अंतरीच्या यातना भाग ४

सारिका व अनुज दुसऱ्या घरात रहायला गेले
अंतरीच्या यातना भाग ४

मागील भागाचा सारांश: अनुज व त्याच्या आईला श्रीकांत आपल्या घरी घेऊन आला. शीतलला हे अजिबात आवडलेले नव्हते. शीतल यावरुन घरात सतत धुसफूस करत होती. एकदा यावरुन शीतल व श्रीकांतचे भांडण झाले, त्यामुळे सारिकाने ठरवले की, आपण दुसरीकडे कुठेतरी रहायला जाऊ.

आता बघूया पुढे….

श्रीकांतने सारिकासाठी एक वनरुम किचन घर भाड्याने शोधले होते. पुढील दोन तीन दिवसांत सारिका व अनुज तिकडे रहायला गेले. घर अनुजच्या शाळेपासून जवळ शोधले होते, जेणेकरुन अनुजला शाळेत जाण्यासाठी काही अडचण येणार नाही. घरात लागणारे तुटपुंजे सामान सारिकाने विकत घेतले होते. सारिका व अनुज घरातून निघून गेल्यावर शीतलला असुरी आनंद झाला होता.

संध्याकाळच्या वेळी अनुज उदास चेहऱ्याने बसलेला होता, त्याच्याकडे बघून सारिका म्हणाली,
"अनुज तुला इकडे करमत नाहीये का?" 

यावर अनुज म्हणाला,
"आई नवीन जागेत रहायला आल्यावर थोडे दिवस असं वाटेलच ना. मामाच्या घरी खेळण्यासाठी सौरभ दादा व श्रेया होते, तसेच टीव्हीपण होता. आता इकडे कोणीच ओळखीचे नाहीये, म्हणून बोअर होत आहे."

"अनुज मला काहीतरी काम मिळालं की, मग आपण टीव्ही घेण्याचा विचार करुयात." सारिकाने सांगितले.

अनुज पुढे म्हणाला,
"आई मला टीव्ही बघण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. टीव्ही असला की अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. मला खूप अभ्यास करायचा आहे. खूप मोठं व्हायचं आहे. आपल्यासाठी एक घर घ्यायचं आहे, जेथून आपल्याला कोणीच काढून देणार नाही."

अनुजचं बोलणं ऐकून सारिकाच्या डोळयात पाणी आले. अनुज व सारिकामध्ये बोलणं चालू असतानाचं त्यांच्या दरवाजाची बेल वाजली. अनुजने जाऊन दरवाजा उघडला.

"आत येऊ का?" दारात उभ्या असलेल्या बाईंनी विचारले.

अनुजने आईकडे बघितले. सारिकाने दारात उभ्या असलेल्या बाईंकडे शंकेने बघितले, मग त्या बाई म्हणाल्या,
"अग मी इकडे बाजूलाच राहते. मला सगळे \"पवार काकू\" म्हणतात. तुम्ही नवीन रहायला आले हे कळलं, म्हणून ओळख करुन घ्यायला आले."

सारिका हसतमुखाने म्हणाली,
"काकू या ना आत या."

पवार काकू घरात येऊन बसल्या. अनुज काकूंसाठी पाणी घेऊन आला. अनुजकडे बघून पवार काकू म्हणाल्या,
"बाळा नाव काय रे तुझं? आणि शाळेत कितवीत आहेस?"

"माझं नाव अनुज प्रकाश पाटील. मी चौथीत आहे." अनुजने उत्तर दिले.

"अरे बाळा इथे समोरच्या ग्राऊंडवर ह्या बिल्डिंग मधील मुलं खेळत असतात, त्यांच्यासोबत जाऊन खेळ म्हणजे तुला नवीन मित्र मिळतील. थांब मी माझ्या नातवाला रोहनला आवाज देऊन तुझी आणि त्याची ओळख करुन देते." पवार काकूंनी सांगितले.

पवार काकूंनी अनुज व रोहनची ओळख करुन दिली. अनुज सारिकाची परवानगी घेऊन रोहनसोबत खेळायला गेला. अनुज गेल्यावर सारिका म्हणाली,
"बरं झालं काकू तुम्ही अनुज व रोहनची ओळख करुन दिली. अनुज चेहरा सोडून बसला होता. आता खेळून येईल, ते तेवढाच फ्रेश होऊन येईल."

"तुम्ही दोघेच इथे राहणार आहात का? अनुजचे बाबा कुठे असतात?" पवार काकूंनी विचारले.

"अनुजच्या बाबांना जाऊन सहा महिने झालेत. आम्ही त्याच्या बाबांच्या नोकरीमुळे गावी रहायचो, पण ते गेल्यावर माझ्या भावाकडे आम्ही आलो होतो. भावाच्या घरी जास्त दिवस राहणं बरोबर वाटलं नाही, म्हणून आता इकडे राहत आहे. काकू मला काहीतरी काम करायचं आहे. माझं शिक्षण बारावी झालं आहे. तुमच्या नजरेत जर काही काम असेल, तर प्लिज सांगा. मी कुठलंही काम करायला तयार आहे." सारिकाने सांगितले.

पवार काकू म्हणाल्या,
"सारिका मी तुझी आणि बचत गटाच्या बायकांची ओळख करुन देते. बचत गटातील बायका छोट्या मोठ्या ऑर्डर घेत असतात. उद्या त्यांच्याकडे १५०० समोस्यांची ऑर्डर आली आहे. माझी सून पण त्याच बचत गटात आहे. उद्या तिच्यासोबत जा म्हणजे तुझी आणि त्या बायकांची ओळख होऊन जाईल, त्यांना गरज असेल तर त्या तुला काहीतरी काम नक्की देतील."

सारिका काकूंसमोर हात जोडून म्हणाली,
"काकू तुम्ही अगदी देवासारख्या धावून आल्यात. मला कुठे जाऊन काम शोधावं हेच कळत नव्हतं."

"अग अडलेल्या नडलेल्या माणसांची मदत करावी म्हणजे मनाला समाधान लाभतं. तुला काहीतरी करावेसे वाटते, हे ऐकून मला बरे वाटले. बऱ्याच बायका हातावर हात धरुन घरात बसलेल्या असतात. तुला जी काही मदत लागेल, ती मी करेल. तुझा अनुज मला रोहनसारखाचं आहे. मी त्याला सांभाळत जाईल, तू काही काळजी करु नकोस." पवार काकूंनी सांगितले.

दुसऱ्या दिवशी सारिका पवार काकूंच्या सुनेसोबत म्हणजेच निलिमासोबत बचत गटाच्या बायकांकडे गेली. एक बाई आली नसल्याने सारिकाला त्यांच्याकडे काम मिळाले होते. सारिकाचा कामातील चटपटीतपणा बघून बचत गटातील बायकांनी सारिकाला आपल्यामध्ये काम करण्याची संधी द्यायची ठरवली. पवार काकू व निलिमामुळे सारिकाला काम मिळाले होते.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all