Login

अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - अंतिम

This is last part of this series..

सगळं कुटुंब एक झाले होते... काही वेळ बोलाचालीत गेल्यानंतर; सर्व आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले होते..
                             --------------

कोर्टाच्या बाहेर येऊन सगळे टॅक्सीची वाट पाहत होते.. 

संध्या अन शरयू आजूबाजूलाच होत्या.. शरयूची व्हीलचेअर रस्त्यातील खड्डयात अडकली तशी संध्या आशाला व्हीलचेअर बाहेर काढण्यासाठी मदत करू लागली.. 

आशिष आणि रवी; रस्त्याच्या कडेला येऊन सर्वांसाठी टॅक्सी शोधत होते.. तितक्यात एकच कोलाहल सुरू झाला.. रोडवर सगळे जण आरडाओरडा करू लागले.. एका गाडीचे ब्रेक फेल झाले होते.. चालक गाडी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याला तितकंसं यश येत नव्हतं.. गाडी संपुर्ण रस्त्यावर वाकडीतीकडी चालली होती..

कोणाला काही कळण्याच्या आत ती गाडी; आशा, संध्या आणि शरयूच्या दिशेने आली होती..

'ताई...'- आशाचा ओरडण्याचा आवाज ऐकून सगळेजण त्या दिशेने धावले होते..

समोरच दृश्य पाहून हंसाबाईनी हंबरडा फोडला होता.. साटम काकू भोवळ येऊन पडल्या.. बाकी सारे सुन्न झाले होते..शरयू व्हीलचेअरवरून खाली जमिनीवर पडली होती.. ती थरथरत होती; रडत होती.. आशिष आणि रवी दोघांनाही स्वतःला आवरणं कठीण झालं होतं.. शर्वरीने त्याही स्थितीत प्रसंगावधान दाखवत अंबुलन्स बोलावली.. साटम काका आणि माधवरावांनी छोट्या आशिष अन अश्विनीला दूर नेलं होतं.. 

क्षणात होत्याच नव्हतं झालं होतं.. अनियंत्रित गाडीने संध्याला ठोकर मारली होती.. त्यात तिला गंभीर जखमा झाल्या होत्या.. अंबुलन्स येताच तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं..

                                   --##--

डॉक्टरांनी धावपळ करत संध्याला तातडीने शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन कक्षात नेलं.. 

'मि. रवी, यु मे मीट हर..'- तीन तासानंतर ऑपरेशन कक्षातून बाहेर येत डॉक्टरांनी बाहेर येत रवीला म्हटलं तसे सर्वजण चकीत झाले..

'ती एवढया लवकर ठीक झाली??'- आशिषने आश्चर्याने विचारलं..

'नो.. त्या अजूनही बेशुद्धच आहेत.. बट त्यांना ज्या प्रकारच्या जखमा झाल्या आहेत; त्या अतिशय गंभीर आहेत.. त्यांच्या बॉडीला मेजर इजा झाली आहे; तसेच खूप ठिकाणी मल्टिपल फ्रॅक्चर झाले आहे... इन शॉर्ट, आय एम सॉरी टू से... त्यांचे जगण्याचे चान्सेस खूप कमी आहेत.. अगदी अर्ध्या टक्क्यांपेक्षा कमी..'- डॉक्टरांनी त्यांचं मत सांगितले तसे सगळेच हादरले.. 

'नाही डॉक्टर.. प्लीज.. तुम्ही होप सोडू नकात.. ती.. ती वाचेल.. नक्की वाचेल..तुम्ही ट्रिटमेंट थांबवू नकात..प्लीज..'- शर्वरी काकुळतीला येऊन त्यांना विनंती करत होती..

'रवी.. तुम्ही त्यांना भेटून घ्या एकदा.. बोलता नाही आलं तरी एकदा पाहून या..'- डॉक्टरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला सांगितलं तसा तो रडवलेला होत आत गेला..

'अँड मॅडम सर्व शक्यता पडताळून मगच मी मत मांडतोय.. प्लीज बिलिव्ह मी..'- डॉक्टरांनी जाताजाता शर्वरीला सांगितलं..

'आई, आशिष कुठे आहे?? त्याला बघा आधी..'शरयुला अचानक आशिषची आठवण आली पण तो आजूबाजूला न दिसल्यामुळे; साटम काकींना विचारलं..

इकडे तिकडे शोधाशोध केल्यानंतर, शर्वरीला तो हॉस्पिटलमधल्या साईंच्या मूर्तीसमोर; शून्यात हरवलेला दिसला.. त्याची नजर साईबाबांकडे होती.. चेहरा भकास पडला होता, त्याचे अश्रू आतल्या आत गोठले होते..

'आशिष, एकदा तु तरी भेटून ये ना रे तिला.. तु तरी बोलव ना रे तिला.. तु..तु बोलवशील तर येईल रे ती.. बघ ना रे.. तिला अस नाही पाहू शकत रे मी.. आशुला काय उत्तर देऊ मी आता..'- रवी बाहेर येऊन रडू लागला होता.. 

'तुम्ही सगळे या भेटून.. मी सर्वात शेवटी जाईन...'- आशिषने एकदम धीम्या आवाजात म्हटलं तशी त्याच्या हृदयातली वेदना सर्वांनाच जाणवली.. 

सगळेजण संध्याला बघायला आत गेले होते..

'पप्पा, मम्मी अशी का झोपली? तिला परत बु झाला??'- आशुच्या  प्रश्नाने तिथलं वातावरण अजून जास्त दुःखी झालं होतं.. रवीला त्याचे अश्रू आवरता आले नाही.. तो त्याला घेऊन तसाच बाहेर पडला..

कोणीच काही बोलत नव्हतं.. समोरच्या दृश्यावर अजूनही कोणाचाच विश्वास बसत नव्हता.. हंसबाई तर पुरत्या कोसळल्या होत्या.. शर्वरीच्या कुशीत डोकं ठेवून; त्या रडत होत्या.. शेवटी आशा दोन्ही छोट्याना घेऊन बाहेर लॉबीमध्ये आली होती..

काही वेळात,आशिष आला तसे सर्वजण त्याच्याकडे पाहतच बसले.. त्याची अवस्था एखाद्या जिवंत प्रेतासारखी झाली होती.. त्याचा चेहरा भावनाशून्य बनला होता.. आत येत तो; संध्या शेजारी बेडवर बसला होता.. बाजूला बसून त्याने तिचा हात हातात घेतला..

'तु फ्रान्सला जाणार होतीस संध्या.. मग आता हा असा प्लॅन का चेंज केलास.. तु.. तु माझ्यासोबत असं कसं करू शकतेस संध्या? मी शरयुला निवडल्याची एवढी मोठी शिक्षा नको देऊस मला संध्या.. नाही झेपणार मला हे सगळं.. एकदा तरी बोल ना ग माझ्याशी.. संध्या.. उठ ना ग...'- आशिष तळमळीने बोलत असला तरी त्याच्या डोळ्यांत एक अश्रूचा थेंब नव्हता... त्याला तस पाहून बाकीच्यांना त्याच्या मानसिक स्थितीबद्दल भीती वाटू लागली होती..

अचानक त्याच्या डोळयातून पाण्याचे काही थेंब संध्याच्या चेहऱ्यावर पडले आणि एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे संध्याला शुद्ध आली.. 

परत सर्वांची धावपळ सुरू झाली होती.. आशिष सुद्धा डॉक्टरांना बोलवायला निघालाच होता की तेवढ्यात संध्याने त्याचा हात पकडून त्याला थांबवलं.. तिने त्याचा हात तसाच तिच्या हातात धरून ठेवला.. 

'प्लीज काही गरज नाही डॉक्टरांना बोलवायची.. मला माझं मरण स्पष्ट दिसतंय.. आज बोलू द्या मला.. प्लीज..'- तिने क्षीण आवाजात म्हटलं तसे सगळे जागीच निशब्द होत थांबले..

'मम्मा.. सॉरी ग.. तुला शेवटपर्यंत सांभाळू शकली नाही.. प्लीज स्वतःची नीट काळजी घे.. ताई.. आता तूलाच तिची काळजी घ्यावी लागेल..'- तिने बोलताच हंसबाईनचा बांध एकवार पुन्हा सुटला होता..

'संध्या, नको बेटा.. अग तु अजून जगायला हवं ग.. ही वेळ माझ्या मरणाची आहे ग.. तुझ्या नाही.. बेटा.. या म्हातारीचा तरी विचार कर.. बेटा फाईट कर.. तु होशील बरी..'- हंसबाईनीं रडू थोडाफार आवरलं होतं..

'ताई, सॉरी.. पप्पांच्या वचनाबद्दल मला आधी माहीत असत तर मी माझं प्रेम खूप आधीच कुर्बान केलं असतं ग.. प्लीज मम्माची काळजी घे.. '- तिने शर्वरीला म्हटलं..

'मीच सगळ्यांची अपराधी आहे ग.. मीच जर हा कोर्टाचा प्रपंच मांडला नसता, तर ही वेळ आलीच नसती..'- शर्वरीला आता स्वतःला सावरता आलं नव्हतं तशी ती रडू लागली होती.. 

'प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते ताई.. माझी वेळ संपली तर मी जाणारच ना ग.. तु नको मनाला लावून घेऊस.. तु फक्त निमित्त..बाकी कर्ता करविता तर वर बसला आहे..'- संध्याने म्हटलं तसं शर्वरीला अजून रडू कोसळलं..

'साटम काका, काकू, माधवकाका माझ्याकडून काही चूक झाली तर क्षमा करा..'- संध्याने एक हात छातीकडे नेत त्यांना म्हटलं तसे तेही भावुक झाले..

'तु.. तु मला का बाजूला ढकललं संध्या.. मी गेली असती तर आशिष आणि तु सुखात तरी राहिली असतात ना?? तु.. तु का मला वाचवलस??'- शरयूने प्रश्न विचारताच सगळे अवाक झाले होते..

'डॅडच्या वचनासाठी ग शरयू.. त्याने एका वचनासाठी स्वतःची प्रतिष्ठा धुळीला मिळून दिली मग मी तर त्याची मुलगी आहे ना ग.. मला पण त्यांचं वचन पुर्ण निभवायला हवंच.. बाकी आशिषला सांभाळ ग आता.. त्याच्यावर असंच प्रेम कर.. '- संध्याचा आवाज हळूहळू क्षीण होत चालला होता.. 

तितक्यात रवी आत परतला होता..

'रवी.. मी.. मी तुझी खुप मोठी गुन्हेगार आहे रे.. माफ कर मला जमलं तर.. आमचा भुतकाळ आम्हांला विसरता आलं नाही म्हणून आज आमच्यावर ही वेळ आली.. बट बच्चूला सांभाळ.. त्याला खूप मोठं कर.. आणि मी आधी म्हटलं तसं त्याला सांग की त्याची मम्मा खूप वाईट होती म्हणून.. बॅड मम्मा..'- तिने उसनं हसू आणत रवीला म्हटलं..

'तुला एवढंच वाईट वाटत तर परत ये ना संध्या.. मी एकटा कसा सांभाळू ग त्याला?? त्याच्या प्रश्नांना मी काय उत्तर द्यावी?? आय बेग टू यु डिअर.. प्लीज कम बॅक..'- रवीच्या डोळयातून अखंड पाणी वाहत होत..

'आशा, चल बाय.. वेळेवर औषध घे.. राहुलची औषध अजून एक महिना तरी चालू ठेवायची आहेत,  लक्षात आहे ना?? त्याला बाय सांग माझा..'- तिच्या तोंडून वाक्य ऐकताच आशाला स्वतःला सावरण कठीण झालं तशी ती रडत तिथून बाहेर पडली..

'आशु.. माझा बच्चा.. मला माफ करशील का रे?? मी खूप वाईट केलं रे तुझं.. तुला आई-बाबांचं एकत्र प्रेम कधीच भेटलं नाही.. ऑल माय फौल्ट.. पप्पाला त्रास देऊ नकोस.. खूप मोठा हो..खूप मोठा..'- तिने त्याच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला.. इतक्या वेळात, पहिल्यांदा तिच्या डोळयातून पाणी वाहल होतं..

'आशिष, मला मांडीवर घेशील का रे?? माझी वेळ झाली रे.. तुझ्या कुशीत प्राण सोडावेसे वाटतात..'- संध्याने म्हटलं तसं आशिषला हुंदका आवरला नाही..

'तुला काहीच होणार नाही.. मी.. मी तुला कुठेच जाऊन देणार नाही आहे संध्या.. कुठेच नाही.. तुला माझी शपथ आहे.. आणि...आणि जर तु मला सोडून गेलीस ना तर.. तर मी पण तुझ्या मागे येईन..'- आशिष रडता रडता बोलला तस संध्या खिन्न हसली..

'काश, मला तुझ्यासोबत जगता आलं असतं... किती छान आयुष्य गेलं असतं ना रे आपलं..पण नाही रे देवाच्या मनात तसं.. आपलं एकत्र येणे; आपल्या नियतीमध्येच नाही.. बट.. बट मला एक वचन देशिल आशु.. प्लीज..'- संध्याला आता बोलणं कठीण झालं होतं..

'बोल.. शरयुला आपलंसं करू हेच ना??' - आशिष उदास चेहऱ्याने म्हणाला..

'ते तर आहेच.. ते तुला करायचंच आहे.. त्या एका गोष्टीसाठी मी माझं आयुष्य पणाला लावलं हे तु विसरणार नाहीस; हे माहीत आहे मला.. मला अजून एक गोष्ट हवी आहे..'- संध्याच्या चेहऱ्यावर क्षीण हसू उमटलं होत..

'बोल.. तु म्हणशील तस..'- आशिषच्या डोळयातून पाणी वाहू लागलं.. त्याने तिचा हात आपल्या हृदयाजवळ नेला..

'माझ्यासाठी जगशील?? मी जिथेही असेन, तुझ्यावर लक्ष ठेवून असेन.. तु.. तु जोपर्यंत मोकळं जगणार नाहीस तोपर्यंत मला मुक्ती मिळणार नाही.. बघ माझ्या मुक्तीसाठी जगशील ना आशु??'- संध्या खिन्नपणे हसत होती..

'संध्या.. तुला माहीत आहे ना ग? तुझी माझ्या आयुष्यातली जागा कोणीच भरून काढू शकणार नाही ग.. तु अशी मला सोडून गेलीस तर..'- आशिष तिचा हात डोळ्यांना लावून जोरात रडू लागला होता..

'आशु.. प्लीज अस मला जाताना रडवू नकोस ना रे.. तु.. तु मला अजून वचन दिलं नाहीस??'- संध्याला आता बोलताना जास्तच दम लागू लागला तसे सगळे घाबरले..

'दिलं.. दिलं वचन.. जगेन मी.. तुझ्याचसाठी जगेन.. शरयूला तिच्या वाट्याचे सारे हक्क देईन मी.. पण..पण तुझी जागा मी कोणालाच देणार नाही.. कोणालाच नाही..आणि कधीही नाही..'- आशिषने हळुवार तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले..

'खबरदार माझी जागा कोणाला दिलीस तर.. मी म्हटलं ना; मी तुझ्या आजूबाजूलाच असेन म्हणून.. माझं शरीर तुझ्यासोबत नसलं तरी माझी आत्मा तुझ्या अवतीभवतीच असणार आहे.. लव्ह यु आशु.. खूप त्रास होतोय रे आशु.. खूप त्रास होतोय.. कोणाशीच पुर्ण बोलता नाही आलं रे मला..'- संध्याने पुन्हा एकदा सगळ्यांकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहिलं तसे सर्वजण तिच्या जवळ गेले...

'माझ्या दोन्ही आशुची काळजी घ्या प्लीज.. मम्मा बाय मम्मा.. आशु एकदा हस ना रे माझ्यासाठी.. हस ना रे..'- संध्याने तिचा हात त्याच्या रडवलेल्या चेहऱ्याजवळ नेत त्याचे गाल ओढले..

'संध्या.. लव्ह यु टू.. तू.. तू.. संध्या..संध्या'- सगळ्या हॉस्पिटलमध्ये आशिषची एकच किंकाळी घुमली होती.. एका उचकीनंतर संध्याचा श्वास थांबला होता.. आशिषच्या गालावरचा तिचा हात फटकन खाली बेडवर आदळला होता..

डॉक्टरांनी येऊन तिला मृत घोषित केलं तसा संपूर्ण कक्षात एकच आक्रोश चालू झाला होता..

आशिष तिचा चेहरा छातीशी कवटाळून ढसाढसा रडत होता.. रवी बिचारा तेवढाही हक्क नसल्याने बाजूला उभा राहून रडत होता.. शर्वरी बाजूच्या भिंतीवर हात आपटून रडत होती.. या दुर्देवी प्रसंगासाठी वारंवार स्वतःला जबाबदार मानत होती. हंसबाई अतिशोकामुळे मूर्च्छित झाल्या होत्या.. त्यांना तात्काळ उपचार करण्यासाठी हलवलं गेलं.. शरयू स्तब्ध झाली होती.. व्हीलचेअरवर बसून ती संध्याच्या मृत शरीराकडे पाहत होती..तिच्या डोळयातून अश्रूचा एकही थेंब बाहेर पडला नव्हता.. माधवराव तिला तशा अवस्थेत पाहून जबर घाबरले.. त्यांनी तिला हलवलं तेव्हा कुठे ती रडू लागली होती..

'नाही संध्या.. तुझ्यासारखी दुसरी कोणी होणं नाही.. खरंच नाही.. आज मी तुला एक वचन देते संध्या.. तुझे दोन्ही आशिष मी सांभाळेण.. तुझी आईसुद्धा माझी जबाबदारी.. आय प्रॉमिस यु डिअर.. तुझे हे उपकार मी पुढचे कित्येक जन्म विसरणार नाही.. रेस्ट इन पीस अँजेल.. '- शरयू रडता रडता बोलून गेली..

छोट्या आशिषच्या हातून संध्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते.. 

                                --##--

सर्वजण हळूहळू सावरले होते.. आशिषला मात्र सत्य स्वीकारण्यासाठी सहा महिने लागले होते.. शरयूने या काळात सर्वांना चांगलं सांभाळून घेतलं होतं..

दिल्या वचनाला जागत; तिने हंसाबाईना सावरलं होत..

रवीने छोट्या आशिषला सोबत घेत शहर सोडलं होतं..

शर्वरी भारतात परतली होती.. माधवरावांच्या आग्रहावरून तीदेखिल हंसबाईकडे लक्ष ठेवून असे..

                                    --##--
वीस वर्षांनंतर..

'अश्विनी, नाष्टा रेडी झाला आहे.. बाबाला आणि संध्याला बोलवून घे..'- शरयूची किचनमध्ये धावपळ चालू होती..

'मॉम, मी आले आहे.. बाबा तेवढा बिझी आहे.. '- संध्या डायनींग टेबलवर येऊन बसली..

'अग बघ ना कुठे राहिला तो.. नाष्टा थंड होईल म्हणावं.. '- शरयूने आवाज दिला..

'काय मॉम तु.. येईल ना त्याला हवं तेव्हा.. खाईल थंड..'- संध्याने नाक मुरडल..

'अग करंटे, कमीतकमी ठेवलेल्या नावाची तरी लाज ठेव जरा.. नुसता स्वतःचा विचार..तु अशी स्वार्थी आणि ती एक..'- शरयूने बोलायला सुरू केलं तशी संध्या उठून बेडरूमकडे निघाली..

'जाते.. जाते.. नको ऐकवूस तेच तेच..'- तोंड वाकडं करत ती आशिषच्या रूममध्ये शिरली..

'बाबा.. असा किती दिवस तिच्यात अडकून राहणार आहेस.. तु जेव्हा जेव्हा या फोटोकडे पाहत उभा असतोस ना तेव्हा तेव्हा मला खूप भीती वाटते तुझी..'- अश्विनी आशिषला समजावत होती..

'तुला नाही कळणार बाळा.. जेव्हा कोणावर मनापासून प्रेम करशील तेव्हा माझं दुःख कळेल तुला.. चल लवकर आता, नाहीतर आपली महामाया कोपेल.. बघ ही संध्या बोलवायला आली म्हणजे..'- आशिष हसत म्हटला..

'ती ऑलरेडी रागावली आहे.. तु..तु.. नाही मॉमने मला यांचं नाव का ठेवलंस ते सांग आधी..सारखं लेक्चर ऐकत बसावं लागतं मला..'- संध्या चांगलीच वैतागली होती.. बेडरूममधल्या संध्या शिर्केच्या फोटोकडे बोट दाखवत तिने प्रश्न विचारला होता..

'तु..तु तशीच आहेस ना म्हणून..'- आशिष तिच्या डोक्यावर टपली मारून निघून गेला..

'बघ, आजपण न सांगताच पळाला.. एक ना एक दिवस मी सगळी स्टोरी सांगायला लावणारच.. बघ दिदू तु..'- संध्या नाक फुगवत म्हणाली..

'हो.. चल आता बाहेर.. नाहीतर माहीत आहे ना..'- दोघी हसत डायनींग टेबलावर आल्या..

शरयूने आशिषच्या सवयीनुसार टीव्ही चालू केला.. सकाळची ब्रेकिंग न्यूज पाहून आशिष आणि शरयू हादरले होते..

' प्रेमी जीवांना एकत्र करणाऱ्या "आस" या संस्थेचे सर्वेसर्वा श्री. रवी पाटील यांची नागपूर येथे अज्ञात गुंडाकडून गोळ्या झाडून हत्या.. मुलगा; कुप्रसिद्ध गुंड आशिष पाटिल तडीपार असल्यामुळे वडिलांच्या अंतिम संस्काराला अनुपस्थित..' 

समाप्त..

हुश्श.. संपली बुवा एकदाची कथा.. 

पहिल्यांदाच एवढं मोठं लिखाण केलं.. ज्यांना आवडलं त्यांनी शेवटपर्यंत आवडीने वाचलं याच कायम समाधान असेल.. 

भाग खूप अंतराने पोस्ट होत होते; त्याबद्दल सॉरी..मनापासून सॉरी..

नाही म्हटलं तरी या कथेच्या निमित्ताने खूप शिकायला भेटलं..

 एरव्ही आठ तासाच्या शिफ्टनंतर सुद्धा थकणारा मी ही कथा लिहायला घेतली तेव्हापासून वेगवेगळ्या साईटवरच आहे.. त्यामुळे तेरा तासांची शिफ्ट करून यायचं आणि मग परत दर दिवशी दोन तास लिहायचं असा दिनक्रम... त्यात आमचा मायग्रेन अधूनमधून राशीला होताच.. कित्येक वेळा डिनर स्कीप करून कथा लिहिली आहे; जेणेकरून तुमच्यापर्यंत जास्तीतजास्त लवकर भाग पोहचवता येईल.. हे सगळं तुमच्या सहानुभूतीसाठी मुळीच नाही.. मला आनंद आहे की आवड तिथे सवड हे खूप छान पद्धतीने उमगलं.. माझा आळस बऱ्यापैकी कमी झाला.. 

तुमच्या प्रतिक्रिया कायमच प्रेरणादायी ठरल्या त्याबद्दल तुमचे आभार.. 

मागच्या अनुभवावरून सध्यातरी थोडा ब्रेक घेईन; बाकीच्यांकडून लिहिणं शिकेन म्हणतो आणि मग भेटूच आपण इतर कथांच्या माध्यमातून किंवा याच कथेच्या पुढच्या पर्वात.. 

धन्यवाद!!

© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all