'हे कधीच शक्य नाही आशु... तुला माहीत नाही; मी काय चीज आहे.. तु..तु फक्त माझा आहेस.. फक्त माझा..'- बोलता बोलता शरयू किचनकडे वळली होती.. आशिषला काही समजण्याआधीच तिने खाली पडलेली फिनेलची बाटली तोंडाला लावली होती..
'शरयू.. स्टॉप इट... शरयू'- आशिष धावेपर्यंत शरयूने अर्धी बॉटल पिऊन टाकली होती...
---------
आशिषचा आवाज ऐकून साटम काका-काकू धावत बाहेर आले होते.. त्यांनी पाहिलं तर शरयू जमिनीवर निपचित पडली होती.. बाजूलाच फिनेलची बॉटल पडली होती.. आश्चर्य म्हणजे आशिष आपल्या जागेवर ढिम्म उभा होता..
'अरे आशिष?? तु असा मूर्खांसारखा काय उभा आहेस?? अरे फिनेल पियाली आहे ती.. अहो, तुम्ही डॉक्टरांना फोन करा ना .. आधी अंबुलन्स तरी बोलवा.. अरे देवा, शरयू... बाळा डोळे उघड ग.. डोळे उघड.. आशिष.. अरे असा कसा दगडाचा रे तु?? कमीतकमी तुझ्या मुलीसाठी तरी काही हालचाल कर..'- साटम काकींना काहीच सुचत नव्हतं..
साटम काकापण शॉक लागल्यासारखे एकाच जागी थिजले होते..
'अहो, तुम्हीपण काय असे पुतळ्यासारखे उभे राहिलात.. लवकर करा.. हा हलत नाहीतर; शेजारच्या नाईकांना तरी बोलवा मदतीला.. शरयू.. बेटा.. काय करून बसलीस ग..'- साटम काकू हतबल होऊन शरयूच्या चेहऱ्यावर थोपटत तिला उठवण्याचा प्रयत्न करत होत्या परंतु शरयूचा काहीच प्रतिसाद भेटत नव्हता..
साटम काका डॉक्टरांना फोन करण्यासाठी बाहेर जाणार तितक्यात आशिषने त्यांना समोरून अडवलं होतं..
'आशिष, हा काय मुर्खपणा आहे.. बाजूला हो.. तुला तुझी जबाबदारी कळत नसली तरी आम्हांला ती पार पाडायलाच हवी.. हो बाजूला..'- साटम काका आता चांगलेच वैतागले होते..
'फक्त एक मिनिट बाबा.. फक्त एक मिनिट..'- आशिष हसून फ्रिजकडे वळला होता..
त्याला याही परिस्थितीत अस हसताना पाहून साटम काका-काकू चक्रावून गेले होते.. आशिषने फ्रिजमध्ये ठेवलेल्या थंड पाण्याच्या दोन बॉटल बाहेर काढल्या होत्या.. बॉटल हातात घेऊन तो लगेच शरयुसमोर जाऊन बसला होता.. शरयू अजूनही बेशुद्धच होती..
साटम उभयतां आशिषकडे वेड्यासारखे पाहत होते.. त्यांनी काही प्रतिक्रिया देण्याआधीच आशिषने दोन्ही बॉटलची झाकणं खोलून; सारं पाणी एकत्रितपणे शरयूच्या तोंडावर सोडलं होतं..
साटम काकू रागात आशिषवर हात उचलणार तितक्यातच शरयू हडबडून उठून बसली होती.. ऐन थंडीच्या दिवसांत; आशिषने चिल्ड पाण्याने तिला भिजवल्यामुळे ती चांगलीच कुडकुडत होती.. आपलं नाटक उघडकीस आल्यामुळे ती पुरती खजील झाली होती.. तिला अस मान खाली घालून बसलेली पाहून ; आशिष खळखळून हसू लागला होता तर साटम काका-काकूंना शरयूचा प्रचंड राग आला होता..
'शरयू, अग किती खेळशील आमच्या भावनांशी?? काय गरज होती हे...हे असलं नाटक करायची.. आम्ही किती घाबरलो माहीत आहे.. खरंच आशिष बोलतो तेच खरं.. तुझ्यावर विश्वास ठेवून चुकी केली आम्ही..'- साटम काकींनी तिला तात्काळ सुनावलं होतं..
'तुम्ही घाबरलात??'- शरयूने साटम काकींच्या डोळ्यांत डोळे घालत प्रश्न विचारला..
'हो..हो.. मग..'- साटम काकी-काकांनी चाचरत उत्तर दिलं तस शरयूच्या चेहऱ्यावर खुनशी हसू उमटलं..
'चांगलं आहे.. असेच घाबरून रहा.. आज नाटक केलंय.. पण जर तुम्ही तुमच्या मुलाला रोखलं नाहीत तर मग मी खरंच फिनेल पियेल.. आणि.. आणि त्यावेळेस समजा; तुम्ही सर्व माझी सासरी मानसिक छळवणूक करता म्हणून पोलिसांना जबानी दिली तर काय होईल तुमचं साटम?? तुमची इज्जत तर जाईलच पण म्हातारपणातसुध्दा जेल मध्ये खडी फोडावी लागेल.. आणि तुमचा मुलगा.. त्याच तर आयुष्यच बरबाद होईल ना.. म्हणजे आता तुमची मर्जी हा.. मी काही तुम्हांला पुढे सांगत नाही.. आशु डार्लिंग मला उचलून घे ना..'- शरयूने साटम काका-काकूंना धमकावून; आशिषला खिजवण्यासाठी मुद्दाम त्याच्या समोर हात पसरले होते..
'हाड.. तुझ्या सारख्या नीच बाईला हात तर दूर; तुझ्या सावलीलापण स्पर्श करण्याची मला किळस येते.. तुझ्या सारखी स्वार्थी स्त्री पहिली नाही मी.. सालं माझंच चुकलं.. काल मध्यरात्री जेव्हा त्या फिनेलच्या बॉटलच लेबल काढून या कफ सिरपच्या बॉटलला चिकटवत होतीस ना, तेव्हा नंतर बॉटल खरंच बदलायला हवी होती मी.. मेली असतीस तर कमीतकमी ब्याद तरी गेली असती माझ्या मागची.. शीट.. देवा अरे आहेस की नाही रे या जगात?? अजून किती दिवस अशा पापी लोकांना साथ देणार?? खरंच तु आहेस की ?? '- आशिषला आपला राग अनावर झाला होता..
रागाच्या भरात का होईना पण आशिषच्या तोंडून आपल्या मरणाची इच्छा ऐकून शरयुला धक्का बसला होता.. तिच्या चेहऱ्यावर आशिषने ओतलेल्या पाण्याच्या ओघळणाऱ्या थेंबामागे; तिचे अश्रू लपून गेले होते.. ती निशब्द झाली होती..
'खूप वाईट वाटलं पोरी तुझे विचार ऐकून.. खरंच तुझी भीती वाटतेय आता.. उगाच तुला लेक बनवायला गेली मी.. सून म्हणूनच सबंध ठेवले असते तर आज इतकं मनाला लागलं नसतं.. चांगले पांग फेडलेस ग आम्हां म्हाताऱ्यांच्या प्रेमाचे.. चांगले पांग फेडलेस.. कर बाई.. कर तुझ्या मनात जे येईल ते कर.. आम्हांला जेल मध्ये पाठव, आमची समाजात बेइज्जती कर, आम्हांला खडी फोडायला लाव, ज्याच्यावर प्रेम करायचा आव आणतेस त्याला आयुष्यातून उठव.. आम्ही काहीही बोलणार नाही.. पण त्यासाठी तुझं आयुष्य पणाला नको लावूस एवढीच प्रार्थना करते ग बाई तुझ्यासमोर.. लेकुरवाळी बाई तु.. लेकीचा तरी विचार कर.. आणि हा.. उतरलीस तु माझ्या मनातून.. या पुढे तु आम्हांला किती जगायला देशिल ते माहीत नाही पण जितके दिवस ही म्हातारी जिवंत आहे, तितके दिवस ती तिच्या लेकाच्या मागे खंबीरपणे उभी राहील.. त्याच्या प्रेमासाठी माझा तरी पाठिंबा असेल..'- साटम काकूंनी उठता उठता शरयुला सुनावलं होतं..
'आणि मी पण माझ्या लेकासोबत आहे.. आशिष, उद्याच माधवरावांना बोलवून त्यांच्या कानावर हा प्रकार घालायला हवा.. उद्या त्यांना इकडे येण्यासाठी विनंती कर'- साटम काकांनीदेखिल शरयूकडे पाठ फिरवली होती..
साटम काका- काकू निघून गेले तसे किचनमध्ये फक्त आशिष आणि शरयूच उरले होते..
'आशु, समजून घे ना रे मला.. मी..मी नाही कंट्रोल करू शकत स्वतःला.. माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर.. मला.. मला तुझ्यासोबतच जगायचं आहे.. आशु, प्लीज ऍक्सेप्ट मी.. प्लीज आशु.. मी..मी तुला खूप सुखात ठेवेन आशु.. तु फक्त मला तुझी पत्नी म्हणून स्वीकार.. आशु.. ऐक ना रे माझं.. '- शरयू कळवळून आशिषला विनंती करत होती..
'प्रेम?? आणि हे असलं?? माझ्याच समोर माझ्या आई-वडिलांना धमकी देतेस तु?? अरे तु काय विष पिशील? तुझ्यात हिंमतच नाही तेवढी.. प्रेमात होणारी पीडा तुला कधी समजणारच नाही.. कारण तु कधी प्रेम केलंच नाहीस..तु फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिलास.. आणि तशीही तुझ्या सारख्या बाईकडून माझी प्रेमाची अपेक्षापण नाही...'- आशिषला अजूनही स्वतःच्या रागाला आवर घालता आला नव्हता...
'मग भारी पडेल तुम्हां सर्वांना आशु... तु माझा आहेस.. फक्त आणि फक्त माझा.. अँड एव्हरी थिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर ना डार्लिंग.. तुला मिळवण्यासाठी मला कितीही निचपणा करावा लागला तरी मी तो करणार; पण मी तुला माझ्यापासून दूर होऊन देणार नाही.. बघच तु..'- शरयू उठून उभी राहिली होती..
'बघू बघू'- आशिष तिला बोलून बेडरूमकडे निघून गेला होता..
शरयू अजूनही किचनमध्येच थांबली होती.. तिला आशिषच संध्यावरच प्रेम कळत होतं, ती त्याच्यावर लादत असलेले स्वतःच प्रेम चुकीचं असल्याची जाणीव तिलापण होतीच परंतु त्याही पेक्षा आशिषबद्दलच तिच प्रेम आणि अरविंदरावांमुळे संध्याप्रतीचा तिचा तिरस्कार; तिला खलनायिकेच्या भूमिकेतून बाहेर पडून देत नव्हता...
या साऱ्या गोंधळात; रागाच्या भरात आशिषने व्यक्त केलेली तिच्या मरणाची इच्छा आठवून ती आतल्या आत कुढत होती.. तिचा अहंकार; तिचे अश्रू डोळयातून बाहेर पडू देत नसले तरी मनातल्या मनात तिचा आक्रोश चालूच होता..
भिजलेल्या अवस्थेत ती पुढचे काही तास तशीच किचनमध्ये विमनस्क स्थितीत उभी होती.. काही वेळाने थंडी अगदीच असह्य झाली तशी ती कपडे चेंज करून बेडरूममध्ये गेली होती.. आत आशिष आणि अश्विनी झोपले होते... नेहमीप्रमाणे तिने दोघांच्या माथ्याचे चुंबन घेत; दोघांच्या अंगावरचे ब्लॅंकेट्स नीट करून; स्वतः बाजूला पहुडली होती.. झोपता झोपता तिने मनाशीच काहीतरी खुणगाठ मांडली होती... मनात प्लॅन तयार होताच तिला हायस वाटलं होतं..
---##---
'रवी, आज लवकर उठलास?? गुड मॉर्निंग..'- सकाळ सकाळी रवीला हॉलमध्ये पाहून संध्याने त्याला विचारलं..
'रात्री झोप नाही लागली ग.. काही गोष्टी फायनल करायच्या होत्या.. डिसीजन होत नव्हता.. मेंटली त्रास झाला बट फायनली आय एम रेडी विथ माय डिसीजन..'- रवीने शांतपणे उत्तर दिलं..
'अरे यार, तुझे डोळे किती सुजले आहेत बघ..तु रात्री अजिबातच झोपला नाहीस की?? थांब मी आय ड्रॉप आणते.. थोडा रेस्ट घे..'- संध्या ड्रॉप आणायला मागे वळली तोच तिला रवीच्या हसण्याचा आवाज आला..
'असं नको करूस ग.. तु मध्येच अशी माझी काळजी करतेस आणि मग माझ्या मनात विनाकारण होप तयार होतात.. आणि आता मला; स्वतःची अन आशिषची काळजी घेण्याची सवय करून घ्यायला हवी..'- रवीने सांगितलं तशी संध्या चमकली..
'म्हणजे??'- संध्या..
'तुझा आशु आणि तु, असेच भेटत राहिलात तर कधी ना कधी तुम्ही एकत्र यालच ना??'- रवी..
'येस.. बट हा टॉपिक तु एवढया सकाळी का डिस्कस करतो आहेस?? तुला खरंच वेळेचं काही कळत की नाही रवी??'- संध्याने चिडून म्हटलं तसा रवी खिन्नपणे हसला..
'वेळ.. वेळ तर माझी खराब चालू आहे ग... एनी वे, आय नो; तुला जास्त घुमावलेलं आवडत नाही.. डायरेक्ट पॉईंटवर येतो.. मी तुला डिव्होर्स देतोय..सॉरी म्हणजे आपण डिव्होर्स घेऊयात.. तु आशिष साटमला तुझ्यासोबत ठेव तर मी आशिष पाटिलला माझ्याकडे ठेवेन..'- रवीने संध्यासमोर विषय मांडला तशी ती चाट पडली...
'रवी?? तु..तु काय म्हणतो आहेस ते कळतंय का तुला??'- संध्याला अजूनही रवीच्या निर्णयाचं आश्चर्य वाटत होतं..
'येस... मी सर्व बाजुंनी विचार करूनच हा निर्णय घेतला आहे संध्या.. आणि डोन्ट वरी..आय प्रॉमिस; आपल्या मुलाला भेटण्यासाठी तुला विशेष दिवस किंवा टाईमची वाट पहावी नाही लागणार.. तु त्याला हवं तेव्हा त्याला येऊन भेटू शकतेस.. मॅक्सिमम आठवडाभर तुझ्यासोबत ठेवू शकतेस.. बट इतरवेळी तो माझ्यासोबतच राहील.. मी..मी त्याची योग्य काळजी घेईन.. आणि समज.. समज.. पुढे मागे तुला आमच्यासोबत रहावं वाटलं तर तु एनीटाईम वेलकम.. फक्त आपण त्या वेळी असे कागदी पती-पत्नी नसू तर फक्त आपल्या मुलाचे पॅरेन्ट्स असू..'- रवीने निर्विकारपणे आपलं म्हणणं मांडलं..
' होरीबल आहेस यार तु!! इतका मोठा डिसीजन तु माझ्याशी काहीच डिस्कस न करता कसा काय घेऊ शकतोस रवी?? अँड अगेन तुझा डिसीजन सांगण्यासाठी काय वेळ निवडली आहेस तू?? हॅट्स ऑफ टू यू यार.. हॅट्स ऑफ टू युअर सिलीनेस..'- संध्याने चिडून त्याला सुनावलं होतं..
'आपण रात्री यावर डिस्कस करू.. मला माझा दिवस फुकट घालवायचा नाही आहे..'- एवढं बोलून संध्या तिची नित्यकर्म आटपण्यासाठी निघून गेली होती.. तिची पाठ वळताच रवीच्या डोळ्यांनी मोठया प्रयासाने अडवलेल्या अश्रूंचा बांध उघडला होता..
त्या दिवशी संध्याकाळी संध्या काहीशी लवकर घरी आली होती.. जेवणं आटपून, छोट्या आशिषला लवकर झोपवून ती आणि रवी हॉलमध्ये समोरासमोर बसले होते..
'रवी, तुझ्या डिसीजनवर आज मी दिवसभर विचार केला.. आणि पटला मला तुझा निर्णय.. खरं म्हणजे आपण असं किती दिवस नाटकी जगायचं रे.. मला पण आता कंटाळा आला आहे.. माझा आशु मला भेटो या न भेटो; वुई विल सेपरेट.. प्रत्येकाला त्याची लाईफ जगण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तो त्याला मिळायलाच हवा.. यू प्लीज प्रोसिड विथ फॉर्मलिटी.. पेपर रेडी झाले की सांग.. मी करेन साइन.. आणि तुझी आशिष बद्दलची कंडिशन मला मान्य आहे.. कारण आय नो, मी जरी त्याची आई असली तरी तु माझ्यापेक्षा त्याची जास्त चांगली काळजी घेशील.. मला फक्त त्याच्यासाठी सगळं बेस्ट व्हावं असंच वाटतं.. डॅट्स ऑल फ्रॉम माय साईड..'- संध्याने एका दमात तिचं म्हणणं मांडलं..
'ठीक आहे, मग मी उद्याच घटस्फोटासाठी अर्ज फाईल करतो..'- रवी..
'बट त्या आधी आपण; माझ्या मम्मीला आणि वैदीहीला आपला निर्णय कळवू.. उगाच नंतर त्यांच्याकडून काही इश्यूस नकोत.. मी मम्माला सांगते, तु वैदीशी बोलशील.. चल आता उशीर होतोय.. झोपुयात..'- संध्या उठली तशी रवीसुद्धा जागेवरून उठला होता..
'अजून एक रवी.. थँक्स अ लॉट डिअर.. इतके दिवस स्वतःची मर्यादा सांभाळून राहिल्याबद्दल.. आशिषचा जन्म तुझ्या पॅरेन्ट्स झाला तरी माझ्यासाठी तो माझ्या लाईफचा बेस्ट मोमेंट होता.. थँक्स फॉर दॅट.. आय होप, आपल्यात लीगल नातं राहिलं नसलं तरी आपण फ्रेंड म्हणून कायम राहू.. चल गुड नाईट डिअर..'- संध्याने जाता जाता रवीला मिठी मारली होती..
ती जाताच, रवीला दुःख अनावर झालं होतं.. अजूनपर्यंत लोकांच्या नजरेत नाटक करताना; नाही म्हटली तरी संध्या त्याच्या कमीतकमी डोळ्यासमोर तरी होती.. परंतु आता घटस्फोटानंतर, ती त्याला क्वचितच दिसणार होती.. रवीची सारी रात्र संध्याच्या आठवणीत तळमळण्यातच गेली होती..
दुसऱ्या दिवशी संध्याने हंसाबाईना आणि रवीने वैदीहीला; त्यांच्या निर्णयाची कल्पना दिली होती.. सुरवातीला दोघींना धक्का बसला असला तरी त्या नात्यात दोघांचीही होणारी घुसमट लक्षात घेता; त्यांनीही त्यांच्या निर्णयाला मान्यता दिली होती.. त्यानंतर संध्या तिच्या आईच्या घरी राहण्यासाठी निघाली होती..
'मम्मा, तु कुठे चाली? भुर्र? मला ने नं..'- छोट्या आशिषने संध्याच्या हातातली बॅग बघून तिला मध्येच अडवलं होतं.. त्याचा निरागस चेहरा पाहून संध्याला भरून आलं होतं.. तिच्यातली आई जागी होत; तिने जागीच बॅग टाकून त्याच्याकडे धाव घेतली होती.. त्याला कडेवर उचलून ती पटापट त्याच्या गालावर किस करत होती.. तिचे डोळे भरून आले होते..
'तु का लडते?? तुला कोणी बू केला मम्मा?'- आशिषने बोबड्या शब्दांत तिच्या रडण्याचे कारण विचारलं तशी ती अधिकच दुःखी झाली.. ती अजूनच स्फुंदून रडू लागली.. तिची तशी बिकट अवस्था पाहून रवीने जाऊन आशिषला आपल्याकडे घेतले..
'बच्चा, मम्मा कुठे नाही चालली..इकलेच आहे.. ती तुझी आजी आता म्हातारी झाली ना.. मग तिच्याजवळ कोणीतरी असायला हवं ना.. म्हणून मम्मा तिची काळजी घ्यायला तिकडे चालली.. आपण जाऊ हा मम्माला भेटायला मध्ये मध्ये..'- रवीने त्याला समजावलं तशी त्याने मान डोलवत संध्याला बाय केलं..
'रवी.. रवी.. आय नो.. एक आई म्हणून मी आशिषवर खूप मोठा अन्याय करतेय.. बट..बट आय लव्ह हिम..आय लव्ह हिम.. सध्या तरी माझ्या हातात दुसरं काहीच नाही..प्लीज टेक केअर ऑफ हिम.. आणि.. आणि.. स्वतःची पण काळजी घे.. चल येते मी..'- लेकासमोर थांबणं संध्याला खूप कठीण जात होतं तशी रवीचा निरोप घेऊन ती बाहेर पडली होती..
ती गाडीत बसताच रवीने आशिषला उराशी कवटाळत आपल्या अश्रूंना वाहू दिलं होतं..
---##---
माधवराव सकाळी नऊ वाजताच साटम कुटुंबीयांच्या घरी पोहचले होते.. त्यांची मुखचर्या रागीट भासत होती.. आल्या आल्याच त्यांनी शरयुला रागाने हाक मारली होती..
त्यांचा आवाज ऐकून सारेजण हॉलमध्ये धावत आले होते..
क्रमशः
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!
कथा अंतिम वळणावर असल्यामुळे काही वाचकांना काही गोष्टी उगीच लांबवल्यासारख्या वाटू शकतात परंतु कथेचा प्रवाह एक सुरळीत राहण्यासाठी प्रत्येक पात्राचं व्यक्त होणं गरजेचे आहे.. जेणेकरून कथेच्या शेवटी तुम्हांला सर्व गोष्टींचा योग्य उलगडा होईल..
आणि दुसरं म्हणजे आशिष साटम आणि आशिष पाटिल या दोन नावांमध्ये काही वेळा गोंधळ उडण्याची शक्यता असेलच परंतु तुम्ही शांतपणे कथा वाचलीत तर तेवढा गोंधळ होणार नाही..खात्री आहे की तेवढी काळजी तुम्ही घ्यालच..
© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा