आशिषचा त्रागा पाहून तिच्या मनाला भयंकर वेदना जाणवत होत्या.. शरीरावर पडणारे थेंब नक्की शॉवरचे की आपल्या अश्रुंचे हेच तिला कळत नव्हते.. कसंबसं तिने स्वतःला सावरलं होतं..
पण असंही एक वादळ तिच्या दिशेने जोरात घोंघावत येत होतेच..
---------------------
आशिषचा रक्ताळलेला हात शरयूच्या नजरेसमोरून हटत नव्हता.. स्वतःच्या आततायीपणाचं तिला वाईट वाटत होतं.. आज तिच्या नकळत तिच्या क्रूरपणावर; तिच्या आशिषबद्दलच्या प्रेमाने मात केली होती.. कसाबसा 'ऑल वेल ' चा मुखवटा लावून ती वावरत होती..
इकडे आशिषची मनस्थिती अजून बिघडली होती.. वासनेच्या डोहात पडून आपण आपल्याच प्रेमाशी प्रतारणा केल्याच त्याला भयंकर दुःख होत होतं.. हाताला झालेल्या जखमेपेक्षा त्याच्या मनाची जखम त्याला जास्त पीडा देत होती..
शरू आणि आशिष, दोघेही एकमेकांसमोर येताच; नजर फिरवून वावरत होते.. शेवटी शरयूने किचन गाठलं होतं तर आशिषने ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला होता..
साऱ्या घडामोडीत घड्याळाचे काटे अकरावर पोहचले होते.. आशिष ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडला होताच, तितक्यात जागीच थांबला ...
'आशा, राहुल?? तुम्ही?? काय विशेष??'- दोघांना सकाळीच पाहून आशिषने विचारलं..
'ते सगळं जाऊ दे.. दादा, तुझ्या हाताला काय झालं हे??'- आशाने त्याच्या हातावरची पट्टी पाहून विचारलं तशा आतून साटम काका-काकी धावत बाहेर आल्या...
'आशिष?? अरे काय हे?? कसं झालं हे?? शरू? शरू कुठे आहेस ग?? तुला तरी माहीत आहे का हे?'- काकूंनी दोघांवर प्रश्नांचा भडिमार सुरू केला तशा दोघांनीही माना खाली घातल्या...
'ते..ते.. सकाळी बेडवरून उठताना तोल गेला आणि जमिनीवर कोसळलो.. पडताना हातावर भार आला त्यामुळे असं... डॉक्टरकडेच चाललो आहे..'- आई-बाबांचे पुढचे प्रश्न लक्षात घेऊन आशिषने आधीच त्यांना सविस्तर असत्य सांगितले होते..
'शरू? बाळा, तु तरी सांगायचं ना ग आम्हांला?? किती लागलं आहे बघ...'- काकांच्या बोलण्यावर शरूने कान पकडून त्यांची माफी मागितली.. तोंडाने सॉरी बोलताना तिने नजर मात्र आशिषकडे ठेवली होती..
'चल दादा, मी येते तुझ्यासोबत डॉक्टरकडे...नाहीतर तु परत काहीतरी कारण सांगून रिटर्न येशील...'- आशाने काळजीने त्याचा दुखावलेला हात हातात घेतला.. तिच्या डोळयातून पाणी वाहू लागलं तस राहूलने तिला थोपटत तिला धीर दिला...
'आशिष?? अरे काय हे?? एवढं लागून तु इकडे गप्पा मारत बसला आहेस?? आशा? अग आधी त्याला डॉक्टरकडे तरी ने..'- संध्या दरवाजातूनच ओरडली तसे सर्व चमकले..
संध्या आणि आशिषची नजरानजर झाली तसे दोघे मनोमन सुखावले....न मिटणाऱ्या भेगा गेलेल्या जमिनीने, पावसाचे थेंब जरी पडले तरी आनंद करावा; अशी त्यांची भाववस्था झाली होती..
त्यांना तस एकमेकांना पाहताना पाहून शरूची चर्या फटकन बदलली होती...
'संध्या,आता इथे काय आहे तुझं?? तुझ्या बापाने माझ्या लेकाला मरणाच्या दारात ढकललं तेव्हा कोणत्या बिळात लपून बसली होतीस?? तेव्हा नाही कधी काळजी केलीस त्याची... कधी स्वतःच्या बापाला विचारलं का, की का अस केलात आशिषसोबत म्हणून?? नाही ना?? तुम्ही अमीर लोकं; एका माळेचे मनी ग.. आम्ही गरीब तुमच्यासाठी खेळणी ना ग??? जेव्हा वाटलं तेव्हा खेळायचं, नाही आवडलं तर दयायचे सोडून.. बरोबर ना?? अग निदान माझ्या मायेसाठी तरी सोडायचं माझ्या लेकाला?? माझ्या पोरीने एवढ तुला माफ केलं, तुला जीव लावला, तिच्यापण मनाचा विचार नाही केलास? चालती हो इथून आत्ताच्या आत्ता.. आज मी इथे तुझं एकही नाटक चालू देेेणार नाही'- साटम काकू रागाने थरथरत होत्या.. शरू मनातल्या मनात खुश होत होती.. आज ती काहीच बोलणार नव्हती, तिने आतापर्यंत खेळलेल्या खेळाची आज ती मजा घेणार होती..
'आई, तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय..'- राहुलने मध्येच आपलं मत मांडलं तसे साटम काकांनी त्याला हात दाखवून अडवलं..
'राहुल, मला माहित आहे तुमच्या दोघांच्या मैत्रीबद्दल..पण याचा अर्थ नाही की तिचा एवढा मोठा अपराध तु नजरेआड करशील.. अरे तु नव्हतास इकडे..आम्हांला माहिती; आम्ही काय काय भोगलं तेव्हा..आणि ही..ही मुलगी तेव्हा आमच्या आसपासपण फिरकली नव्हती.. म्हणे आशिषवर प्रेम केलं..अरे हाड..खेळ केलास ग माझ्या मुलाच्या भावनांचा..'- साटम काकांनीसुद्धा आपला संताप व्यक्त केला तसा राहुलने पुन्हा त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला; त्याच वेळी संध्याने हातानेच त्याला थांबवलं... आणि नकळत तिची नजर आशाकडे गेली.. तिच्या नजरेतसुद्धा संध्याला एकप्रकारची घृणा स्पष्ट दिसत होती..
'मागे ज्या चुका केल्या त्या यावेळेस मी करणार नाही मिसेस. संध्या पाटिल... तुझ्याशी मैत्री करण्याच्या निर्णयाचा मला आयुष्यात कायम पश्चाताप राहील.. निघून जा संध्या.. निघून जा... एक साधा फोन रिसिव्ह केला नाहीस तु आमचा..आता आमच्यात बिल्कुल सहनशक्ती नाही तुला इथे नाटक करताना पाहण्याची..' - आशा रागात लाल झाली होती...
संध्या आणि आशिष; दोघे सुन्न होऊन निव्वळ एकमेकांकडे पाहत उभे होते... नजरेने संवाद साधण्याइतपत त्यांचं प्रेम आजही तितकंच उच्च होत.. दोघांच्याही डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या.. जणू एकमेकांच्या फाटलेल्या काळजाला आपल्या मूक प्रेमातून ते ठिगळ लावू पाहत होते..
आज संध्याला कोणालाच काही स्पष्टीकरण द्यायचं नव्हतं..आज ती फक्त आणि फक्त तिच्या आशिषला शेवटच भेटायला आली होती... म्हणूनच कोणालाही उत्तर देण्यात वेळ दडवण्यापेक्षा; तिला तिच्या प्रेमाचं स्वरूप मन भरून पाहायचं होत, आयुष्यभरासाठी साठवून ठेवायचं होतं.. आणि सर्वांत जास्त महत्वाचे म्हणजे माधवकाकांना दिलेले वचन पाळायचे होते.. तिने काहीही सांगितलं नसलं तरी तिची असहाय्यता आशिषपर्यंत अचूक पोहचली होती.. तिच्या चुप्पीचा नेमका अर्थ त्याला उलगडत होता म्हणूनच तो ही शांत होता.. त्यांचा ह्रदयाचा संवाद समजण्याची कुवत सध्यातरी तिथे असलेल्या कोणातही नव्हती...
'मानलं संध्या तुला..किती निगरगट्ट आहेस ग?? एवढे सर्वांनी बोलून सुद्धा निर्लज्जपणे तिथेच उभी आहेस?? जेव्हा गरज होती तेव्हा एक फोन उचलला नाहीस आणि आता केवढा तो ड्रामा...'- शरूने मुद्दाम आगीत तेल ओतण्याचे काम केलं होतं..
'ती कशी फोन उचलेल शरयू? तुझ्या सांगण्यावरून मीच नाही का तिचा मोबाईल घेऊन तिला खोलीत बंद केलं होतं...'- दरवाज्यातून पुन्हा आवाज आला तस सर्वांनी चमकून त्या दिशेने पाहिलं..
दरवाज्यात रवीला पाहून संध्या शॉक झाली होती.. शरयूचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता.. आशिष मनातून खुश झाला होता.. रवीचा पश्चाताप आज शरूच सत्य सर्वांसमोर आणणार होता..
'तु...तु कोण तु?? आणि का..काय बोलतोय तु..मी..मी नाही ओळखत तु..तुला..'- शरूच्या चेहऱ्यावरचा मुखवटा लवकरच गळून पडणार होता त्यामुळे तिला आता काहीच सुचेनासे झाले होते..
'अरे व्वा... मला नाही ओळखत.. एक नंबर ना मॅडम.. जाऊ दे चल मीच माझी ओळख करून देतो सर्वांना.. हॅलो ऑल.. मी रवी पाटील.. मी तोच तो ज्याने संध्याशी तिची इच्छा नसताना तिच्याशी लग्न केलं..तिचं आयुष्य उध्वस्त केलं..तिच्या आणि आशिषच्या प्रेमाचा खुनी मीच.. तस बघायला गेलं तर त्यांचं प्रेम अमर आहे.. त्यांना मनाने वेगळं करणं कोणाच्या बापाला पण जमायचं नाही.. असो, या तुमच्या सुनेच्या बोलण्यात येऊन मी संध्याच्या वडिलांचा तिच्यासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव स्वीकारला बरं का... म्हणजे तुमच्या मुलाला दुःखाच्या डांग्या देणारी तुमचीच सून हो... आणि'- रवीने हळूहळू साटम कुटुंबियांसमोर शरूच खर रूप मांडायला सुरू केलं होतं तशी शरू अस्वस्थ होण्याला सुरू झाली होती.. बाकी इतर सर्व आश्चर्यचकित होऊन जागीच थिजले होते..
रवीने पुढे बोलण्याचा प्रयत्न करताच संध्याने त्यालाही अडवण्याचा प्रयत्न केला होता..
'बोलू दे संध्या त्याला बोलू दे.. का स्वतःची इमेज डाऊन करून घेते आहेस? आशा, मी बोललो होतो ना की हिच्यावर अविश्वास दाखवून तुम्ही भयंकर चूक करताय... बघ आज तुला कळेल सर्व.. बोल रवी बोल.. सांग सर्वांना, आशिषला पोलिस स्टेशनमधून सोडवणारी संध्या होती आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करणारी पण संध्याच होती.. ती जेव्हा उपाशीपोटी त्याच्या साठी पळापळ करत होती तेव्हा आज तिला खोटं पाडणारी शरयू मॅडम; इकडे येऊन सगळ्यांचे कान भरत होती... सांग रवी.. सांग तु..'- राहुलचा आवाज वाढला होता..
होणाऱ्या एकेक उलगड्यामुळे संपुर्ण घरात चलबिचल सुरू झाली होती..
'काका- काकी, तुम्ही जिला साधीसुधी मुलगी समजता; ती प्रत्यक्षात नागीण आहे नागीण.. आणि ती इथे काही तुमचं किंवा तुमच्या मुलाच भलं करण्यासाठी नाही आली आहे.. ती इथे फक्त बदला घेण्यासाठी आली आहे.. फक्त बदला..'- रवीने बोलणं सुरू केलं होतं..
'आई- बाबा, आशा काही ऐकू नका यांचं... ही..ही सगळी या संध्याची चा..चाल आहे..हिनेच यांना पट्टी पढवून आणलं आहे..'- शरूने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला..
'हो का?? काका- काकू, तुमच्या आशिषला केस मध्ये फसवलं गेलं याची संध्याला कल्पना नव्हती पण तुमच्या सुनेला पक्की आयडिया होती.. इव्हन अरविंदरावांच्या डोक्यात ही आयडिया टाकणारीपण ही तुमची सूनच बरं.. माझ्या डोक्यात राग भरवून, संध्याला घरात कोंडून ठेवायला लावणारी पण हीच..'- बोलता बोलता रवीने संपुर्ण घटनाक्रम साटम कुटुंबियांना उलगडून सांगितला होता तसा सर्वांना धक्का बसला होता.. आता सर्वांनाच संध्याशी नजर मिळवण्याची लाज वाटत होती..
'संध्या, तुला उध्वस्त करण्यात मीही सहभागी होतोच.. तुटलेली संध्या मी जोडू तर शकत नाही.. हा पण मी यापुढे तुझ्या इज्जतीची विटंबना होऊ देणार नाही.. तुझी इच्छा असो वा नसो, जिथे जिथे माझ्यामुळे तुझा अपमान होईल; तिथे तिथे मी पोहचेन..आय एम सॉरी संध्या...हॉस्पिटलमध्ये तुझी माफी मागायची होती बट मॉम-डॅडनीं तुला भेटून नाही दिलं.. आज कुठे चान्स भेटला, तुझी माफी मागण्याचा... सॉरी संध्या..एम एक्सट्रीमली सॉरी...'- रवीने स्वतःला संध्याच्या पायावर झोकून दिलं होतं..
'शरू, बच्चा हे तु ठीक नाही केलंस.. खोटं बोललीस तु माझ्याशी... उतारवयात केवढं मोठं पाप करायला भाग पाडलस...'- माधवरावांनी बाहेरून सर्व संवाद ऐकला होता..
क्रमशः
या कथेच्या भाग पोस्ट करताना होणाऱ्या अतिविलंबामुळे दिलगिरी.. आता त्याचीपण लाज वाटतेय पण काहीसा नाईलाज आहे..
एक वाचक म्हणून होणाऱ्या त्रासाबद्दल खेद आहे...
पुढचे भाग कमीतकमी एक दिवसाआड पोस्ट करण्याचे पुरेपूर प्रयत्न करेन..
© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा