कौतुक (प्रियंका शिंदे बोरुडे)

आपल्या सासऱ्यांचे कौतुक म्हणजेच माझे कौतुक ही समर्पक वृत्ती एका स्त्रीला खरंच खूप महान बनवते. त्यासाठी ती कधीही अट्टाहास करत नाही.


" रमेशला काय झालं काही समजत नाही. एवढे दवाखाने केले, इतक्या डॉक्टरांना दाखवले तरीही त्याला काय झाले आहे याचे निदान होत नाही. तो सारखा छातीत दुखते असे म्हणतो.आम्ही तर आता पुरते थकलो आहोत. नारायणदाजी आता काय करावं असं वाटतं तुम्हाला?"

"हे बघ गोविंद, मलाही तुला काय सांगावं काही समजत नाही."

थोड्यावेळाने गोविंदराव घरी निघून जातात..

आता प्रिया आणि तिचे सासरे(नारायणराव) यांच्यात संभाषण सुरू होते,

"पप्पा, मी एक सुचवू का?"

" हा बोल ना प्रिया?"

"मला वाटतं रमेशला विपश्यना हा उपचार नक्की उपयोगी पडेल किंवा एखादी सोलो ट्रिप सुद्धा त्याच्यात खूप मोठा बदल घडवू शकते. आता हे बघा गोविंदमामा सांगत होते की एवढे दवाखाने, डॉक्टर्स यांना दाखवून सुद्धा त्याच्या आजाराचे निदान होत नाही. आजवर त्यांनी सर्व प्रकारच्या टेस्ट सुद्धा केल्या."

"हो खर आहे."

"म्हणून रमेशला मानसिक आजार आहे असे मला वाटते. म्हणजे तो काही मनोरुग्ण आहे ,असे मला म्हणायचे नाही. पण मानसिक आजार हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. म्हणूनच अशावेळी त्या रुग्णाला एकांताची, वातावरण बदलाची खूप गरज असते म्हणूनच विपश्यना हा उपचार, किंवा एखादी छानशी ट्रीप रमेशला नक्की फायदेशीर ठरेल असे मला वाटते."

" छान उपाय सांगितला तू. मी आत्ता गोविंदला फोन करतो आणि हा उपाय सुचवतो."

थोड्यावेळाने,

" हा गोविंद, मी नारायण दाजी बोलतोय. अरे त्याला जवळच्या विपश्यना केंद्रात दाखल कर, मग बघू त्याच्यात काय बदल घडतो ते. कदाचित त्याची छाती दुखणे थांबेल. कारण हे दुखणे म्हणजे त्याचा मनाचा खेळ सुद्धा असू शकतो. त्यानंतर त्याला सोलो ट्रिपला देखील पाठव."

"खूप खूप धन्यवाद दाजी हा उपाय सुचवल्याबद्दल! मी आजच त्या केंद्रात रमेश चे नाव दाखल करतो."

काही दिवसानंतर रमेश घरी येतो..

" नारायणमामा, खरंच तुम्ही सुचवलेला उपाय मला खूप कमी आला. खरंतर छातीतले दुखणे हा माझा मनाचा संभ्रमच होता. विपश्यना केंद्रात मी खऱ्या अर्थाने स्वतःला समजू शकलो. त्यानंतर मी सोलो ट्रीपला देखील गेलो. खर तर मला मानसिक आजारच झाला होता. खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.."

असे बोलून रमेश पाया पडतो.

"अरे राहू दे बेटा. तुझी बिकट अवस्था पाहून मी सुद्धा खूप दुःखी झालो होतो. म्हणून जे मला सुचलं ते तुला सांगितलं."

प्रिया हे सर्व संभाषण किचन मधून ऐकत होती.

ती मनाशीच पुटपुटली,

" खरंतर रमेशला विपश्यना केंद्रात तसेच सोलो ट्रीपला जाण्याचा उपाय मी सुचवला होता. पण माझे नाव माझ्या सासर्‍यांनी एकदाही घेतले नाही. त्यांनी एकदाही कौतुकाने असे सांगितले नाही की हा उपाय खरं तर मला प्रियाने सुचवला. जाऊदे.. घेतला तर घेतला त्यांनी मोठेपणा. पण माझ्या सांगण्यामुळे रमेश ठीक झाला, यातच माझे खरे कौतुक आले. आई नेहमी सांगते, कौतुक उघडपणे झाले नाही तरी चालेल पण कुटुंबासाठी समर्पण नेहमी करावे. त्यामुळे मी पप्पांना याबद्दल काहीही बोलणार नाही. शेवटी ते देखील माझे सासरे आहेत. त्यांना हा मान मिळाला म्हणजे मलाच मिळाला आहे, असे मी समजेल."

      वाचक हो, स्त्रियांची कुटुंबाप्रती समर्पणाची वृत्ती किती महान असू शकते हे प्रियाच्या विचारांनी या कथेतून समजते. शेवटी घरातल्यांचा मान तोच आपला मान असे ती समजत असते. म्हणूनच तिचे कौतुक झाले काय, नाही झाले काय याचा तिला काहीच फरक पडत नाही पण आपल्यामुळे दुसऱ्यांचे भले झाले यातच तिला खूप भरून पावल्यासारखे वाटते.

  पण स्त्रीची दरवेळी अशी समर्पणाची वृत्ती कितपत योग्य आहे? काय वाटते तुम्हाला? केवळ घरातली सून आहे म्हणून प्रियाला तिच्या सासर्‍यांनी कौतुकापासून झाकोळून ठेवले. तिचा मान त्यांच्यासाठी काहीच महत्त्वाचा नव्हता का?

आपला या कथेबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा..

धन्यवाद..


©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे