Login

आपल्याला काय कमी आहे? (उत्तरार्ध )

Aplyala Kay Kami Ahe?
आपल्याला काय कमी आहे? उत्तरार्ध ©®विवेक चंद्रकांत...

ज्यादिवशी दिलीप येणार त्यादिवशी राजेशने फोन केला.
"अरे तुम्ही कोणत्या गाडीने येतायेत?"

"आम्ही संध्याकाळपर्यंत येऊ." दिलीप उत्तरला.

"अरे म्हणजे ट्रेनने की st ने? म्हणजे मी घ्यायला येतो."

"नको दादा. आम्ही येऊ आमचे."

राजेशला आश्चर्य वाटले एरवी तर बोगी no. ट्रेन no. पाठवतो. आज एकदम आम्ही आमचे येऊ?

संध्याकाळी राजेश घरी आला तर नवी कोरी चारचाकी बाहेर उभी होती. घरात आला तर पल्लवी आणि दिलीप चहा पीत होते.
"अरे गाडी कोणाची आहे बाहेर?"

"दादा, मीच घेतली नवी. ऑफिस मध्ये कार फायनान्स वाले आले होते, चार पाच लोकांनी घेतल्या.नमस्कार करतो."

पल्लवी आणि दिलीपने नमस्कार केला.

"सुखी राहा. छान केले गाडी घेतली."

रात्री गप्पाटप्पा करत जेवण झाले. तसा दिलीप म्हणाला

"दादा उद्या घरी आहे का? "

"नाही. पण रजा घेतो ना?"

", अरे उद्या फ्लॅट बघायला जायचे आहे. म्हणजे बूक करायचे म्हणतो. तुला अनुभव आहे तर चल सोबत."

"अरे आताच गाडी घेतली लोनवर.. आणि परत..?"
माधवीने इशारा केला तसा राजेश चूप बसला.

दुसऱ्या दिवशी चारी जण गाडीने पुष्कळ फिरले. अखेर एका स्कीम मधील 2 bhk फ्लॅट बूक केला.माधवीने सांगितल्यामुळे राजेश काही बोलला नाही.मात्र राजेशने स्कीम, बिल्डर, कार्पेट एरिया, पझेशन वैगरे गोष्टी क्लिअर करून घेतल्या.

संध्याकाळी बाहेर हॉटेल चा पाहुणचार करून रात्री घरी आले. दुसऱ्या दिवशी दिलीप आणि पल्लवी गेल्यावर राजेश माधवीला म्हणाला

"दिलीपला वेड लागले आहे का? जेमतेम 40 हजार पगारात एवढे का करतोय? 52 लाखाचा फ्लॅट, 10-12 लाखाची गाडी, मुले मोठी होतायेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च? "

"मलाही तसेच वाटते आहे. कारण दरवेळी पल्लवी जे रडगाणे लावते ते यावेळी बोलली नाही. तुम्ही शांत रहा मी तपास करते. हे नक्कीच काहीतरी आहे."

याबाबतीत राजेशचा पत्नीवर विश्वास होता. साध्या सरळ राजेशला असले छक्के पंजे यायचे नाहीत.

चार दिवस झाले. संध्याकाळी ऑफिस हुन आल्या आल्या माधवी राजेशला म्हणाली. "सगळे कळाले. तुमचा भाऊ वहिनी किती लबाड आहे ते पण."

"कसे काय?"

"तुमची चुलत चुलत बहीण गावातच राहते ना? तिचे आणि पल्लवीचे अजिबात पटत नाही. ती नणंदेचा तोरा दाखवते असे पल्लवीचे म्हणणं आहे.तुम्ही गेले की तिच्याकडे जातात. एखादी साडी देतात त्यामुळे तुमच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे तिला."

"तिचे काय?"

"तिलाच फोन लावला.ती तर अगदी वाटच पाहत होती. तुम्हाला माहिती आहे ना की अप्पांचे प्रोविडंड फंडाचे पैसे काही तांत्रिक कारणाने अडकले होते."

"हो "

"ते नंतर मिळाले. साधारण पंधरा लाख "

"इतके?"

"हो. ते सर्वच्या सर्व दिलीपने हडप केले. पण त्यावेळेस अप्पांचे आजारपण असल्याने कोणाला कळाले नाही. इतकेच नाही. आईंच्या अंगावर किती दागिने होते हे आठवत?"

"नाही "

",, कमीतकमी, 10 तोळ्याची बोरमाळ, बांगडया पाटल्या मंगळसूत्र मिळून एकूण अठरा ते वीस तोळे."

"बापरे.!"

"आजची किंमत काढली तर पंधरा सोळा लाख. आणि घराच्या खर्चासाठी ते दागिने म्हणून विकल्याचे पल्लवीने सांगितले. पण ते खरे नव्हते."

"तरीही 30 एक लाखच होतात."

"सांगते ना. एक plot अप्पानी घेऊन ठेवला होता. तो दिलीपला कायम करण्यासाठी अप्पानी विकला तो सतरा लाखाला विकला. पण अप्पांच्या ओळखीमुळे तिथे दिलीपचे काम फुकट झाले पण हे पैसेही दिलीपनेच घेतले."

"जाऊ दे. अप्पा आईना त्याने शेवटपर्यंत ठेवले जवळ. त्याचे त्याला फळ मिळाले."

", हो ना. मिळायलाच हवे पण मग अधूनमधून तुमच्याकडून रडून पैसे कशाला घ्यायचे? शिवाय अप्पा तर हार्ट अटॅकने गेले पण आई पंधरावीस दिवस क्रिटिकल कंडिशन मध्ये हॉस्पिटलला होत्या तेव्हा त्यांचे संपूर्ण बील साडेचार लाख रुपये तुम्ही दिले."

"जाऊ दे ग. आई होती माझी."

"हो ना मिस्टर राजेश भंडारी. पण आई आणि अप्पांच्या शेवटच्या दिवसाचा दहाव्या.. बारावयाचा खर्च ही निम्म्याच्या वर तुम्हीच केला."

"ठीक आहे. पण त्याला हे पैसे लपवायचे असते तर त्याने इथे फ्लॅटच बूक केला नसता. कारही दाखवली नसती."

"कारचे आज ना उद्या समजलेच असते. फ्लॅटचे असे आहे की आपले शहर शिक्षणाला उपयुक्त आहे. शिवाय तुम्ही सोबत असला की संपूर्ण माहिती घेऊनच बुकिंग कराल म्हणजे बिल्डर कडून फसवणूक होणार नाही. शिवाय भावाचा फ्लॅट म्हणून अगदी भाडेकरू शोधून द्याल.. बरोबर ना?"

"बरोबर "

"तेव्हा आहे हे असे आहे. दुर्दैव म्हणजे एवढे सगळे होऊन आई, अप्पाही काही बोलले नाही.खरेतर त्या सगळ्या पैशांवर, किमान आईच्या दागिना्यांवर निम्मा हक्क तुमचा होता."

"खरंय माधवी, जो मुलगा आर्थिकदृष्टया कमजोर असतो आईवडील त्याचीच बाजू घेतात."

" पण आता अगदी हरिषचंद्राचा अवतार नका राहू. थोडे सजग राहा. भाऊ वहिनी काय, कधी कधी आईवडिलही आपल्या बाजूचे नसतात. "

"अगदी मान्य. पण मी काय म्हणतो माधवी..."

"काय म्हणणार? आपल्याला काय कमी आहे का? हेच ना.."

." तुने मेरी मुह की बात छिन ली. "

"धन्य हो तुमची "

"पण एक फायदा झाला. दिलीप अधूनमधून पैसे घेऊन जातो रडून ... ते बंद होईल."

"कोण जाणे? हफ्ते थकल्याचे कारण देऊ शकतो तो..."

"अरे?..."

©®डॉ. विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.(समाप्त )