आपलंच नाणं खोटं.. अंतिम भाग

कथा एका कुटुंबाची


आपलंच नाणं खोटं.. भाग ४


मागील भागात आपण पाहिले की वृंदाताई आजारी पडतात. त्यामुळे सगळे काम सुजय आणि मीरावर पडते. आता बघू पुढे काय होते ते..


" मी उद्या पियुला घेऊन आईकडे जाते. मला नाही जमणार ही अशी घरातली कामे." मीरा बोलत होती.

" मीरा असा घाईघाईत निर्णय घेऊ नकोस. आई काय उद्या बरी होईल. तुम्ही दोघीही गेलात तर मला कसं करमणार इथे?" सुजय बोलत होता.

" ते तुझं तू बघ. पण मला नाही हे जमणार." निर्वाणीचे बोलून मीरा झोपायला गेली. आज कधी नव्हे ते पियुलाही तिने फटके दिले. ती सुद्धा रडत झोपली. सुजय देवाची प्रार्थना करत झोपला की उद्या तरी आईला बरं वाटू दे.
पण दुसर्‍या दिवशीही वृंदाताईंना ताप होताच. ते बघून मीराने स्वतःची आणि पियुची बॅग भरली.

" बाबा, मी आईकडे जाते आहे रहायला."

" अग पण, ही आजारी असताना?" सुधाकररावांनी विचारले.

" हो बाबा.. पण पियुला इन्फेक्शन होऊ नये म्हणून जाते आहे. तुम्ही आहात इथे त्यांची काळजी घ्यायला. मी कसं करू?" मीरा बोलत होती.

" बरोबर आहे तुझे. जा तू. सुचेता येईलच." सुधाकरराव बोलायला आणि बेल वाजायला एकच गाठ पडली. दरवाजात सुचेता होती, नाश्ता घेऊन आलेली.

" अग, मीरा कुठे बाहेर चाललीस का?" सुचेताने आश्चर्याने विचारले.

" हो आईकडे जाते आहे." मीराचा आविर्भाव बघून सुचेता पुढे तिला काही बोलली नाही.

" पियु, खाऊ खाणार का?"

" काय आहे?"

" इडली.."

" यस्स.." पियुचे खाऊन होईपर्यंत सुचेताने आईवडिलांनासुद्धा नाश्ता दिला. सुजय आणि मीराने सुद्धा खाऊन घेतले.

" आईंना बरं वाटलं की येईनच.." असे म्हणत मीरा बाहेर पडली. तिच्यापाठोपाठ सुजय सुद्धा ऑफिसला जायचे म्हणत गेला. घरातला पसारा बघून सुचेताने काही न बोलता घर आवरायला घेतले.

" मी आता ऑफिसला जाते आणि परत संध्याकाळी येते."

" आणि तुझ्या घरी?"

" होईल मॅनेज. तुम्ही काळजी नका करू. आईचा तापपण उतरला आहे. थोडी विश्रांती घेतली की बरं वाटेल.. मी तुमचा स्वयंपाक करून ठेवला आहे. कुकर फक्त जेवायच्या अर्धा तास आधी लावा." सूचना देत सुचेता गेली सुद्धा.


दोनचार दिवसात वृंदाताई बर्‍या झाल्या. ते होताच मीरा पियुला घेऊन परत आली. सकाळी सकाळी सुजयचा परत आवाज आला..

" आई, चहा नाश्ता झाला का? मला उशीर होतो आहे."

" चहा नाश्ता काहिही झालेलं नाही." वृंदाताई बोलल्या.

" म्हणजे? तुला करायचे नव्हते तर आधी सांगायचे ना?" सुजय चिडला होता.

" सुजय, आता तुला याची सवय करून घ्यायलाच हवी ना?" सुधाकरराव बोलले.

" कसली सवय?" सुजय थोडा घाबरला होता.

" हेच स्वतःचा चहानाश्ता करून घ्यायची. डब्बा भरायची."

" का?"

" कारण उद्या वेगळे रहायला लागल्यावर तुला सवय नको?"

" पण आम्ही का वेगळं रहायचे?" इतका वेळ ऐकत असलेली मीरा येऊन बोलली.

" कारण हे घर माझे आहे आणि माझ्याच घरात मीच आश्रित बनून राहण्यापेक्षा आपण वेगळे राहिलेलेच बरे.."

" तुम्हाला कोण आश्रित म्हणते आहे?"

" म्हणायला कशाला पाहिजे? वागणे दिसतेच ना? घरातली कामे आम्ही करायची. सामान भरण्यापासून बिले आम्ही भरायची कारण तुम्हाला ऑफिस असते. पियुला आम्ही सांभाळतो, ते आमचं नातवंड आहे म्हणून. पण तिचे खाणे पिणे, आवरणे सगळे आम्ही करायचं. तुम्ही फक्त तिला कुठे मिरवायचे असेल तर घेऊन जाणार.. इतके दिवस आम्ही हे सगळे केले सुद्धा. पण आता नाही. स्वतःच्या बायकोची काळजी घेणारा मुलगा आई आजारी असताना साधी चौकशीही करू शकत नाही.. ही एकच गोष्ट आमचे डोळे उघडून गेली. आज पियुला सांभाळायला आमची गरज आहे म्हणून इथे राहताय. उद्या ती मोठी झाली की आम्हाला दूर लोटाल. त्यापेक्षा आत्ताच दूर झालेले काय वाईट?" सुधाकररावांना बोलून धाप लागली.

"जरा शांत व्हाल का?" वृंदाताई म्हणाल्या.

" इतके दिवस शांतच होतो ना? पण आता नाही. त्याला जशी त्याच्या बायकोची काळजी आहे तशी मलाही घ्यायलाच पाहिजे ना? कारण मला हे नक्कीच कळून चुकले आहे की शेवटी मला तू आणि तुला मी.."

" सुजय, एकदाच आणि शेवटचे सांगते. आमच्याकडे ना म्हण आहे पेराल तसे उगवेल. आम्ही आमच्या वडिलधार्यांचे केले म्हणून सुचेता का होईना आमचे थोडेफार करते. पण तुझ्याकडे एकच मुलगी आहे ते विसरू नकोस." वृंदाताई हताश होत म्हणाल्या. हे ऐकून मीराला कुठेतरी काहीतरी वाटले.

" आई, मला माफ करा. खरेतर तुम्ही पियुचे उदाहरण दिले ते लागले मनाला. मी यापुढे तुमच्याशी आणि माझ्या आईवडिलांशीही नीट वागायचा प्रयत्न करीन. " मीराच्या डोळ्यात पाणी होते.

" माफ करणारे आम्ही कोण ग? पण खरंच सांगते. जेव्हा आपलंच मूल आपली किंमत करत नाही ना तेव्हा खूप वाईट वाटते ग.. आपण त्यांच्यासाठी कष्ट घेतो, त्यांना एवढे शिकवतो. आपलं कर्तव्यच असतं म्हणा ते. कारण आपल्या सुखासाठी आपण त्यांना जन्म दिलेला असतो. ते आपले हक्क बजावून घेतात. पण स्वतःच्या कर्तव्याची वेळ आल्यावर ते जेव्हा पाठ फिरवतात ना.. तेव्हा आपल्या खोट्या नाण्याची फार लाज वाटते बघ." वृंदाताई सुजयकडे बघत बोलल्या.

" आई, नको ग बोलूस एवढे टोचरं. मी चुकीचे वागलो. आता यापुढे असे वागणार नाही असे तुला वचन देतो. " सुजय वृंदाताईंच्या मिठीत शिरला. आणि डोळे पुसत सुधाकरराव स्वतःशीच हसले.



सासू, सून जगातला कधीच न संपणारा वादाचा विषय. या दोघींमध्ये बहुतेकदा वाद होतातच. पण या मध्ये जेव्हा आपला मुलगाही आपल्या बाजूने नसतो तेव्हा आईवडिलांची जी अवस्था होते ते लिहीण्याचा हा एक प्रयत्न. कसा वाटला ते नक्की सांगा.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all