अनुभवाची पोटली -कथा 3-सौदा भाकरी आणि मिरचीच्या ठेच्याचा 

Time never stops

अनुभवाची पोटली -कथा 3-सौदा भाकरी आणि मिरचीच्या ठेच्याचा 

मी लहान असताना आमच्या घरासमोर एक साबळे कुटूंब भाड्याने राहत होते, त्यांचा चपला दुरुस्ती आणि चपला बनवीणे हा व्यवसाय होता , ते काका एकदम उत्तम कारागीर असल्याने धंदाही चांगला व्हायचा,त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती,मुलीच नाव सुवर्णा होतं ,ती माझ्या पेक्षा दोन तीन वर्षानी लहान असेल,आम्ही एकत्रच खेळायचो .

तिच्या वडिलांची मित्र संगत चांगली नसल्याने त्यांना सट्टा,दारु,जुगार ह्या सगळ्या गोष्टींची सवय लागली होती,चांगला पैसा मिळूनही घरात मात्र मुबलक प्रमाणात पैसा येत नव्हता, सुवर्णाची आई चार पाच घरची धुणी भांडी करुन कसं तरी घर चालवायची ,रोज रात्री त्यांच्या घरातून भांडणे व्हायची आणि त्याचा आवाज आम्हांलाही ऐकू यायचा .

एक दिवस आम्ही सर्वांनी अंगत पंगत करायचं ठरवलं,प्रत्येकाने वेगळा पदार्थ आणायचा ठरवला,सुवर्णा थोडी नाराज होती ,तिला विचारलं तर ती म्हणाली ,मी फक्त ठेचा आणू शकते,मी तिला म्हटलं चालेल ,तू ठेचा आण ,मी भाकरी आणते,हे ऐकून ती खुश झाली.

अंगत पंगत मध्ये सगळ्यांनीच भाकर आणि ठेच्याचा आस्वाद घेतला. मी तर तिच्या आईच्या हातच्या ठेच्याची फैन झाली.

ब-याचदा त्यांच्या घरात जेवायला काही नसायचे, हे सुवर्णा कडून कळायचे.

आईवडील शिक्षक असल्याने ते शाळेत गेल्यावर आमचेच राज्य असायचे ,आजी घरी असायची पण चुकीचं काही करत नाही म्हणून काही बोलायची नाही आणि तिला सुवर्णाची आई आपल्या मुली सारखीच वाटायची.

मी घरातलं पीठ आणि मिरच्या घेवून त्यांच्या कडे जायची आणि म्हणायची मला भाकरी आणि ठेचा करून द्या ,त्या मम्मी घरी नसल्यामुळे करून द्यायच्या आणि सुवर्णानेही सांगितलं होतं की मला त्यांच्या हातचा ठेचा आवडतो ,मग त्याही आवडीने  करून द्यायच्या, भाकरीच पीठ ही मी थोडं जास्तच घेऊन जायची आणि मग त्यांना म्हणायची ,राहू द्या तुम्हाला,उलट घरातून माझ्या वाट्याची भाकरही नेऊन द्यायची ,त्या म्हणायच्या अगं कशाला ,मग मी म्हणायची मम्मीला कळायला नको ना,की मी इकड येवून जेवली आहे .

त्यांना हळू हळू समजलं की मी जाणून बुजून सगळं करते ,पण त्या काही बोलल्या नाही आणि मी असं करत होती कारण मला त्यांचा स्वाभिमान दुखवायचा नव्हता. आमच्यात भाकरी आणि मिरचीच्या ठेच्यामूळे एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं,मला कधी कधी अभ्यास असला की त्या आईला भांडी धुणी करायला मदत करत कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता.

एकदा तर मी पीठ आणि मिरच्या घेऊन चालली असताना वडील काही कामानिमित्त अचानक घरी आले ,ते माझ्या हातात पाहून डोळ्यानीच विचारलं, काय आहे ,मी म्हटलं, मी आलेच. आजीने त्यांना काय सांगितल माहित नाही,जाताना फक्त हसत म्हणाले,मला पण ठेव थोडा ठेचा.

त्यांच्या हातच्या ठेच्याची चव इतकी छान होती की आता लिहीत आहे तरी तोंडाला पाणी सुटले आहे. अशा प्रकारे भाकरी आणि ठेचाच्या सौद्याने आमच्यात एक वेगळेच नाते निर्माण झाले जे अजुनही नेहमी न बोलताही मनाच्या एका कोप-यात नेहमीच आहे जे आठवले की,नेहमीच आनंद देते .

आता त्यांची दोनही मुलांची स्वत: ची चप्पलची दुकानं आहेत ,स्वत:ची घरं आहेत आणि दोघं म्हातारा, म्हातारी नातवंडांसोबत आनंदात आहे ,सुवर्णा तिच्या घरी आनंदात आहे ,दिवस कुणासाठी थांबत नाही परिस्थिती वेळेनुसार बदलते पण काही गोष्टी आपण कधीच विसरू शकत नाही , अशी ही कहाणी सफळ संपूर्ण.  

वाचून कशी वाटली यावर नक्की प्रतिक्रिया दया.

वाचत रहा,आनंदात रहा.

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all