अपॉइंमेंट

वेळेसाठी नाते नव्हे तर नात्यांसाठी वेळ हवा..
अपॉइंटमेंट...


     रोजच तिच्याकडे निवांत वेळ असायचा.. सकाळी नऊ ते संध्याकाळी साडे सहा घरी एकटीच असायची ती.. मुले सकाळी नऊ ला क्लास ला गेली की तिथून परस्पर शाळेत आणि मग संध्याकाळी साडेसहाला घरी... घरी आल्यावर ही त्यांचे खाणे, होम वर्क, टाईम पास यातच त्यांचा वेळ जायचा.. ती आपले त्यांना लागेल ते ते करत राहायची.. तरी बरे धुण भांडी सगळ्याला मेड होती.. फक्त स्वयंपाक मात्र ती स्वतः च करायची.. आपल्या हाताने बनवलेले जेवण आपल्या माणसांना खाऊ घालायचे सुख काही वेगळेच असते..

     मुलांना आणि  अहोंना ही दोन वेळचा वेगळा डबा, सोबत सलाड असे करण्यात कोण धन्यता वाटायची.. मुले डबा सोबत च घेऊन जायची. नवऱ्याचा मात्र एक डबा सोबत आणि एक नंतर येणाऱ्या त्याच्या शिपाया कडे पाठवावा लागायचा.  संध्याकाळी घरी आल्यावर जेंव्हा ते रिकामे चाटून पुसून साफ झालेले डबे बघायची तेंव्हा केलेल्या कामाचं चीज झाल्या सारखे वाटायचे तिला.. त्यातूनच तिला कळायचे तिच्या हातचे जेवण त्यांना आवडतय ते.. मुले तरी आनंदून छान असल्याची पावती द्यायची. पण अहो? त्यांना तर वेळच नसतो असे रिकामे बोलायला.. असे नाही की बोलायचे नसायचे पण बोलायला गेले की फोन वाजायचा.. आणि मग कित्येक वेळ त्यातच जायचा.. आणि ही मात्र त्याच्या एका प्रेमळ कटाक्षातच समाधान मानून घ्यायची..

     तिची आई नेहमी म्हणायची, " नमू.. आपण आपल्या लोकांना प्रेमाने काहीही बनवून खाऊ घातले ना, तर त्याने त्यांचे आरोग्य चांगले आणि सुदृढ राहते. कारण त्यांच्यासाठी आपण जे काही बनवतो ते त्यांच्या आवडीचा, आरोग्याचा विचार करूनच बनवतो. म्हणून घरातील सगळ्या कामांसाठी नोकर ठेवले तरी स्वयंपाक मात्र घरातल्या स्त्री नेच करायला हवा.." तिच्या आईचे हे विचार, ह्या आठवणीच तर होत्या तिच्याकडे..

   घड्याळात दोन चे टोल पडले आणि ती जागी झाली विचारातून... आज मात्र जरा गडबड होती तीची..
आज तीला कोणाला तरी भेटायला जायचे होते.. चारची ॲपोईंमेंट घेतलेली होती दोन दिवसा पूर्वीच.. त्यासाठी पदरचे पैसे ही खर्च केले होते.. ते ही तिच्या पूर्वीच्या जॉब च्या शिलकी तून... हो! कारण या भेटी साठी तिला नवऱ्याचे पैसे खर्च करायचे नव्हते..

   तीने भरभर आवरले असले, तरी सुरेख तयार झाली होती ती.. त्याला आवडणारी गाजर कलरची काठा पदराची सिंपल पण सोबर साडी,, समोर केसांचा पफ काढून मागे घातलेली लांबसर वेणी, त्यावर माळलेला, कालच कामवाली ला सांगून आणून ठेवलेला मोग्ऱ्याचा गजरा, माफक प्रमाणात केलेला मेक अप.. अगदी तस्साच जसा त्याला आवडायचा.. लग्नाच्या आधी... त्यावेळेस ही ती अशीच तयार होऊन जायची त्याला भेटायला.. एवढेच की तेंव्हा पंजाबी ड्रेस असायचा..

    आज जवळ जवळ दहा वर्षांनी ती त्याला अशी भेटायला जात होती.. तो काय म्हणेल? आपल्याला अचानक समोर पाहून काय प्रतिक्रिया देईल? आनंद होईल की असे नाव न सांगता अचानक आले म्हणून रागवेल? की त्याला हवी तशी तयार होऊन आले म्हणून कौतुक असेल नजरेत...मनात असंख्य विचार आणि एक्साईट मेंट...

    मुले घरी यायला अजून बराच वेळ होता. त्या आधी तीला घरी परत यायचे होते. कारण माहित होते, ते घरी आले की त्यांना त्यांची मम्मा समोर हवी असायची.. तशी नेहमी तिला समोर हजर असलेलं बघायची सवयच झाली होती त्यांना.. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही..


   ती तयारी करून आपल्या स्कूटी वरून बाहेर पडली.. ही स्कूटी गेल्या वर्षीच तिच्या नवऱ्याने वाढ दिवसाचे गिफ्ट म्हणून घेऊन दिली होती तिला.. आज वेगात जात असली तरी तो वेग कमीच वाटत होता.. आपल्या ला पंख असते तर? अस्से उडत गेलो असतो त्याच्या पुढ्यात ... पण..? पण अपॉइंटमेंट तर चार ची होती.. त्या आधी तो तिला भेटू शकणारच नव्हता.. त्याचा वेळ किती मौल्यवान होता याची कल्पना होती तिला.. पंधरा पंधरा दिवस लोकांना वाट बघायला लागायची.. तेंव्हा कुठे त्याचा वेळ उपलब्ध व्हायचा... तीचे नशीब जोरावर म्हणून कोणाची तरी अपॉइंटमेंट कॅन्सल झाली आणि तिला मिळाली..


    कोर्टाचे आवार आले तसे तीने स्कूटी पार्क केली. आणि आपली पर्स सांभाळत ती आजू बाजूला बघतच त्याच्या केबिन च्या दिशेने वळली..

    आज कित्येक वर्षांनी ती इथे येत होती.. बरेचसे नवीन बदल झाले होते. नवीन व्यक्ती दिसत होत्या. सगळे सराईत पणे वावरत होते.तीला तीच तिथे नवखी असल्यासारखी वाटत होती...

    काही जूनी मंडळी तिच्या कडे आश्चर्य चकित नजरेने बघत होते... नजरेत ओळख ठेवून स्मित हास्य करत होते.. ती मात्र बावरून इकडे तिकडे बघून चालत होती.. अनपेक्षित व्यक्ती अचानक समोर आली तर कसे सामोरे जायचे, याची भीती ही नजरेत होती..

    ती त्याच्या केबिन समोर आली.. अजून पाच मिनिटे बाकी होती चार ला...

    "अरे नमू तू?? तू इथे???" समोरच्या व्यक्तीने अचानक विचारले आणि ती दचकली..

   "का.. काका.. तुम्ही??"


क्रमशः