अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 10

This part is in continuation with earlier series

संध्या, तु खरंच आलीस? आय कान्ट बिलिव्ह यार!!, दादा ही बघ संध्या खरंच आली रे..

आशाने आशिषला आवाज दिला तसा आशिषपण पटकन दरवाज्याजवळ धावत आला.. शर्वरीच खर रूप उघडकीस आल्यावर आशिष खरतर रात्रभर संध्याचाच विचार करत होता..

विनाकारण आपण तिच्या सांगण्यावरून एका मुलीवर एवढया मुलां-मुलींसमोर हात उचलला.. आपल्यावरच्या संस्काराविरुद्ध आपण वागलो, वकालतीचे शिक्षण घेऊन सुध्दा आपण हिंसेचा मार्ग स्वीकारला याबद्दल त्याच मन त्याला खात होतं.. 

त्यामुळेच आता संध्या खरच पहाटे घरी आली म्हटल्यावर आशिषला राहवलं नव्हता आणि तो दरवाज्याकडे धावत आला होता.. 

आशिषला पाहून संध्यापण सुखावली होती.. 

हाय आशिष, सॉरी मला उशीर झाला थोडा.. अरे एवढं लवकर उठायची सवय नाही रे मला.. पण मी रात्री उशिरापर्यंत थांबेल, मला काही प्रॉब्लेम नाही.. - एवढं बोलून संध्या आशिषकडे एकटक पाहतच राहिली होती..

आशिष पण आज पहिल्यांदा संध्याकडे नॉर्मल भावनेतून पाहत होता त्यामुळे तो पण एक क्षण गोंधळाला होता.. मुळात लाजाळू असलेल्या आशिषला संध्यासमोर कस रिऍक्ट करावं हे सुचत नव्हतं आणि त्याची ही मानसिक तारांबळ संध्याच्या लक्षात आली तशी तिच्याही चेहऱ्यावर गोड हसू आलं होतं...

आशाने संध्याला घरात घेतलं तस   तिच्या तोंडावर आश्चर्य पसरलं.. १० X १८ च घर, त्याला वर एक पोटमाळा.. कस राहत असतील हे लोक इतक्या छोट्या जागेत?- संध्या आपल्याच विचारात होती.

'सवय आहे आम्हा गरिबांना ऍडजस्ट करत जगण्याची.. जागा छोटी असली तरी आमची मन मोठी आहेत, त्यामुळे आम्हाला काही कमी पडत नाही संध्या मॅडम..'- संध्याला तस विचाराधीन पाहून आशिषने म्हटलं तस संध्याने मान खाली घातली..

' आशा, बाईसाहेब कधी नव्हे ते एवढ्या लवकर उठल्या आहेत, भुक लागली असेल तर आपल्याकडचे पोहे, शिरा किंवा इडली जे त्यांना आवडेल ते खायला दे..' - संध्याकडे न बघताच आशिषने आशाला सांगितलं तस आशाला हसू आलं..    

' यात दात काढण्यासारखं काय आहे?'- आशिषने उगाचच चिडायच नाटक करत आशाला विचारले..

' दादा, बहीण सकाळपासून राब राबतेय तिला नाही विचारलस की पोटात काही टाकलं की नाही ते आणि संध्याची लगेच काळजी?'- हसता हसता आशाने आशिषला टोमणा मारला तसा आशिष परत  कावराबावरा झाला तशा त्या दोघी अजून जोरात हसू लागल्या..

या दोघींसमोर आपला काही निभाव लागणार नाही हे कळताच आशिषने तिकडून निमूटपणे काढता पाय घेतला.

" हं, आशा बोल काय करायचंय आपल्याला आता?"- संध्याला अशी तर कामाची सवय नव्हतीच पण आशिषच प्रेम मिळवण्याचा तिचा निश्चय खंदा असल्याने ती या चॅलेंजसाठी तयार झाली होती..

' तू आधी खाऊन घे काहीतरी.. पोहे, शिरा, इडली हे आजचे आमचे नाश्त्याचे मेनू आहेत, तुला काय हवं?'- आशाने एवढं म्हणून समोरच ठेवलेल्या सर्व भांड्यावरची झाकणं बाजुला केली तशी एवढया मोठया प्रमाणात पदार्थ बघून संध्या हबकलीच..

" एवढं सारं? इतकं कोण खात तुमच्याकडे? आणि कधी बनवलं हे सगळं तुम्ही"- संध्याचे डोळे अजूनही विस्फारलेले झाले..

'अग, मी, आई-बाबा आम्ही सर्वजण मिळून सकाळी ४.३० वाजता बनवतो हे आणि मग पुढे एक M. I. D. C. एरिया आहे तिकडे ६.१५  च्या दरम्यान स्टॉल लावून तिथे येणाऱ्या कामगारांना हे सर्व विकतो.. तू आज आहेस ना पुर्ण दिवस, कळेल तुला सर्व.. तु आधी काय खाणार ते सांग.. सोड, मीच तुला सर्व एक एक प्लेट देते, ते खा आणि सांग कसे झाले आहेत ते..

आशाने सर्वांची एक एक प्लेट बनवून संध्या समोर ठेवली तस संध्याच्या डोळ्यातून पाणी आलं..

' काय ग काय झालं? तू माझ्याशी एवढी वाईट वागलीस आणि मी तुझ्यासोबत एवढं चांगला का वागतेय, हाच प्रश्न पडलाय ना तुला? अग नको एवढा विचार करूस.. झालं गेलं विसरून जा.. तुझ्या डोळ्यात मला दादाबद्दल जे प्रेम दिसलं ते निरागस प्रेम होतं, त्या प्रेमापोटी जर तू एवढया मुलांसमोर स्वतःचा पराभव खुलेआम स्वीकारू शकतेस, संपुर्ण आयुष्यात न केलेल्या गोष्टी करण्याचं चॅलेंज घेऊ शकतेस तर  मी पण तुला माफ करू शकते ना? तेवढं तर मी नक्कीच करेन.. आणि हो असं पण माझ्या होणाऱ्या वहिनीची काळजी तर घ्यायलाच हवी ना मी..- एवढं बोलून आशा जोरात हसू लागली तस संध्यालापण हसू आलं आणि तिने पटकन आशाला मिठी मारली...

" थँक्स आशा, कस कळत ग तुम्हाला मनातलं? साटमांकडे स्पेशल पॉवर आहेत वाटतं...पण.. पण ते जाऊ दे..मला.. मला सांग; तुला खरच आवडेल का मी तुझी वहिनी म्हणून, सांग ना आशा?"

' ए बाई, सरळ सरळ प्रश्न विचार ना की दादा तुला पसंत करेल की नाही म्हणून.. बरोबर हेच विचारायचं होत ना तुला?'- आशाने संध्याला डोळा मारत तिला विचारलं तशी संध्याच्या चेहऱ्यावर हलकी लाली पसरली आणि ते पाहून आशा अजून जोरात हसू लागली..

सरतेशेवटी आशाने शिऱ्याच्या प्लेट मधला एक घास संध्याला स्वतःच्या हाताने भरवला..


'चला मग बाईसाहेब, कुछ अच्छा करना हैं तो मिठा खावो'- संध्याने घास खाताच आशाने तिला डोळ्यानेच शिरा कसा झाला म्हणून विचारलं..

इकडे शिरा खाताच संध्या चमकली- एक मिनिट, मी ही सेम चव आधी खूप वेळा फील केलीय.. कोणी बनवला आहे हा शिरा? आणि त्याच विचारात तिने पटापट सोबतच्या पोहे आणि इडलीचा एक एक घास खाऊन पाहिला.. याही वेळी तिला तसंच जाणवलं तशी ती विचारात पडली की दोघींची चव सेम कशी असू शकेल? 

' वहिनी, आईने बनवलं आहे हे सर्व.. मी आणि बाबा मदत करतो तिला.' - आशाने आता सर्व पदार्थ  भांडयातून काढून डब्यात भरायला घेतले होते..

संध्या पुढे काही विचारणार तितक्यात आशिष कपडे करून माळ्यावरून खाली आला होता..

' तुमच्या अजून गप्पाच चालू आहेत काय? आशा त्यांचं सोड पण तू का टाईमपास करतेय? आपल्याला ६.१५ ला स्टॉल लावायचा आहे माहितेय तुला, ५.५० झालेत आधीच, कधी तू डबे भरणार आणि कधी स्टॉल वर जाणार?'- एवढं बोलून आशिष स्वतःच डब्बे भरायला बसला आणि त्याने इडली भरायला भांड्यात नेमका हात घातला , तेवढ्यात आशिषच बोलणं ऐकून घाईघाईने संध्याने पण त्याचवेळी भांडयात हात घातला.. दोघांनापण अनपेक्षितरीत्या एकमेकांचा स्पर्श होताच दोघांनीपण विजेचा झटका बसवा तसे आपले हात मागे घेतले आणि त्या धांदलीत आशिषच्या हातातल्या इडल्या खाली पडल्या..

' नानाची टांग तुमच्या दोघांच्या!, व्हा बाजूला दोघेच्या दोघे इथून नाहीतर उगाच माझं काम डबल करून ठेवाल..' - इडल्या खाली पडलेल्या बघून आशा वैतागली तस नकळतपणे संध्या आणि आशिष एकमेकांकडे बघून हसू लागले..

" हम्मम, झाली म्हणायची गट्टी म्हणजे..." आशाने दोघांकडे बघत म्हणताच दोघे थोडेसे वरमले आणि त्यांचे तसे पडलेले चेहरे बघून आशा हसू लागली होती..

" काय यार तुम्ही पण.. कशाला उगाचच सिरीयसनेसची ऍक्टिगं करता.. मिळवा हात आणि करा मैत्री"- आशा हसत हसत दोघांना टोमणा मारत होती..

' बरं बरं भर तुझे डब्बे एकटीच.. मी खाली रिक्षा घेऊन आहे , लवकर या खाली'- आशिषने पुन्हा एकदा तिकडून निसटण्यातच शहाणपण समजलं..

आशाने संध्याच्या मदतीने पटापट डब्बे भरून तयार केले... सोबत पेपर डिश, चहा, पेपर कप, प्लास्टिक चमचे अस सार साहित्य घेऊन ती खाली उतरली..


आशिष आधीपासूनच रिक्षा घेऊन तयार होता.. सवयीप्रमाणे आशाने एकाच वेळी दोन हातात दोन डब्बे घेतले होते तर त्याच्या उलट इकडे संध्याला एक डब्बा उचलणं पण भारी जात होतं.. कसाबसा तिने तो डब्बा रिक्षात नेऊन ठेवला.. मेहनतीची जरापण सवय नसल्याने इतक्या पहाटे पण तिला घाम फुटला होता, धाप लागली होती.. तिची ती अवस्था बघून आशिषला खरतर वाईट वाटत होतं पण चेहऱ्यावर तस काही न दाखवता त्याने संध्याला माघार घेण्यासाठी विचारलं.. 


' नो, नेव्हर.. मी जर चॅलेंज स्वीकारलं आहे तर ते मी पुर्ण करणारच.. भले मला वेळ लागेल, जास्त त्रास होईल पण मी ते पुर्ण करणार म्हणजे करणारच.."- एवढं बोलून संध्या बाकीच सामान आणायला परत घरात गेली..

तिला आत जाताना आशिषला परत शर्वरी आठवली आणि त्याच्या अंगावर काटा आला.. शर्वरीच्या डोळ्यातला सुड आशिषने स्वतः पाहिला होता.. तिच्या कारस्थानी डोक्याने त्याला पण भरकटवल होतं.. तिने दिलेली धमकी आठवताच त्याला आशाची परत एकदा काळजी वाटू लागली होती.. 

आशिष विचाराच्या तंद्रीत असतानाच आशा आणि संध्या उरलेलं सामान घेऊन आल्या आणि रिक्षात बसल्या तशी आशिषने रिक्षा चालू केली..

' आशिष, ही तुमची रिक्षा आहे? तु तर मुंबईला असतोस मग इकडे कोण चालवत?'-आशिषला बोलत करण्यासाठी संध्याने त्याला प्रश्न विचारला..

' अग, रिक्षा आमचीच आहे पण  सकाळी ड्राइवर चालवतो आणि संध्याकाळी बाबा.. '- आपल्याच धुंदीत आशाने उत्तर दिलं तस तिला जाणवलं की संध्या तिच्याकडे लटक्या रागाने बघतेय तशी तिने आपली जीभ चावत कान पकडले- "सॉरी शक्तिमान.. गलतीसे मिस्टेक हो गयी.."

आमच्या दोघांचंही शिक्षण नीट होण्यासाठी खूप धडपडतात ग आई-बाबा; म्हणून तुझा प्रश्न ऐकून राहवलं नाही मला म्हणून आपसूक माझ्या तोंडून उत्तर निघून गेल..- आशा काहीशी भावूक झाली तस संध्याने तिचा एक हात आपल्या हातात घेत हळुवार थोपटत तिला शांत केलं..

' म्हणजे ही इतकी पण वाईट नाही म्हणायची..फक्त अतीलाडाने आणि वाईट संगतीमध्ये राहून बिघडलीय थोढीशी'- रिक्षा चालवता चालवता आशिषची नजर मागे संध्यावरच होती.. 

बरोबर ६.१० च्या आसपास आशिषने त्यांच्या नेहमीच्या जागी रिक्षा उभी केली.. त्यानंतर तिघांनी मिळून हळूहळू रिक्षातून सारे सामान खाली उतरवले.. सर्वात शेवटी आशिषने स्टॉलच स्टँड रिक्षातून काढून त्यांच्या नेहमीच्या जागी उभं केलं.. आशाने संध्याच्या मदतीने सारे पदार्थ स्टँडवर नीट मांडले आणि आता सर्वजण ग्राहकांची वाट पाहू लागले..

इतक्यात एक ५०-५५ वयाच्या आसपासचा इसम स्टॉलच्या बाजूला येऊन तिथे घुटमळत राहिला.. 


 तस आशाने त्यांना हाक दिली..


' अरे राजा काका, या ना, बोला काय देऊ?' .

' नाही नको राहू दे पोरी, आधी तुझी भवानी होऊ दे मग मला दे..  अस पण मी उधारीवर घेणार; माझ्यामुळे तुझा दिवस नको खराब जायला.'- त्या इसमाने आशाला खाली मान घालून उत्तर दिले...

" काय काका, एवढीच का आपली ओळख? अहो, पैसे काय आज आहेत, उद्या नाही.. आपण माणुसकी जपायला हवी ना? आणि भवानीच काय घेऊन बसलात, अहो काही नाही होत काका.. अस समजा की देवाचा नैवेद्य तुम्हांला देतोय.. या काही मनात बाळगू नका.. जेव्हा पैसे येतील तेव्हा द्या.. आता मी तुम्हाला काय देऊ ते सांगा?"- आशा नॉनस्टॉप बोलत होती तर संध्या आणि आशिष दोघे तिच्याकडे थक्क होऊन बघत होते..
' मला १० रुपयाचे पोहे दे पोरी, मी तुला जसे पैसे येतील तसे नक्की देईन'

आशाने प्लेट भरली खरी पण तिने त्यात पोहे थोडे जास्तच टाकले होते. तिने जसे पोहे त्या व्यक्तीसमोर पुढे केले तसे त्या व्यक्तीने आशासमोर हात जोडले..


" आजच्या स्वार्थी युगात कोण कुणाला एवढी मदत करत ग? पण तू मागचे कित्येक महिने मला उधारीवर नास्ता देतेस आणि ते पण जास्तीचा.. देव तुझं खुप भलं करू पोरी, तू खरच माझ्यासाठी देवी भवानी आहेस ग"- आशाचे आभार मानताना त्या व्यक्तीला गहिवरून आलं होतं..

'काका, खा बघू तुम्ही निमूटपणे.. आणि मी कुठे फुकट देतेय तुम्हांला, तुमचे एवढे आशीर्वाद तर घेतेय मग तुम्ही कशाला उगाच स्वतःला त्रास करून घेताय? आणि तुमची कामाची वेळ झालीय बरं , निघा लवकर नाहीतर लेटमार्क लागेल तुमचा'- आशाने त्यांना आठवण करून दिली तसे ते परत एकदा तिला भरपूर आशीर्वाद देऊन निघाले..

' संध्या, आई- बाबांनी स्टॉल लावायला चालू केला तेंव्हापासूनचा आमचा नियम आहे की भले नुकसान झालं तरी चालेल पण कोणीही गरीब पैशाअभावी स्टॉलवरून भुकेला नाही गेला पाहिजे.. हे काका २-३  महिन्यांनी जसे जमतील तसे थोडे थोडे करून पैसे देतात पण आम्ही कधी त्यांना इकडून भुकेल पाठवलं नाही.'- संध्याचा प्रश्नांकित चेहरा बघून आशाने उत्तर दिलं..

संध्या अजून पुढे काही विचारणार त्या आधीच गिऱ्हाईक यायला लागले होते तसे आशिष आणि संध्या दोघे पण तिला मदत करू लागले होते.. गर्दी वाढत होती तशी संध्या थकत चालली होती पण आशा आणि आशिष पटापट लोकांना हवे ते देत होते..  


संध्याने एक गोष्ट मार्क केली होती ती म्हणजे आशाकडे येणारे ९०% लोक तिला नावाने ओळखत होते आणि सारेजण तिचं कौतुक करत होते आणि आशा सर्वांशी खुप विनम्रपणे बोलत होती.. अधून मधून कोणी तिला विचारलं तर संध्याची आपली मैत्रीण आणि आशिषची भाऊ म्हणून ओळख पण करून देत होती..

हळू हळू पदार्थ संपत आले होते तितक्यात दोन पोलिस गाडीवरून त्यांच्या स्टॉलसमोर येऊन उभे राहिले आणि ते संध्या आणि आशिषकडे रोखून पाहू लागले तसे ते दोघे थोडे घाबरल्यासारखे झाले..
पण तितक्यात आशा ने त्यां पोलिसांना हाक मारली..
' काय म्हणतात आमचे सुपर कॉप्स? झाला का राऊंड पुर्ण?'- आशाने त्यांना विचारलं..

' हो बाळा, झाला आमचा राऊंड.. तुला काही अडचण नाही ना? आणि असेल तर आमच्या दोघांचा नंबर दिला आहे ना तुला, कधीपण बिनधास्त फोन करायचा, आम्ही येऊ आमच्या लेकीसाठी.. बरं ही दोघे कोण?'- पोलिसांनी एकवार पुन्हा आशिष आणि संध्या कडे पाहत आशाला विचारलं..


" काका, हा माझा भाऊ  आशिष आणि ही माझी बेस्ट फ्रेंड संध्या.. आज मला सोबत म्हणून आले आहेत.."- आशाने दोघांची ओळख करून दिली 

' बरं बरं, चल आम्ही जातो आता, काही असेल तर फोन करायचा हं.. आणि हो मिसळ आणशील तेव्हा २ प्लेट काढून ठेव आमच्यासाठी' - एवढं बोलून ते आशाला हात दाखवून निघून गेले..


' आशा, तू तर डॉन झालीस ग.. पोलिसांना पण खिश्यात टाकलं तु.. डायरेक्ट लेक त्यांची..' - आशिषने मस्करीत आशा ला म्हटलं..

" अरे तस नाही रे दादा, मी फक्त माणुसकी जपते रे.. एक दिवस असेच ते राऊंड वरून येत होते.. आपल्याकडची गर्दी बघून ते आले आणि मी त्यांना आपली मिसळ ऑफर केली, ते दोघेपण विचित्ररित्या पॉकेट पोलीस स्टेशनमध्ये विसरले होते आणि त्यादिवशी गुगल पे पण क्रॅश झालं होतं त्यामुळे त्यांना पैसे देता येत नव्हते म्हणून ते नको म्हणत होते पण मी त्यांना आग्रहाने खाऊ घातल..खाता खाता त्यांनी मला आपली परिस्थिती विचारली आणि मी त्यांना सर्व सांगितल तस त्यांनी माझं कौतुक केलं आणि त्यांचे मोबाईल नंबर दिले.. मला म्हणाले, आज पासून तू आमची लेक, काही लागलं , कोणी काही त्रास देत असेल तर दिवसा- रात्री कधीही फोन करायचा .. आता पण आठवड्यातून दोनदा चौकशी करून जातात मग मी पण त्यांची आवडीची मिसळ त्यांना खाऊ घालते.."- आशा आशिष आणि संध्याला सांगत होती तस त्यांना पण तीच कौतुक वाटत होतं..

संध्या तर विचारात पडली होती- खरी श्रीमंती कुठली? आमची पैशाची की आशाची माणुसकीची?


क्रमशः

वाचकहो, तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! हा भाग लिहिण्यास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व! रिफायनरी मध्ये काम करताना अचानकपणे डोळ्याला वेल्डिंग लाईट लागल्यामुळे दोन दिवस लिखाण करता आलं नाही म्हणून हा भाग थोडा मोठा लिहिला आहे.

© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all