अंतरीच्या यातना भाग ९

Anuj's Life Is Full Of Challenges

अंतरीच्या यातना भाग ९


मागील भागाचा सारांश: सारिकाचा अपघात झाल्याने ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. सारिका आय सी यू मध्ये होती. काही वेळानंतर सारिका शुद्धीत आल्यावर तिने अनुज व प्रियाला बोलावले आणि त्यांच्यासोबत थोडं ती बोलल्यावर पुन्हा बेशुद्ध झाली. डॉक्टरांनी सांगितले की, पुढील बारा तासांत जर सारिका शुद्धीवर आली नाहीतर ती कोमात जाईल.


आता बघूया पुढे…..


घड्याळातील काटे भरभर पुढे सरकत होते. वेळ निघून चालली होती, पण सारिका काही अजून शुद्धीत आली नव्हती. अनुज, प्रिया व मनोज देवाकडे प्रार्थना करत होते. 


बारा तास पूर्ण व्हायला शेवटची काही मिनिटे उरली होती, तेव्हा सारिका शुद्धीवर आली. सारिका शुद्धीवर आल्याने सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सारिकाचा एक पाय फ्रँक्चर झाल्याने त्याचे ऑपरेशन करण्यात आले होते. पुढील पंधरा दिवसांनी सारिकाला डिस्चार्ज देण्यात आला होता. सारिका कंपनीच्या कामावर असताना तिचा अपघात झाल्याने हॉस्पिटलचे सर्व बिल कंपनीने दिले होते.


घरी आल्यावर सारिकाची काळजी घेण्यासाठी एक फुल टाईम नर्स ठेवण्यात आली होती. अनुजने अकरावी करीता पुण्यातच एका कॉलेजला ऍडमिशन घेतले होते. प्रिया दिवसभर तिच्या कामांमध्ये व्यस्त असायची, त्यामुळे तिला सारिकाकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. 


सारिकाला थोडं चालता फिरता यायला लागल्यावर नर्सची आवश्यकता भासत नसल्याने तिला सारिकाने स्वतःहून घरी येण्यास नकार दिला होता. घरातील कामं करण्यासाठी कामवाली बाई ठेवण्यात आली होती. सारिकाचा पाय अजून पूर्णपणे बरा न झाल्यामुळे तिला कंपनीत जाऊन काम करता येत नव्हते. सारिका दिवसभर घरात एकटी बसून बोअर होऊ लागली होती. अनुज दिवसभर कॉलेज व क्लास यामध्ये व्यस्त असल्याने सारिका एकटीच रहायची.


सारिकाचा स्वभाव दिवसेंदिवस बदलत चालला होता. छोट्या छोट्या गोष्टींवरुन ती अनुजवर चिडायची. अनुजला घरी यायला थोडा उशीर झाला तरी ती चिडचिड करु लागली होती. सुरुवातीला अनुजला वाटले की, सारिकाला काही काम नसल्याने ती अशी चिडचिड करत असेल. 


अनुजने सारिकाच्या कंपनीत जाऊन तिच्या बॉसची भेट घेतली व सारिकाला काही वेळ का होईना कंपनीत जाऊन काम करु देण्यासाठी रिक्वेस्ट केली. सारिका आता चार ते पाच तास कंपनीत जाऊ लागली होती. अनुजला वाटलं होतं की, सारिका कंपनीत कामात रमल्याने तिची चिडचिड बंद होईल.


सारिकाचे वर्तन कंपनीत सुद्धा बदलले होते. सारिका सहकाऱ्यांवर चिडायची. सारिका एकदा चिडली की, ती काय बोलेल याचा नेम राहिला नव्हता. शेवटी बॉसने अनुज व मनोजला कंपनीत बोलावून सारिकाला एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जा, असा सल्ला दिला. जोपर्यंत सारिका मानसिकरित्या पूर्णपणे बरी होत नाही, तोपर्यंत तिला कंपनीत येऊ दिले जाणार नाही, हे स्पष्टपणे तिच्या बॉसने सांगितले.


मनोज व प्रिया सारिकाला घेऊन एका मानसोपचार तज्ञाकडे घेऊन गेले. सारिकाच्या सर्व तपासण्या केल्यावर असे निदर्शनास आले की, अपघातात सारिकाच्या मेंदूला मार लागला होता. त्यानंतर बराच काळ ती घरात एकटी राहिल्याने ती सतत कसलातरी विचार करत होती. सारिका डिप्रेशनमध्ये गेली होती, तिने जरी तसं लगेच दाखवलं नसेल, पण या सगळ्याचा तिच्यावर परिणाम होत होता. सारिकाच्या आयुष्यात अनेक वादळे येऊन गेली होती, पण त्या सगळ्याचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता, या सगळ्यामुळेचं तिचं वर्तन बदललं होतं.


काही दिवसांनंतर सारिकाचे वर्तन खूपच बदलल्याने आणि ती हिंसक व्हायला लागल्याने तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. आपली आई एक दिवस पूर्णपणे बरी होऊन आपल्या घरी येईल, अशी आशा अनुज ठेऊन होता. अनुजने आपल्या आईसोबत आपल्या घरात राहण्याचे किती स्वप्न बघितले होते, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. अनुज एकटाच आपल्या घरात राहत होता. 


सारिकाला कंपनीने कामावरुन काढून टाकल्याने तिच्या उपचारांचा खर्च कुठून करायचा हा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. आपले राहते घर विकण्याचा निर्णय अनुजने घेतला. एका घराशिवाय त्याच्याकडे दुसरे काहीच नव्हते. मनोज व प्रियाची कितीवेळेस मदत घ्यायची असे अनुजला वाटत होते. मनोज व प्रिया नाही म्हणत असताना सुद्धा अनुजने घरी विकण्याचा निर्णय घेतला. घरावर काही लोन होतं ते वजा जाता बरीच मोठी रक्कम अनुजला मिळाली होती. अनुजने त्यातून मनोज व प्रियाचे पैसे परत केले होते.


अनुज होस्टेलवर राहून पुढील शिक्षण घेणार होता, पण प्रिया व मनोजच्या आग्रहाखातर अनुज त्यांच्याकडे रहायला तयार झाला. अनुजने एक पार्ट टाईम जॉब शोधला. कॉलेज करुन अनुज नोकरी करत होता. अनुजला आयुष्याचे गणित आधीच उमजले होते. जगायचे असेल तर पैसे लागतात आणि पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.


महिन्यांमागून महिने जात होते, पण सारिकाच्या मानसिक स्थितीमध्ये काहीच बदल होत नव्हते. दिवसेंदिवस सारिकाची स्थिती अजूनच बिकट होत चालली होती.


सारिका पूर्णपणे बरी होईल की नाही? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all