Feb 25, 2024
पुरुषवादी

अंतरीच्या यातना भाग ८

Read Later
अंतरीच्या यातना भाग ८

अंतरीच्या यातना भाग ८


मागील भागाचा सारांश: अनुजची दहावीची परीक्षा झाल्यावर तो घरी आला होता. आता अनुज पुढील शिक्षण पुण्यातच आई जवळ राहून घेणार होता. सारिका बाहेरगावी गेलेली असताना अनुजचा निकाल लागला. अनुज गुरुकुलमध्ये पहिला आला होता. सारिकाचा फोन लागत नसल्याने अनुजला टेन्शन आले होते.


आता बघूया पुढे….


सारिकाचा फोन न लागल्याने अनुज निराश होऊन एका कोपऱ्यात बसला होता. इतक्या वेळ प्रिया त्याला समजावत होती, पण आता तिलाही टेन्शन यायला लागले होते. शेवटी न राहवून प्रियाने सारिकाच्या बॉसला फोन करुन चौकशी केली, तेव्हा बॉसने सारिकाच्या गाडीला अपघात झाल्याचे सांगितले. सारिकाचा अपघात झाल्याचे कळताच प्रियाला काय करावे काहीच कळत नव्हते. प्रियाने मनोजला फोन करुन घरी बोलावून घेतले. 


मनोज व प्रिया अनुजला घेऊन सारिका ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती, तिकडे गेले. सारिकाच्या डोक्याला मार लागल्याने ती अजून शुद्धीत आलेली नव्हती. सारिका आय सी यू मध्ये असल्याने कोणालाच तिला भेटता आले नाही. अनुज प्रियाकडे बघून म्हणाला,


"मावशी हे सगळं माझ्याच नशिबात का घडतं? चौथीत असताना स्पर्धेची बक्षिसे बाबांना दाखवण्यासाठी मोठ्या आशेने धावतपळत घरी आलो होतो, पण त्यावेळी माझे बाबा मला भेटलेच नाही. ते मला सोडून देवाघरी निघून गेले. शिक्षणामुळे व भोवतालच्या परिस्थितीमुळे मला आईपासून इतके दिवस दूर रहावे लागले. आता आईसोबत रहायला मिळेल, म्हणून मी खूप आनंदात होतो. आज आईला निकाल सांगता यावा म्हणून माझी किती धडपड चालू होती, पण आज आई अशी आय सी यू मध्ये आहे. मावशी आईला काही होणार तर नाही ना? आईला काही झालं तर मी सहन करुचं शकणार नाही." 


अनुजला काय सांगून समजावे हे प्रियाला कळत नव्हते. मनोज म्हणाला,

"अनुज आईला काही होणार नाही. तू देवाकडे आईसाठी प्रार्थना कर. आपण चांगला विचार केला की, चांगलंच घडतं. तू वाईट विचार मनात येऊ देऊ नकोस."


हॉस्पिटलमध्ये गणपतीची मूर्ती होती, अनुजचे लक्ष त्या मूर्तीकडे गेले. अनुज गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडून उभा राहिला व मनातल्या मनात म्हणाला,

"हे गणपती बाप्पा, तू विघ्नहर्ता आहेस ना, मग प्लिज माझ्या आईवरील दुःखाचे हरण कर. माझ्या आईला लवकर शुद्धीत येऊदेत. तू माझ्या बाबांना तर घेऊन गेलास, पण प्लिज आईला घेऊन जाऊ नकोस. प्लिज बाप्पा माझ्या आईला लवकर बरं कर."


अनुज देवासमोर हात जोडून उभा असतानाच आय सी यू मधून नर्स येऊन म्हणाली,

"इकडे अनुज म्हणून कोणी आहे का?" 


अनुज लगेच नर्सकडे वळून म्हणाला,

"मी अनुज आहे. काय झालं?"


"तुमच्या आई सतत तुमचं नाव घेत आहेत. तुम्ही पटकन माझ्यासोबत चला." नर्सने सांगितले.


अनुज नर्सच्या पाठोपाठ आय सी यू मध्ये गेला. सारिका अर्धवट शुद्धीत आली होती, पण तिच्या सतत अनुजचं नाव घेत होती. अनुज तिच्याजवळ जाऊन म्हणाला,

"आई तू बरी आहेस ना?" 


अनुजचा भरलेला आवाज ऐकून सारिका म्हणाली,

"प्रियाला बोलवं.


अनुज नर्सकडे बघून म्हणाला,

"माझी मावशी बाहेर उभी आहे, तिला बोलवता का?"


नर्सने पटकन प्रियाला बोलावून आणले. सारिकाची अवस्था बघून प्रियाच्या डोळयात पाणी आले. सारिकाने खुणेनेच प्रियाला जवळ बोलावले. सारिकाने प्रियाचा हात हातात घेतला व ती म्हणाली,

"प्रिया माझं काही खरं वाटत नाहीये. माझ्या अनुजला सांभाळ."


प्रिया काही बोलणार तेवढ्यात सारिका अनुजकडे बघून म्हणाली,

"अनुज आयुष्यात कधीही हतबल होऊ नकोस, हार मानू नकोस. शिकून मोठा हो. मावशी काकांना कधीच अंतर देऊ नकोस. मला काही झालं तरी मन घट्ट करुन आलेल्या संकटाचा सामना कर."


सारिकाच्या आवाजावरुन तिच्यात अजिबात ताकद न राहिल्यासारखे जाणवत होते. बोलता बोलता सारिकाची शुद्ध हरपली होती. नर्सने अनुज व प्रियाला बाहेर जायला लावले. नर्सने पटकन डॉक्टरला बोलावले. डॉक्टरांनी सारिकाला तपासून सांगितले की, पुढील बारा तासात सारिका शुद्धीत आली नाही, तर ती कोमात जाऊ शकते.


सारिका शुद्धीत यावी म्हणून प्रिया, मनोज व अनुज तिघेही देवासमोर हात जोडून प्रार्थना करत होते.


सारिका शुद्धीत येईल की कोमात जाईल? बघूया पुढील भागात….


©® Dr Supriya Digheईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//