अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 45

This part is in continuation with earlier series..

'राहुल, अरे केबिनमध्ये केवढे मोठे डास होते ना रे?? बघ ना आपल्याला नाही चावले म्हणून बरं झालं.. दादा आमचा भलताच दुर्दैवी.. केवढा चावला बघ त्याच्या गालावर..'- आशिषच्या गालावरचे दाताचे व्रण पाहून आशा म्हटली तसा आशिष लाजून पुढे निघून गेला तर आशा आणि राहुल मागे खळखळून हसत राहिले होते..

                                   ---------


पुढे आठवड्यातून दोनदा राहुलला सेशन्ससाठी संध्याकडे जावे लागत असे.. 

आशिषसुद्धा काही न काही निमित्त काढून राहुलला सोबत म्हणून जात असे.. संध्या राहुलशी बोलत असताना तो निरागसपणे तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत बसे.. तिच्या चेहऱ्यावरच्या बदलत्या भावानुसार त्याचे भाव देखिल बदलत असत... ती हसली की हा सुद्धा खुदकन हसे, तिचा चेहरा गंभीर झाला की याचा चेहरापण उतरलेला होई..

राहुलशी बोलता बोलता; संध्याची चोरटी नजर आशिषवरच खिळलेली असे.. त्याला आपल्याकडे एकनजर पाहताना पाहून; तिच्या मनात गुदगुदल्या होत.. त्याची नजर अगदीच असह्य होत, लाजल्यासारखं झालं की संध्या हसून त्याच्याकडे वळत; त्याच्या नजरेला नजर भिडवत त्याच्या हातावर हलकेच चापट मारे आणि मग दोघेही हसून नजर दुसरीकडे फिरवत..

'अरे या पेशंटला काही इज्जत आहे की नाही?? मला पण बघा कोणीतरी??'- राहुल त्याही अवस्थेत ओरडे तसे तिघेही खळखळून हसत..

या साऱ्या खेळीमेळीतील सेशन्सचा राहुलवर खूप छान परिणाम होत होता.. संध्याने आशाचीसुद्धा काही सेशन्समधून आत्मविश्वास बांधणी करून दिली होती. त्यामुळे राहुलला घरूनदेखिल छानपैकी मनोबळ मिळत होत.. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून; त्याच्या अंतर्मनातूनपण लवकर बरे होण्याची इच्छा प्रबळ होत होती आणि त्याच भावनेतून त्याच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा होत होती..

संध्या आणि आशिष दोघांनाही त्यांचं नात नव्याने गवसलं होतं.. राहुलच्या सेशन्स व्यतिरिक्तदेखिल ती दोघे बाहेर एकमेकांना भेटू लागले होती.. एकमेकांची सांसारिक विवशता दोघांनीही एक-दूसऱ्याला सांगितली होती.. दररोज होणाऱ्या मानसिक घुसमटीला तसेही दोघे कंटाळलेलेच होते.. राहुलचं आजारपण त्यांच्या नात्यासाठी नवसंजीवनी देणारं ठरलं होतं.. दोघांच्या चेहऱ्यावर आता नव्याने टवटवीतपणा दिसू लागला होता.. आपापल्या घरांत वावरतानापण त्यांचा आनंद कोणाच्या नजरेतून सुटण्यासारखा नव्हता.. 

                                    ---##---

'संध्या?? आजपण लेट?? तु आजकल घरी खूपच लेट यायला लागली आहेस?'- रवीने रात्री नऊला घरी पोहचलेल्या संध्याला दरवाज्यातून आत येताच टोकलं होतं..

'तुला काय वाटतं रवी? कुठे असेन मी??'- संध्याने रॅकमध्ये चप्पल सरकवता, त्याला प्रतिप्रश्न केला होता..

'कु..कुठे म्हणजे? क्लिनिकला ना? मला म्हणायचं होतं की ते..ते तु इतक्या पण अपॉईंटमेंट घेऊ नकोस की तुला आराम करण्यासाठी वेळ मिळणार नाही..'- रवीने म्हटलं..

'तुला नेमकं हेच म्हणायचं आहे रवी??'- संध्या..

'हो, मग?? अजून दुसरं काय?'- रवी

'मी एक मानोपसचार तज्ञ आहे रवी.. विसरतोस तु.. एनी वे, तुझ्या ऍकच्युअल प्रश्नाचं उत्तर आहे की आजकल जेव्हा जेव्हा मला उशीर होतो; तेव्हा तेव्हा मी आशु सोबत असते.. आय मिन आशिष साटम.. माय वन अँड ओन्ली लव्ह.. हॅप्पी??'- संध्याने त्रोटकपणे त्याला उत्तर दिलं तसा रवीचा चेहरा पडला होता..

'हे ठीक नाही आहे संध्या..तुम्ही दोघेही आपापल्या पार्टनरसोबत चिट करताय.. नॉट गुड.. नॉट गुड'- रवीने काहीसं चिडून म्हटलं तसे संध्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते..

'काय बोललास?? चिटिंग? आपल्या पार्टनरसोबत?? तु..तुझं एक्सकॅटली राईट आहे रवी.. वुई बोथ आर चिटिंग विथ अव्हर पार्टनरस्.. मी तुझ्यासोबत राहून आशु सोबत चिट करतेय आणि आशु शरयू सोबत राहून माझ्याशी चिट करतोय.. हेच फॅक्ट आहे रवी.. हेच फॅक्ट आहे..'- संध्याला राग अनावर झाला तसे तिने डोळे गच्च मिटून घेतले.. हॉल मधल्या डायनींग टेबलवर बसून तिने ग्लासभर पाणी पिऊन घेतले आणि परत एक नजर तिने रवीकडे पाहिलं..

'रवी, तुला काहीच वाटत नाही का रे माझ्याबद्दल?? काहीच नाही?? माझ्यावर प्रेम करतोस ना?? मग माझ्या फिलिंग्स, माझ्या इमोशन्सची तुला आजही कदर नाही का रे?? तुला झालेला पश्चात्ताप इतका टेम्पररी होता की आज परत तु माझ्यासाठी पजेसिव्ह झालास?? '- संध्याच्या डोळ्यांत हलकं पाणी तरळलं तस रवीला वाईट वाटलं..

'राईट संध्या.. मे बी, यु आर राईट.. बरोबर आहे तुझं.. मी खरंच पजेसिव्ह झालोय ग तुझ्यासाठी.. बघ ना..साडे तीन वर्षापूर्वी , तु आशिषसोबतच नात संपवून माझ्या फॅमिलीसाठी मला स्वीकारलं तेव्हाच मला वाटलं होतं की मला आता फुल ट्राय करायला हवं.. तु मागची तीन वर्षे माझ्या फॅमिलीसाठी मन मारून जगलीस आणि मी.. मी फक्त तुझं मन जिंकण्यासाठी जगलोय ग.. तु.. तु समजून घे ना ग मला.. तु.. तु माझं पहिलं प्रेम आहेस ग.. आशिषच्यापण आधीपासून मी तुझ्यावर प्रेम करतोय.. आणि बघ ना आज माझा हक्क असूनही मला तू मिळत नाहीस.. मग...मग मी नाही तडफडणार का ग?? आज माझ्या डोळ्यादेखत माझी बायको तिच्या प्रियकरासोबत लाईफ एन्जॉय करतेय आणि मला तिच थेंबभरही प्रेम नशिबात मिळू नये या पेक्षा जास्त वाईट काय होऊ शकतं?? तु.. तु माझ्या जागी स्वतःला ठेवून विचार कर ना ग?..'- रवीच्या डोळयातून अश्रुधारा वाहू लागल्या होत्या..

'रवी, सिच्युएशनच अशा आहेत की आपण कोणालाच दोष देऊ शकत नाही.. ना तु मला ऑर ना मी तुला.. तु जेव्हा डॅडसोबत सामील होत जबरदस्ती माझ्याशी लग्न केलंस तेव्हाच मी तुला क्लिअर केलं होतं.. आजही करते, संध्या ही कालपण आशिष  साटमची होती, आजही आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याचीच असेल.. माझं तुझ्यासोबतच लग्न, आपल्या मुलाचा जन्म ही सारी माझी मजबुरी होती बट माझं आशुवरच प्रेम कधीच कमी होणार नाही.. कधीच नाही..'- संध्याने निर्धाराने रवीला सांगितलं..

'आणि मोठा झाल्यावर आपल्या आशिषने तुला तुझ्या आशुला विसरून जाण्याचा हट्ट केला तर?? त्याने आपल्याला एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले तर?'- रवीने विनाकारण काहीही बोलण्याचा प्रयत्न केला..

'ओह.. आता तू त्या आशेवर आहेस की काय?? तुला मग आतापासूनच त्याच्या मनात माझ्याबद्दल राग भरावा लागेल.. बट यू नो? त्याचाही काहीच फायदा होणार नाही.. '- संध्याने हलकं हसत रवीला उत्तर दिलं..

'कस??'- रवी..

'जर तशी वेळ आलीच तर मी स्वतःला संपवायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही रवी..मग त्याही वेळेस संध्या शेवटपर्यंत आशुचीच  राहील..'- संध्याने निर्विकारपणे उत्तर दिलं तसा रवी हादरला..

'का..काय म्हणालीस तु?? तु.. तु असं मनातच कस आणू शकतेस संध्या?? आ.. आणि समज आशिषने तुझी साथ नाही दिली तर?? तो शरयुसोबत सेटल झाला तर?'- रवीने प्रश्न विचारताच संध्या खळखळून हसली होती..

'अरे वेड्या, मी त्याला गृहीत धरतच नाहीये.. मी माझं सांगतेय.. तो जर शरयुसोबत सेटल होत असेल तर तो त्याचा लूकआऊट आहे.. मी माझं प्रेम मात्र कायमच ठेवणार आहे.. मी  माझ्या फिलिंग्स सोबत कधीच चिट करणार नाही मि. रवी?? आय होप की तुला आता सगळं क्लिअर असेल??'- संध्या बोलून बेडरूमच्या दिशेने निघता निघता अचानक थांबून परत रवीकडे वळली होती..

'आणि रवी, इफ यु रिमेम्बर, जेव्हा मी तुझ्या फॅमिलीसाठी; हा सर्व ड्रामा करण्यासाठी रेडी झाली होती तेव्हाच मी तुला एक गोष्ट फॉलो करायला सांगितली होती.. तु तुझं लिमिट क्रॉस करणार नाहीस म्हणून.. आणि मला वाटतंय की आज तु हा टॉपिक काढून त्या लाईनजवळ आला आहेस.. जस्ट टेक केअर की तू ती लाईन क्रॉस करणार नाहीस..'- संध्याने काहीश्या रागातच रवीला आठवण करून दिली तशी रवीने मान खाली घातली आणि तो मागे फिरला..

                            ---##---

'आई, डॉक्टरकडे फक्त तुमच्या जावयाचीच ट्रीटमेंट चालू आहे ना ओ?? नाही कारण आजकल तुमचा लेक खूपच खुश असतो, आठवड्यातून तीन-चार वेळा तर रात्री उशिरा घरी येतो.. कधी कधी सेशन्स नसली तरी साहेब डॉक्टरांना बाहेर प्रायव्हेटली भेटतात..त्याला म्हणावं मांजरीने डोळे मिटून दूध पिल तर याचा अर्थ असा नाही की तिला दूध पिताना कोणी पाहिलं नाही..'- शरयूने सर्वजण जेवायाला बसले असताना मुद्दाम टॉपिक छेडला होता..

'शरयू, जेवून घे आधी बाळा.. वाटलं तर नंतर बोलू..'- साटम काकांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला होता..

'इथे माझ्या संसाराला लागलेली आग तुम्हाला दिसत नाहीये का ?? माझा नवरा.. कोणाचा?? माझा.. माझा नवरा खुलेआम बाहेर गुलछर्ये उडवतोय, मेव्हण्याच्या नावाखाली स्वतःच्या प्रेमिकेला भेटायला जातोय; आणि तुम्ही म्हणताय की जेवून घेऊ?? माझ्याजागी तुम्ही असतात तर तुम्हांला तरी घास गेला असता का?? सांगा?? '- बोलता बोलता शरयूने टेबलावर जोरात आपली मूठ आदळली तशी तिच्या ताटातली डाळ सांडून काहीशी तिच्या आणि आशिषच्या अंगावर उडाली होती.. तिचा अवतार पाहून साटम काका-काकूंना कापरे भरले होते... आशिष मात्र शांतपणे आपलं जेवण जेवतच होता तशी शरयू अधिकच रागाला गेली होती..

ती पुढे काही बोलणार तितक्यातच आशिषने तिच्याकडे कटाक्ष केंद्रित केला होता..-' बाबांनी काय सांगितलं ते डोक्यात नाही गेलं का?? गप्प, निमूटपणे जेवून घे... आणि नसेल जेवायचं तर उठून गेलीस तरी चालेल.. आम्हांला जेवू देत.. साटमांच्या घरी ताटात वाढलेल्या अन्नाचा अपमान करण्याची पद्धत नाहीये.. आई- बाबा; तुम्ही जेवण चालू ठेवा..असेही हा तुझ्या- माझ्यातला विषय आहे शरयू.. बोलू आपण यावर जेवून झाल्यावर..'

आशिषच्या अशा दुर्लक्ष करण्याने शरयू अधिकच संतापली होती.. रागातच ती जेवण तसच टाकून बेडरूममध्ये जाऊन बसली होती.. जेवण आटपून साटम काकू आणि आशिषने मिळून सारी साफसफाई केली होती.. शरयू बेडरूमच्या बाहेरसुद्धा आली नव्हती..

'आशिष, अरे बघ जरा शरयुला..तुझ्या गोड शब्दांना आसुरली आहे रे ती.. जेव्हापासून तु राहुलची संध्याकडे ट्रीटमेंट सुरू केली आहेस तेव्हापासून तिने जेवणच टाकलंय रे.. एक एकदा दुपारचीपण जेवत नाही.. एकटीच शून्यात नजर लावून बसते.. कधी अश्विनीला मिठीत घेऊन रडते तर कधी रागात भिंतीवर मुठी आपटत बसते.. सावर रे तिला.. काहीही झालं तरी बायको आहे तुझी ती.. तुझ्या मुलीची आई आहे ती.. मला फार काळजी वाटते रे पोरीची... आधीच खूप भोगलं आहे बिचारीने...'- साटम काकींनी बेडरूमकडे निघालेल्या आशिषला अडवून आपलं मत सांगितलं..

'तुझी आई बोलतेय ते योग्यच आहे आशिष, तुझ्यावर शरयूचाच हक्क आहे आणि तो तु नाकारू शकत नाही..'- साटम काकांनी बायकोच्या म्हणण्याला दुजोरा दिला होता..

'अच्छा म्हणजे आज तुम्हांला तिचा पुळका येतोय.. मग तुम्ही सर्वांनी मिळून संध्यावर केलेल्या अन्यायाचं काय?? आठवतं ना तिची काहीच चुकी नसताना तुम्ही तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं? तेव्हा तिला तुमच्या नजरेत गुन्हेगार ठरवणारी ही.. ही तुमची लाडकी शरयूच होती ना?? काय चुकी होती बाबा तिची?? सांग आई काय चुकी होती तिची? माझ्यावर प्रेम केलं ही चुकी की अरविंद शिर्केसारख्या माणसाची मुलगी बनून जगात आली ही चुकी?? तिची काहीच चूक नव्हती ग.. काहीच चुकी नव्हती.. तरी देखिल तिला शिक्षा दिलीत तुम्ही सर्वांनी.. या.. याच घरात तिचा इन्सल्ट केला होता तुम्ही सर्वांनी.. आज..आज ती सगळं विसरून तुमच्या मुलीचा संसार सावरतेय.. तुमच्या जावयाला ट्रीट करतेय.. पण.. पण एकदा तरी तुम्हांला तिला भेटून तिची माफी मागणं तर दूर, किमान बोलावसं तरी वाटलं?? ती रोज तुमच्याबद्दल विचारते.. तुम्हाला ज्या प्रोटीन टॅबलेट चालू केल्या आहेत ना? त्या..त्या पण तिनेच दिल्या आहेत.. कळलं?? ठीक आहे चला.. संध्याच सोडा.. ती तर परकी आहे.. पण..पण मी.. मी तर तुमचा स्वतःचा पोटचा मुलगा आहे ना ओ?? मग माझ्या भावनांचा काहीच विचार नाही तुम्हांला?? शरयू मला कधीही नकोच होती.. तुम्ही सर्वांनी जबरदस्ती ती माझ्या गळ्यात मारलीत.. परिस्थितीच अशी होती की मला पण मनात नसताना हो म्हणावं लागलं..आज इतक्या वर्षाच्या घुसमटीनंतर जर मला माझ्या संध्यासोबत पुन्हा एकदा जगायला मिळत असेल तर शरयुला काय प्रॉब्लेम आहे?? सांगा ना काय प्रॉब्लेम आहे?? तु सांग शरयू.. तु सांग.. असं लपून ऐकण्यापेक्षा समोर येऊन उभी रहा आणि बोल..'- आशिषने एकजात सर्वांना सुनावलं होतं..

साटम काका-काकूंना संध्याबाबत झालेला अन्याय पटला होता तशी त्यांनी खजील होत मान खाली घातली होती.. साटम काकांनी जाता जाता आशिषच्या खांद्यावर हात ठेवत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला होता..

'आम्हांलापण मान्य आहे रे.. संध्यासोबत आम्ही जे काही वागलो त्याचा आम्हांला कायम पश्चातापच असेल.. तु तिच्याशी बोलण्याचं बोलतोस खरं पण आमची तिच्या समोर उभं राहण्याचीपण हिंमत नाही रे.. ती.. ती खरंच वेगळंच रसायन आहे.. अशी मुलगी देव प्रत्येकाला देवो पण असे भोग कोणाच्याच वाट्याला नको येवो..तिला आमचा निरोप दे आशिष; जमलं तर या म्हातारा-म्हातारीला माफ कर म्हणावं..बाकी माझ्याकडे तरी तिच्याबद्दल बोलायला शब्दच नाहीत..'- एवढं बोलून साटम काका-काकी त्यांच्या खोलीत परतले होते..

आशिषची नजर गेली तर त्याला शरयू धुसफूसत समोर उभी असलेली दिसली होती... आशिषचा शब्द आणि शब्द तिने ऐकला होता.. त्याच्या मनात असलेल संध्याबद्दलचं प्रेम ऐकून ती भयंकर चिडली होती.. त्यात तिला पाहून शांत झालेल्या आशिषला पाहून तिचा राग अधिकच पराकोटीला पोहचला होता..

'तुझ्या डोळ्यातला राग स्पष्ट दिसतोय शरयू.. बट आय एम सॉरी.. माझा नाईलाज आहे.. मी माझ्या मनातली संध्याची जागा तुला कधीच देऊ शकत नाही हे सत्य आहे आणि ते कधीच बदलणार नाहीये.. आणि..आणि हे सत्य तु जितक्या लवकर स्विकारशील हे तुझ्यासाठीच नव्हे तर सर्वांसाठी चांगलं असेल...'- आशिषने शांत स्वरात शरयूसमोर आपलं म्हणणं मांडलं..

'हा..हाऊ डेअर यु आशु.. तु.. तुझी हिंमत कशी झाली माझ्यासमोर संध्याबद्दलच्या तुझ्या फिलिंग्स सांगायची.. तु.. तु विसरलास ना... विसरलास ना की मी.. मी काय करू शकते ते.. तेव्हा तर मला फक्त तिला त्रास द्यायचा होता तर मी तिला इतकं रडवलेलं होतं... आणि..आणि तरी ती आज माझा नवरा माझ्यापासून दूर करू पाहतेय.. मी.. मी सोडणार नाही तिला आशु.. तुला माझ्यापासून वेगळी करणारी प्रत्येक संध्या मी संपवून टाकेन.. कळलं तुला.. संपवून टाकेन मी संध्याला...'- शरयू संतापाने लाल झाली होती.. अत्यांतीक क्रोधाने तिचं सर्वांग थरथरत होतं..

'माहीत आहे मला.. मला माहित आहे की तू काय करू शकतेस आणि काय नाही.. म्हणूनच हात जोडतो.. आधीच तुझ्यामुळे खूप भोगलंय आम्ही.. आता तरी आम्हांला जगू दे ग.. प्लीज..'- आशिषने शरयुसमोर हात जोडले होते..

'हे कधीच शक्य नाही आशु... तुला माहीत नाही; मी काय चीज आहे.. तु..तु फक्त माझा आहेस.. फक्त माझा..'- बोलता बोलता शरयू किचनकडे वळली होती.. आशिषला काही समजण्याआधीच तिने खाली पडलेली फिनेलची बाटली तोंडाला लावली होती..

'शरयू.. स्टॉप इट... शरयू'- आशिष धावेपर्यंत शरयूने अर्धी बॉटल पिऊन टाकली होती...

क्रमशः


© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all