मला कोणी समजून घेईल का?

Feeling Of One Girl

मला कोणी समजून घेईल का?

एका हातात पुस्तक आणि दुसऱ्या हातात चहा घेऊन शीतल सोप्यावर बसली होती, तेवढ्यात दरवाजा वरील बेल वाजली, म्हणून शीतल आपल्या हातातील चहाचा कप व पुस्तक बाजूला ठेवून दरवाजा उघडण्यासाठी आपल्या जागेवरुन उठली. शीतलने दरवाजा उघडला आणि ती जोरात ओरडली,


"नीलम! तू इथे कशी काय?"


"एवढ्या जोरात ओरडू नकोस. आजूबाजूचे लोक घाबरतील. भूत बघितल्यासारखी ओरडू नकोस. मी घरात येऊ का? मग तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील." शीतलने सांगितले.


शीतलने नीलम आत येऊन बसण्यास सांगितले, किचनमध्ये जाऊन पाणी घेऊन आली.


"नीलम चहा घेशील ना? मी चहाचं पित होते." शीतलने विचारले.


नीलमने मानेने होकार दिल्यावर शीतल नीलमसाठी चहा बनवायला किचनमध्ये गेली, नीलम तिच्या पाठोपाठ किचनमध्ये गेली.


" शीतल तू मला बघून एवढी का ओरडलीस?" नीलमने विचारले.


"ज्या डॉ. नीलमची अपॉइंटमेंट घेण्यासाठी पेशंट किती किती दिवस वाट बघतात, त्या डॉ मॅडम आपल्या घरी बघितल्यावर आश्चर्याचा धक्का बसेलच ना." शीतलने उत्तर दिले.


"हा टोमणा आहे की नॉर्मल बोलणं?" नीलमने विचारले.


"एका मानसोपचार तज्ञाला हा प्रश्न पडावा. अग लोकांच्या मनात काय चालू आहे? याचा ठाव घेत असतेस ना? मग माझ्या बोलण्याचा अर्थ तुला समजू नये का?" शीतल म्हणाली


यावर नीलम म्हणाली,

"शीतल तुझा चहा तयार असेल, तर आपण हॉलमध्ये बसून बोलूयात का?"


शीतल म्हणाली,

"हो, तू सोप्यावर जाऊन बस. मी चहा आणि बिस्कीटे घेऊन येते."


नीलम सोप्यावर जाऊन बसली. शीतल कोणतं पुस्तकं वाचत आहे? हे ती बघत होती, तेवढ्यात शीतल चहा घेऊन येऊन म्हणाली,


"तुलाही अवांतर वाचनाचा छंद जडलाय का?"


"नाही ग. सध्या तू कोणत्या कॅटेगरीचे पुस्तक वाचत आहे? ते बघण्यासाठी पुस्तक उचकून बघितलं. तुझा वाचनाचा छंद काही सुटला नाही ." नीलम म्हणाली.


शीतल चहाचा कप नीलमच्या हातात देत म्हणाली,

"पुस्तकं हीच खरे मित्र असतात. पुस्तक ही अशी गोष्ट आहे की, ज्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही."


नीलम म्हणाली,

"सॉरी शीतल."


शीतल आश्चर्याने म्हणाली,

"सॉरी! ते कशासाठी?"


"मी तुला वेळ देऊ शकले नाही म्हणून." नीलमने उत्तर दिले.


शीतल म्हणाली,

"नीलम प्लिज माझं बोलणं एवढं मनावर घेऊ नकोस. तू आज इकडे कशी काय आलीस? आज अपॉइंटमेंट नव्हत्या का?"


नीलम म्हणाली,

"मी आजच्या सर्व अपॉईंटमेंट कॅन्सल केल्या. काल माझ्याकडे एक केस येऊन गेली, ती माझ्या केबिनमधून बाहेर पडल्या पडल्या मी ठरवलं की, मला तुला येऊन भेटायचं आहे."


शीतल म्हणाली,

"अशी काय केस होती?"


नीलम म्हणाली,

"शीतल ती एक मुलगी होती, तिचं नाव स्पृहा होतं. स्पृहाशी बोलल्यावर मला तुझीच आठवण आली. शीतल तू बरी आहेस ना?"


शीतल म्हणाली,

"नीलम मी धडधाकट आहे. स्पृहाबद्दल सांग ना. मला ऐकायला आवडेल."


नीलम म्हणाली,

"हो, सांगते. आपल्या वर्गात अमृता देशपांडे होती बघ, तिची ही लहान बहीण स्पृहा. अमृताची इच्छा होती, म्हणून स्पृहा माझ्याकडे आली होती. अमृता लग्न झाल्यापासून अमेरिकेत राहते. एक ते दीड वर्षांतून एकदा भारतात ती परत यायची, पण कोरोनामुळे गेल्या अडीच वर्षांपासून तिला भारतात यायला जमलंच नाही. 


स्पृहासोबत अमृताचं जे काही बोलणं व्हायचं ते फोनवरचं. अडीच वर्षांनंतर जेव्हा अमृता स्पृहाला प्रत्यक्षात भेटली, तेव्हा तिला स्पृहाच्या वर्तनात बरेच बदल आढळून आले. स्पृहाच्या चेहऱ्यावर सतत स्मितहास्य असायचं, पण तिचा चेहरा आणि डोळे वेगळंच काहीतरी सांगत होते. अमृताला तिची काळजी वाटू लागल्याने तिने माझ्याकडे तिला पाठवले होते.


स्पृहासोबत बोलल्यावर मला जाणीव झाली की, ती बऱ्याच दिवसांपासून कोणासोबतच बोलली नाहीये. स्पृहाने तिचं मन कुठेच मोकळं केलं नाहीये.


स्पृहाची कथा अशी होती की, स्पृहा व अमृता ह्या दोघी बहिणी, ह्यांना भाऊ नाही की बहीण नाही. देशपांडे काका बँकेत नोकरीला होते, त्यांची आर्थिक परिस्थिती पहिल्यापासूनच उत्तम होती. काकांचा स्वभाव कडक असल्याने काकू व मुली त्यांच्या शब्दाबाहेर नव्हत्या. 


आपले पप्पा आपल्याला या गोष्टींना नाही म्हणतील, या विचाराने स्पृहाच्या लहानपणापासूनच्या बऱ्याच इच्छा अपूर्ण राहिल्या. उदाहरणार्थ, कराटे, कथ्थक, ट्रेकिंग, स्विमिंग, स्केटींग. अश्या अनेक गोष्टी होत्या की ज्यांना स्पृहा वडिलांच्या भीतीने नाही म्हणायची. काकांचं म्हणणं असायचं की, मुलींना या गोष्टी शिकण्याची गरज नाही. खरंतर बघायला गेलं तर स्पृहाला त्यावेळी या गोष्टी आपल्याला नाही करायला भेटल्याचं फारसं वाईट वाटलं नव्हतं.


अमृता इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षांत असतानाच तिचं लग्न जमलं होतं. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर तिचं लग्न अमित सोबत झालं. अमित अमेरिकेत नोकरी करत असल्याने अमृता त्याच्या सोबत तिकडे गेली. इकडे स्पृहा आई बाबा असे तिघेच घरी होते. स्पृहा स्वभावाने शांत होती. समोरच्याचं बोलणं मनाला पटलं नाहीतरी ती पटकन बोलून दाखवत नव्हती. स्पृहा इंजिनिअरिंगला होती. स्पृहा आणि अमृता बहिणी जरी असल्या तरी त्या एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. 


अमृता व स्पृहाचं दररोज व्हाट्सएप द्वारे संपर्कात रहायच्या. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी स्पृहाचं कॅम्पस इंटरव्ह्यू मधून कंपनीत सिलेक्शन झालं. स्पृहा कंपनीत जॉईन झाल्यावर तीन महिन्यांनी लॉकडाऊन झालं. स्पृहा वर्क फ्रॉम होम करत होती.


कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशपांडे काकांना कोरोना झाला आणि त्यात ते गेले. काकांचे सर्व विधी एकट्या स्पृहाला करावे लागले. स्पृहाला स्वतःला सांभाळून तिला तिच्या आईला सावरायचे होते. फ्लाईट बंद असल्याने अमृताला येता आले नाही आणि बाकीचे नातेवाईक कोरोनाच्या भीतीने त्यांच्या घरी गेले नाही. या सगळ्यात स्पृहा खूप एकटी पडली होती, तिला सावरायला कोणीच नव्हतं. अमृता दररोज स्पृहाला फोन करायची, पण प्रत्यक्षात भेट आणि फोनवर बोलणं यात फरक असतोच ना.


अमृता लांब राहत असल्याने स्पृहा बऱ्याचशा गोष्टी तिला सांगायची नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर फ्लाईट चालू झाल्यावर अमृता भारतात येणार होती, पण तेवढ्यात ती गरोदर राहिली. कोरोनाचा संसर्ग नको म्हणून तिने भारतात येणे कॅन्सल केले. अमृताची काळजी घेण्यासाठी तिच्या सासूबाई तिच्याकडे अमेरिकेत गेल्या. सासूबाई अमृताकडे गेल्यावर तिने स्पृहासोबत दररोजचा संवाद बंद केला होता. 


काही दिवसांनी महिन्यातून एकदा अमृता स्पृहाला फोन करायची, कारण अमृता दिवसेंदिवस तिच्या संसारात खूप व्यस्त झाली होती. स्पृहाला ज्यावेळी तिच्या बहिणीची गरज होती, नेमकं त्याच वेळी तिची बहीण तिच्यासोबत नव्हती. स्पृहाला कोणाची तरी सोबत हवी होती. सर्व जबाबदाऱ्या स्वतःच्या अंगावर घेऊन ती वैतागली होती. स्पृहाला बोलायची सवय नसल्याने ती मनातल्या मनात कुढत रहायची. 


देशपांडे काका गेल्यापासून काकूही मानसिक व शारिरीक रित्या थकल्या होत्या. स्पृहाने काकूंना कोशातून काढण्यासाठी बरेच प्रयत्न केले. अमृताची डिलिव्हरी अमेरिकेतच झाली, तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलगी झाल्यानंतर तर अमृताला स्पृहासोबत बोलण्यासाठी वेळच मिळायचा नाही. 


दुसऱ्या लाटेत देशपांडे काकूंना कोरोना झाला आणि त्याही हे जग सोडून गेल्या, त्यावेळी स्पृहा पूर्णतः कोलमडून गेली होती. स्पृहाला काकूंची बॉडी सुद्धा बघायला मिळाली नव्हती. एवढ्या मोठया घरात स्पृहा एकटीच राहत होती. स्पृहाला घर खायला उठायचं, तिला रात्रीची झोप लागायची नाही. काकूंचे सर्व विधी एकट्या स्पृहाने केले होते. काकू गेल्यानंतर स्पृहाला सुद्धा कोरोना झाला होता. स्पृहाची काळजी घ्यायला कोणीच नव्हतं.


अमृता स्पृहाचं सांत्वन फोनवरुनच करायची. काही महिन्यांनी फ्लाईट चालू झाल्यावर स्पृहा अमृताला म्हणाली, 

"ताई प्लिज एकदा भारतात येऊन जा. मला तुझी खूप आठवण येत आहे. तू सोडून माझं म्हणावं असं कोणीच या जगात राहिलं नाहीये."


स्पृहाने अमृताला कळकळीची विनंती केली होती. अमृता या विषयावर तिच्या नवऱ्यासोबत बोलली असता तो स्पृहाला फोन करुन म्हणाला,

"स्पृहा तुला थोडं तरी समजतं का? पिल्लू अजून किती लहान आहे. अजून कोरोना पूर्णपणे गेला नाहीये. फ्लाईटचा प्रवास सतरा ते अठरा तासांचा असतो, ह्या दरम्यान पिल्लूला कोरोनाची लागण झाली तर, आपण काय करायचं? प्रत्येक एअरपोर्टवर कोरोनाची टेस्ट होत आहे. टेस्टचा रिपोर्ट positive आल्यावर तिथल्या तिथे quarantine व्हावं लागतं. एवढे सगळे धोके पत्करुन अमृताने भारतात येणं मला मान्य नाही. तू तिला पुन्हा भारतात येण्याचा आग्रह करु नको. जेव्हा सर्व परिस्थिती नॉर्मल होईल, तेव्हा मी स्वतः तिला भारतात घेऊन येईल."


स्पृहाने पुन्हा अमृताला भारतात येण्याबद्दल विचारणा केली नाही. स्पृहा मनातून खूप दुखावली गेली होती. त्या दिवसापासून स्पृहा अमृतासोबत तुटकपणे वागू लागली होती. काही दिवसांनी अमृताने स्पृहाला सांगितले की,


"तू तुझं नाव एखादया मॅट्रिमोनी साईटवर नोंदव. तुला एखादा मुलगा आवडला तर मला सांग. आम्ही तुमच्या दोघांचं लग्न लावून देऊ." 

स्पृहा या विषयावर अमृतासोबत फारशी बोलली नाही. लहान असल्यापासून स्पृहाच्या मनावर कोरलं होतं की, तुझ्यासाठी मुलगा बाबा शोधतील आणि घरातील वडीलधाऱ्या माणसांच्या संमतीनेच तुझं लग्न होईल. स्पृहाला मुलांसोबत बोलण्याची सुद्धा घरातून अनुमती नव्हती. स्पृहा कामाव्यतिरिक्त कोणत्याच मुलासोबत बोललेली नव्हती. 

या सगळ्याची कल्पना अमृताला असताना सुद्धा ती स्पृहाला सांगते की, तू तुझ्यासाठी मुलगा शोध म्हणून. स्पृहाला अमृताच्या अनेक गोष्टी खटकू लागल्या होत्या. स्पृहाचा स्वभाव शांत असल्याने ती याबद्दल कोणासोबतच बोलत नव्हती.


साहजिकच स्पृहाच्या मनात अमृताबद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. स्पृहा पूर्णपणे एकटी पडत चालली होती, तिला तिच्या मनातील गोष्टी कोणासोबत तरी बोलायच्या होत्या, पण ऐकायला कोणीच नव्हतं. जवळपास स्पृहाच्या सर्वच मैत्रिणींची लग्न झाली होती, त्यामुळे त्या त्यांच्या आयुष्यात व्यस्त झाल्या होत्या. स्पृहाचं बोलणं ऐकून व ते समजून घेणार असं कोणीच राहिलं नव्हतं.


स्पृहाने एकटेपणा स्विकारला होता. अमृताच्या सासऱ्यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं, म्हणून अमृता व तिचा नवरा भारतात आले. स्पृहाची मनातून इच्छा होती की, अमृताने भारतात आल्यावर तिच्या घरी यावं, पण अमृता पहिले सासरी गेली. सासऱ्यांचे सर्व विधी उरकल्यावर ती स्पृहाला भेटण्यासाठी आली. देशपांडे काकूंचं वर्षश्राद्ध असल्याने सर्व नातेवाईक स्पृहाच्या घरी गोळा झाले होते. सर्वांनी स्पृहाचं सांत्वन केलं. स्पृहा हसतमुखाने सर्वांचं स्वागत करत होती, पण तिला मनातून कोणाशीच बोलण्याची इच्छा नव्हती, कारण त्या नातेवाईकांमधील एकाने सुद्धा गेल्या वर्षभरात तिची एकदा पण चौकशी केली नव्हती. 


अमृता अजून चार पाच दिवसांनी अमेरिकेत परतणार आहे. स्पृहाला वाटलं होतं की, अमृता काही महिने तरी भारतात राहिलं, तर तेवढंच तिला बरं वाटेल. अमृताला हे सांगण्याचा अधिकार पण स्पृहाला राहिला नाहीये.


स्पृहाचं एकच म्हणणं पडलं की, माझी बहिण किंवा मैत्रिणी त्यांच्या आयुष्यात इतक्या व्यस्त झाल्या आहेत की, मी कोणत्या फेजमध्ये आहे, हे कोणालाच समजत नाहीये. मला मान्य आहे की, माझे प्रॉब्लेम मलाच सोडवायला लागतील, त्या काहीच करु शकत नाही. पण माझी किमान एक इच्छा आहे की, सर्वांनी त्यांच्या आयुष्यातील थोडासा वेळ काढून माझ्याशी बोलल्या तर, त्यांना माझी मनस्थिती कळेल, माझं मन मोकळं होईल. मला डिप्रेशन मधून बाहेर येता येईल. मी काही बोलायला गेले तर, मलाच तत्वज्ञान शिकवत बसतात, त्या त्यांच्या दृष्टीने योग्य असतील पण, माझ्या आयुष्याकडे माझ्या नजरेतून का बघत नाहीत? एकटं जगताना मला किती त्रास होत आहे? याची कल्पनाही कोणी करु शकत नाहीये. "


"नीलम स्पृहाला तू काय तोडगा सांगितला?" शीतलने विचारले.


नीलम म्हणाली,

"माझ्याकडे तिच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मी माझ्या भाषेत तिला समजावून सांगितलं. स्पृहा जाताना एक गोष्ट सांगून गेली की, "तुम्ही सायकॉलॉजिस्ट आहात, तुम्ही बऱ्याच व्यस्त असतात. लोकांनी तुमच्या सोबत बोलण्याचे तुम्ही पैसे घेतात. पण तुमची जर अशी कोणी एकटी मैत्रीण असेल तर, प्लिज तिची स्वतःहून आठवण काढत जा. तुम्हाला कदाचित या गोष्टीने काही फरक पडणार नाही, पण तुमच्या त्या मैत्रिणीचे पुढील काही दिवस, महिने आनंदात जातील. आपली कोणाला तरी आठवण येते, याचा तिला खूप आनंद होईल."

शीतल स्पृहाचं बोलणं ऐकल्यावर मला तुझी आठवण आली. तू मला भरपूर वेळेस फोन करायचीस, पण तुला कॉलबॅक करणं टाळतं होते. मी स्वतःहुन तुझी आठवण कधीच काढली नाही. मी तुझ्या एकटेपणाचा कधीच विचार केला नाही. तू तुझ्या मनातील गोष्टी सांगायला लागलीस की, मी तुला लेक्चर देत बसायचे, पण तू कोणत्या त्रासातून जात आहेस? याचा मी विचारच केला नाही. मला तुला एकच प्रश्न विचारायचा आहे की, तुला माझा राग येत नव्हता का? मी तुझा फोन उचलायचे नाही, पण तू माझा फोन लगेच उचलायचीस असं का? तू माझ्याजवळ व्यक्त होणं बंद का केलं?"


शिवानी म्हणाली,

"एकच प्रश्न म्हटलीस आणि किती प्रश्न विचारलेत. तू जेव्हा माझा फोन उचलायची नाहीस, तेव्हा मला तुझा राग यायचा. मी त्यावेळी ठरवायचे की, मी पुन्हा तुला स्वतःहून फोन करणार नाही. काही वेळाने माझा राग मी विसरायचे कारण, मला तुझ्यासारखी मैत्रिण गमवायची नव्हती. मी तुझ्याकडे व्यक्त होणं बंद केलं, कारण माझे तेच प्रॉब्लेम ऐकून तुला कंटाळा आला आहे, हे मला समजलं होतं. तुझा फोन मी लगेच उचलायचे कारण, तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे ना. 

माझ्या बाबतीत जे घडलं ते घडलं, पण स्पृहाच्या बाबतीत आपण ते घडू द्यायचं नाही. आयुष्य एकटं जगणं खूप कठीण असतं. मी जो एकटेपणा अनुभवला तो स्पृहाने अनुभवू नये असं मला वाटतंय.

तू अमृता व स्पृहाला उद्या माझ्या घरी बोलावून घे. मी अमृतासोबत बोलते. माझ्या मनाची व्यथा कोणीच समजून घेतली नाही, पण स्पृहाच्या मनाची व्यथा निदान अमृताला तरी समजली पाहिजे. माझ्या प्रमाणेच हसऱ्या चेहऱ्यामागे स्पृहा खूप काही लपवत आहे, ते अमृताला समजलेच पाहिजे."


नीलम म्हणाली,

"शीतल मी तुझं दुःख समजून घेतलं नाही, यासाठी मनापासून सॉरी.पण तू कधीच बदलणार नाहीस. स्वतःच दुःख बाजूला ठेऊन तू नेहमी समोरच्याचं दुःख समजून घेत आलीस. अजूनही तेच करते आहेस. हॅट्स ऑफ टू यू."

©® Dr Supriya Dighe