बघ, आजपासून तुझा आणि माझा काही संबंध नाही. माझी बायको म्हणून मी तुला कधीच स्वीकारणार नाही. तुला या घरात राहायचं तर राहा, सुनेची कर्तव्य कर. बाकी माझ्याकडून कसलीच अपेक्षा ठेवू नको." अभय राधिकाला म्हणाला.
"म्हणजे? माझं काही चुकलं का?" राधिका अपराधी स्वरात म्हणाली.
"नाही गं. चूक माझीच आहे. मलाच लग्न करायचं नव्हतं तुझ्याशी." अभय चिडून म्हणाला.
"का? मी पसंत नव्हते का तुम्हाला?" राधिका.
"हवं तर तसं समज. पण इथून पुढे माझ्या कुठल्याच बाबतीत लक्ष घालायची गरज नाही." अभय ऑफिसला निघून गेला.
"अहो, ऐका तरी.." राधिका त्याच्या मागून धावली.
इतक्यात सासुबाई पुढे आल्या.
"काय गं काय झालं?"
"काही नाही. माहेरची आठवण आली. जाऊन येऊ का म्हणताना, हे नाही म्हंटले." राधिकाच्या डोळ्यात पाणी आलं.
"अजून थोडे दिवस असं व्हायचंच. अजून लग्नाला पंधरा दिवसच झाले आहेत तुमच्या." सासुबाई.
तशी राधिका रडू लागली.
"अगं रडतेस कशाला? आणि आत्तापासूनच नवऱ्याला पाठीशी घालायला लागलीस की काय? जाब विचारण्याआधीच?" सासुबाई तिला जवळ घेत म्हणाल्या.
"म्हणजे?"
"मी ऐकलं आहे सगळं. लग्न म्हणजे काय खेळ नव्हे. नवरा -बायकोने एकमेकांकडून अपेक्षा ठेवायच्या नाहीत तर कोणी ठेवायच्या? आणि बायको म्हणून स्वीकारणार नाही म्हणजे काय?त्याच्या मनात काय आहे देव जाणे. पण वेड वाकडं काही नाही..हे मात्र मी ठामपणे सांगू शकते. थांब, संध्याकाळी येऊ दे त्याला. चांगल खडसावते." सासुबाई रागाने म्हणाल्या.
"नको. आई, मी तुम्हाला सारं काही सांगितलं असं होईल. पुन्हा मलाच बोल लावतील हे. मी जाईन माहेरी थोडे दिवस." राधिका आपले डोळे पुसत म्हणाली.
"जाशील गं. पण तुझ्या संसाराची घडी आधी बसवावी लागेल ना? सारं सुरळीत झालं की आपल्याला निवांत जा माहेरी. तेव्हा वाटणारही नाही तुला माहेरी जावं म्हणून." सासुबाईंच्या या शब्दांनी राधिकाला धीर वाटला.
"आता मी सांगते तसं कर." राधिका आणि सासुबाई एकमेकींशी बराच वेळ बोलत राहिल्या.
रात्री अभय घरी आला आणि राधिका सासुबाईंनी सांगितलेलं सगळं विसरली.
"अहो, मी कमी शिकले म्हणून तुम्हाला आवडत नाही का? छोट्या शहरातून आले म्हणून? की मॉडर्न राहत नाही म्हणून? आणखी काही वेगळे कारण तर नाही ना?"
"तोच विषय आणखी किती उगाळणार आहेस? सांगितलं ना, मी तुला माझी बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही म्हणून. आता या विषयावरुन रोज सारखी कटकट नाही करायची मला." अभय वैतागून म्हणाला.
"असं कुठे असतं का? लग्न करायचं आणि वर म्हणायचं, आपण नवरा -बायको म्हणून राहायचं नाही! लोक काय म्हणतील?" राधिका.
"त्यात काय? चार-चौघात आपण नवरा -बायको सारखे वागायचं. बाकी एरवी तू माझ्या आयुष्यात लक्ष घालायचं नाही आणि मी तुझ्या. इतकं सोपं आहे हे." अभय झोपायच्या तयारीला लागला.
'किती स्वप्न पाहिली होती मी. अर्थात प्रत्येक मुलीची आपल्या संसाराची काही स्वप्नं असतात. पण माझ्याबाबतीत काही वेगळच घडतं आहे.' राधिका रात्रभर तळमळत राहिली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा