अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 1

This series dedicated to all Male n their families who suffer major loss for their dignity, their Social status, Mental stability just because of false Domestic violence charges imposed on them by their estranged parteners. Our Law trust women plea

" हॅलो, हॅलो संध्या ताई का??"

' नाही मी त्यांची आई हंसा बोलतेय, आपण कोण?'

" नमस्कार मावशी, मी आशा बोलतेय, संध्या ताईला बोलवता का फोन वर, एक खुप महत्वाच बोलायचं होतं, प्लीज लवकर बोलवा हा."

' हो ताई, बोलावते मी बाईसाहेबांना'.

- संध्या बाई, कुठे आहेस ग? कोणी आशा नावाची मुलगी फोन वर तुझी वाट बघतेय, पार रडवलेला सुर आहे ग तिचा, बघ ये पटकन.. - एवढं बोलून आई हॉलच्या बाल्कनीत गेल्या...

 कारण काल रात्रीचा संध्याचा बिघडलेला मूड त्यांच्या लक्षात होता. आशिष घटस्फोटानंतर कोणासोबत राहील यावरून संध्या आणि तिच्या वकील नवऱ्याचं म्हणजेच रवीशी जोरदार भांडण झाले होते.. आशिष; दोघांचा एकुलता एक मुलगा, त्यामुळे साहजिकच त्याची कस्टडी आपल्याकडेच रहावी असे संध्या आणि रवी दोघांनाही वाटत होते.. 

हंसाबाईना माहीत होते की डिप्रेस झाल्यावर बाईसाहेब नेहमीप्रमाणे बाल्कनीतल्या झोपाळ्यावर बसून कॉफी पीत बसल्या असणार.. 

आई पोचली तेव्हा संध्या शून्यात नजर लावून बसली होती, हातात आशिषचे लहानपणापासूनचे फोटो होते आणि त्या फोटोंच्या गराड्यात अजून एक व्यक्तीचा फोटो सुद्धा होता की जो आईची चाहुल लागताच संध्याने पटकन पदराखाली लपवला.. आईच्या चाणाक्ष नजरेतून तर ते सुटणार नव्हतंच कारण ती पण शेवटी भारत सरकारच्या गुप्तहेर खात्याची निवृत्त अधिकारी होती.. पण या क्षणी त्यांना आशाचा निरोप लेकीला द्यायचा होता..

-"अग, कधीची आवाज देतेय तुला, ती बिचारी आशा फोन वर ताटकळली आहे, काही खूप महत्वाचं आहे तिचं."

- 'आशा ? कोण आशा? आशिष ची बहीण आशा?' - संध्या स्वतःशीच पुटपुटत फोन कडे धावली...

इकडे तिचं पुटपुटनं हंसबाईच्या कानावर पडलं आणि त्यांचं गुप्तहेर डोकं एकाच वाक्यावर नाचू लागलं- आशिष ची बहीण आशा??

कसंबसं स्वतःला सावरत हंसाबाई हॉल मध्ये आल्या.. 

आशासोबत बोलताना संध्याचा चेहरा रडवलेला झाला होता.. तिच्या चेहऱ्यावर भयंकर क्रोध आणि वेदना एकाच वेळी दिसत होत्या..

-" आशा , तू अशी कशी ग? मी तुला सांगितलं होतं ना ग, की मला दर आठवड्याला अपडेट दे म्हणून.. "- संध्या आता स्वतः रडू लागली होती पण हंसाबाईना हॉल मध्ये येताना बघून तिने झरकन्न चेहरा फिरवत आपले अश्रू पुसून टाकले..

 हे बघताच हंसाबाईना त्याही परिस्थितीमध्ये हसू आले. एवढी मोठी ही मनोपसाचारतज्ञ आणि स्वतः रडतेय आणि वरून 40 वर्ष गुप्तहेर खात्यात काढलेल्या बाईपासून ही स्वतःला लपवू पाहतेय.. अवघड आहे पोरीच.. पण काहीतरी जास्त बिनसलं दिसतंय. हिचा फोन झाला की विचारू असं म्हणून त्या किचनकडे जाण्यासाठी वळल्या आणि तोच..

-" आशा, पण शर्वरी आशिष सोबत अस करूच कसं शकते? ती.. तिची हिम्मतच कशी झाली त्याच्यासारख्या साध्याभोळ्या मुलाबरोबर असं वागायची?? " , 
- "बघ आशा, आशिष ला काही झालं ना तर मी या शर्वरीला सोडणार नाही.. जीव घेईल मी तिचा".. संध्याचा आवाज आता हळूहळू वाढला होता. तिच्या बोलण्यात एक अगतिकता असली तरी तीव्र राग होता..

पण हंसाबाईनची पाऊले थांबली होती ती 'आशिष' हे नाव ऐकून..

म्हणजे आशिष.. आशिष संध्याच्या आयुष्यातून कधी गेलाच नव्हता? की संध्याने त्याला जाऊच दिलं नव्हतं? अनेक गोष्टी आता त्यांच्या डोक्यात थैमान घालत होत्या..

 उलट सुलट विचार करण्याच्या त्यांच्या गुप्तहेर खात्याच्या सवयीप्रमाणे त्या अनेक गोष्टीचं एकाच वेळी लॉजिक लावू पाहत होत्या परंतु प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याने त्यांचं एकमत होत नव्हतं.. बराच वेळ विचार केल्यावर शेवटी संध्यालाच फोन संपला की विचारू असं म्हणून त्या किचन कडे वळल्या..

-" बरं आशा मला सांग, पोलिस सर्वांना कधी पकडून घेऊन गेलेत? कोणती कलमं लावलीत त्यांच्यावर? तु वकीलांशी बोललीस का जमिनाबद्दल? - संध्या आता संपूर्णपणे कोसळली होती..

-' नाही ताई, कोणीच वकील केस घ्यायला तयार नाही, सर्व म्हणतात की पुरावे शर्वरीच्या बाजूने आहेत, कोणी जामिनासाठी पण मदत करायला तयार होत नाहीये; तु प्लीज रवी भावोजींना मदत करायला सांग ना.. खुप उपकार होतील ताई तुझे'- पलिकडून आशा पण तितक्याच अगतिकतेपणे बोलत होती..

" आशा, तू थांब मी बघते मला काही करता येत का.. अग, रवी आणि मी मागच्याच आठवड्यात एकमेकांसोबत घटस्फोट घेण्याचं ठरवलं आहे.. आधिच आशिषच्या कस्टडीवरून आमच्यात वाद चालू आहेत, अशात तो मला मदत आणि ती पण आशिषच्या केस मध्ये हे मला तरी कठीण दिसतंय"- हे बोलताना संध्या गंभीर झाली होती पण तिच्या चेहऱ्यावरून तिचा काहीतरी निर्णय पक्का झाल्याचं वाटत होतं..


-" आशा, तु एक काम कर, मी तुला माझा पत्ता सेंड करते, तू जशी आहेस तशी माझ्या घरी ये"- बोलता बोलताच संध्याने आशा ला घरचा पत्ता पाठवला..


आशा बरोबरचा फोन थांबताच संध्याने लागलीच रवीला फोन लावला..

-"हॅलो, रवी?"

-'बोला, संध्या मॅडम, आज काय डिफेन्स आहे तुमचा आशिषच्या कस्टडीसाठी? सोडून दे तू आशिषची कस्टडी कारण तुला पण माहिती आहे की तु फक्त आई आहेस म्हणून तू त्याची कस्टडी माझ्याकडून जिंकू शकत नाहीस.'


-"रवी, आशिष आणि त्याच्या आई- बाबांना पोलिसांनी पकडून नेले आहे आणि तुला त्यांची जमानत करून घ्यायची आहे आणि.."- पुढे कसं आपलं मागणं मांडायचं हेच संध्याला सुचत नव्हतं.

तितक्यात तिला पाठीवर कोणीतरी प्रेमाने थोपटत असल्याची जाणीव झाली; हंसाबाई संध्याला धीर देत, तुझ्या डोक्यात काय आहे ते स्पष्टपणे रवीला सांग असे डोळ्यांनी सुचवत होत्या..

-' आणि? आणि पुढे काय?' आणि हे सगळं करून मला काय मिळणार?'- आता रवीला पण काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला आहे हे जाणवत होतं कारण संध्याच्या आयुष्यातले ' आशिष साटम' च स्थान त्याच्यापेक्षा जास्त फक्त हंसाबाईनाच माहीत होतं..

"रवी पाटील, तुला आशिष आणि त्यांच्या घरच्यांना जामीन घेऊन सोडवायचे आहे आणि त्यांना कोर्टासमोर त्यांचं निर्दोषत्व सादर करायचं आहे. आणि.. आणि बदल्यात तुला.. बदल्यात तुला... तुला आशिषची कस्टडी.. मान्य?"- एवढं बोलून संध्या फोन म्युट करून ओक्साबोक्शी रडू लागली.. 


-' हॅलो, हॅलो संध्या.. संध्या मला मान्य आहे, संध्याकाळपर्यंत आशिष आणि त्याच्या घरचे पोलीस लॉकअप मधून बाहेर आलेले असतील'- एवढं बोलून रवी ने आपल्या पुढील कार्यवाहीचा विचार करायला सुरूवात केली..


त्याला एक आशिष संध्याला द्यायचा होता आणि त्या बदल्यात त्याला दुसरा आशिष संध्याकडून मिळणार होता..

🎭 Series Post

View all