कळताच दोघेही कावरेबावरे झाले होते..
'संध्या, तु टेंशन नको घेऊस.. जस्ट रिलॅक्स.. तु आधी जाऊन फ्रेश हो.. मी रूमबाहेर थांबतो.. तो पर्यंत अजून एखादी रूम भेटली तर बघू..'- तिची समजूत काढत आशिष बाहेर निघून गेला होता..
संध्या काही वेळात फ्रेश होत बाहेर आशिषची वाट पाहत बसली होती.. तेवढयात आशिष चेहरा पाडून आत आला होता.. रिसॉर्ट फुल असल्यामुळे दुसरी कोणतीच रूम शिल्लक नव्हती..
'आपल्याला आज रूम शेअर करावी लागेल संध्या.. तु बेडवर झोप, मी इथे कोचवर झोपेन.. आणि तरीही तुला अवघडलेलं वाटलं तर मी रूमबाहेर जाईन..'- आशिष बोलून आत आंघोळीला गेला होता.. संध्याला त्याच्या समजूतदारपणाच कौतुक वाटलं होतं..
चौघांचे आटपून सर्वजण बाहेर एकत्र भेटले होते.. दोघांसाठी एक रूम बुक केल्याबद्दल आशिषने राहुलची खरडपट्टी काढली होती.. त्याला कसंबसं मनवत राहुलने , त्या तिघांना गार्डनमध्ये आणलं होतं..
रिसॉर्टवाल्यांनी आज स्पेशल थीम म्हणून कपल डान्स स्पर्धा ठेवली होती..
आशिष आणि संध्या, दोघंही नाही नाही म्हणताना आशा आणि राहुलने दोघांना कपल म्हणून भाग घ्यायला लावले होता.. शेवटी डोळ्यांनी एकमेकांची मंजुरी घेत; दोघेही डान्स करायला शामिल झाले होते..
सुरुवातीला एकमेकांसोबत नाचताना दोघंही अवघडले होते.. हळूहळू त्या धुंद संगीतामध्ये ते एकमेकांच्या सान्निध्यात हरवले होते.. एक दुसऱ्याच्या नकळतपणे, त्यांचे हात एकमेकांभोवती गुंफले गेले होते..आतापर्यंतचा असलेला मानसिक क्षीणपणा; त्यांच्या एकत्रित डान्स स्टेपसोबत बाहेर फेकला जात होता..क्षणाक्षणाला ते अधिकच जवळ येऊ लागले होते..
सलग दोन-तीन तासानंतर म्युझिक बंद झाले होते.. म्युझिक बंद झाले तरी दोघे एकमेकांपासून वेगळे झाले नव्हते.. एकमेकांभोवती हात तसेच गुंफलेले ठेवत ते एकदूसऱ्याच्या नजरेत हरवून गेले होते...
'अँड विनर इज, मि. आशिष आणि मिसेस. संध्या साटम..'- घोषणा होताच टाळ्यांचा कडकडाट झाला होता आणि दोघेही भानावर आले होते..
त्यांच्या लक्षात आले तेव्हा ते दोघेच डान्स अरेना मध्ये उभे होते तर बाकीची सारी कपल बाजूला उभे राहून त्यांची मज्जा घेत होते.. दोघांनाही भयंकर लाजल्यासारखं झालं होतं.. संध्याला अगदीच सहन करण्यापलीकडे गेलं तशी ती पुन्हा आशिषच्या मिठीत शिरली होती.. दोघांना पुन्हा तस पाहताच; परत एकदा शिट्ट्यांचा पाऊस पडला होता, परत टाळ्या वाजल्या होत्या..
शेवटी दोघांनी आपलं बक्षीस स्वीकारून तिथून काढता पाय घेतला होता.. वाटेत कित्येक लोकांनी दोघांचं अभिनंदन केलं होतं..- बेस्ट लव्ह, बेस्ट कपल, नाईस केमिस्ट्री अशा कित्येक कौतुकांचा दोघांवर वर्षाव झाला होता..
राहुल आणि आशा, दोघांनीही त्यांचं कौतुक केलं होतं.. एकमेकांची टेर उडवत; त्यांनी आपली जेवणं आटपली होती.. आशिष आणि संध्याला प्रायव्हसी देण्याचं निमित्त करून; आशा आणि राहुल तिकडून सटकले होते..
रिसॉर्टच्या आजूबाजूला फेरफटका मारताना दोघे पुन्हा एकदा वेळेचे भान विसरले होते.. काही वेळ अशीच आपली लाईफ डिस्कस केल्यावर; दोघे परत आपल्या खोलीत परतले होते..
वाटेत येता येता; या मोमेंट्स साठी आशा आणि राहुलला धन्यवाद द्यावं म्हणून दोघेही त्यांच्या खोलीवर गेले होते.. दरवाजा उघडाच असल्यामुळे; नॉक करून त्यांनी दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून दोघेही जागीच थिजले होते.. आशा आणि राहुल, दोघेही भान हरपून एकमेकांच्या मिठीत हरवले होते.. एक-दुसऱ्यावर चुंबनाचा वर्षाव करता करता त्यांना संध्या आणि आशिषच्या प्रवेशाचा देखिल विसर पडला होता.. त्यांना तस बघून संध्या तात्काळ मागे फिरत आपल्या रूममध्ये परतली होती..
मागोमाग आशिषही त्या दोघांच्या रूमचे दार बंद करून रूम मध्ये परतला होता...
क्रमशः
© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा