अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 29

This post is in continuation with earlier series

यथावकाश रवी अनं संध्याच लग्न पार पडलं होतं.. एक मोठी अशक्यप्राय लढाई जिंकल्याच्या अविर्भावात रवी खूप खुश होता तर आपल्या सुडाग्नीमध्ये रवीच्या सुखाच्या समिधा जाळण्यासाठी संध्या आतुर होती..

                           ---------------------
संध्या आणि रवीचा विवाहसोहळा संपन्न झाला..

संध्याच्या पाठवणीची वेळ झाली तस हंसाबाई आणि अरविंदरावांच्या डोळ्यात पाणी तरळले.. मागचे दिवस कटूपणात गेले असले तरी संध्या त्यांची एकुलती एक लेक होती.. रवीसोबत बाहेर पडताना; तिच्या आतापर्यंतच्या सर्व आठवणी शिर्के उभयतांच्या डोळ्यासमोरून हलत नव्हत्या.. 

संध्या समोर आली तसा हंसाबाईनी इतका वेळ रोखून धरलेले अश्रू त्यांच्या चेहऱ्यावरून घळाघळा वाहू लागले होते.. आशिषच्या दुस्वासापोटी अनं वैयक्तिक अहंकारामुळे तिला रवीशी विवाह करण्यास भाग पडणाऱ्या अरविंदरावांनासुद्धा राहवलं नव्हता.. कितीही झालं तरी ती त्यांची लाडकी लेक होती... त्यांनी चेहरा कितीही भावनाशून्य करण्याचा प्रयत्न केला तरी एका बापाचं हृदय मात्र आतून लेकीच्या विरहाने तीळतीळ तुटत होत..

संध्या त्या दोघांसमोर उभी राहिली असली तरी तिच्या चर्येवर कोणताच भाव नव्हता..

' काश, देवाने उपकार रक्कमेच्या रुपात मोजायला शिकवले असते.. मला आज खूप उपयोग झाला असता त्याचा.. मि. अँड मिसेस शिर्के, तुम्ही मला जन्म दिलात, माझा योग्यरितीने सांभाळ केलात, मला हवं नको ते पाहिलंत.. आज माझं जे काही नाव आहे त्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे.. आणि याबद्दल मी कायम तुमची ऋणी असेन.. माझ्या आयुष्यातील या काळ्या क्षणांनंतर; आपल्यात यापुढे कोणतेही नाते नसेल.. परंतु तुम्ही जे उपकार माझ्यावर केलेत, त्याबदल्यात तुम्हांला कधीही काही माझी गरज लागली तर मी नक्कीच माझ्या परीने तुम्हाला मदत करेन'- शक्य तितका चेहरा निर्विकार ठेवत संध्याने हंसाबाई आणि अरविंदरावांशी आपलं नात तोडलं होत.. आपल्या जन्मदात्यांसोबत अस वागताना खरतर तिला मनातून अपार दुःख होत होतं पण जे काही तिच्याबाबत घडलं होतं त्याची संबंधितांना शिक्षा देण्यासाठी ती ठाम होती..तिच्या स्वतःपेक्षा ; आशिषच्या प्रत्येक वेेदनेचा तीला सुड घ्यायचा होता.. 

तिच्या तोंडून सारं ऐकून ; शिर्के दांपत्य सकट रवीसुद्धा अवाक झाला होता..


'संध्या.. बाळा...'- धक्क्यामुळे हंसाबाईच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते.. 

'अग तो मुलगा चांगला नव्हता म्हणून आम्हांला अस करावं लागलं.. तुझ्या भल्यासाठीच केलं ग आम्ही.. जन्म दिलाय ग आम्ही तुला बेटा.. आमच्या लेकीच्या भल्याचा विचार करण्याचासुद्धा हक्क नाही का बच्चा आम्हांला??'- हंसाबाई रडवलेल्या सुरात तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होत्या..

'माझ्या भल्याचा?? मि. शिर्के काय म्हणतायत मिसेस. शिर्के, ऐकलात का? खरंच तुम्ही माझ्या भल्याचा विचार केलात?'- संध्याने रागाने अरविंदरावांना प्रश्न केला...

'हो.. हो.. मग अजून काय? हंसा.. सोड हिला.. जाऊ दे..हिच्या डोळ्यावर अजूनही त्या पोराच्या प्रेमाची पट्टी आहे; हिला आपली माया नाही कळणार.. आपल्याला काही फरक नाही पडत हिच्या असण्या किंवा नसण्याने..'- चोरी पकडली जाण्याच्या भीतीने अरविंदराव कसेबसे शब्द जुळवत बोलत होते..

'आई, बाबा बरोबर बोलत आहेत.. हिच्या..'- रवीने अरविंदरावांना साथ देण्यासाठी तोंड उघडताच संध्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं.. तिच्या नजरेतील जाळ पाहून रवीने आपली वाक्य आधीच गिळून टाकली होती..

' मि. शिर्के, माझ्या असण्या ऑर नसण्याने तुम्हां दोघांना काही फरक पडणार नाही हे ऐकून आनंद झाला.. पण तरीही कधी काही गरज लागली तर नक्की सांगा.. आणि मिसेस. शिर्के; एक दिवस तुमचे मिस्टरच तुम्हांला स्वतःच्या तोंडून सत्य सांगतील.. त्याचे नेमके परिणाम काय ते मला नाही सांगायचेत पण पण.. तुम्ही समजून जा..चला येते मी..'- आई- बाबांच्या उत्तराची वाट न पाहताच संध्या थेट गाडीत जाऊन बसली होती..तिच्या मागोमाग रवीपण गाडीत जाऊन बसला तशी गाडी रवीच्या घराच्या दिशेने निघाली होती..

हंसाबाई अजूनही धक्क्यात होत्या.. आपलं नेमकं काय चुकलं हेच त्यांना कळत नव्हतं.. त्यांना आशिषची प्रचंड चीड येत होती..त्याच्यामुळेच आपल्या लेकीने आपल्याशी नात तोडलं अशी भावना त्यांच्या मनात दाटून येत होती.. पण.. पण.. ति जाता जाता कोणतं सत्य अरविंद सांगतील म्हणाली?यांनी माझ्यापासून काही लपवल तर नाही ना??- हंसाबाईनीं शेवटी स्वतःहुन सत्य शोधण्याचा निश्चय केला होता..


अरविंदरावांवरचा अहंकारचा पडदा हळूहळू खाली गळून पडत होता.. आपल्या सुडापोटी; आपण आपल्या पोटच्या पोरीच्या प्रेमाचा गळा घोटलाय ही जाणीव त्यांना अस्वस्थ करत होती.. त्यातही जाताना संध्या हंसाबाईनच्या मनात शंका पेरून गेली होती.. तिला खरं कळलं तर? तर माझं काय होईल? आपलं पितळ उघडं पडण्याच्या भीतीने त्यांच्या घशाला कोरड पडू लागली होती..पण आता वेळ निघून गेली होती.. जे काही होईल ते आता भोगायच एवढंच त्यांनी मनाशी ठरवलं होतं..

इकडे, रश्मीने आशिषला फोन करून संध्या आणि रवीच्या लग्नाची खबर दिली होती.. ते ऐकताच त्याला प्रचंड धक्का बसला होता.. रश्मी पलिकडून त्याच सांत्वन करत असली तरी त्याच्या हातून फोन कधीच खाली पडला होता..एखाद्या लहान मुलासारखा तो ओक्साबोक्शी रडू लागला होता.. पलीकडे रश्मीला त्याचा आक्रोश कानावर जातच होता.. तिच्या हॅलो हॅलो ला त्याचा न येणारा रिप्लाय पाहून तिने तात्काळ आशाचा मोबाईल डायल केला होता.. तिला झाला प्रकार सांगून तिने तिला आशिषची काळजी घेण्याची विनंती केली होती..

संध्याच्या लग्नाची बातमी ऐकून आशालासुद्धा वाईट वाटलं होतं पण त्याहीपेक्षा तिला स्वतःच्या भावाची काळजी वाटत होती.. आशिषच रडणं ऐकून त्याच्या आई- वडिलांनी त्याच्याकडे धाव घेतली होती.. सरतेशेवटी आशाला त्यांना सत्य सांगावं लागलं होतं.. सगळं ऐकून त्या दोघांनासुद्धा दुःख झालं होतं.. संध्याला आपल्या पोटच्या पोरीप्रमाणे माया करणाऱ्या साटमकाकी जास्त दुःखी झाल्या होत्या.. 


शेवटी साटम काकांनी पुढाकार घेत आशिषला सावरलं होतं..
' बाळा, अरे जे काही झालं त्यात तुमचा कोणाचाच दोष नव्हता.. तुमच्या नियतीमध्ये तुमचं एक होणं नव्हतंच तर त्याला तुम्ही तरी काय करणार? बेटा, सावर स्वतःला.. अरे तूच असा तुटून पडलास तर आम्ही कोणाकडे बघायचं रे.. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं समज आणि पुढची वाटचाल चालू ठेव..'- बराच वेळ बाबा आशिषला समजावत होते.. काही वेळानंतर आशिषने स्वतःला सावरलं होतं.. तस बघायला गेलं तर आतून त्याच रुदन चालूच होत पण आपल्या दुःखाचा भार बाकीच्यांवर नको म्हणून त्याने शांत होण्याचं नाटक केलं होतं.. फक्त आशाला त्याच्या सावरण्यामागचं कारण कळलं होतं पण त्या खेपेस तिने शांत राहणंच पसंद केलं होतं.. झाल्या प्रकारचा धसका म्हणून सर्वांनी आशिषला रात्री हॉलमधेच सर्वांसोबत झोपायला लावलं होत..

तिकडे संध्याने रवीच्या घरी गृहप्रवेश केला होता.. मधुचंद्राच्या रात्री रवी जास्तच उत्साही होता.. लहानपणापासून त्याला संध्या आवडत होती..ज्या दिवशी संध्याच आशिषवरच प्रेम त्याला कळलं होतं तेव्हापासून त्याची घुसमट होत होती.. सुरुवातीला तिच्या भल्याचा विचार करणाऱ्या रवीचं मन मागच्या काही वर्षांत बदललं होतं.. त्याला काही करून तिला मिळवायचंच होत आणि आज अनायसे अरविंदरावांनी स्वतःहुन त्याला ती संधी दिली होती..लग्न करून त्याने कागदोपत्री तिचा हक्क तर मिळवला होताच परंतु आज तो संध्याला शरीरानेसुद्धा मिळवणार होता मग तिची इच्छा असो वा नसो..

संध्याने रात्री बेडरून मध्ये प्रवेश केला तस रवी बेभान झाला होता.. कामज्वराने त्याला काहीही सुचत नव्हतं.. त्याच आवेशात त्याने संध्याला मिठी मारली तशी एक जोरदार किक त्याच्या गुप्तांगात बसली होती.. "आई ग... आई..."- प्रचंड वेदनेने रवी खाली कोसळला होता..संध्या त्याच्याकडे रागाने पाहत होती..तिचे डोळे भयंकर लाल झाले होते.. तिचं संपूर्ण शरीर क्रोधाने थरथरत होतं..

"खबरदार, माझ्या अंगाला हात लावशील तर.. माझं मन आणि तन, दोन्हीपण माझ्या आशिषलाच समर्पित आहे.. तुझ्यासारख्या नीच माणसाने मला टच करण्याचा विचार सुद्धा मनात आणला तर जीव घेईन मी तुझा.. आज फक्त वॉर्निंग देतेय.. परत असा मुर्खपणा करशील तर पाटील खानदान त्याचा एकमेव वारस गमवेल.."- संध्या आत्यंतिक रागात तडफडत होती.. 

'नीच माणसा, अरे जेव्हा तु माझ्या बोटात अंगठी घातलीस, तेव्हा मला असं वाटलं की कोणतरी माझ्या गळ्यात फास अडकवला आहे.. काश कोणीतरी खरंच तस केलं असत तर बरं झालं असतं यार.. मी या हेल मधून तरी सुटले असते.. तुझ्याबरोबर सात फेरे घेताना अस वाटत होतं की मी तप्त लाव्हावरून चालतेय..त्या साऱ्या विधींमध्ये माझ्या मनाला किती यातना झाल्या आहेत; माझ्या मलाच माहीत.. ज्या गोष्टीवर माझ्या आशुचा हक्क होता ; त्या तु कपटाने मिळवल्यास.. पण आता आशिषची संध्या मेलीय.. मारलं तुम्ही सर्वांनी तिला.. मारलं तुम्ही.. तुझ्या .. तुझ्यासमोर उभी आहे ती जुनी संध्या आहे..जुनी संध्या.. व्हिलन संध्या.. आणि मी कोणालाच सोडणार नाहीये.. कोणालाच म्हणजे कोणालाच.. माझ्या आशूच्या प्रत्येक अश्रूंची किंमत मोजायला लावणार आहे मी तुम्हांला..'-बोलता बोलता आशिषच्या आठवणीने संध्या व्याकुळ झाली तसं तिच्या डोळ्यातून पाणी आलं.. 

तिचा राग पाहून रवीने स्वतःहुन माघार घेतली होती..तिच्या किकची कळ अजून उतरली नव्हती त्यामुळे तो गप्प बाजूच्या कोचवर जाऊन पहुडला होता..

असेच काही दिवस गेले होते.. आशिष किंवा संध्या, कोणीही नॉर्मल झालं नव्हतं.. शेवटी शो मस्ट गो ऑन म्हणून दोघांनीही आपआपल्या कामाला सुरुवात केली होती.. हळूहळू दोघांची गाडी रुळावर येत होती की अचानक आशिषला नजदीकच्या पोलीस स्टेशनमधून फोन आला होता.. तिकडे पोहचताच पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली होती..कोण्या अनामिक मुलीने त्याच्यावर कोर्टाच्या आवारात विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली होती..

क्रमशः


© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all