अनुत्तरीत

सहजच मनातलं

अनुत्तरीत


कधी कधी कमावणारी स्त्री घरातल्या पुरुषाला हवा तितका वेळ, मान देत नाही. अर्थात सर्वच स्त्रिया असे करतात असेही नाही. पण कमावणाऱ्या स्त्रीला 'आपण कमावतो' असा अहंगंड असला तर पुढचे सगळेच हिशोब चुकत जातात.
आपल्याच माणसांना कायम गृहीत धरलं जातं आणि त्यांच्या विरुद्ध बाहेरच्या माणसांकडे तक्रारी केल्या जातात.

आपण मोठे आहोत, आपल्याला सर्वांनी मान द्यावा ही मागणी रास्त असली तरी आपणच श्रेष्ठ आहोत, अनेक वर्षे मी नोकरी केली म्हणून मलाच मान द्यायला हवा ही मागणी त्यांच्या इगोला सुखावणारी असते.

असे का करतात स्त्रिया हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

सून स्वावलंबी असेल तर तिला 'आम्ही केलं नाही का इतकी वर्षे?' असा प्रश्न विचारला जातो. पण सुनेला मनापासून घर सांभाळावं वाटलं तर ती नोकरी करत नाही, घरी आम्ही तिला काही काम लावत नाही, हळूबाई आहे नुसती अशी लेबल्स चिकटवली जातात. ती कमवत नाही म्हणून किंमत दिली जात नाही तिला आणि भरगच्च पगार असेल तरीही नावं ठेवली जातात.

तसेच सासू -सुनेच्या करबुरी 'घरोघरी मातीच्या चुली' या म्हणीनुसार सगळीकडे काही ना काही प्रमाणात दिसतात. मात्र बहुतेक कुरबुरींची सुरुवात ही सासुकडून होत असते. याला काही सुना अपवाद असतील.
मात्र सून आपल्या मनाप्रमाणे वागत नाही, घर सांभाळत नाही म्हणून सासू आपल्या सुनेला विश्वासात घेऊन सांगण्याऐवजी बाहेर दवंडी पिटल्यासारखे सांगत राहते. मी कशी चांगली आणि सून कशी निरुपयोगी हे मिरवत राहते.
सुनेची चूक असेलच तर एकांतात सांगायला काय हरकत आहे? आणि कौतुक चारचौघात करायला तेवढं मन मोठं हवं.

नसती आदळ -आपट करून मानसिक त्रास देण्यात कसला आनंद मिळतो? शिवाय काही बोलायला गेलं तर मी त्यातली नाहीच हे जगाला दाखवायला कसं जमतं हे त्यांनाच ठाऊक!

सासू जेव्हा आजारी असते तेव्हा सुनेच्या हातचा स्वयंपाक गोड लागतो. पण इतर वेळी त्याच स्वयंपाकाला कधीच मान नसतो.

सुनेने कायम पडती बाजू घ्यावी, नसलेली चूक मान्य करावी हा अट्टाहास का? सासू - सुनेत असलेले पिढीचे अंतर मिटविण्यासाठी दोघींनी पुरेसा सुसंवाद साधणे आवश्यक असते आणि यासाठी दोघींनी पुढाकार घेणे गरजेचे असते. मात्र सून आपल्या मनाप्रमाणे वागत नाही म्हणून तिला चुकीचे का ठरवले जाते? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

नवऱ्याने आपलीच बाजू घ्यावी हा हट्ट सुनेने करू नये. पण तिला समजून घेण्याची तयारी, इच्छा त्याने जरूर दाखवावी आणि चुकीला चूक म्हणण्याचे धाडस त्याच्या अंगी असावे हे मात्र नक्की. बरेच पुरुष आपल्या आईचा राग बायकोवर का काढतात? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

एका बायकोसाठी आपल्या नवऱ्याचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. बायकोच्या मनात काय आहे हे जाणून घेऊन तिला, 'मी आहे, काळजी करू नकोस. इतका आधार द्यायला काय हरकत आहे? एक अबोल स्पर्श खूप काही बोलून जातो.

सासुच्या, नवऱ्याच्या तक्रारी किंवा घरात काय घडते हे मुलीने आईजवळ सांगितले तर आई तिला अडजस्ट करायला सांगते, तिची चूक कुठे होते हे शोधायला सांगते. नरमाईन घ्यायला लावते.
पण आपल्या जावयाला एका शब्दाने याचा जाब विचारत नाही की समजावत नाही!

जसा सासुला सुनेला समजावण्याचा, ओरडण्याचा अधिकार आहे तसा जावयाला समजावण्याचा अधिकार मुलीच्या आईला नाही का?

आपल्या मुलाला/ मुलीला मनाप्रमाणे वाढवण्याचा अधिकार सगळ्याच सुनांना आणि मुलाला आहे. पण त्यातही सुनेला मुलांना सांभाळण्याची अक्कल नाही आणि तिला मूल होत नसेल तर तिलाच दोषी मानणं, तिची आपल्याच नातेवाईकांत तिची बदनामी करणं हा कुठल्या प्रकारचा न्याय असतो? हे सासुलाच ठाऊक.

एक स्त्री म्हणून नात्यापलीकडे जाऊन सासू आपल्या सुनेला समजून घेऊ शकत नाही? तिच्या चुका समजावून देऊ शकत नाही का? यासाठी सासुने घराच्या बाहेरच्या माणसांचा आधार घेणे चुकीचे वाटते.


मन मोकळं करण्यासाठी कोणीतरी नक्कीच हवं. मात्र आपलं मन कितीजणांकडे मोकळं करावं यालाही मर्यादा असावी.
मनातली अढी बोलून सुटत असेल तर कधीही उत्तमच! त्या अढीला किती खत-पाणी घालायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं.

एखाद्या व्यक्तीकडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त व्हायला हव्यात. आपल्या मनात ठेऊन त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत कधीच पोहोचत नाहीत.
मग नात्यात पडलेलं अंतर कधीच मिटत नाही. एकदा मनातून उतरलेली व्यक्ती पुन्हा मनात घर करू शकत नाही हे मात्र नक्की.

समाप्त.
✍️ ©️®️सायली जोशी.