अनुभव एक, किस्से अनेक- भाग ६ सायंकाळ

It's About The Beautiful Day Spent With Colleague Come Friend..a Beloved Friend.

अनुभव एक, किस्से अनेक- भाग ६, सायंकाळ 

नमस्कार ईरा वाचकहो, 

मागच्या भागात आपण बघितले, वल्लरी ची सोनेरी पहाट घरातल्यांशी बोलून किती छान झाली...त्यानंतर एली उर्फ एलोरा सोबतची शॉपिंग...तुम्हाला नक्कीच खूप सारे प्रश्न पडले असतील ना? रेहान आणि वल्लरी च संभाषण म्हणा...किंवा..एली सोबतची मैत्री...हळूहळू सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल....चला तर मग पुढे पाहूयात वल्लरी ची बॅक टू वर्क मोड च्या आधीची एक सायंकाळ .... आणि थँक्यू मेघा अमोल...? 

मस्त ताणून दिल्यामुळे दोघींना खूप फ्रेश वाटू लागले होते.  आता डिनर ला काय बनवायचं करून वल्लरी विचार करतच होती की, तितक्यात एली ने...ऐलान केलं की ती स्वयंपाक करेल....तोपर्यंत तुझ्या आवडीचा एखादा कार्यक्रम बघत बस... 

एलोरा ने आधीच ठरवून ठेवले होते...वल्लरी आली की तिला \"दालखिचडी\" सरप्राइज देणार... तिला किचन मधून वल्लरी काय करत आहे ते दिसत होते... 

किचन, डायनिंग आणि लिव्हिंग मध्ये भिंती नसल्याने मोकळी जागा होती. पूर्ण इंटेरियर शुभ्र पांढर्‍या रंगात आणि कलात्मकतेने रंगसंगतीचा वापर केलेला होता. 
किचन मध्ये मोठा असा ओपन फ्लोर...ओपन व्ह्यू ह्या किचन चे वैशिष्ट्य...ज्यास छतावरून माध्या पर्यंत काचेच्या खिडक्या आहेत ज्यामुळे घराच्या आतून बाहेरचे सुंदर दृश्य दिसत होते.... ब्राऊन वुडन फ्लोरींग, व्हाइट कॅबिनेट, व्हाइट मार्बल काऊंटर टॉप,  मधोमध असलेला मोठ्ठा आइलँड ( भाज्या आणि इतर गोष्टी ठेवण्यासाठी वापरतात) अमेरिकन किचन शैलीला सूचित करत होते. या स्वयंपाकघरात एक जेवणा साठी एक जागा अशी आहे जे जेवण शिजल्यानंतर लगेचच जेवणाचा आस्वाद घेता येईल.... 

\"...म्म् ऽऽ काय मस्त सुवास आहे हा...\" करत वल्लरी ची पाउले किचन च्या दिशेने अर्धवट बंद डोळ्यांनी चालू लागली... 

आवाज आला म्हणून एली ने मागे वळून पाहिले आणि हसू लागली...\" अग्ग, लव पडशील ना...पूर्ण डोळे उघडून चाल बघू...\" 

....\"तुज्या स्वयंपाकाची किमया आहे...मी तो सुवास एन्जॉय करते आहे.  आज काय सुवासानेच पोट भरणार वाटते...पटकन वाढ बघू...खूप भूक लागली आता...\" पोटावर हात फिरवत अर्धवट डोळ्यांनीच टेबल वर बसत वल्लरी बोलली .... 

\" टाऽऽ डाऽऽ पेश है दालखिचडी\"... एलोरा ने पण जास्त वेळ न दवडता तिच्यासमोर दालखिचडी ची बाऊल ठेवली... 

मस्त सुवास सुटला होता...छानपैकी कोथिंबिरीच्या पानांनी साधीच सजावट केली...सोबत पापड आणि साधेच ग्रीक योग्य....ते पाहून वल्लरी जाम खुश झाली...
वेळ न दवडता पटकन एक घास खाल्ला... 

\" वाह ऽऽ...खूपच स्वादिष्ट आहे. हा जिऱ्याचा फ्लेवर आहे खूप छान आहे. तुला कसं काय येतं ग बनवता? एली... मला तर भारी सरप्राईज मिळालं....\"...वल्लरी मिटक्या मारत खाताना बघून एलोरा काय तो आनंद झाला .... 

\" एली...सांग ना तुला कसे काय येतं बनवता?  तेही दालखिचडी ...माझी सगळ्यात फेवरेट आहे...\" असं म्हणत म्हणत पापड,  दही वर ताव मारायला सुरू केल तसं तिला ठसका लागला... 

\" हे लव...अगं हळूहळू खा ना...अजून आहे भरपूर...दोघींना पुरून उरेल...कुठेही पळून नाही जाणार दालखिचडी तुझी...\" एलोरा तिला पाणी देत पाठीवर रब करत बोलली... 

वल्लरी- \" ते जाऊदे...मला सांग कुणाकडून एवढी टेस्टी दालखिचडी शिकून घेतलीस तू?...नक्कीच कोणी भारतीयच असणार ....हो ना?..\" 

एलोरा - \" अग हो हो....किती ती घाई ...बर ऐक सांगते......मागच्याच महिन्यात मी एका कॅम्पिंग ला गेले होते...द बिझनेसमन श्रीराज देशमुख यांची पत्नी माहितीये?.....\" 

वल्लरी - \"हे त्याच का?...सौ. नंदिनी श्रीराज देशमुख...त्यांच्या विषयी वाचलेय... माझे आयडियल कपल आहेत...\" 

\" तर ...कॅम्पिंग मध्ये वेगवेगळ्या देशाचे लोक आले होते...तिथेच नंदिनी सोबत ओळख झाली...\" एलोरा ने सांगितल्या बरोबर...वल्लरी आश्चर्यचकित होऊन  जोरात, \"क... काऽऽय?\"...बोलली .. 

\" एऽ...लव...अगं..हळू...किती ते तुझे ओरडणे...पुढे ऐक तर...\" ..इति...एलोरा... 

जराशी...शांत होत वल्लरी ने \"पुढे काय झाले?\"... करून विचारले... 

\" हा...तर आम्ही दोघींनी एकमेकांचा परिचय घेतला करून घेतल्यानंतर सगळ्यांच्या गप्पा रंगल्या. तिने मग सगळ्यांना तिची आयडिया सांगितली.  सगळ्यांनी त्यांच्या देशाच्या आवडत्या झटपट होणार्‍या डिशेस बनवायच्या.  मग काय जोश सांगू तुला...सगळ्यांचा...त्यातच मला बरेच पटकन तयार होतील असे भारतीय पदार्थ शिकायला मिळाले.  नंदिनी नेच मला ही साधीसोपी, पौष्टिक आणि अजिबात तिखट नाही...पण खूप चविष्ट असा दालखिचडी शिकवली....\" एलोरा ने बोलता बोलता हळूच ताकाचा एक ग्लास वल्लरी कडे सरकवला... 

ते बघून वल्लरी एकदम अवाक् झाली...पटकन ताक चा एक घोट घेतला तर घरची आठवण आली...मस्तपैकी आले आणि हिमालयीन पिंक साॅल्ट घालून तयार केलेले ताक पिऊन डोळ्यात आसू आले... 

एलोरा ला समजायला वेळ लागला नाही..तिने हळुवारपणे तिच्या पाठीवर थोपटत विचारले...\" घरची आठवण आली का?...\" 

\"ह्मम्...माझ्याकडून नंदिनी दि ला नमस्कार सांग एली...आणि थँक्यु सुद्धा...इतकी सुंदर रेसिपी त्यांनी तुला शिकवली...\"...वल्लरी डोळ्यातले आसू पुसत बोलली... 

\"हो...ग्गं ...लव ...नक्की सांगेन..तुला माहिती आठवड्याभरा पूर्वीच इथे होती. स्वभावाने खूप छान. नेहमी उत्साही. एवढे सगळे असून सुद्धा कसला बडेजाव पणा नाही. खरच खुप सुंदर व्यक्तिमत्त्व तिचे. अजून थोडीशी लवकर आली असती तर नक्कीच नंदिनी ची आणि तुझी भेट झाली असती...\"...एलोरा.. 

वल्लरी ला थोडी चुटपुट लागून गेली...\" श्याऽऽ यार...थोडक्यात आमच्या दोघींची भेट मिस झाली म्हणायची...\"..उदास होऊन बोलली... 

एलोरा...\" अगो...नको उदास होऊन बसु...मी तिला कॉल केला की तू पण बोल..आणि वेडाबाई ...उद्या जॉईन करायच...विसरलात?  बॅक to वर्क मोड...ऑन...हे हे..\"... 

\"अं...हो  ना...चल मी उद्यासाठी तयारी करते. उद्या ये तू घ्यायला मला...\" वल्लरी... 

एलोरा ने वल्लरी ला बाय करून निघून गेली...तशी वल्लरी जराशी उदास झाली...पण उद्याचा दिवस महत्वाचा आहे करत जास्त डोक्याला ताण नाही द्यायचा करून झोपायची तयारी करतच होती की तिचा फोन वर नोटिफिकेशन चा आवाज आला....बघितले तर रेहान चे बरेच मेसेज आणि मिस्ड कॉल्स होते... दिवसभराच्या दगदगीमुळे फोन कडे पूर्ण पणे दुर्लक्ष झाले होते...तिने रेहान ला मेसेज केला की...\"उद्या बोलू..\" 

मेसेज गेल्याबरोबर लगेच कॉल आला...आता उचलू की नको ह्या विचारात होती की नाही कॉल कट होऊन परत लगेचच आला... 

उदास होऊन फोन उचलला तसा पलीकडून रेहान चा आवाज आला....आवाज नाही जवळपास ओरडतच होता...\" कुठे होतीस? दिवसभरात एक मेसेज करावासा नाही वाटला?  काय चालू आहे तुझ काही कळतच नाहिये मला...\" 

\"रेहान ऐक ना..आपण उद्या बोलूयात...इथे रात्रीचे 11 वाजलेत. उद्या कामावर रुजू होतेय. \"...वल्लरी समजवण्याचा सुरात बोलली...
\"...हो...काम काय तर तुला एकटीलाच आहे नाही का?...आम्ही काय तेव्हा रिकामटेकडे...तू तिकडे मस्त मजा करायला गेलीस...एकटी आहेस...काय तेव्हा...कसले टेंशन आणि कसले काय ना तुला....\"...रेहान अक्षरशः तिला हिणवून बोलत होता... 

इतके की वल्लरी च्या डोळ्यात अश्रू जमा होऊ लागले होते...कसे बसे तिने त्याला उत्तर दिले..\" तुला जे समजायचे ते समज. मी तुला आत्ता कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण द्यायच्या मनस्थितीत नाहिये....\" बोलुन फोन कट करून टाकला आणि पटकन नेट बंद केल... 

वल्लरी स्वतःशीच बोलत होती...\" रेहान तू असा कसा विचार करतोस रे...कधी विचारले पण नाही की मी कशी आहे आणि माझ आजुबाजूला सगळे कसे आहे.  मी मजा कशी करू?  माझे मित्रमैत्रिणी तिथे भारतात आहेत.  मला आई च्या हातून जेवण खायचे आहे.  इथे कोण भरवणार?  कोणी नाही.  रोज स्वतःलाच जेवण बनवायचे आहे स्वतःसाठी. अगदी किराणा सामान पासून घरातल्या सगळ्याच गोष्टी मलाच करायचे आहेत.  एकटी असले म्हणून काय झालं...काम तर असतातच....तुला सांगून कळणार नाही...मी सांगणारही नाही...कारण,  मला वाटतच नाहिये की तुझी समजून घ्यायची मानसिक तयारी आहे...\" 

खूप दिवसांनी ती पूर्ण दिवस मनसोक्त जगली...संध्याकाळी एलोरा ने दिलेली स्पेशल सरप्राईज...टेंशन मुक्त होती... 

तिच्या नशिबी सुखाची झोप लिहिली नसावी कदाचित...रेहान च बोलणं तिला खूप लागलं...कशीतरी तळमळत बेड वर झोपेची वाट बघत पडून राहिली...रात्री कधीतरी तिचा डोळा लागला... 

क्रमशः 

पाहूयात वल्लरी चा पहिला दिवस...तिथे तिला कोण कोण भेटतात आणि अजून काय होते... 

© पूजा आडेप.






























































अनुभव एक, किस्से अनेक- भाग 5 सोनेरी पहाट 


नमस्कार ईरा वाचकहो, 

मागच्या भागात आपण बघितले, वल्लरी च मन आधीच साता समुद्रापार जाऊन पोचले. पासपोर्ट वर इमिग्रेशन चा शिक्का फक्त अमेरिकेत प्रवेशच नाही तर तिच्या आयुष्या चा नवारंभ होता. चला तर बघूयात तिची सातासमुद्रापार सोनेरी पहाट कशी होते....


सोनेरी किरणे चेहर्‍यावर आली तशी वल्लरी एक डोळा बंद आणि एक उघडा ठेवून एका कुशी वर पडून  राहिली.... सगळ्यात आधी फोन घेऊन वाय-फाय ला कनेक्ट केला तसे...भराभर मेसेज, मिस्ड कॉल्स, विडिओ कॉल्स आणि रेकॉर्डेड मेसेज ने फोन भरून गेला...ते पाहून तर उरलीसुरली झोप पण उडालीच... 

सगळ्यात आधी आई ला विडिओ कॉल केला... 

वल्लरी- \"  आऽऽऽई.....\" 

रेवती वल्लरी ची आई- \"उठल्या बाई आमच्या मॅडम...नाहीतर आम्हाला वाटले...विसरली की काय तिकडे जाऊन..?\" 

वल्लरी -  \" आई गंऽऽऽ हे काय?  मी अशी कशी विसरेन बरे...माझ्या लाडक्या आई ला?\" 

आई- \" उठा आणि आंघोळ करून मेडीटेशन करा...म्हणजे बरे वाटेल..\" 

वल्लरी- \" तुला ना ऽऽऽ सगळेच कसे समजते गं...! पण मला खूप कंटाळा आलाय अगं..!कित्ती छान वाटतय सांगू तुला ह्या उबदार डुवेट( ब्लँकेट ) मध्ये...\" 

आई- \" उठ आणि आवर...तुझ ह्याव् आणि ट्याव बाजूला ठेव...\" म्हणत च होती की ...
वल्लरी चे बाबा विहान...आणि बहिण श्राव्या....चा पाठीमागून आवाज आला... 

वल्लरी- \" आई...कसला गोंधळ चालू आहे ?...\" 

आई ने फोन चा कॅमेरा दोघांच्या दिशेने वळवला.., तशी वल्लरी टुणकन उडी मारून मांडी घालून बसली...कारण, वल्लरी चे बाबा श्राव्या ला जेवण भरवत होते... 

\"बाबाऽऽऽ... हे काय? श्रावू सरक तिकडे...तुझ्या हाताने जेव जा...आणि बाबा तुम्ही तर मला विसरूनच गेले. ...कट्टी मी...\" 

बाबा - \" अरे...काय झाले माझ्या बच्चा ला? रुसून बसली ते... 

लगेच बाबांनी त्यांच्या स्टाइल मध्ये हातवारे करत...सूर तालात बडबड गीत म्हंटले.... 

\"नको ना रुसू, कोपर्‍यात बसू ,
येऊ दे गालावर, खुदकन हसू ,
इवल्याश्या नाकावर,
कित्ती मोठा राग,
देऊ काय तुला,
हवे ते माग...\" 

हे ऐकून वल्लरी खुदकन हसली...\" बाऽऽबा...you are बेस्ट.\" 

बाबा- \" खुश आहे ना माझा बच्चा?\" 

वल्लरी- \" मी ठीक आहे बाबा....तुम्ही कसे आहात?....तुम्हाला आत्ता आठवण आली ना माझी?...\" 

बाबा फिल्मी स्टाइल मध्ये- \" तुमको ना भूल पायेंगे? तू माझा बच्चा आहेस..\" 

\" आणि...तू माझी लाडकी ताई...मला काय आणशील बरे तिथून?...\" इति श्राव्या...म्हणाली तशी आई ने येऊन पाठीत एक धपाटा दिला...आणि म्हणाली... 

\" तिला जाऊन आठवडा पण नाही झाला आणि मला काय आणणार?...कोणाचे काय आणि कोणाचे काय...देवा रे...\" 

वल्लरी ची हसून हसून पुरेवाट झाली...सगळ्यांना काळजी घ्यायला सांगून फोन ठेवते की नाही तोच रेहान चा फोन आला...उचलू की नको विचारात असताना कट झाला...आणि परत विडिओ कॉल आला...मनात नसताना उचलला... 

\" काय ग...किती वेळ झाला कॉल करतोय?  मेसेज ला तर अजिबातच रिप्लाय नाही...गेलीस तर तिकडचीच झालीस...कोणाशी बोलत होतीस एवढा वेळ..!?\"...रेहान वैतागून बोलत होता... 

वल्लरी ने शांतपणे च प्रतिउत्तर दिले...\" आता मी घरच्यांशी पण बोलू नये का रेहान..? तुला पण माहितीये आई किती काळजी करते माझी...तरीसुद्धा तू असा बोलतोयस्....!\" 

रेहान- \" वल्लरी...तिकडे गेल्यापासून पोहोचल्याचा एक साधा मेसेज पण करावासा नाही वाटला का तुला? ... बास्  झाली तुझी नाटकी आणि स्पष्टीकरण...तुला जे वाटेल ते कर..\" 

\" ठीक! ठेवते मी फोन...\"...उदास होऊन वल्लरी ने फोन ठेऊन दिला... 

आता तिला भूक पण लागली होती चांगलीच.  सुदैवाने फ्रीज मध्ये दूध, फळे, ब्रेड, बटर आणि कपाटात काही cereals चे बॉक्सेस होते. जवळपास प्राथमिक सोयी-सुविधा, खायला काहीतरी व्यवस्था केलेली होती . पटकन स्वतः साठी गरम कॉफी आणि ब्रेड टोस्ट करून TV वर बातम्या पाहत नाश्ता करत होती...तेवढ्यात फोन रिंग वाजली...न पाहताच फोन उचलला... 

\"वल्लरी here\" ...वल्लरी.. 

\" हे हाय लव (वल्लरीच्या नावातून एक लाडकं टोपणनाव)...एली बोलतीये...कसं वाटत आहे? आपण तुझ्यासाठी ग्रोसरीज् घ्यायला Walmart ला जाऊया...तू तयार हो...मी वीस मिनिटात पोहचेल तुझ्याकडे...\" इति एलोरा.. 

वल्लरी - \" ये तू सावकाश..\"



दहाच्या सुमारास डोर बेल वाजली तशी वल्लरी ने दरवाजा उघडला...समोर एलोरा तिला विश करत हातात स्नॅक्स घेऊन उभी होती... 

एलोरा... ३७ वय, Regional Head HR...म्हणजे की...HR लोकांची पण HR Head , चांगलीच उंच पण बारीक, मानेपर्यंत रुळणारे सोनेरी केस, हिरवे-निळे डोळे, उभा चेहरा आणि सुंदर हास्य...हातात एक नाजूक ब्रेसलेट...आणि उन्हात टॅन साठी बसल्याने टोमॅटो सारखा लाल चुटूक चेहरा......दोघींच्या घरांमध्ये अंतर फक्त पाचच मिनिटे ... 

वल्लरी ने तिला बसायला सांगून...पटकन तयार होऊन हॉल मध्ये आली...एक छानसा जॅकेट घालून दोघी कार मधून Walmart च्या दिशेने जाऊ लागल्या. ... वल्लरी ला पण कंपनी ने गाडी दिली पण रस्ते माहिती नाही म्हणून...एलोरा तिची कार घेऊन आली होती. .. कार पार्किंग मध्ये लाऊन Walmart च्या दिशेने चालू लागले... 

\" एलीऽऽ काय घेऊ अगं? हे तर आमच्या इथल्या बिगबझार पेक्षाही मोठे आहे. ...\" वल्लरी..एकदम भांबावून गेली... Walmart मध्ये शिरल्या बरोबर...
काय घेऊ आणि काय नको होऊन गेलं तिला... 

एली- \"चिल्ऽऽ बेबी...मी आहे ना..! \" 

दोघींनी हे नको ते नको करत करत ... बरीच खरेदी केली. खायच्या गोष्टी तर बघायलाच नको...इतकी खरेदी केली... 

मनसोक्त खरेदी झाली तशी दोघी एका मेक्सिकन रेस्तराँ मध्ये गेल्या...एली ला लक्षात होतं की वल्लरी ला मेक्सिकन डिशेस फार आवडतात... 

\" वाह..! एली मस्तच आहे हे ठिकाण एकदम...मी तर आपला नेहमीच \"टाको आणि कॅसाडिया\" ऑर्डर करणार...विथ Guacamole आणि सालसा\".. वल्लरी ने ऑर्डर दिली सुद्धा....
एली ने सुद्धा होममेड Tortilla ची ऑर्डर दिली...तोपर्यंत दोघींनी मस्त Guava Agua Fresca जे की...(ताज्या पेरू पासून बनवलेलं मेक्सिकन ड्रिंक ) मस्त एन्जॉय करत होते...ज्यूस मधला गोडवा, पेरूचा आतला गर एकदम मस्त कॉम्बिनेशन... ताजेतवाने करेल असेच बनवलेले होते... 

एली - \" हे लव... बाकी प्रवास कसा झाला? प्रवासात कोणी पटवला की नाही?  घरी कसे आहेत सगळे?  आणि माझी साडी आणलीस ना? ...\" 

ज्यूस पिता पिता वल्लरी ला ठसका लागला...तशी एली तिची पाठ थोपटत बोलली , 

\" अग हळू हळू पी ना...किती ती घाई?  कुठे पळून नाही जाणार तुझा ग्लास आणि त्यातला ज्यूस..\"...


थोड्याच वेळात जेवण आल तसं दोघी पण तुटून पडल्या...पोटोबा एकदम शांत...आता कंटाळा येऊ लागला दोघींना...पटकन घरी जायच ठरवल...
दोघी वल्लरी च्या घरी आल्या तश्या आडव्या झाल्या सोफा वर...दमल्यामुळे आणि मस्त पोट भरून जेवण झाल्याने डोळे अगदी जड होऊन गेले...दोघी बाकीच काम नंतर करत मस्त ताणून द्यायच ठरवलं... 

क्रमशः 


नमस्कार वाचकहो, 
नक्कीच प्रश्न पडले असतील ना? एलोरा ला वल्लरी कशी काय ओळखते?  बघूयात पुढच्या भागात... हा भाग कसा वाटला नक्की कमेन्ट करून सांगा...काळजी घ्या... 

© पूजा आडेप.





























































अनुभव एक, किस्से अनेक- भाग 4 नवारंभ 

नमस्कार ईरा वाचकहो, 

मागच्या भागात आपण बघितले, फक्त विमानच नाही तर वल्लरी च मन सुद्धा उड्डाण करत होते. तिचा विमानप्रवास, विमानतळ आणि वेगवेगळ्या नवलाई बघत प्रवास सुरू असतो.  

आता पाहूयात पुढे, 

एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ती ही की आता अमेरिकेत संवाद हा इंग्लिश मधूनच केला गेलाय.  पण वाचकांच्या सोयीसाठी मराठी मधून असणार आहे.  धन्यवाद! 


एकदाचं विमान सॅन फ्रान्सिसको आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. केबिन क्रु ने अनाऊन्समेंट करत तापमान, स्थानीय वेळ, दिवस जुजबी माहिती पुरवली. 


वल्लरी च मन कधीच अमेरिकेत पोचले होते. मोबाईल मध्ये आपोआप नेटवर्क मुळे स्थानीय वेळ अपडेट झाली. बाकी बरेच गॅझेट मोबाईल ला कनेक्ट असल्याने आपोआपच सगळे अपडेट झालं. 

खरं तर सगळ्यान पासून दूर एकटी कल्पना करूनच तीच मन थुईथुई नाचत होतं आणि उदासपण झालं. उदास ह्या साठी की, आईच्या हातच जेवण नाही मिळणार. खूप दिवसांनी एक शांतता अनुभवत होती. जणूकाही काहीतरी गवसल्या सारखे. मिश्र भावनांचा अनुभव घेत, विमानातून बाहेर आली तोच अंगावर सर्रकन काटा आला,  दिवसा तिला चांगलीच हुडहुडी भरली. पटकन सोबत आणलेला ओव्हरकोट घातला. सूर्य नारायणच दर्शनाची शक्यता कमीच होती. 

सगळ्यात आधी वॉश रूम मध्ये जाऊन फ्रेश झाली. 

\"आहा! कित्ती छान. हे वॉश बेसिन ला कोमट गरम पाणी. हात तर अजिबातच काढू वाटेना.\" स्वतःशीच बोलत चेहरा धुवून घेतला. प्रवासाचा सगळा शीण  निघून गेला. वल्लरी साठी मेकअप एक काजळ आणि लिपस्टिक. तेवढ्यावर सुद्धा तिचा चेहरा अगदी उठून दिसायचा. उभा चेहरा, अधोरेखित करणारी हनुवटी, कान त्या थ्री इडियट्स मधल्या आमीर सारखे किंचित बाहेर, त्यात मोत्याचे कानातले, नाक अगदी सरळ तर शेंडा गोलाकार, हसली की एका गालावर खळी. समोरचे दोन दात सशासारखे हसत आणि बोलत असेल तर खूपच क्युट दिसायचे, ब्राऊन डोळे मासोळी सारखे आकार असलेले, रंग मध्यम गोरा आणि ओठांवर स्मित.पटकन काजळ आणि mac ची रुबि वू लिपस्टिक लावून, घनदाट ब्लॅक आणि ब्राऊन मिश्रित केसांचा वर चंबू बांधुन बाहेर इमिग्रेशन च्या दिशेने चालू लागली. लोकांच्या नजरा तिच्या कडे कमी आणि केसांन कडे जास्त होते.  तिच्या केसांचा चंबू डोक्यापेक्षा जरा मोठाच दिसत होता. 


\"अरे यार किती ही थंडी? इतकी थंडी पण असते?! ऐकुन होते आज तर अनुभवत आहे. कसे काय हे लोकं राहतात एवढ्या थंडी मध्ये काय माहिती!\" वल्लरी विचार करत च चालत आजुबाजूला निरीक्षण करत स्वयंचलित वाॅकवे वर जाऊन थांबली. आपोआप पुढे जाणारा बेल्ट आणि त्याच बाजूच्या भिंती वर त्याविषयी चा इतिहास बघत जाताना गम्मत वाटली. आगमन हॉल मध्ये येऊन इमिग्रेशन च्या लाइन मध्ये नंबर यायची वाट बघत उभी होती.  
नंबर आला तसा ती पटकन काऊंटरपाशी जाऊन उभी राहिली. 

वल्लरी- \" गुड मॉर्निंग Mr. Alex !\" 

इमिग्रेशन अधिकारी Alex   - (तिच्या निरीक्षण शक्तीच कौतुक वाटलं) \" गुड मॉर्निंग मिस. कृपया आपला पासपोर्ट द्यावे. \" 
Alex साठीच्या आसपास असलेला अमेरीकन, भारदस्त व्यक्तिमत्व , पोट सुटलेल, निळे डोळे, गोरा रंग, उंच चेहर्‍यावर किंचित लालसर छटा, पांढरे केस , नाकावर असलेला चष्मा, चेहर्‍यावर थोडेसे गंभीर भाव आणि अनुभवी नजर. 

वल्लरी ने पासपोर्ट दिला तस Alex ने नाव बघून तीच नाव उच्चारायच्या आधीच, 
Alex - तुझ्या नावाचा उच्चार नक्की कसा आहे? (बर्‍याच वेळा नावाचा उपचार चुकल्याने गमतीदार गोष्टी झालेल्या होत्या) 

वल्लरी ह्या प्रश्नाने बावरली, पण लगेच सावरत तिने उत्तर दिले- \" इट इज प्रोनाउन्सड् अॅज \" व ल्ल रीऽऽ\" 

Alex - \"ओके! मिस वलरी. हे बरोबर आहे? 

वल्लरी मनातल्या मनात डोक्यावर हात मारत, \" देवा!\" 

वल्लरी ने हलकेच मान डोलावून \"हो\" म्हंटले.  आता त्याला बरोबर उच्चार करत बसलो तर वेळ जाणार होता. 

Alex - \" तूम्ही भारतीय मान डोलावून का बोलता? बर्‍याच वेळेस बघितले पण कळत काहीच नाही. हाहाहा.... असो. तुज्या कंपनी आणि कामाचे स्वरुप सांग बघू. \" 

वल्लरी - \" माझी कंपनी कॅलिफोर्निया मधील सॅन फ्रान्सिसको मध्ये आहे. मी डायरेक्टर of सेल्स अँड मॅनेजमेंट पदावर आहे. सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन अजून कसे उत्पन्न वाढवता येईल काय-काय नवीन उपयोगी आणि परवडणाऱ्या गोष्टी लोकांसाठी आणता येतील वैगरे अजून बरेच काही आहे.\" 

Alex - \" तुला काही सामान वैगरे डिक्लेअर करायचे आहे का? जसे की जिवंत प्राणीपक्षी, मांस, नाशवंत वैगरे? \" 

वल्लरी - \" सगळे कंपनी सील पाकिटे आहेत. त्या व्यतिरिक्त कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वैगरे आहेत. \" 

Alex - \" गुड. घरी कोण कोण आहे? काय काम करतात? \" 

वल्लरी- \" घरी आई, बाबा आणि एक लहान बहीण आहे. आई एका कंपनी मध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजर असून , बाबा व्यावसायिक आहे...बहीण अजून पदवीधर परीक्षा देत आहे...\" 

Alex - \" मग तुला हा जॉब का करावासा वाटला?  इतक्या दूर? \" 

वल्लरी- \" कारण मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप वाव आहे असे वाटते. म्हणून मी स्वतःला सुद्धा चॅलेंज केले आहे. \" 

Alex - \" ठीक आहे...\" 

पासपोर्ट वर इमिग्रेशन एंट्री चा शिक्का मारून पासपोर्ट परत दिला. ग्रीन लाइट लागली तशी वल्लरी इमिग्रेशन काऊंटर च्या पुढे येते तोच Alex ने तिला गाठलं. 
वल्लरी सोबत थोड्या गप्पा मारून तिला तिच्या आयुष्याच्या नवारंभासाठी शुभेच्छा देऊन निघून गेला.... 

एक मोठ्ठा श्वास घेऊन वल्लरीने लगेज घेतले आणि बाहेर चालू लागली. एक नवीन जीवन जगण्यासाठी.... 

तिच्या नावाचा बोर्ड बघून ड्रायवर ला हसून अभिवादन केले.  त्याने लगेज कार मध्ये पटकन ठेवून तिला बसण्यासाठी कारचा दरवाजा उघडला.  वल्लरी ला खूप बरे वाटत होते. कार मध्ये थंडी वाजत नव्हती.
लवकरच कंपनी ने राहण्यासाठी दिलेल्या घरी पोहोचली. ... फ्रेश होऊन निवांत बघूयात घर करून वल्लरी झोपेच्या अधीन झाली. प्रवास, जेटलॅग आणि टाइम झोन बदलल्याने पटकन झोप लागली .... 

क्रमशः 

वाचकहो,  तुम्हाला काय वाटते? कसा असेल तिचा पुढचा प्रवास?  बघूयात पुढच्या भागात.. 

© पूजा आडेप.






























































































































































































































































🎭 Series Post

View all