अपूर्वाचे नवे स्वप्न,जगण्याची नवी आशा

प्रस्तुत कथेत मी अपूर्वावर बेतलेला प्रसंग तिला जगण्याची नवी आशा,तसेच नवे स्वप्न कसे मिळवून देते हे सांगितले आहे.

अपूर्वा..साधारण पस्तीशी गाठलेली मुलगी..

" अपूर्वा,आम्ही तुझे पालक आहोत.तुला आजपर्यंत एवढी स्थळे दाखवूनही एकही पसंत न पडल्याने अजून किती दिवस सिंगल असण्याचे ओझे घेवून वावरणार आहेस? आम्ही दोघे आता तुझ्यामागे लग्नाचा तगादा लावणे सोडून देणार आहोत.तुझे नशीबच असे आहे काय करणार?"

" मग काय हो! एक आई म्हणून मलाही वाटत की माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न व्हावं.आता हिला देव कधी सद्बुद्धी देणार काय माहित? एकच गोष्ट हिच्या बाबतीत चांगली आहे ती म्हणजे तिची भरमसाठ पगाराची नोकरी."

" बास! पुरे हा आई बाबा आता. सारखा तोच तोच विषय असतो घरात मी ऑफिस वरून आले की! मला ना अशा जगण्याचा आता वीटच आलाय!"

अपूर्वा बेडरूम मध्ये जाते आणि दार लॉक करते.

थोड्या वेळानंतर..

" अपूर्वा ,ए अपूर्वा! खिडकीतून बघते ही काय करते ते. अरे बापरे ! अहो इकडे या लवकर! अहो अहो.."

" आलो ग ..काय ओरडतेस?बापरे! अपूर्वा .."

   तात्काळ अपूर्वाला हॉस्पीटल मध्ये दाखल केले जाते. अपूर्वाला काही वेळानंतर जाग येते.सिस्टर तिला म्हणते,

" मॅडम ,अहो एवढी मारायची हौस बरी नव्हे!काय तर म्हणे हाताची नस कापली.हे समोर बघा ५ वर्षांचे लेकरू.निपचित पडले आहे अगदी.तिला जेव्हा कळेल की कार अपघातात फक्त मी एकटीच वाचले आणि माझे आई बाबा देवाघरी गेले तेव्हा तिचे काय होईल? अशा निरागस मुलांना तसेच बेवारस अर्भकांना आम्हाला अनाथालयाला सुपूर्त करावे लागते.चला काळजी घ्या स्वतःची!"सिस्टर निघून जाते.

" आम्ही बाहेर होतो. मग सिस्टर ने सांगितले की तू शुध्दीवर आलीस म्हणून. बरं वाटतंय ना बाळा तुला?"

" आई बाबा,मला ना अनाथालय उभारायचे आहे,जिथे मी असंख्य मुलांचा आधार बनू शकेल."

" हो बाळा आम्हाला तुझा निर्णय मान्य आहे.उगाच पळत्याच्या मागे धावत हातचे आम्हाला सोडायचे नाही."

आज एवढ्या दिवसांत अपूर्वाला जगण्याची नवी आशा गवसली होती;तसेच अनाथांचा आधार बनण्याचे नवे स्वप्नही गवसले होते.



©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

# गोष्ट छोटी डोंगराएवढी