अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 23

This part is in continuation with earlier series..

कालांतराने संध्याची डॉक्टरकी आणि आशिषची वकिली एकत्रच  संपली होती.. साटम कुटुंबिय आणि आशाचा निरोप घेऊन; भावुक मनाने संध्या मुंबईला तिच्या आई-वडिलांकडे परतली होती.. मुबंईला येताच संध्याने मानोपसचार क्षेत्रात स्पेशालायझेशन सुरू केलं होतं तर आशिष एका प्रतिष्ठित लॉयर फर्ममध्ये ट्रेनी म्हणून रुजू झाला होता..
                                --------------
दोघेही आपापल्या क्षेत्रात चांगली प्रगती करत होते... गोल्ड मेडल मिळवून संध्याने मानोपसचार विषयात विशेष प्राविण्य मिळवलं होतं; त्याचंच फळ म्हणून तिला तात्काळ एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नोकरी लागली होती.. आपल्या अभ्यासू विचारांमुळे अन लाघवी वागण्यातून तिने अल्पावधीतच मेडिकल क्षेत्राला आपल्या नावाची दखल घ्यायला लावली होती.. आता तिला वेगवेगळ्या प्रतिष्ठित हॉस्पिटल आणि क्लीनिकमधून व्हिझिटसाठी कॉल येत होते त्यामुळे ती आता चांगलीच बिझी झाली होती..

आशिषने पण स्वतःच नाव चांगलंच कमावलं होतं.. छोट्या मोठ्या केसेस जिंकून तो पण सर्वसामान्य लोकांमध्ये काहीसा लोकप्रिय झाला होता.. फसवणुकीच्या केसेससाठी गोरगरिबांना आशिष साटम या नावाचा  खूप मोठा आधार वाटायचा.. कित्येकदा, कोणी जास्तच गरीब असेल तर आशिष अत्यल्प फी मध्ये त्यांची केस लढून त्यांना न्याय मिळवून देत असे.. 

दोघेही आपापल्या कार्यात कितीही व्यस्त असले तरी दिवसातला अर्धा तास फोनवरील संभाषणासाठी आणि आठवड्याचा अर्धा दिवस ते एकमेकांसाठी राखून ठेवत होते..  त्यांचे प्रेम आता मॅच्युरिटीच्या वेगळ्याच टप्प्यावर होते.. कित्येकदा एकमेकांचा हात हातात घेऊन ते तासंतास न बोलता एकत्र बसून वेळ काढायचे तरीपण निघताना त्यांची मन तृप्त असायची..

एकमेकांना सरप्राईज गिफ्ट देणं, दोघांपैकी कोणी जास्त स्ट्रेस असेल तर त्याला फुलांचा बुके आणि ग्रीटिंगस पाठवणं; जमलं तर धावती भेट घेणं अशा कित्येक छोट्या-मोठया गोष्टींमधून त्यांच्यामधली प्रीत दिवसेंदिवस फुलत चालली होती.. 

तिकडे, संध्याच्या कॉलेजमधून निघून जाण्यानंतर आशाला शर्वरीच्या कारस्थानांमुळे एक वर्ष भयंकर मानसिक त्रास झाला होता.. पण संध्याने जाता जाता तिला दिलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर ती स्वतः एकट्याने त्या सर्वांचा सामना करत होती..ब्रँडेड ग्रुपचे जे सदस्य तिच्या बरोबरच्या वर्षाला होते; त्यांचीपण तिला साथ लाभत होती.. आशाच्या नकळत राहुल तिची काळजी घेत असे.. आशाच वागणं; तिचा मेहनती स्वभाव पाहून तो तिच्या प्रेमात पडला होता.. स्वतःच्या आई-वडिलांना सांगून; त्यांच्या परवानगीने त्याने आशाला रीतसर लग्नाची मागणी घातली होती.. खूप विचार करून आशा अन साटम कुटुंबीयांनी त्यांना होकार दिला होता.. दोघे आपापल्या कामात सेटल झाले की दोघांचं लग्न करण्याचं ठरलं होतं.. बहिणीच्या नशिबात आलेलं सुख पाहून आशिष मनोमन सुखावला होता..  

आशाच शिक्षण पुर्ण झाल्यावर; संपूर्ण साटम कुटुंबीय मुंबईला शिफ्ट झाले होते.. आशिषने एक टू बीएचके प्लॅट भाडयाने घेतला होता..साटम काकी मुंबईला येताच संध्याने त्यांची आवर्जून भेट घेतली होती.. संध्याची लोकप्रियता ऐकून साटम काकींना भरून आलं होतं.. त्यांनी तोंड भरून तिची स्तुती केली होती आणि पुढील आयुष्यासाठी भरभरून आशिर्वाद दिले होते..

आशानेपण आता स्त्री-रोग तज्ज्ञ म्हणून जाणूनबुजून सरकारी रुग्णालयात प्रॅक्टिस सुरू केली होती; गोरगरिबांची सेवा करता यावी यासाठी तिने एक-दोन नामांकित खाजगी हॉस्पिटलचे प्रस्ताव नाकारले होते.. तिच्या या निर्णयाचे सर्वांनीच स्वागत केले होते.. साटम कुटुंबीय, राहुलचा परिवार, आशिष आणि संध्या सगळ्यांनाच आशाच कौतुक वाटत होतं..

राहुल आणि आशा, दोघांनी आपल्या कामात जम बसल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता;  त्यानुसार दोघांचं लग्न झालं होतं.. दोन्ही कुटुंबियांच्या एकमताने विवाहसोहळा साध्या पद्धतीने पार पडला होता..त्यांच्या लग्नात संध्याने केलेली धावपळ पाहून साटम काका अन काकींना , मनातून तिचा संशय आला होता.. अखेरीस त्यांनी लग्नकार्य आटपल्यानंतर आशिषला सत्य विचारले होते.. सरतेशेवटी आशिषने पण घरच्यांना सर्व खरं सांगून टाकले होते.. 

तसं बघायला गेलं तर संध्या साटम कुटुंबियांनापण आवडतच होती त्यामुळे त्यांनापण विशेष आनंद झाला होता.. साटम काकांनी आशिषला काही दिवसानंतर; संध्याच्या घरच्यांना भेटून तिला लग्नाची मागणी घालण्यासाठी सांगितले होते.. 

सगळं काही सुरळीत चालू होतं.. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात सुखाने जगात होतं..


नाही म्हटलं तरी शर्वरी नावाचं वादळ आशिष-संध्याच्या आजूबाजूला घोंगावत होतं.. संध्याला अजून ते जाणवलं नसलं तरी आशिषला त्याची तीव्रता जाणवत होती.. संध्याबद्दल तिच्या मनात असलेला पराकोटीचा राग त्याने स्वतः अनुभवला होता.. संध्याच्या आयुष्यतले सर्व आलबेल पाहून ती आतल्या आत धुमसत होती.. कोण्या त्रयस्थाच्या माध्यमातून तिने संध्या आणि आशिष मध्ये गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न केले होते मात्र त्यांचा एकमेकांवर दृढ विश्वास असल्याने त्यांनी वेळीच एकमेकांना सावरले होते;  उलट त्यानंतर त्यांचं नातं अजून जास्त स्ट्रॉंग झालं होतं..

तिच्या अजून काही उपद्रवानंतर आशिषने; तिची भेट घेत तिला चांगलेच खडसावले होते.. त्या दिवसानंतर शर्वरीच्या कुरापती थांबल्या होत्या.. आशिषला मात्र त्याचच जास्त टेन्शन होतं... त्याला ती वादळापूर्वीची शांतता वाटत होती..

सर्व काही सुरळीत चालू असताना; अचानक एक दिवस आशिषला वकिलीक्षेत्रातील वजनदार नाव असलेल्या माधव देशपांडेंकडून त्यांना जॉईन करण्याचा प्रस्ताव आला होता..

मागची काही दशके माधव देशपांडे म्हणजे विजय असंच समीकरण होतं..  साठीच्या आसपास असणाऱ्या देशपांडेंना जवळपास तीस वर्षे वकिलीचा अनुभव होता.. त्यांचा बचाव इतका अचूक असे की प्रतिस्पर्धी वकिलाला त्यांच्या फक्त उभं राहण्याने धडकी भरत असे..वयोपरत्वे माधव देशपांडे आता कमी केसेस घेत असत.. परंतु त्यांचे काही जुने व्यावसायिक क्लायंट्स त्यांना त्यांच्यावतीने खटले लढवण्यासाठी कायमच गळ घालत..

आशिष साटम सारखा अभ्यासू, तडफदार वकील जर आपला असिस्टंट झाला तर आपले जुने क्लायंट्स आपल्याकडेच राहतील आणि आशिषलासुद्धा पुढे त्याचा फायदा होईल; असा त्यांचा विचार होता..

माधव देशपांडेंची किर्ती इतकी अपार होती की कोणालाही त्यांच्या ऑफरची भुरळ पडणं साहजिकच होती.. एकतर आतापर्यंत त्यांनी कित्येकजणांची असिस्टंट बनवण्यासाठीची विनंती नाकारली होती.. आणि आता तर त्यांनी स्वतःहुन आशिषला त्यांचा असिस्टंट बनण्याची ऑफर दिली होती त्यामुळे सर्वत्र त्याच्या नावाची चर्चा होती.. खूप विचारांती आशिषने देशपांडेंना होकार कळवला होता.. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल आणि त्याने आपली चांगली व्यावसायिक प्रगती होईल या आशेने त्याने त्यांना तात्काळ जॉईन होण्याचा निर्णय घेतला होता.. 

परंतु त्याचा हा एक निर्णय त्याच्या आणि संध्याच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ घडवून आणणार होता.. हा होकार म्हणजे भविष्यात त्या दोघांच्या होणाऱ्या मानसिक घुसमटीची नांदी होती..

  
क्रमशः


© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all