Login

अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 14

This part is in continuation with earlier series

दुसऱ्या दिवशी कोणीही न सांगताच संध्या सकाळी लवकर उठून साटम कुटुंबीयांना मदत करत होती.. साटम काकींना अजूनही अशक्तपणा जाणवत असल्याने त्या झोपूनच होत्या.. संध्यामध्ये आळस जरी असला तरी तिची ग्रासपिंग पॉवर (आकलन शक्ती) चांगली होती त्यामुळे एकदा शिकलेली गोष्ट तिच्या चांगलीच लक्षात राहायची.. त्यामुळे काल आशाने शिकवलेली काम ती आज व्यवस्थित करत होती.. सर्वांच्या मदतीने आशाने वेळेवर आपला स्टॉल लावला होता. आज संध्यापण तिच्या खांद्याला खांदा लावून तिला मदत करत होती..  आज मिसळचा मेनू असल्याने आशाने तिच्या दोन पोलीस काकांना आग्रहाने बोलवून घेत त्यांना मिसळ खाऊ घातली होती.. विशेष म्हणजे आज आशा सोबत काही आशिर्वाद संध्याच्यापण वाट्याला आले होते.. 

आशिष दूर उभा राहून संध्याच निरीक्षण करत होता.. ती जे पण करतेय त्यात त्याला कुठेही कृत्रिमपणा जाणवत नव्हता किंवा आपल्याला जिंकण्यासाठी ती मदतीच नाटक करतेय अस काही चित्र नव्हत.. आणि खरतर  संध्याच्या मनातपण तसा कोणताच विचार नव्हता.. या वेळची तिची धडपड साटम काकींच्या प्रतीची कृतज्ञता होती..

हळूहळू सारी आवराआवर झाली आणि ते त्रिकुट घरी येण्यास निघाले..आशिष रिक्षा चालवत होता तर आशा अन संध्या मागे सामानसोबत बसल्या होत्या..

'दादा, आज डेट ला काय घालणार आहेस रे?'- आशाने मुद्दाम खोड काढण्यासाठी विषय काढला..

"तुला काय करायचंय? मी माझं बघेन.. संध्या बोल कधी भेटायचं आपण??"- आशिषचा स्वर चिडलेला होता.. डेटची आतुरता त्याच्यापण मनात होती पण आशा किंवा संध्यासमोर आपली उत्सुकता उघडकीस आली तर दोघी आपलं जिणं हैराण करतील या भीतीने त्याच नाटक चालू होतं..

' अशी काही घाई नाही आशिष, तुला जेव्हा कम्फर्टेबल वाटेल तेव्हा; तु म्हणशील तिथे जाऊ आपण'- संध्याने आरशातुन आशिषकडे पाहत शांतपणे उत्तर दिलं तस आशिष अन आशा दोघांनाही तिच्या उत्तराचा आश्चर्य वाटलं..  त्यांना वाटलं होतं की ती हट्टाने वेळ मागून घेईल, एखाद्या लोकेशनचा हट्ट करेल पण त्याच्या विपरीत तिने संयतपणे सारं आशिषवर सोपवलं होतं..

' ठीक आहे, आपण आता सकाळी १० लाच सारसबागेत जाऊ, चालेल??'- आशिषने मुद्दाम सकाळची वेळ आणि मोकळी जागा निवडली होती.. ऊन लागलं तर संध्या घरी लवकर निघेल किंवा डेट कॅन्सल तरी करेल म्हणजे आपली होणारी फजेती तरी टळेल.. नाहीतर तिच्यासमोर असापण आपला निभाव लागण कठीणच दिसतंय..

"काय सारसबाग??, तू वेडा झाला आहेस दादा.. सार्वजनिक जागा आहे ती आणि सकाळी १० नंतर तिकडे किती ऊन लागेल माहितेय का?? तुला डेट म्हणजे नक्की काय ते माहीत आहे ना?"-आशा आता खरेच वैतागली होती..

"आशिष, चालेल मला, भेटू आपण १० ला सारसबागेत.. गणपती मंदिरात भेटू आपण.. मग तिथून पुढे तू म्हणशील तिथे जाऊ.. आशा, आज माझ्यासाठी दुसरं काहीच इम्पोर्टटंट नाहीये ग, मला फक्त त्याच्यासोबत काही क्षण जगायचंय; माझं मन त्याच्या समोर मोकळं करायचंय, माझं प्रेम प्रेसेंट करायचं आहे.. बाकी नंतर त्याचा निर्णय घेण्यासाठी तो स्वतः समर्थ आहे, माझी काही जबरदस्ती नसेल"- संध्याच्या चेहऱ्यावर आज वेगळाच संयम होता.. एकेक वाक्य ती विचारपूर्वक बोलत होती..

 त्यामुळेच आशिषला धडकी भरली होती.. हिने आपल्यातल्या भावना जाग्या केल्या तर? हिच्या बोलण्यावरून तर वाटतंय की करेलच ही.. मग आपण कसं व्यक्त होयचं? 

"आशिष, थांबव इथे, रस्त्याच्या पलीकडेच माझं घर आहे; तुम्ही येताय का दोघे?"- संध्याने आशिषच्या खांद्यावर हात ठेवत त्याला रिक्षा थांबवायला सांगितली खरी पण तिच्या अनपेक्षित स्पर्शाने तो चांगलाच शहरला होता.. अजून काही जास्त होण्याआधीच तो नाही बोलून मोकळा झाला होता.. त्याची भीती आशापर्यंत पोहचली तस तिने पण संध्याला डोळा मारून नाही सांगितलं..
' संध्या नंतर कधी तरी ग.. आज दादाला घाई आहे नं'- तिने असं बोलायचं अवकाश की आशिषने रिक्षाला वेग देत रिक्षा तिकडून हलवली होती तस आशा रिक्षात आणि संध्या रस्त्यात हसत होत्या..

अंतिमतः तो क्षण आला होता, ज्याची संध्याला आतुरता होती.. सर्वकाही पटापट आवरून ती पाऊने दहालाच सारसबागेत गणपती मंदिरात पोहचली होती.. १५ मिनिटांचा अवकाश असल्याने बाप्पाला प्रार्थना करण्यासाठी तिने मंदिरात प्रवेश केला तशी ती जागीच थबकली... आशिष तिच्याआधीच मंदिरात बाप्पाचं दर्शन घेत होता.. हात जोडून त्याची काहीशी लांबलचक  प्रार्थना चालू होती.. संध्यापण निमूटपणे त्याचा उजव्या बाजूला जाऊन उभी राहिली आणि डोळे मिटून तिने बाप्पाची करुणा भाकली..
' गणराया, मला माहित आहे की बऱ्याच ठिकाणी मी चुकली आहे,   श्रीमंतीच्या धुंदीत मी खुप जणांचे अपमान केले, त्यांची चेष्टा केली..  तु सर्वांचे अपराध पोटात घालतोस ना देवा, मग माझे एवढे अपराध क्षमा करशील का रे? यापुढे मी नक्कीच चांगली व्यक्ती बनून राहीन.. तेवढं आशिषच प्रेम माझ्या नशिबात देशिल का बाप्पा?'- संध्या मनोभावे श्रीगणेशाकडे आपलं मागणं मागत होती..

'तूमच्या सर्व इच्छा-आकांक्षा संपुर्ण होवो.. सुखी संसार करा!!'- पुजारी बाबांनी नकळत आशिर्वाद दिला तस संध्याने अत्यानंदाने डोळे उघडले तसे समोर तिच्यासाठी धक्कादायक चित्र होते.. 

पुजारी बाबांनी आशिर्वाद तर आशिषलाच दिला होता पण त्यांनी संध्याला गृहीत धरलं नव्हतं तर आशिषच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या एका मुलीला आशिषची पत्नी समजून दोघांना सुखी दांपत्य जीवनाचे आशिर्वाद दिले होते.. विशेष म्हणजे पुजारी बाबांचा प्रसादाचा पेढा त्या मुलीने झटकन स्वीकारला होता आणि तितक्याच वेगात ती त्यांना नमस्कार करून मागे वळली होती..

संध्या आणि आशिष दोघांनापण धक्का बसला होता; एकतर त्या मुलीचा चेहरा संपूर्णपणे स्कार्फने झाकला होता, मंदिरातपण तिने डोळ्यावरचा गॉगल काढला नव्हता, त्यामुळे तिची ओळख गुलदस्त्यातच होती आणि त्यात तिने प्रसाद विनातक्रार स्वीकारला होता म्हणजे ती आशिषला नक्की ओळखत असणार.. ती होती तरी कोण?? आशिषला मात्र जाताना ती आपल्याकडे बघून हसल्याच जाणवलं होत पण सर्व काही इतकं जलद घडलं होत की त्यालापण काही सुचत नव्हतं.. त्याने संध्याकडे प्रश्नार्थक नजर फिरवली तस ती श्रीगणेशाकडे असहाय्यपणे बघत रडताना त्याला दिसली होती...

'संध्या..'

"तु घरी जा आशिष.. कदाचित माझी पाप खुप जास्त आहेत म्हणून तुझ्यासारख्या सद्गुणी मुलाच प्रेम माझ्या नशिबात नाही, मे बी बाप्पाची आणि तुझीपण तीच इच्छा असावी.. एम सॉरी..सॉरी फॉर एवरीथिंग.."- संध्या खूपच दुखावली होती.. आशिष काही बोलण्याचा आतच; त्याच्याकडे न बघताच बाप्पाकडे परत एकदा पाहुन ती भराभर पायऱ्या उतरून रिक्षात बसून गेली पण होती..

झाला प्रकार आशिषच्या पण आकलन शक्तीच्या बाहेरचा होता.. कोण होती ती मुलगी?? असं कसं ती भलत्याच आशीर्वादाचा प्रसाद स्वीकारू  शकते?? आणि संध्या.. संध्याला काय वाटलं असेल?? शीट.. देवा काय आहे रे नेमकं तुझ्या मनात?- आशिषने यावेळेस आर्ततेने गणरायाला सवाल केला..

' मला संध्या कडे जायलाच हवं, तिचं माझ्यावरच प्रेम पाहता, या गोष्टीचा विपरीत अर्थ लावून ती स्वतःच बरंवाईट नको करून घ्यायला.. मला तिच्याकडे जायलाच हवं'-एवढा विचार करून त्याने रिक्षा काढली आणि थेट ति राहत असलेल्या बिल्डिंगसमोर लावली..


क्रमशः


© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all