आपल्यातल्या बाबांची कहाणी

Father love towards children

बाबा म्हणजे सर्वात मोठी भेट..

स्वरा रागावली होती बाबांवर ..
स्वरा:"बाबा आज मला माझ्या वाढदिवसाला मेकअप किट हवी होती, पण नाही आणली ना तुम्ही??..
बाबा:"स्वरा,बाळा..पगार कमी आला ,म्हणुन नाही जमलं पण,पुढच्या वेळी नक्की देईल तुझी भेट ...
स्वरा:"नाही,देणार  तुम्ही मला माहित आहे... माझ्या सर्व फ्रेंडकडे आहे, फक्त माझ्याकडेच नाही"रडत रडत  निघुन गेली....
दुसऱ्यादिवशी बाबांनी ,मित्राकडुन उधार घेऊन स्वराला तिला हवी तशी मेकअप किट विकत घेतली...
घरी गेले,स्वराला दिली ..बाबांना वाटलं खुश होईल, पण ती रडायला लागली आणि बोलु लागली"बाबा मला कसलीच मेकअप किट नको,फक्त तुम्ही पाहिजे.माझी फ्रेंड शलाका  तिचे बाबा आत्ताच मेजर अटेकने गेले"....
"आयुष्याची बाबाच  खूप मोठी भेट आहे" हे स्वराला आज कळले होते....

★★★★★★★★★★★★★


आईसाठी बाबा झाला तो.
(सत्यकथा)

सत्तराव्या वर्षी शिवाच्या आईची  स्मृती एकाएकी गेली..वयोमानानुसार खूप आजारी पडली..शिवा आणि त्याच्या परिवारासाठी कठिण झाले तिला सांभाळणे..तिला एकटीला सोडून कुठेच जाता येत न्हवतं....
मित्राने  सल्ला दिला..."शिवा! तुझ्या आईला वृद्धाश्रमात टाक, हल्ली सगळे तेच करतात.. स्वतःसाठी जग जरा"
शिवा उत्तरला.."माझी आई आणि वृद्धाश्रमात!अजिबात नाही...माझ्या बाबांना अकाली मृत्यू आला ...आई आमची बाबा झाली... आम्हाला चटणी भाकरी का होईना पण उपाशी नाही ठेवले...तरुण होती,दुसऱ्या लग्नाचा विचार करू शकत होती, तीसुद्धा आम्हाला अनाथ आश्रमात टाकू शकली असती ,पण तिने तसे नाही केले....आता या वळणावर तिला माझी खूप  गरज आहे.
"माझी आई, आयुष्यभर माझ्यासाठी "बाबा"झाली होती,मग माझसुद्धा  कर्तव्य आहे..आज  मी माझ्या आईचा "बाबा"झालो आहे...

★★★★★★★★★★★★★★

मुलीला पुनर्जन्म देणारा बाबा
सत्यकथा..

"तुमची मुलगी नाही जगणार"डॉक्टरांनी सांगितले.हे ऐकून आईने सात महिन्याच्या चिमुकलीला घेऊन हंबरडा फोडला..बाबाही रडु लागला...पण बाबाने हार मानली नाही , आशा सोडली नाही.  त्या कठिण प्रसंगातही..तो लगेच दुसऱ्या डॉक्टरांकडे  घेऊन गेला...त्यांनीही तेच सांगितले "तुमच्या मुलीची जगण्याची शाश्वती नाही , पण प्रयत्न म्हणुन शेवटचं इंजेक्शन देऊन बघु ,ते आणा....त्या 
इंजेक्शनने वाचली तर वाचली,.. बाबा रात्रीच्या दोन वाजता पायी पळत  सुटला. एकही रिक्षा न्हवती,एकाही मेडिकलमध्ये इंजेक्शन सापडत न्हवते.. पण मुलीचा जीव वाचवायचाच होता त्याला कोणत्याही परिस्थितीत, त्याने कुर्ला ते घाटकोपर अंतर पायी गाठले.,..तेथे इंजेक्शन मिळाले,. डॉक्टरांनी तिला  इंजेक्शन दिले... दुसऱ्या दिवशी लेक  मृत्यूला चकवा देऊन आली...बाबांच्या प्रसंगसावधानामुळे तिला पुनर्जन्म भेटला होता...

★★★★★★★★★★★★★★

फूटपाथ ते फ्लॅटचा प्रवास (सत्यकथा )
तिचा  बाबा ,सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्यापैकी एक  होता, पण डोक्यावरून वडीलांचे छत्र हरवलं आणि  गरिबीने दार ठोठावले.. त्याची आई मुंबईला घेऊन आली त्याला...थोड्यादिवस  रोडवरच झोपावे लागले ,आईला लादी कंपनीत काम मिळाले.... भाड्याने घर पाहिले. पत्र्याचे होते....त्याचा अवतार पाहून शाळेतली पोरं चिडवायची.आईची मजुरी घर भाडे देण्यात संपुन जायची... वयाच्या  दहाव्या वर्षी त्याने कामं सुरू केली. चणे फुटाणे विकले, पाव विकले. टेलरिंग शिकला..गारमेंटमध्ये कामाला लागला पण तरीही आईला हातभार लागावा म्हणून सकाळी चारला उठून पाव विकायचा..कामाच्या नादात दहावी मधुनच सोडली... आईने लग्न लावले त्याचे.. तो स्वतः  आता वडिल झाला...त्याने दहावी पास केली..त्याला सरकारी नोकरी लागली..फ्लॅटचा मालक झाला. सोनेरी दिवस पुन्हा आले.....

★★★★★★★★★★★★★★


जेव्हा आई बजावते भूमिका
यशोदा आणि रामच्या घरी गोंडस मुलीने जन्म घेतला.. साक्षात लक्ष्मी,ती आली  घरात भरभराट झाली..आईपेक्षा बाबांची लाडकी होती.. राम तिच्या केसालासुद्धा धक्का लागू देत नव्हता .सर्व मागण्या पुर्ण करत होता.. फुलाप्रमाणे जपायचा तिला..बाबांची सोनपरी  होती.

रामने तिला आवडतो त्या मुलाशी लग्न लावून दिले... महिना होत नाही काळाने घात केला...राम  अपघात होऊन देवाघरी गेला...लक्ष्मी बाबाच्या जाण्याने दुःखी झाली.त्यातुन सावरत नाही तोच अजुन एक धक्का बसला,तिच्या नवऱ्याचे बाहेर प्रेम प्रकरण चालु झाले होते, खूप मारहाण करायला लागला....
ती आईपासून लपवत होती, आईला जसे कळलं..तसे आईने घटस्फोट घ्यायला लावला..घरी आणले लक्ष्मीला.

 बाबा म्हटलं की, पुरुषाची प्रतिमा उभी राहते... पण वेळप्रसंगी आई मुलांसाठी बाबासुद्धा होते.

कश्या वाटल्या लघुकथा ,नक्की अभिप्राय कळवा

©®अश्विनी पाखरे ओगले..