Jan 27, 2021
माहितीपूर्ण

अपेक्षा

Read Later
अपेक्षा

अपेक्षा:-

नितीन आज खूप खुश होता , आज त्याचा 12 वी चा निकाल लागला होता आणि खूप छान मार्कांनी  तो पास झाला होता.
" अभिनंदन नितीन , खूप छान मार्कस मिळालेत . आता काय बाबा एक मुलगा इंजिनिअरिंग ला जाणार आणि इंजिनीअर होणार." शेजारचे जोशी काका म्हणाले , पेढा घेतला आणि थोडा वेळ घरात गप्पा मारून गेले.
नितीन आपल्याच विचारात होता , तेवढ्यात फोन वाजला मामा चा फोन पाहून आनंदाने " बोल मामा , कसा आहेस?"
" मी मजेत नितीन , खूप छान वाटले तुझी प्रगती ऐकून, ताई आणि जिजू खुश असतील ना खूप? आता छान कॉलेज ला ऍडमिशन मिळून तू इंजिनिअरिंग ला गेलास की सार्थक वाटेल बघ."
" थँक्स मामा , आईला फोन देतो."
इतकेच बोलला आणि तो आपल्या रूम मध्ये गेला.
"सगळे स्वतः का ठरवत आहेत की मी काय करावे. मला वेगळे काही करायचे असू शकते , मला माझ्या ही काही ईच्छा आहेत " मनाशी बडबड करत त्याने डोळे मिटले आणि कधी डुलकी लागली त्याला कळलेच नाही . जागआली तेव्हा 4 वाजले होते. 
बाहेर हॉल मध्ये आला तर आई कोणाशीतरी फोन वर बोलत होती " हो ना, आता बस चांगले इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं की देव पावला म्हणायचे"

" आई , मी जरा राजुला भेटून येतो वेळ लागेल."
" अरे या अवेळी कुठे जातोय ? संध्याकाळी जा आणि काय हे जेवला पण नाहीस आज!"
 "नंतर  जेवेन" इतकेच बोलून त्याने शूज घातले आणि बाहेर पडला. राजू चे घर फार लांब नव्हते म्हणून चालतच आपल्या विचारात तो निघाला आणि त्या नादात तो कधी पोहचला हे त्याला कळले पण नाही.
बेल वाजवली तर राजुनेच दार उघडले नितीन ला पाहून एक घट्ट हग केले आणि म्हणाला, "नित्या लेका , जिंकलास!" 
नितीन ने छोटीशी स्माईल दिली.
 तेवढ्यात आतून येऊन त्याचे बाबा म्हणाले
 " अभिनंदन नितीन , काय मग काय प्लान आता? नीट विचार करून निर्णय घे." 
पहिल्यांदा असे कोणी काहीतरी वेगळे म्हणाले हे ऐकून नितीन जरा हसला आणि थँक्स म्हणून राजू बरोबर त्याच्या च्या रूम मध्ये गेला .
"काय रे नितीन चेहरा का असा पडलेला तुझा? तू तर खुश असायला हवे . अरे तुझे मार्क बघून हेवा वाटेल बघ कुणालाही नाहीतर माझा रिझल्ट बघ , जेमतेम फर्स्ट क्लास!  तरी मला हायसे वाटतेय."
" राजू खरं तर खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणून आलोय बघ. सगळे ठरवतात आहेत की मी इंजिनीअर होणार , इतकेच नाही तर कॉम्पुटर की मेकॅनिकल इथपासून चर्चा!  अरे पण मला तर कोणी विचारा की मला खरच ते करायचे आहे की नाही! आई काय,  बाबा काय,  प्रत्येक जण आपल्या अपेक्षा बोलत आहेत , माझे काय?"
प्रकरण जरा सिरीयस दिसतंय असे जाणवून राजू नितीन  जवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हाथ ठेऊन म्हणाला " बोल नक्की, काय  झालाय? तुझा काय विचार आहे ? 
अरे तू तर सायन्स घेतले ना!
 मग मनात तरी काय तुझ्या?"
" राजू अरे जे इंजिनीअर बनतात तेच सक्सेस होतात का? दुसरे काही पण तर करता येते ना! मला एअर फोर्स मध्ये जायचे आहे त्यासाठीच तर मी इतका अभ्यास केला करण माझे निश्चित आहे आधीपासून . त्यासाठी सायन्स घेणे गरजेचे होते आणि माझी मनापासून एकच ईच्छा की मला देशासाठी काही करायचे आणि  फायटर पायलट बनायचे. माझी माझ्याकडून पण अपेक्षा असू शकते ना?"
राजू जर विचारात पडला करण त्याला माहित होते की नितीन चे आई बाबा यासाठी तयार होणे खूप कठीण. टिपिकल विचाराचे नितीन चे बाबा यांसाठी तयार होणारच नाही. 
" तू हे घरी बोलला आहेस का नितीन? तुला माहीत आहे ना, तुझे बाबा तयार होणार नाहीत. तुझी तयारी आहे का विरोध पत्करायची ? नीट विचार कर , मला सगळे कठीण वाटते आहे."
" मला कळतंय तू काय म्हणतो राजू!  पण आज जर मी बोललो नाही तर आयुष्यभर दुःखी राहीन आणि जिथे मनाविरुद्ध काही केले तिथे यश तरी कसे मिळेल. अपेक्षांचे ओझे होईल मला आणि मी दबत जाईन त्याखाली."
राजू ने जर विचार केला आणि त्याच्या बाबांपाशी नितीन ला नेले. तोवर छान गरम पास्ता घरून राजू ची आई आली आणि त्यांच्या चर्चेत सामील झाली.
राजू ने आपले बोलणे सविस्तर सांगितले तेव्हा ती दोघे पण जरा विचारात पडली कारण राजू च्या घरचे आणि नितीन च्या घरचे वातावरण खूप वेगळे होते. कमी मार्क मिळून सुद्धा त्यांनी राजू ला प्रोत्साहित केले आणि इंजिनीअरिंग ला जा आम्ही फीज भरू तू काळजी करू नकोस असे आईने सांगितले होते आणि नितीन चे पूर्ण उलट . सहज इंजिनीअर होता येईल तर त्याला ते न करता BSC करायचे होते.
" नितीन , हे बघ मी तुझ्या पाठीशी आहे . स्ट्रॉंग हो आणि मनातले सांग घरी , गरज पडेलच मला माहित आहे मी बोलेन तुझ्या बाबांशी. पण सुरवात तुलाच करावी लागेल." 
आपल्या सोबत काका आहेत म्हटल्यावर नितीन ला जर धीर आला आणि मनाशी काही ठरवून त्याने काका काकुला नमस्कार केला आणि घराकडे निघाला.
घरात तर आनंदी वातावरण होते नितीन चे  मावशी काका पण आले होते , आता हा आनंद फार काळ टिकणार नाही माहीत होते तरी हिम्मत करून " बाबा मला तुमच्याशी बोलायचे आहे!" आज पहिल्यांदा नितीन काहीतरी बोलायचं प्रयत्न करत होता.  वातावरण एकदम स्थिर झाले. सगळे एकदम शांत झाले
" नितीन अरे काय झालंय ? आज आम्हाला इतका आनंद झालाय आणि तुझे हे काय ? आमचा मुलगा इंजिनीअर व्हावा यासाठीच तर आम्ही स्वप्नं पहिली."
" पण बाबा हे तुमचे स्वप्न आहे माझे नाही. आजवर मी तेच केले जे तुम्ही म्हणालात. आजवर तुमच्या सगळ्या अपेक्षांना मी खरा उतरलो पण आता नाही होणार तसे. माझ्या स्वतःकडून ही काही अपेक्षा आहेत , स्वप्न आहे आणि ते मला जगायचे आहे."
आता काय घडणार म्हणवून त्याची आई आणि मावशी जरा टेन्शन मध्ये आल्या होत्या. उत्सुकता आणि भीती याचे समीकरण जुळून आले होते. 
 " काय म्हणायचे आहे तुला?" रागातच त्याचे बाबा बोलले.
" बाबा मला इंजिनिअरिंग नाही करायचे."
" मग काय कारकुनी करायची आणि आयुष्याभर खर्चाची जुळवणी करत बसायचे का?" आता त्यांचा आवाज एकदम चढला होता. 
"बाबा , कारकुनी आणि इंजिनिअरिंग हे इतकेच पर्याय नाहीत जगायला .मला एअर फोर्स मध्ये जायचे आहे आणि फायटर पायलट व्हायचे आहे . मी ठाम आहे की मला BSC करायचे आहे ."
शांत आणि स्पष्ट शब्दांत नितीन बोलला .हे ऐकून नितीन चे बाबा खूप चिडले, तरी पण तरीही नितीन पहिल्यांदा स्वतःच्या मतावर ठाम होता. 
 रागाने निघून गेलेल्या त्याच्या बाबांनी  पूर्ण अबोला धरला , घरात अगदी सुतकी वातावरण झाले होते. पण तरीही नितीन ठाम राहिला , त्याला राजू चे बाबा समजावत होते आणि मदत पण करत होते .
अखेर त्याने BSC ला ऍडमिशन घेतली. विरोध मान्य करून तो त्याच्या प्रवासाला निघाला आणि बघता बघता 3 वर्ष गेली सुद्धा! नितीन ने BSC मध्ये टॉप केले , निकाल आला आणि कॉलेज मध्ये त्याचा सत्कार पण झाला पण तरीही त्याचे बाबा त्याच्याशी बोलले नाही .
 नितीन ला याचे वाईट वाटत होते पण यावेळी माघार नाहि यावर तो ठाम होता . 
त्याने एअर फोर्स साठी फॉर्म भरला , परीक्षा दिली. लेखी परीक्षेत पुन्हा तो अव्वल आला .  पुढे शारीरिक चाचणी व इतर लेव्हल पस करत शेवटी त्याचे सिलेक्शन झाले आणि तो ट्रेनिंग ला गेला. 
आता मात्र राजू च्या बाबांना राहवेना.
एकदिवस ते नितीन कडे गेले आणि नितीन च्या बाबांना  भेटले.तसे ते अजूनही रागात होते , नितीन च नावही ऐकायला तयार नव्हते.
" देशमुख साहेब , एक बघा आज नितीन म्हणाला त्याप्रमाणे त्यानें त्याचे स्वप्न पूर्ण केले . तो इतरंपेक्षा वेगळा आहे आणि त्याचा मार्ग पण. जो निवडला तो सोपा मार्ग नाहीं , पण त्यावर चालायची धमक नितीन ने दाखवली .आपण आपल्या अपेक्षा लादणे कितपत योग्य आहे याचा विचार करा? नितीन आनंदी असावा की दुःखी हे तुम्ही ठरवा. कारण यश हे तेव्हाच पुरे वाटते जेव्हा त्याला घरच्यांची साथ मिळते.  नितीन कितीही मोठा झाला आणि तुमचा आशीर्वाद नसाल तर तो यशस्वी होईल का? तुमची अपेक्षा योग्य आणि त्याचे स्वप्न चूक हे कसे काय बरे? जर तो अयशस्वी झाला असता तर तुम्हाला आनंद झाला असता का? थोडा विचार करावा ही विनंती करतो."
बाबा शांतपणे ऐकत होते.
राजू चे बाबा पुढे म्हणाले, " खरं सांगू! अगदी गोल्डन स्टेटमेंट आहे हे! 
आई वडिलांचा खरा आनंद हा मुलांच्या आनंदातच असतो"
त्यांच्या ह्या बोलण्याने 
नितीन चे बाबा एकदम चमकले.
त्यांच्या चेहऱ्यावरून ते आता थोडे विचारात जाणवत होते. काय योग्य काय अयोग्य या विचारात बरेच दिवस निघून गेले त्यांच्या वागण्यात फरक पडत होता.
ट्रेनिंग पूर्ण करून काही दिवसांसाठी नितीन घरी आला , दारातच त्याचे जंगी स्वागत तयारी त्याला दिसली आणि मुख्य म्हणजे पुढाकाराने त्याचे बाबा सगळे बघत होते. नितीन ला आश्चर्य आणि आनंद असे दोन्ही जाणवत होते पण ही जादू कशी झाली हे कळत नव्हते. राजू चे बाबा त्याला भेटायला आले तेव्हा त्याला कळले की या जादूचे खरे जादूगार काका आहेत. 
" काका मनापासून धन्यवाद.आज मला खरे यश पूर्ण मिळाले असे वाटते आहे. तुम्ही होतात म्हणून मला माझे स्वप्न पूर्ण करता आले. त्यावेळी तुमची साथ , हिम्मत मला बळ देत होती आणि आज तुम्ही माझ्या या यशाचे खरे मानकरी आहेत." भरल्या डोळ्याने त्याने काकांचा आशीर्वाद घेतला.
त्याचे लक्ष नव्हते की बाजूच्या खोलीतून त्याचे बाबा हे सगळे ऐकत आहेत . थोड्या वेळाने ते बाहेर आले आणि राजू च्या बाबांना आलिंगन देऊन धन्यवाद म्हणाले. 
"आज रात्री आमच्या घरी सगळे जेवायला या" असे आमंत्रण देऊन  त्यांनी राजू च्या बाबांना  आणि नितीन ला पण घट्ट मिठी मारली. 
नितीन , राजू आणि त्यांचे परिवार आनंदात हसत खेळत जेवण करत होते आणि कृतकृत्य नजरेने नितीन आणि त्याचे बाबा एकमेकांकडे बघत होते.
आज खरे यश त्या दोघांनाही मिळालं होतं , त्यांना वडील होण्याचे आणि नितीन ला स्वतःच्या ईच्छा पूर्ण करून यशस्वी मुलाचे वडील म्हणून  वडिलांची "अपेक्षा" पूर्ण केल्याचे!
©®अमित मेढेकर

Circle Image

Amit Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!