Login

अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 40

This story is in continuation with earlier series..

'शरू, बच्चा हे तु ठीक नाही केलंस.. खोटं बोललीस तु माझ्याशी... उतारवयात केवढं मोठं पाप करायला भाग पाडलस...'- माधवरावांनी बाहेरून सर्व संवाद ऐकला होता..

                           --------------- 
'प...पप्पा?? तुम्ही..तुम्ही कसे अचानक?'- शरूला धक्क्यावर धक्के बसत होते..

'उगाच आलो ना ग मी.. आज आलो नसतो तर कमीतकमी भ्रमात तरी राहिलो असतो; की माझी लेक परी आहे.. पण..पण तू तर क्रूर खलनायिका निघालीस ग... या सगळ्यांबरोबर केवढे खेळ खेळलीस तु?? किती मन एकाच वेळी दुखावलीस?? स्वतःच्या जन्मदात्या बापाशी खोटं बोललीस?? काय...काय चालू आहे तुझ्या डोक्यात शरयू?? तुला...तुला आजही तुझ्या आईचा सुड घ्यायचा आहे?? सांग शरयू... एकदाच काय ते सांग मला..'- माधवरावांना संताप आणि दुःख एकाच वेळी अनावर झाले होते...

काहीवेळ घरात वातावरण एकदम निस्तब्ध झाले होते... सर्वांच्या नजरा शरयूवर खिळल्या होत्या... शरयूची मुखचर्या एकदम लाल झाली होती... रागाने तिचे सर्वांग थरथरत होते..

'पप्पा... मंदाकिनी देशपांडेंने भोगलेल्या नरकयातना तुम्ही विसरू शकता.. तिची लेक नाही.. कधीच नाही.. मी कोणालाच सोडणार नाही.. भले मला त्यासाठी कितीही आणि कोणाचेही बळी द्यावे लागले तरी ते मी देणार...'- शरूच्या डोळ्यांत अंगार फुलला होता तर तिच्या आवाजाचा स्वर क्रोधमय झाला होता..

'सगळे म्हणतात ती अतिताणामुळे लवकर गेली... सगळे म्हणतात की ती वेडी होती.. पण ती तशी नव्हती ना पप्पा... सांगा ना पप्पा, मम्मी तशी नव्हती ना ओ..'- अचानक शरू ओक्सबोक्शी रडू लागली होती..

तिला तस रडताना बघून सर्वजण  विस्मयचकीत झाले होते.. फक्त तिच्या वेदनांची जाणिव असलेल्या माधवराव आणि संध्याच्या डोळयांत पाणी होतं..

'ती वेडी नव्हती पप्पा.. काही दोष नव्हता तिचा..तरीपण लोकांनी आपल्याला टोमण्यांचे दगड मारले.. किती हाल झाले तिचे.. स्वतःच मरणपण तिला समजलं नाही पप्पा..कसं माफ करू मी तिच्या गुन्हेगारांना पप्पा??...कसं माफ करू??..'- आईच्या आठवणीने शरयूला दुःख होत होतं.. बाजूच्या सोफ्यावर हात आपटत शरयूचा आक्रोश चालूच होता.. तिला तस तूटलेलं पाहून संध्या तिला सावरायला पुढे सरसावली; तोच शरू पटकन मागे सरकली होती.. तिच्या चेहऱ्यावर परत एकदा क्रोध दाटून आला होता.. 

'तु..तु दूर हो.. चीड आहे मला तुमची.. अरविंद शिर्केची आणि त्याच्या पुर्ण खानदानाची.. मामा नाही कंस मामा होता तुझा बाप.. कोण म्हणतं माझी मम्मा जळून मेली.. अरे खून केला त्याने स्वतःच्या सख्ख्या बहिणीचा... खून केला मामाने माझ्या मम्माचा!!..'- शरूला पुन्हा एकदा अश्रू अनावर झाले होते..

 यावेळेस मात्र संध्या लांबच उभी राहीली होती..

आशिष, आशा, साटम काका-काकी, राहुल आणि आता रवी; सर्वांच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते.. सगळ्या घटनाक्रमात येणाऱ्या अनपेक्षित वळणांनी त्यांच्या डोक्याचा भुगा होणं तेवढा बाकी होता..

'तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे ना की मी का अशी वागली? का मी कारस्थान रचून या दोघांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला..तर मग ऐका सांगते..'- शरूने दोन्ही हाताने डोळ्यातले पाणी फुसत स्वतःला शांत केलं..

'मंदाकिनी शिर्के.. एक होतकरू नाट्यकर्मी.. कमालीची अभिनयक्षमता, नाट्यक्षेत्रात स्वतःचं नाव कमावण्याची मनिषा.. पण स्वप्न उमलण्याआधीच ते चिरडलं गेले.. आणि.. आणि चिरडणारा कोण?? कोण माहितेय.. अरविंद शिर्के.. तिचा मोठा भाऊ.. बहिणीची प्रगती डोळ्यांत खुपत होती त्याच्या.. आपल्यापेक्षा बहिणीला मिळणारा मान सन्मान त्याला पचत नव्हता...वडिलांचे कान भरून; तिच करिअर, तिची स्वप्न संपवली मामाने.. मम्माने सर्व आकांक्षा विसर्जित करून आपलं शिक्षण पुढे सुरू ठेवलं... कॉलेजमध्ये असतानाच तिच एका मुलासोबत प्रेमप्रकरण सुरू झालं.. जिवापाड प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर.. तेही मामाला मान्य नव्हत... जातीभेदाच्या धमकीने त्याने मम्माला ते नातं जबरदस्ती संपवायला लावलं.. त्या मुलाला प्रेमविरह सहन नाही झाला; आत्महत्या केली त्या बिचाऱ्याने.. या वेळेस मात्र मम्मा सावरली नाही..सैरभैर झाली.. तिच्या प्रियकराच्या मृत्यूने ती डिप्रेशनमध्ये गेली.. कसेबसे उपचार करून घरच्यांनी तिला नॉर्मल केलं...पण तिच्या मनाला धसका बसला तो कायमचाच.. कधीच सावरली नाही ती आयुष्यभर.. त्यातही ती नको नको बोलताना ; तिच लग्न पप्पांबरोबर जबरदस्ती लावलं गेलं... दोघांच्या वयात अंतर किती? १४ वर्षे.. किती? तब्बल १४ वर्षे...लग्नावेळी नवऱ्याचं वय किती? तर ४४ वर्षे.. नवरा तेवढा चांगला मिळाला.. डॅडनी तिला खूप समजून घेतलं, तिला बऱ्यापैकी सावरलं...हळूहळू ती कुठे डॅडसाठी जगायला लागली होती..'

'तितक्यात...तितक्यात या संध्याच्या आईने भर नातेवाईकांमध्ये तिचा अपमान केला.. लग्नाला ४ वर्ष झाली तरी घरात मुलबाळ नाही म्हणून तिला सर्वांसमोर हिणवले गेले..तिच मन पुन्हा एकदा तुटलं..या वेळेस तुटलं ते कधीच न जुडण्यासाठी.. ती कायमच स्वतःच्या धुंदीत राहू लागली.. स्वतःला वेगळ्याच कोषात तिने गुंतवून घेतलं.. तिला बाहेर काढणं कोणालाच जमलं नाही अगदी डॅडनापण नाही..'- आईचे हाल आठवून कंठ दाटल्यामुळे शरूला पुढे बोलता येईना तशी ती थांबली..

आतापर्यंतची तिची कहाणी ऐकून सर्वांनाच वाईट वाटत होतं..

'मम्माने तिच मानसिक संतुलन पुर्ण गमावलं होतं.. घरची सगळी काम करायची ती; अगदी काही न चुकवता.. पण अगदी सेम रोबोट.. काही बोलणं नाही की काही भावना नाही.. निव्वळ यांत्रिकपणा.. हाईट म्हणजे जेव्हा मी तिच्या पोटी जन्म घेतला; त्याचपण तिला काही सोयरसुतक नव्हतं.. आई असून पण मी कायम पोरकीच राहीली ओ.. माझा काही दोष नसताना सुद्धा मला कधी आईचं प्रेम मिळालं नाही.. तुम्हांला.. तुम्हांला ही मी कुठल्यातरी फिल्मची स्टोरी सांगते असंच वाटत असेल ना..ना?? तर विचारा या माधवराव देशपांडेंना... एवढा मोठा वकील.. कोर्टात नुसता उभा राहीला तरी समोरच्या पार्टीला घाम फोडणारा.. नुसत्या नावाने प्रतिस्पर्ध्याला धडकी भरवणारा माझा बाप; त्याच्या बायकोची अवस्था बघून रोज ढसाढसा रडायचा.. फक्त आणि फक्त माझ्यासाठी जगलाय तो..'- शरूच ऐकून नकळत माधवरावांच्या हृदयातली जखम परत एकदा ताजी झाली होती.. पत्नीची दुरावस्था आठवून त्यांच्यासुद्धा डोळयातून पाणी वाहू लागले होते...

'शेवटी शेवटी माझ्या मम्माची मेंटल कंडिशन इतकी बिघडली की एखाद काम हातात घेतलं की त्यातच तिची तंद्री लागायची.. कपडे धुवायला घेतले की ती वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकून ; मशीनकडे तासंतास अशीच बिनकामाची बघत बसायची.. जेवण करताना चपाती करपून गेली तरी तिला त्याच भान नव्हतं.. डॅडने पाण्यासारखा पैसा खर्च केला पण.. पण ती कधी बरी झालीच नाही.. कधी बरी नाही झाली..'- रडून रडून शरूची अवस्था खूप बिकट झाली होती..

'तुम्ही विचार करा काय अवस्था असेल माझी त्यावेळी?? माझं बालपण कस गेलं असेल?? आजही ते दिवस आठवले तरी अंगावर काटा येतो.. मम्मा जास्त सिरिअस झाली तेव्हा मामा आणि त्याची ही नौटंकी फॅमिली आमच्या घरी माफी मागण्याचा ड्रामा करायला आली होती.. सिर्फ और सिर्फ ड्रामा.. लोकांनी यांच्या तोंडात शेण घालू नये म्हणून धडपडत होते हे लोक... त्यांनी त्यांना हवं तसं नाटक केलं आणि मग काय..आमचे संतश्रेष्ठ श्री. माधव देशपांडेंनी त्यांना माफ केलं... आणि त्याहीपेक्षा माझी मम्मा.. जी उभ्या आयुष्यात माझ्याशी कधीच बोलली नाही; ती...ती बोलली.. बोलली तीपण तिच्या सर्वात मोठया गुन्हेगारासोबत.. तिने चक्क त्याची माफी मागितली.. जे झालं त्यात मामाची काही चूक नाही बोलली ती...शीट.. आय डोन्ट नो की तिने असं का रिऍक्ट केलं...'- शरयुला बोलता बोलता धाप लागली होती तस संध्याने पुढे येऊन तिला पाणी ऑफर केलं होतं.. शरयूने पाणी घटाघटा पित काही क्षणासाठी आपले डोळे मिटले होते.. त्याहीवेळी तिच्या डोळ्यातल्या अश्रुधारा थांबल्या नव्हत्या..

'मग.. मग पुढे?? काकींचा अपघात कसा झाला??'- आशाने प्रश्न विचारला..

'मी बोलली ना की लास्ट लास्टला शी लॉस्ट हर ऑल मेंटल साऊंडनेस.. एकदा..एकदा'- शरूला हुंदका आवरत नव्हता तस साटम काकींनी तिला पाठीवरून हात फिरवत धीर दिला होता..

'एकदा ती अशीच किचनमध्ये गेली.. तिने गॅस चालू केला आणि..आणि.. लायटर चालू केलं.. लायटर चालू केलं बट आफ्टर हाल्फ अवर... संपली माझी मम्मा त्या ब्लास्ट मध्ये.. संपली.. सुटली हेल मधून..'- शरयूचा आक्रोश टिपेला पोहचला होता.. सर्व दुःखद आठवणी पुन्हा शरयूच्या तोंडून परत डोळयांसमोर येताच माधवरावांच्या चेहऱ्यावर गडद वेदनेची छटा पसरली होती.. दुःख आवेगात ते मटकन जवळच्या खुर्चीत बसले होते...

शरयूची कर्मकहानी ऐकून; सर्वांची मन हेलावून गेली होती.. तिच्याशी काय बोलावं, कोणालाच सुचत नव्हतं..  

न राहवून संध्या तिच्याकडे गेली होती.. तिचा चेहरा हाताने वर उचलून तिने तिच्या डोळ्यातले अश्रू फुसले होते.. 

'शरू, अग का एवढा त्रास करून घेतलास स्वतःला?? अग मी तुला मागे पण बोलली होती ना ग? तुला हवी ती शिक्षा दे मला.. माझ्या डॅडच्या गुन्ह्यांची शिक्षा तु मला दिलीस आणि ती मला मान्य आहे डिअर.. आय प्रॉमिस; तुला याबद्दल कोणीच काही बोलणार नाही सिस्टर.. अग.. अग.. आशिष श्वास आहे माझा आणि पुढे पण राहील... पण आता तो तुझा आहे, बायको आहेस तू त्याची.. मी..मी आज त्याला शेवटचं भेटायला आली आहे ग.. यापुढे तुमच्या संसारात माझी सावली पण इंटरफेर करणार नाही.. बट एकच रिक्वेस्ट आहे तुला शरू.. मला त्रास देण्यासाठी तुला खूप ऑप्शन भेटतील..बट तु आशुला दुखवू नकोस ग.. प्लीज शरू..प्लीज..'- संध्याने हात जोडत शरूला विनंती केली होती.. तिचे शब्द ऐकून आशिषला सर्व काही संपल्यासारखं वाटू लागलं होतं.. इतक्या वेळाने त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.. 

'ऍग्री...मान्य आहे मला.. तुला असं वाटतं की मी त्याला त्रास देऊ नये तर मला त्याच्याकडून एक कमिटमेंट घेऊन दे.. त्याने मला त्याच्या बायकोचा दर्जा द्यावा.. मनाने.. तो जर तस करणार असेल तर कोणालाच त्रास होणार नाही.. ना संध्याच्या आशिषला अन ना आशिषच्या संध्याला.. बट तो तुझा पास्ट असेल.. इथून पुढे आशिष हा ओन्ली शरयूचाच असेल..'- शरूने संध्याच्या डोळ्यांत डोळे घालत आपली मागणी मांडली तशी संध्या आशिषकडे वळली..

पुन्हा एकदा दोघांचा मूक संवाद सुरू झाला होता.. दोघांच्याही मनात वेदनांचा धुमाकूळ माजला होता.. डोळे अश्रूने डबडबले होते.. निव्वळ नजरेने दोघे एकमेकांना विनवत होते.. अखेर एकक्षणी आशिषने मान डोलवत आपला होकार कळवला होता..

त्याचा प्रतिसाद पाहून शरूला मनातून आनंद झाला होता.. 

'ओह गॉड.. मला वाटलं नव्हतं की तू एवढया लवकर याला कनव्हीन्स करशील.. ते पण एक शब्द न बोलता..हॅट्स ऑफ टू यू संध्या.. बट तु आमच्या लाईफमध्ये रिटर्न येणार नाही त्याची काय ग्यारंटी??'- शरूने प्रश्न मांडताच संध्या चमकली...

'म्हणजे??'- संध्या..

'तु रवीसोबत सेटल हो..'- शरूच्या मागणीवर सगळेच उडाले होते..

'शरयू.. इट्स नॉट फेअर.. तुला काही हक्क नाही तिला अस फोर्स करण्याचा..'- रवीने न राहवून शरयूला प्रत्युत्तर केलं होतं..

'मान्य आहे.. मी रवीसोबत सेटल होईल.. बट कस तो माझा लूकआऊट असेल..'- संध्याचे उत्तर ऐकून रवीला आश्चर्य वाटलं होतं..

'साटम काका-काकू, आशा जे झालं ते सोडून द्या.. माझ्या नकळतपणे मी तुम्हांला कधी दुखावलं असेल तर सॉरी.. काळजी घ्या.. थँक्स राहुल फॉर युअर ट्रस्ट.. माधवकाका.. सांभाळा स्वतःला.. काही बोलावसं वाटलं तर नक्की फोन करा.. येते मी.. रवी.. चल..'- संध्याने आशिष सोडून सर्वांचा निरोप घेतला होता.. जाताजाता आशिषकडे एकवार पाहत; दोघांनी नेत्रभाषेने त्यांच्या एकमेकांवरील प्रेमाच्या अमरतेची  ग्वाही दिली होती..

संध्या आणि रवी निघून गेल्यावर घरात एकप्रकारे सन्नाटा पसरला होता... शेवटी शरयूनेच पुढाकार घेत स्वतःला सावरले होते.. माधवरावांसमोर जात तिने त्यांच्या चेहऱ्यावर ओघळणारे अश्रुंचे थेंब फुसले होते..

'डॅड, जस्ट वेट.. मी तुम्हां सर्वांसाठी चहा घेऊन येते.. एवढी फिल्म झाली.. ब्रेक तो बनता हैं ना...'- शरू उठली आणि तितक्यातच जागीच कोसळली होती.. 


क्रमशः

तुम्हां सर्व वाचकांसाठी एक प्रश्न-- आतापर्यंत तुम्ही सर्वांची बाजू वाचली.. मग काय वाटतं कोणती जोडी जुळावी? आशिष-शरयू की आशिष-संध्या? नक्की कळवा..

© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all