अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 21

This part is in continuation with earlier series

त्याने मिठी मारताच संध्यालाही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं अशक्य झालं आणि तिच्यापण डोळयातून अश्रू वाहू लागले.. अखेरीस देवाने तिच्या पदरात आशिषच प्रेम टाकलं होतं..

'आय लव्ह यु टू आशु.. तुझे सारे प्रॉब्लेम माझे प्रॉब्लेम आहेत.. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या सोबत असेन; भले तुझी इच्छा असो वा नसो..लव्ह यु आशु..'

                          -------------------------

काही क्षणानंतर दोघांनीपण स्वतःला सावरलं.. दूरवरून आशाने त्यांना एकमेकांच्या मिठीत पाहिलं होतं; दोघांचा मीलन पाहून तिला आनंद झाला होता.. ते एकमेकांच्या मिठीतून वेगळे होताच आशा त्यांच्या जवळ गेली..

' दादा, वहीनी ; आई जागी झाली आहे.. दादा, तुला बोलवतेय ती..'- आशाने मिश्कीलपणे दोघांना सांगितलं तशी संध्यासोबत आशिषच्यापण चेहऱ्यावर लाली पसरली होती..

'आशा, यू जस्ट वेट देअर...'- संध्या लटक्या रागात आशाच्या अंगावर धावून गेली तस आशाने तिला चुकवून आत पळ काढला..  संध्यापण तिच्या मागोमाग धावली खरी पण थोड्याच क्षणात तिला आशिष मागे राहिल्याची जाणिव झाली आणि ती जागीच थांबली.. तिने मागे वळून पाहिलं तर आशिष मागे उभा राहून दोघींची मस्ती पाहत हसत होता.. दोघींचं घट्ट नात पाहून त्याला समाधान वाटत होतं..

आतमध्ये जाताच साटम काकींनी संध्याचे हात जोडून आभार मानले.. तिथेच त्यांनी साटम काकांना काहीतरी तजवीज करून संध्याचे पैसे परत करण्यास सांगितले..

'काय काकू, एवढ्या लवकर परकं केलंत? मी तुमच्यासाठी धावपळ तुम्ही आशाची आई आहात म्हणून केली नव्हती तर मग्रूर संध्या शिर्केची पोटच्या पोरीप्रमाणे काळजी घेतलात म्हणून केली होती..

कितीतरी वेळा जेवण माझ्या आवडीचं नाही म्हणून तुम्हाला नवीन जेवण बनवायला सांगितलंय; विशेष म्हणजे तुम्हीपण कितीही उशीर झाला तरी माझं पोट भरल्याशिवाय तिकडून निघायच्या नाहीत.. आई-बापाच्या लाडाने बिघडलेल्या, वागण्या-बोलण्याची शिस्त नसलेल्या मुलीला तुम्ही स्वतःच्या प्रेमाने बदललात, एवढं सर्व माझ्यासाठी विनाअपेक्षा केलात मग मी तुमच्यासाठी थोडं काही केलं तर कुठे काय बिघडलं??'- संध्या भावनिक होऊन साटम काकींशी भांडत होती.. 

'बरं बाई, हरले मी.. माफ कर मला.. पैसे तर आम्ही देऊच तुला कारण बाळा; आमच्यासाठी आमचा स्वाभिमान  म्हणजे आमचं सर्वस्व आहे.. त्यामुळे किमान आमच्यासाठी तरी तु पैसे परत घेशील.. आम्ही टप्याटप्याने तुला तुझे पैसे परत करू...'- साटम काकींनी तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला शांत केलं..

एक-दोन दिवसांत साटम काकींना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.. त्या घरी आल्या तरी एक आठवडा संध्याने त्यांना सक्तीने विश्रांती घ्यायला लावली होती.. आशा कॉलेजला जाताना तिच्यासाठी पण डब्बा घेऊन जात असे तर रात्री संध्या साटम काकींच्या घरी जाऊन आशाला घरकामात थोडीफार मदत करून; तिथेच रात्रीच जेवून निघत असे..

आशिष आईला डिस्चार्ज मिळाल्यानंतर; दुसऱ्याच दिवशी मुबंईसाठी निघाला होता.. जाता जाता संध्याला तो कॉलेजबाहेर भेटण्यासाठी थांबला होता..

'हाय, संध्या..'- रिलेशनमध्ये असूनही स्वतःच्या प्रेयसीसोबत बोलण्यासाठी आशिषला शब्द सुचत नव्हते..

'आशु, व्हॉट अ सरप्राईज? तु इकडे चक्क मला भेटायला आला आहेस? थँक्स डार्लिंग..'- आशिषला समोर पाहताच संध्या खूप खुश झाली होती..

'बरं, तुला एक सांगायचं होतं..तुला वेळ असेल तर आपण कुठे तरी फिरून यायचं का?'

'येस.. व्हाय नॉट.. तुझ्याबरोबर मी टाईम स्पेन्ड करायला कायमच रेडी असेन'..

संध्याला आठवलं की कॉलेजच्या मागच्या बाजूलाच एक गार्डन आहे; तस ती आणि आशिष गार्डनच्या दिशेने निघाले..वाटेत चालताना आशिष शांत होता.. 

'संध्या.. मला उद्या मुंबईला जावं लागेल ग...'- आशिष निराशेच्या स्वरात बोलत होता...

"हम्मम, गार्डनमध्ये बसून बोलू चल..."- संध्याने त्याचा हात हातात घेत त्याला म्हटलं..तिचा स्पर्श होताच त्याला शहरल्यासारखा झालं.. त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती आपल्याच धुंदीत चालत होती..

शेवटी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत दोघेजण गार्डनमध्ये पोहचले; एक निवांत जागा पकडून दोघे बसले..

' हम्मम, बोल आशु, काय बोलत होतास? कधी निघतोय तु मुंबईला?'- संध्याने बसल्यावर पुन्हा त्याचा हात हातात पकडला होता..

'उद्या.. नाही इन्फॅक्ट मला आज रात्री निघावं लागेल.. उद्या सकाळी कॉलेज आहे.. दोन दिवसांची सुट्टी समजून आलो होतो पण पाच दिवस झाले आता.. आज निघावच लागेल..'- संध्यापासून नजर चुकवत ; खाली मान घालून आशिष बोलत होता..

खूप वेळानंतरपण संध्याने काही उत्तर दिलं नाही म्हणून त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिलं तर ती हसत त्याच्याकडे बघत होती..

'तुला काहीच वाटत नाहीये का?'- आशिष हलकं चिडून बोलला तरी त्याचा आवाज हेलावलेला होता..

'इतकं प्रेम करतोस माझ्यावर आशु? मग का असच टाकून गेलास तेव्हा मला?'- संध्याने हलकं स्मित करत त्याला विचारलं.

' मी सांगितलं ना ग तुम्हांला; माझी मनस्थिती काय होती त्यावेळी..'- आशिषने पण त्याचा हात तिच्या हातावर ठेवत उत्तर दिलं..

'सोड जुनं सर्व आशु... अरे तु एवढं टेन्शन का घेतो आहेस? आपण काही दिवसांसाठी भेटणार नाही आहोत.. कायमचे तर दुरवलो नाहीत ना एकमेकांपासून.. आणि मुंबई-पुणे 3 तासाच अंतर.. मला कधी तुला भेटावं वाटलं किंवा तुला कधी मला भेटावं वाटलं; त्याच दिवशी तुझी संध्या मुंबईला हजर असेल.. समजा जानेमन..'- आशिषच्या खांद्यावर डोकं ठेवत संध्याने त्याची समजूत काढली..

काही वेळांच्या प्रयत्नानंतर आशिष सावरला होता..खरं म्हणजे त्याला सावरताना संध्यालापण येणाऱ्या दुराव्याच दुःख होतं पण आशिषपेक्षा जास्त प्रॅक्टिकल विचारसरणी असल्याने तिने स्वतःला लवकर सावरलं होत.. 

काही क्षण दोघे असेच शांतपणे एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेवून, हात हातात घेऊन बसले होते.. अधून मधून एकमेकांच्या हातांवर हात फिरवत त्यांचा एकमेकांशी मूक संवाद सुरू होता..

'आशु..'- संध्याने शेवटी शांतताभंग केला..

'हम्म'

'असंच प्रेम करशील ना रे माझ्यावर? परत सोडून नाही ना जाणार मला?'

'खूप खूप प्रेम आहे ग माझं तुझ्यावर आणि माझ्या अंतिम क्षणापर्यंत तूच माझी प्रिया असशील.. आता नाही सोडून जाणार तुला मी..'- आशिषने मान वळवून संध्याच्या कपाळाचे चुंबन  घेतले.. त्यानंतरही काही काळ दोघे तसेच शांतपणे एकमेकांच्या सहवासात बसून राहिले होते..

'चल, संध्या.. मला आता निघावं लागेल.. रात्रीची बस पकडून निघेल मी.. आता काय आपली टेलिफोनवाली प्रेमकहाणी असेल'- काही वेळाने आशिषला भान आलं तस त्याने संध्याला आवाज दिला..

'बरं.. चल असं पण तुझ्याच घरी जायचं आहे, अजून थोडा टाईम एकत्र घालवता येईल'- संध्याने परत एकदा त्याचा हात हाती घेतला.. या वेळेस मात्र आशिषने आत्मविश्वासाने आणि तितक्याच प्रेमाने तिचा हात घट्ट धरला..

रात्री आशिष मुंबईला निघाला तसे संध्या आणि आशा नाही म्हणूनसुद्धा त्याला सोडायला आल्या होत्या.. एकमेकांचा निरोप घेताना तिघांनापण गलबलून आलं होतं पण नाईलाज होता..

दुसऱ्या दिवसापासून संध्या आणि आशिषची लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप चालू झाली होती.. संध्याकाळी वेळ काढून दोघ एकमेकांशी तासभर बोलत बसायचे.. 


सकाळी उठलं की पहिलं आशिषने भेट दिलेल्या गुलाबाच्या रोपट्याला गोंजरायच.. त्याला खत-पाणी घालायचं आणि मग सर्व आवरून कॉलेजला जायचं, कॉलेज वरून आलं की साटम काकींकडून जेवण शिकून घ्यायचं, त्यांच्याशी गप्पा मारायच्या.. मग त्या घरी गेल्या की अभ्यास करून , जेवून झालं की आशुशी फोन वर बोलायच.. एखाद्या सकाळी कधी मनात आलं तर आशाच्या स्टॉलवर जाऊन तिला मदत करायची आणि तिच्यासोबतच कॉलेजला जायचं ;असाच संध्याचा दिनक्रम ठरला होता..

गुलाबाच्या रोपट्याला फुल आलं की संध्या खूप खुश होत असे.. मग ती त्याचे वेगवेगळ्या अँगलने फोटो काढून; त्यावर लव्ह ईमोजी टाकून ते फोटो आशिषला पाठवून द्ययाची..त्यानंतर हळूच ते फुल खुडून ; कॉलेजला गेल्यावर आशाला भेट करायची.. संध्याच्या मते; ते रोपटं जरी तिच्या आणि आशिषच्या प्रेमाची आठवण असलं तरी त्याला येणार फुल हे आशाच्याच हक्काचं आहे..तिने मोठया मनाने तिला माफ केलं नसतं तर कदाचित हे रोपटं तिच्या नशिबात नसतंच.. आपल्या आयुष्यात फक्त काटेच राहिले असते.. त्यामुळे त्या फुलाच्या माध्यमातून ती कायम आशाकडे ऋण व्यक्त करत असे..

आशा आणि संध्यामध्ये आता छान मैत्रीचं नात तयार झालं होतं.. संध्यामुळे ब्रँडेड ग्रुपचा कोणताच मेंम्बर आशाला काही म्हणत नव्हता.. नाही म्हटलं तरी संध्यापेक्षा त्यांना आशिषची जास्त भीती होती.. पण काही मेंम्बरमध्ये झालेल्या अपमानाचा राग मनात कुठेतरी खदखदत होता.. आशाच अस संध्यासोबत फिरणं, संध्याने तिला आपल्या ग्रुपसोबत घेऊन फिरणं हे काही जणांना खटकत होतं..

एकदाआशाच्या घरी आर्थिक प्रॉब्लेम झाला तेव्हाच कॉलेजमध्ये अचानक वाढीव फी लावली गेली होती; तेव्हा संध्यानेच फी भरून तिची मदत केली होती.. तेव्हापासून आशाने तिला ताई म्हणायला सुरुवात केली होती कारण तिच्यामते नावापेक्षा नातं जोडून हाक मारली की माणूस जास्त आपलंसं वाटतो.. या गोष्टीने ब्रँडेड ग्रुपच्या असंतोषी मेम्बर्सना अजून जास्त राग आला होता..

असंच एक दिवस संध्याला आशिषला भेटावं वाटलं म्हणून ती कॉलेजला दांडी मारून त्याला भेटायला मुंबईला गेली होती..

दुसऱ्या दिवशी कॉलेजला पाऊल टाकताच तिला आशाच काहीतरी बिनसल्याच कळलं होतं.. तिच्या मनात भयंकर वेदना घुमत असल्याचे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.. खूपदा विचारूनपण ती काहीच प्रतिक्रिया देत नव्हती... शेवटी आशिषला सांगण्याची धमकी दिल्यानंतर, आशाने आपलं मन मोकळं केलं होतं.. कालची घटना सांगताना तिचा मनाचा बांध सुटला तस तिला रडू कोसळलं होतं..

तिच्यासोबत घडलेलं ऐकून संध्याच्या तळपायाची  आग मस्तकात गेली होती..

  
क्रमशः


© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all