विषय: नातीगोती
तिला वयाच्या मानाने लवकर पाळी आली. तो दिवस तिला ठळक आठवत होता. शनिवार असल्या मुळे शाळा लवकर सुटली होती. कसली तरी विचित्र भीतीची भावना तिच्या मनात निर्माण झालेली होती. ही गोष्ट कोणाला सांगावी हे तिला समजेना. कारण आई घरी नव्हती आणि काही दिवस येणारही नव्हती. मग तिने नेहमी प्रमाणे काकूंच्या घराकडे मोर्चा वळवला. काकू काहीतरी काम करत होती. काका कुठं बाहेर गेलेला होता. तिने काकूला सगळी गोष्ट सांगितली. काकूने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला.
" माझे बाय, आज पासून तू बाई झालीस ग " असं म्हणत तिला, आता या पुढे कसं वागायचं, काय करायचं, काय करायचं नाही, स्वतःची काळजी कशी घ्यायची अशा बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या. या गोष्टी ऐकल्यावर तिला खूप भीती वाटली. तिला खूप रडावसं वाटलं. आई असती तर आईच्या कुशीत शिरून ती पोटभर रडली असती. का रडली असती त्याचं कारण तिलाही सांगता येतं नव्हतं. आज काकूने आईची जागा भरून काढली होती. तिला काहीच काम करू दिलं नाही. उलट खायला काहीतरी गोड केलं. काकू बद्दल तिच्या मनात खूप प्रेम दाटून आल. थोड्यावेळाने ती घरी आली. खूप थकल्यासारख वाटतं होतं . ती तशीच पडून राहीली. शरीरात मनात काय काय वादळं सुरू होती. ती नुसतीच बघत राहीली.
संध्याकाळी काका घरी आल्यावर काकूने त्याला ती हकीगत सांगीतली. काकाने ती बातमी तिच्या वडिलांना पोहोचवण्याची व्यवस्था केली. तिच्या वडिलांना समजल्यावर त्यांनाही खूप आनंद झाला लगेच दोनचार दिवसांनी ते दोघेही घरी आले. येतांना त्यांनी तिच्यासाठी नेसायला साडी आणली होती. त्या साडीचा रंग तिला खूप आवडला होता. साडी तिला नेसता देखील येत नव्हती. तरीहि कशीबशी तिने नेसली. तशाही अवस्थेत आईने तिची नजर उतरवली.
दुसऱ्या दिवशी बाबा काकाला सांगत होते, ते तिने ऐकलं. बाबा म्हणतं होते,
" बघता बघता पोरगी मोठी झाली. आता तिच्या साठी
स्थळ शोधायला सुरुवात करायला हवी "
स्थळ शोधायला सुरुवात करायला हवी "
खरोखरच ऋतूस्नात झाल्या नंतर मुली मोठया होतात का, माहीत नाही. पणं ती मात्र खरोखर मोठी झाली होती. वयाच्या मानान खूप समजूतदार आणि समंजस. आता ती जास्त वेळ कुठं घरा बाहेर पडत नसे . सतत घरातच काम करत राही. अगदी काकूच्या घरात देखील जात नसे. आईला प्रत्येक कामात मदत करतं असे. बहुतेक सगळी कामं तिचं पार पाडत असे.
तिच्या या समजूतदारपणा मुळे तिच्या आईला कधी कधी खूप गलबलून येई. अगदी काल परवा पर्यंत अंगा खांद्यावर खेळलेली ही पोरगी बघता बघता उद्या कोणाचा तरी संसार करायला निघून जाईल. तिला वाटलं. आत्ता उठावं आणि या काम करणाऱ्या आपल्या लाडक्या मुलीला पोटाशी धराव. तिचे खूप लाड करावे. पण ती फक्त तिच्याकडे बघत राहिली.
खरोखरच तिच्यासाठी गावातले चांगलं स्थळ सांगून आल. दुसऱ्या दिवशी तिला दाखवण्याचा कार्यक्रम होता. यांत्रिक पणे ती कोणी जसं सांगेल तसं वागत होती. गावातले प्रतिष्ठित जमले होते. तिला काही प्रश्न विचारली गेली. तिने तिला जमेल तशी उत्तरे दिली. अखेर चहा पोह्यांचा कार्यक्रम संपला.
तिच्यामध्ये नाकारावे असे काहीच नव्हते. प्रश्न उलट तिच्याच पसंतीचा होता. त्यामुळे सगळे अगदी निश्चिंत होते. अगदी विचार केल्याप्रमाणे मुलाकडून पसंतीचा निरोप आला.
( क्रमशः)
लेखक : दत्ता जोशी
लेखक : दत्ता जोशी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा