अनुभवाची पोटली -कथा 2 ( लग्न - वासना की प्रेम )

Truth of Today's young generation

नैराश्य आणि त्यावर केलेली मात इरा स्पर्धा 

प्रस्तावना :-

या स्पर्धेत भाग घेण्याचा विचार मनात आला कारण ,आज इथे मी ज्या विषया वर लिहिणार आहे, त्या विषयावर बोलणं शक्यतो टाळतात,ही कथा आजुबाजुला घडलेल्या सत्य कथेवर आधारित आहे .या कथेतील पात्रांची नावे बदलण्यात आली आहे,माझ्या लिखाणातून ती मी तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आतुर आहे ,आजच्या तरुण पिढी बद्दल आहे,मला आशा आहे की,तुम्हांला सर्वांना आवडेल.

कथेचे शीर्षक:- लग्न - वासना की प्रेम 

नागपुरात एक सधन चौकोनी कुटुंब होत,ज्यात प्रदीप आणि स्वाती ,त्यांची मुले सायली आणि भावेश असे रहात होते. दोन्ही मुले हुशार होती , सायली ने M .COM आणि भावेशने इंजिनिअरिंगला तिस-या वर्षाला होता. सायलीचे शिक्षण पूर्ण झालं,म्हणून घरच्यांनी तिच्या लग्नासाठी स्थळे शोधायला सुरुवात केली जशी बाकीचे आईवडील पाहतात . त्यांनी सायलीला स्थळे बघण्याआधी विचारल सुध्दा की तुला कुणी आवडत असेल तर सांग ,कारण घरातलं वातावरण कायम मोकळं होतं.तिने नाही म्हणून सांगितल्यावर त्यांनी रितसर नाव नोंदणी केली एका विवाह मंडळात ,त्यांच्या मुलाबद्दलच्या जास्त काही अपेक्षा नव्हती,मुलगा व्यवस्थित नोकरीला असेल आणि स्वभावाने चांगला प्रेमळ असावा.

ज्या विवाह मंडळात नाव नोंदवले होते ,तिथुनच एक स्थळ आले ,मुलगा आय टी कंपनीत कामाला,एकुलता एक,पाच आकडी पगार मिळवतो,त्याच नाव शैलेश,त्याचे वडील श्रीधर बँकेत कामाला आणि आई रेवती शाळेत शिक्षिका.स्थळात नाव ठेवायला काही जागा नव्हती. आता प्रश्न होता तू मुलामुलींच्या पसंतीचा ,लवकरच शैलेश मुंबई वरून येणार होता,तो आला की दोघे बाहेर कुठे तरी भेटणार असं ठरलं,कारण दोन्ही कुटुंब आधुनिक विचारांची होती.

श्रीधररावांनीच फोन करून सांगितलं की,आधी त्यांना भेटू दे,त्यांची पसंती झाली की आपण पुढची बोलणी करु,त्यांच्या या बोलण्यावरून सुसंस्कृत कुटूंब आहे याची प्रचिती आली होती.दोघं एकदा भेटले ,त्यानंतर दोन्ही कुटूंब भेटली ,लग्नाच्या बोलाचाली झाल्या,लग्नाची तारीख ठरली .

ठरलेल्या तारखेला लग्न झाले , येण्या जाण्याच्या सगळया प्रथा पार पडल्या. शैलेशची सुट्टि संपत आली होती,त्यामुळे त्यांची आता मुंबईला जायची तयारी चालू होती,जाण्या आधी सायली आणि शैलेश दोघेही पाहुणचार घेऊन आले होते, सायलीच्या बाबांनी शैलेशला सांगितलं तिला मुंबईच जास्त काही माहित नाही तर तिची काळजी घ्या,शैलेशनी त्यांना दिलासा दिला आणि आता दोघे राजा आणि राणी मुंबईत आले, सर्व घर लावले आणि दोन दिवसांनी शैलेशने ऑफिसला जायला सुरवात केली. सायली बिचारी निरागस तिला माहीत ही नव्हते की,तिच्या पुढे काय वाढून ठेवले आहे.

पहिले पंधरा दिवस छान चाललं,तिने शेजारी ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला तर शैलेश म्हणाला त्याला आवडत नाही असं ,म्हणून बिचारी घरातच थांबायची. मुंबईला येऊन एक महिना झाला असेल ,त्याने सकाळी जाताना सायलीला एक सीडी दिली आणि सांगितले पाहून ठेव, सायलीने उस्तुकतेने सीडी लावली , पहायला लागली तर तिला खुप कसे तरी झाले , पॉर्न मुव्ही होती ,तिला तर धक्काच बसला, त्यात अनैसर्गिक रित्या सेक्स कसा करायचा हे दाखविल होतं. तिला वाटलं चुकून त्याने तिला दिली असेल. रात्री 8 वाजता घरी आला,जेवल्यावर तिला जवळ घेतलं आणि म्हणाला सीडी पाहिली का, ती म्हणाली, अहो चुकून  तुम्ही मला वेगळीच सीडी दिली होती,कुणाची होती ती तुमच्या मित्राची ,मला तर उलटी यायला लागली म्हणून बंद केली. हे ऐकताच तो तिच्यावर भडकला आणि म्हणाला,शी तू माझा सगळा मूड घालवला ,तो रागात तिथून निघून जातो.

शैलेश शिक्षणानिमित्त होस्टेलला राहिला होता,त्याला पॉर्न मुव्ही बघायचे वेड लागले होते ,त्यात त्याला काही गैर वाटत नव्हते कारण सगळीच मुले पाहायची आणि त्याला असे वाटत होते की आपल्या बायकोने यात आपली साथ द्यावी, सायलीला मात्र हे सारे नवीन होते,पहातानाच तिला किळस येत होती,तर ती काय त्याला साथ देणार नाही याची त्याला जाणीव झाली.त्याच्या स्वप्नांवर पाणी फिरले.

दुस-या दिवशी तो जरा उशिराच घरी आला ,येताना पिऊन आला होता,तिने आल्यावर विचारले,जेवायचं ना ,तो म्हणाला,तू जेवून घे,तिने जेवून घेतलं आणि बेडरूम मध्ये गेली ,तिला कल्पनाही नव्हती की तिच्या सोबत असं काही होईल,अक्षरशः त्याने तिचे बलात्कार केल्यासारखे लोचके तोडले. सायलीने शैलेशचे हे रूप पहिल्यांदाच पाहिले होते,मनातून पूर्ण घाबरली होती,त्याचे काम होताच तो झोपला देखील,सायली मात्र रात्रभर रडत बसली होती. सकाळी त्याला जाग आली तेव्हा तो तिला म्हणाला की रात गयी बात गयी ,चल ऊठ मला ऑफिसला जायला उशीर होतोय ,डबा बनव पटकन आणि याद राख जर ही गोष्ट तू इतर कोणाला सांगितली तर कालची रात्र लक्षात आहे ना तुझ्या, बिचारी उठली आणि सगळं आवरल्ं. 

तिने एकदा दोनदा विषय काढला होता की,मी पण जॉब करते,तर त्याने नाही म्हणून सांगितलं . सगळं आवरून तिने आईला नेहमीसारखा फोन लावला. पण आज तिने वीडियो कॉल नाही केला ,आईला काय सांगणार होती चेह-यावर काय झाले ते,त्यांना टेन्शन नको म्हणून तिने साधा फोनच केला ,तर ती म्हणाली ,नेट पैक संपला. आईला काही कळू नये म्हणून व्यवस्थित बोलली . संध्याकाळी घरी आल्यावर शैलेशने तिचा फोन चेक केला,तिला विचारलं काय सांगितलं तू घरी,रोज फोन करायची काय गरज आहे,तू सांग त्यांना आठवड्यातून एकदा फोन करशील आणि तेही मी समोर असताना,तिने आईला फोन करून सांगितलं,तर आई म्हणाली काय झालं ,काही नाही उद्या पासून एक क्लास लावला आहे म्हणून,चालेल बेटा असं म्हणून तिच्या आईने फोन ठेवला ,त्याने तिच्या कडून फोन काढून घेतला आणि सिम काढून खिडकी बाहेर फेकले ,आता बघतो तू कशी फोन करते .

तो ऑफिस मध्ये गेला की,नेहाला हायसं वाटायचं , त्या दिवशी शुक्रवार होता,तो त्या दिवशी ड्रिंक घेऊन आलेला,त्याने तिच्याकडे अनैसर्गिक सेक्सची मागणी केली,तिने नाही म्हटल्यावर त्याने तिचे हातपाय बेडला बांधले तर तिने ओरडायला सुरुवात केली ,तर त्याने तिच्या तोंडावर चिगट पट्टी लावली आणि जोपर्यंत त्याचे समाधान झाले नाही तो पर्यंत तिच्यावर अत्याचार केला. त्या नंतर त्याने तिला सोडले आणि स्वत: झोपी गेला , तिने आपल्या तोंडाची पट्टी काढली आणि कशी बशी बाथरूम मध्ये गेली ,तिला धड चालता ही येत नव्हते. बाथरूम मध्ये गेल्यावर  नळ चालू केला आणि किती तरी वेळ त्याखाली बसून होती,पाण्याबरोबर तिच्या अश्रूंनाही बांध फुटला होता,जवळ जवळ एक तासाने ती पाण्याखालून उठली ,धडपडत कपाटाजवळ आली व दुसरी कपडे घातली,टॉयलेटच्या जागेला घरात जो मलम भेटला तो लावला,आणि डोळे उघडे ठेवून छताकडे बघत राहिली,तिने स्वप्नात सुध्दा असा कधी विचार केला नव्हता.तो मात्र काही झालच नाही अशा अविर्भावात झोपला होता.

दुस-या दिवशी सकाळी तिला जरा उशिराच जाग आली,तो तयार होवून ऑफिसला निघाला होता, तो तिच्या कडे बघून म्हणाला,मजा आली ना .त्यावर ती म्हणाली ,मला हा सगळा घाणेरडेपणा वाटतो. तो म्हणाला,नंतर तुला पण मजा येईल.

तिने विचारले , इथे दवाखाना कुठे आहे,मला बसता आणि चालता ही येत नाही. त्याला वाटले , ही डॉक्टर कडे गेली तर आपलं खरं रूप कळेल. तो तिला म्हणाला,मी संध्याकाळी आल्यावर जाऊ. जाताना त्याने घराला बाहेरुन लॉक लावून घेतले. शैलेशला आज ऑफिसमध्ये गेल्यावर सायलीच्या बाबांचा फोन आलेला ,ते सायली बद्दल विचारत होते ,तिचा फोन लागला नाही असे म्हणाले , त्याने सांगितल ,तिचा फोन हरवला ट्रेन मधे ,मी घरी गेल्यावर करतो. 

घरी गेल्यावर त्याने सायलीला फोन लावून दिला आणि बोलायला सांगितल,ती फोन वर बोलत असताना तो तिथेच होता ,ती प्रश्नाची उत्तरे फक्त देत होती ,जास्त काही बोलता येत नव्हतं तिला त्याच्या समोर,तिच्या आईला फोन केल्यावर ही गोष्ट खटकत होती. त्यांचा मुंबईचा पत्ता ही नव्हता, म्हणून तिच्या आईने लोणचं कुरियर करायचं आहे म्हणून पत्ता द्या ,असं तिच्या बाबांना फोन करुन विचारायला सांगितल,त्याने ही देऊन टाकला पत्ता. तिची आई बाबांना म्हणाली ,की तुम्ही अचानक बघायला जा , मला काही तरी प्रोब्लेम आहे असं वाटतं. चल तू काहीही बोलू नको. तिची आई तिच्या बाबांना म्हणते ,केवळ माझ्या समधानासाठी जाऊन या,सगळं व्यवस्थित असेल तर चांगलच आहे पण मनात शंका आली आहे तर जाऊनच या.

तिच्या बाबांनाही वाटत ,मुंबईला गेल्यापासून आपली भेट नाही झाली तेवढच सरप्राईस देऊ. ते मुंबईला येतात ,दिलेल्या पत्त्यावर पोहोचतात. दाराला बाहेरून लॉक असते,म्हणून ते शेजारच्यांना विचारतात,ते विचारत असताना खिडकीतून सायलीला त्यांचा आवाज ऐकू येतो,तशी ती खिडकी उघडते ,पहाते तर तिचे बाबा असतात ,ती त्यांना हाक मारते,ते खिडकी जवळ येतात नी म्हणतात ,तू आत आहेस आणि दाराला बाहेरून कुलुप कुणी लावलय,ती म्हणते ,शैलेश नी लावलय ,ते म्हणतात,थांब मी त्याला फोन करतो. ती म्हणते ,नको बाबा त्याला नका बोलावू ,तुम्ही जाऊन लॉक काढ्णा-या माणसाला बोलवा,मला नाही रहायचं इथे.

सायलीचे बाबा जाऊन लॉक काढ्णा-या माणसाला घेऊन येतात, तो लॉक काढून पैसे घेऊन जातो .तिचे बाबा दरवाजा उघडून आत जातात ,तशी सायली त्यांना मिठी मारते व हमसून हमसून हमसून रडत असते , शेजारच्या मंदा  ताई येतात ,ज्यांच्या कडे ती रहायला आल्या वर एकदा गेली होती, त्या सायलीला बघून म्हणाल्या ,आम्हाला शैलेशनी तू माहेरी गेली असं सांगितल . सायली आणि तुझी ही काय अवस्था झालीय.

तिचे बाबा पण तिच्या कडे पाहत राहतात, पण ती बाबां समोर सगळं कसं सांगणार म्हणून तिने आत नेऊन ताईंना सगळं सांगितल आणि दाखवलं,त्या सुध्दा ते सगळं पाहून हादरल्या,त्यांनी तिला दिलासा दिला आणि म्हणाल्या आता बाबा आलेत ना तुझे ,आपण त्याला बरोबर सरळ करु,पण बाबा थोडी कायमचे इथं रहाणार आहे,ते गेल्यावर तो मला अजून त्रास देईल . त्याने त्रास द्यायला तू इथे रहाणारच नाहीयेस तर त्रास देण्याचा प्रश्नच येत नाही,मी तुझ्या बाबांशी बोलते मग ठरवू आपण काय करायच ते.मंदा ताईंनी सायलीच्या बाबांना सगळं सविस्तर सांगितल,त्या दोघांची चर्चा झाली आणि ठरलं पोलिस स्टेशनला कम्प्लेन करायची, सायली मात्र घाबरत होती,पण तिला या दोघांनी समजवल्यावर तयार झाली,तिचे बाबा म्हणाले ,मी तुझ्या सोबत आहे.

सायली,तिचे बाबा आणि मंदा ताई पोलीस ठाण्यात पोहोचले,त्यांनी शैलेश विरुद्ध गुन्हा दाखल केला, सायलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली, तिने सांगितल्या प्रमाणे वैद्यकीय रिपोर्ट पण जुळत होते,डॉक्टर सायलीच्या बाबांना म्हणाले ,तुमच्या मुलीने खुप सहन केलय ,तिला आता तुमच्या आधाराची गरज आहे ,ती पूर्ण कोलमडून गेली आहे,तिचा आत्मविश्वास तुम्हीच वाढवू शकता.

इकडे पोलीस शैलेशला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन घेऊन येतात,त्याला काही कळत नसतं की हे काय चाललय्ं, तिथे गेल्यावर सायली आणि तिच्या बाबांना बघून,तो विचारतो,बाबा तुम्ही इथे कसे? , तिचे बाबा त्याला रागाने म्हणतात,तू मला तुझ्या घाणेरड्या तोंडाने बाबा म्हणू नको, नराधमा माझ्या सोन्यासारख्या पोरिची काय अवस्था केलीस,बरं झालं मी अचानक आलो नाही तर तू तिला मारुन टाकली असती.

पोलीस त्याला लॉक अप मध्ये नेऊन मारतात,तो त्याचा गुन्हा कबूल करतो,मंदा ताई आणि सायलीचे बाबा साक्षीदार म्हणून सगळं सांगतात आणि सह्या करतात. मंदा ताई तिच्या बाबाना घरी येण्याचा आग्रह करतात पण ते नाही म्हणतात. कारण त्यांच घर शेजारीच असत तिथं गेल्यावर नेहाला अजून त्रास होईल,ते एका हॉटेलमध्ये रूम बुक करुन सायलीला तिथे घेऊन जातात.

हॉटेल वर गेल्यावर तिला समजून सांगतात ,घाबरु नको म्हणतात,आम्ही तुझ्या बरोबर आहोत . तिला जेवायला घालून झोपायला सांगतात. ती झोपली हे पाहून ते सायलीच्या आईला फोन करुन सगळ सांगतात आणि येण्यासाठी तू हट्ट केला म्हणून हे सगळं कळाल असं म्हणून धन्यवाद देतात.

सायली झोपेत ओरडत असते ,नका करु असं, तसे तिचे बाबा तिला हलवून उठ्वण्याचा प्रयत्न करतात ,तर ती त्यांचा हात झटकून देते आणि म्हणते ,सोड मला. ते कसेबसे तिला शांत करतात,पण तिची ती अवस्था पाहून स्वत:ला दोष देतात ,की थोडी चौकशी करायला हवी होती  आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं,ते लगेच सायलीच्या आईला फोन करून सांगितलं की,उद्या सकाळच्या फ्लाइटने तू लगेच ये,तुझी गरज आहे तिला .

दुस-या दिवशी सकाळी सायलीची आई 9.00 वाजता हॉटेल  मध्ये येते,आईला पाहून तिच्या गळ्यात पडून खुप रडते.

ते सगळे पोलीस ठाण्यात जाऊन सगळया फॉर्मलीटी पूर्ण करतात. तिथले पोलीस अधिकारी त्यांना  सल्ला देतात की,तुम्ही हिला मानसोपचारतज्ञाकडे  घेऊन जा,तिला कोर्टात साक्ष देण्यासाठी खंबीर व्हावं लागेल, तिचे बाबा म्हणतात ,बरोबर आहे तुमचंं, ते पोलीस अधिका-याचे आभार मानून हॉटेल वर येतात,त्यांची संध्याकाळची फ्लाइट असते,म्हणून ते सायलीला घेऊन त्यांच्या फ्लॅट वर जातात ,तिचं सगळं सामान घेतात,जाता जाता मंदा ताईंचे आभार मानतात,त्या सायलीला जवळ घेऊन सांगतात , बरं झालं तुझे बाबा आले ,आम्हाला इथे राहून तुझ्या दु:खाची कल्पना नव्हती,आता स्वत:ची काळजी घे,मी नेहमी तुझ्या बरोबर आहे,असं म्हणून त्या फोन नंबर घेतात तिच्या आई कडून आणि म्हणतात ,अधून मधून करत जाईल,काळजी घ्या तिची. सायलीची आई ,हो म्हणते आणि ते तिथून डायरेक्ट एअरपोर्टला जातात.

घरी गेल्यावर सायलीला असे अचानक पाहून आणि तिची अवस्था पाहून भावेश तर खूप चिडतो, स्वाती त्याला शांत करते.सायलीला तिच्या रूम मध्ये आराम करायला पाठवतात.

संध्याकाळी त्यांच्या फैमिली डॉक्टरची अपोइंटमेंट घेऊन तिच्यासाठी औषधं आणतात, सायली कुणाशी काहीच बोलत नसते,असं लेकिला पाहून दोघांचा जीव तुटत असतो ,ते तिला ह्यातून बाहेर काढायचं ठरवतात,ते तिला तिथल्याच मनसोपचार तज्ञांकडे घेऊन जातात, ते तिच्या आईवडीलांना बाहेर बसायला सांगतात, ती तिचं मन त्यांच्या समोर मोकळं करते,त्यांनाही सगळं ऐकून धक्का बसतो,अशी पहिलीच केस असते त्यांची ,ते तिला दिलासा देतात आणि तिला विचारतात,तुला यातून बाहेर पडायचं का ,ती म्हणते ,हो ,मी माझ्या आई बाबांना दु:खी नाही पाहू शकत.

ते तिला म्हणतात,तू बाहेर जाऊन बस आणि आई बाबांना पाठव,ती जाते आणि आत त्यांना पाठवते. डॉक्टर तिच्या आई बाबांना म्हणतात , सायली खरचं स्ट्रांग आहे,तुम्ही तिला छान संस्कार केले आहे आणि विशेष म्हणजे ती सकारात्मक प्रतिसाद दिला आहे,मी काही औषधं देतो आणि तिला जे केल्याने आनंद मिळतो,ते करण्यास प्रवृत्त करा.

इकडे पोलीस ठाण्यात शैलेशच्या आईवडीलांना बोलवून घेतले,त्यांना सगळं ऐकताच खुप धक्का बसला होता,त्यांनी त्याला म्हटले ,आम्हांला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती,तुला पण एक बहिण आहे,तू असं कसं करु शकतो,आम्ही संस्कार करायला कुठे कमी पडलो ते कळतच नाही.

श्रीधर आणि रेवती सायलीच्या घरी जाऊन तिची माफी मागायची ठरवतात. ते तिच्या घरी जातात ,त्यांना पाहून प्रदीपला खुप राग येतो ,तो काही बोलणार त्या आधी श्रीधर त्यांना म्हणतो,मला माहित आहे,तुम्हांला आम्ही इथ आलेलं आवडलं नाही,आम्ही तुम्हांला हे सांगायला आलो नाही की,तुम्ही शैलेशला माफ करा म्हणून सांगायला नाही आलो,सायलीला भेटून आम्हांला तिची माफी मागायची आहे,आम्ही पण तिच्या बरोबर आहोत,आम्हांला पण मुलगी आहे, आम्ही समजू शकतो तुमच्या भावना, आम्हांला पण सगळं ऐकून धक्का बसला ,आम्ही त्याच्या वर संस्कार करायला कुठे तरी कमी पडलो.

स्वाती म्हणाली,त्यात तुमची काय चूक आहे ,घाबरत घाबरत प्रदीप कडे पाहत म्हणते. 

रेवती-"आम्हाला सायलीशी बोलायला मिळेल का ,आम्ही जास्त वेळ नाही घेणार "

प्रदीप-"आता काय बोलयचं आहे ,तुमच्या मुलानी दिलेला त्रास काही कमी होणार आहे का"

रेवती-"नाही फक्त एकदा आम्हांला तिची माफी मागू द्या इथेच तुमच्या समोर"

स्वाती सायलीला घेऊन येते, रेवती तिच्याजवळ जाते,तोंडावरुन हात फिरवत "आम्हांला माफ कर पोरी ,पण आमच्या साठी ही हा एक धक्काच आहे,पण आता तू काही काळजी करू नकोस,त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळेल,पण तू ह्याच्यातून बाहेर पड ,तुझे आईवडील आहेतच तुझ्या बरोबर ,तुझी जी इच्छा अपूर्ण असेल ती पूर्ण कर,नव्याने पुन्हा उभी रहा ,आम्ही ही तुझ्या बरोबर आहोत ,जे झालं ते आम्ही बदलू नाही शकत ,पण तुझ्या पाठीशी उभे राहू शकतो,आमच्या कडून तुम्हांला सहकार्य मिळेल, सुखी रहा पोरी,"असं म्हणून ते जायला निघतात.

स्वाती -"अहो चहा तरी घेऊन जा"

रेवती-"सगळं व्यवस्थित झाल्यावर सायलीने आम्हांला चहा प्यायला बोलावल्यावर नक्की येऊ,हो ना सायली"असं म्हणून ,नमस्कार करून ते दोघे निघून गेले.

ते निघून गेल्यावर स्वाती प्रदीपला -" सायलीला ह्यातून बाहेर पाडण्याचा एक मार्ग सापडला ,तुम्हांला आठवतं सायली एकदा म्हणाली होती ,तिला एम बी ए करायच आहे,तिला आपण जर ऐडमिशन घेऊन दिले तर तिच्या जगण्याला एक दिशा मिळेल आणि ती लवकर यातून बाहेर पडेल"

प्रदीप-"हो हे आपल्या लक्षात नाही आले "

स्वाती-"मघाशी रेवती ताई बोलत होत्या,तेव्हा माझ्या लक्षात आलं,बिचारे दोघं किती केविलवाणा चेहरा झाला होता त्यांचा,असा मुलगा कुणालाही नसावा."

स्वाती ,प्रदीप आणि भावेश यांनी मिळून सायलीला ऐडमिशन

साठी रेडी केले. डॉक्टर आणि सायलीच्या आईवडील यांच्या प्रयत्नांना यश आले. स्वातीने चांगल्या मार्कानी एम बी ए पास केलं  आणि एका कंपनीत छानशी नोकरीही लागली,तिथेच काम करणा-या एका मुलाबरोबर तिने लग्न केले पण लग्ना आधी जे झाले ते स्पष्ट त्याला आणि त्याच्या घरच्यांना सांगितल्या नंतर,तिच्या लग्नाला शैलेशचे आईबाबा ही आले होते,त्यांनीही सांगितल्या प्रमाणे तिला साथ दिली होती,आता तिच्या मनात त्यांच्या  बद्दल कोणत्याही प्रकारची कटू भावना नव्हती. इकडे शैलेशला त्याने केलेल्या प्रकाराचा पश्चात्ताप झाला होता. त्याला तीन वर्षाची शिक्षा भोगली होती ,त्यानंतर त्यानेही सायलीची माफी मागितली होती आणि पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.      

         

 पात्रांच्या नजरेतून कथा- सायली शांतपणे विचार केला तर  काय करु शकत होती

1) जसा बाबांचा आवाज ऐकून तिने खिडकी उघडली,तशीच खिडकी उघडून ती मंदा ताईंची मदत घेऊ शकत होती.

2) पती परमेश्वर म्हणून त्याचा अन्याय सहन करण्या ऐवजी त्याला विरोध करु शकत होती.

3) माझ्या आईबाबांनी नेहमीच मला मुलगी असुनही मुला इतकच प्राधान्य दिल ,खरच मी खुप नशीबवान आहे.

4) त्यांच्या संस्कारांमुळे आणि आधारामुळे मी परत नव्याने ऊभी राहिले .

शैलेश: 1) मित्रांची निवड चुकली ,त्यामूळे स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे असचं वाटतं होतं.

2) होस्टेल वर सगळेच वीडियो बघायचे त्यात काही गैर आहे असं कधी  वाटलं नाही 

3) आई बाबांशी कामापुरतं नातं होतं कधी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोललोच नाही.

4) हातून चूक झाल्यावर जे समजून सांगितल ,ते लग्नाच्या आधी बोलले असते तर हे काही घडलच नसतं, प्रेम आणि वासना यातला अर्थ समजायला खूप मोठी किमत मोजवी लागली.

प्रदीप आणि स्वाती: 1) मुलीच लग्न ठरवताना दुस-यांवर विश्वास न ठेवता स्वत: चौकशी केली पाहिजे

2) आपल्या मुलांना मग ती मुलगी असो की मुलगा नेहमी साथ दिली पाहिजे.

श्रीधर आणि रेवती: 1) मुलांची मित्रांची संगत चांगली आहे का ते नेहमी पहावे.

2) मुल मोठी झाल्यावर त्यांच्याशी मित्र म्हणून वागावे व कोणत्याही गोष्टीवर मग ती सेक्स जरी असेल तरी त्याच्यावर मनमोकळी चर्चा करावी निदान लग्न ठरल्यावर तरी.

बोध: आजची तरुण पिढी इंटरनेट मुळे वहावत चालली आहे, अजून एक गोष्ट आपल्या समजात सेक्स वर बोलणं टाळलं जातं आणि मग मुल जिज्ञासा असल्याने जे हाती पडेल त्याचा आधार घेतात आणि त्या गोष्टी बद्दल योग्य माहिती न मिळाल्याने गैर समज करून घेतात त्यामूळे कधी कधी एखाद्याच आयुष्यही उध्वस्त होत.या कथेत सायलीच्या आईवडीलांनी तिला समजून घेतलं आणि तिला पुन्हा उभं रहाण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून ती सावरली ,हे एक सकारात्मकतेचे चांगले उदाहरण आहे आणि सायली एक आशेचा किरण झाली.

कविता: आशेचा किरण - सकारात्मकतेच्या दिशेने एक पाऊल 

आशा आणि निराशेच्या गर्तेत ,सापडला एक किरण,

पण त्याचं मन करीत होते द्वंद्व,त्यात विसरला तो हसणं,

जसं सूर्याच्या किरणांना ,ढग नाही झाकून ठेऊ शकत ,

तसचं संस्कारांनी केली,नैराश्यावर मात ,

इच्छा शक्तीची होती त्याला जोड,

म्हणून कथेचा शेवट झाला गोड,

सकारात्मकतेच्या दिशेने टाकल एक पाऊलं,

आशेच्या किरणाने अंधाराला प्रकाशमय करून टाकलं.

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all