अंतरीच्या यातना भाग ३

Life Teaches Everything

अंतरीच्या यातना भाग ३


मागील भागाचा सारांश: अनुजचा मामा अनुज व आईला आपल्या सोबत घरी घेऊन गेला. अनुजला आपली शाळा व गाव सोडून जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण त्याचं कोणीच ऐकलं नाही.


आता बघूया पुढे….


अनुजच्या मामाचे नाव श्रीकांत आठवले होते, तो रेल्वेत इंजिनिअर म्हणून नोकरीस होता. अनुजचा मामा रेल्वेच्या क्वार्टर मध्ये रहायला होता. अनुजचे आजी आजोबा अनुजचा जन्म झाल्यावर वर्षभराच्या अंतराने वारले होते. श्रीकांत, प्रिया व सारिका (अनुजची आई) हे तिघे बहीण भाऊ होते. प्रिया पुण्यात रहायला होती, तर श्रीकांत मुंबईत. 


श्रीकांतची बायको शीतल हिचा स्वभाव कटकट करणारा होता. श्रीकांतला एक मुलगा व मुलगी होते, श्रेया व सौरभ. सौरभ सातवीत होता,तर श्रेया चौथीत होती. श्रीकांत अनुज व सारिकाला आपल्यासोबत घरी घेऊन गेला. अनुज व सारिकाला दारात बघूनचं शीतलच्या कपाळावर आठ्या उठल्या होत्या. शीतलने नाईलाजास्तव हसतमुखाने अनुज व सारिकाचे स्वागत केले.


श्रीकांतने अनुजचे ऍडमिशन जवळच असणाऱ्या एका मराठी माध्यमाच्या शाळेत घेतले. श्रेया व सौरभ दोघेही इंग्लिश मीडियममध्ये शिकत होते. अनुज घरी आल्यावर श्रेया व सौरभ दोघांनाही खूप आनंद झाला होता.


अनुजला नवीन शाळा अजिबात आवडली नव्हती, त्याला राहून राहून आपल्या जुन्या शाळेची आठवण येत होती. अनुजला अभ्यासाची आवड असल्याने तो हळूहळू शाळेत रुळला होता. सौरभकडे सायकल होती, त्या सायकलकडे बघितल्यावर अनुजला बाबांची आठवण यायची. 


दररोज रात्री अनुज झोपताना 'आपले बाबा कधी येतील?' हा प्रश्न सारिकाला विचारायचा. सारिका शीतलला घरातील कामांमध्ये मदत करायची, त्यामुळे शीतल फारशी धुसफूस करत नव्हती. सुरुवातीचे सहा महिने सगळं काही सुरळीत सुरु होतं.


शीतलला अनुज व सारिका आपल्याकडे राहत असल्याचा राग येत होता. दिवाळी जवळ आल्यामुळे शीतल कपड्यांच्या खरेदीला गेली होती. मार्केटमधून आल्यावर शीतलने विकत घेतलेले कपडे श्रीकांत व मुलांना दाखवले. सारिका व अनुज तिथेच बाजूला बसलेले होते.


"शीतल अनुजसाठी कपडे आणि सारिकासाठी साडी का आणली नाही?" श्रीकांतने विचारले.


शीतल म्हणाली,

"अनुजचे बाबा वारले आहेत, तर यावर्षी त्यांनी दिवाळी साजरी करायची नसते, म्हणून मी त्यांच्यासाठी काहीच आणले नाहीये."


श्रीकांत चिडून म्हणाला,

"शीतल तू हे मुद्दाम करते आहेस. सकाळी पैसे देताना मी या दोघांसाठी कपडे आणण्यासाठी सुद्धा दिले होते. ते आपल्या घरी आहेत. आपण सर्वांनी दिवाळी साजरी करायची आणि त्यांनी नाही करायची, हा कुठला नियम आहे? उद्या मार्केटमध्ये जाऊन अनुज व सारिकासाठी कपडे घेऊन ये."


"मी आणणार नाही. एकतर या दोघांनी आपल्याकडे रहावे, हेच मला मान्य होत नाहीये. माझ्या मुलांच्या प्रत्येक गोष्टींमध्ये अनुज भागीदार होत असतो. काही खाऊ आणला तर त्याला द्या. मुलांसाठी काही खेळणी घेतली, तर त्याच्यासाठी पण घ्या. सारिका ताईंचं नशीब फुटलं, तर त्या माझं नशीब सुद्धा फोडण्यासाठी इथे आल्या आहेत. सारिका ताईंची या घरातील होणारी लुडबुड मला सहन होत नाही. सारिका ताईंना त्यांची व्यवस्था दुसरीकडे करायला सांगा, नाहीतर आपल्या घरी सुद्धा दिवाळी साजरी होणार नाही." एवढं बोलून शीतल रागाने आपल्या रुममध्ये निघून गेली.


श्रीकांतला शीतलचा खूप राग आला होता, तो तिच्या मागे जाऊन बडबड करणार होता, पण त्याला थांबवत सारिका म्हणाली,

"श्रीकांत शीतलला काही बोलू नकोस. सहा महिन्यांपासून ती आम्हाला या घरात सहन करत आहे. शीतलच्या बोलण्यातून, वागण्यातून हे सर्वकाही जाणवत होतेचं. मला एखादे भाड्याचे छोटेसे घर शोधून दे. अनुजच्या बाबांची पेन्शन येते, त्यात घरभाडे निघेल. मी काहीतरी काम शोधते. हातावर हात धरुन घरात बसून चालणार नाही. काहीतरी काम तर करायलाच हवे. माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद नकोत."


यावर श्रीकांत म्हणाला,

"अग तू एवढ्याशा अनुजला घेऊन एकटी कशी राहशील? मी शीतलला समजावून सांगतो. तू काम कर, पण इथेच रहा."


इतक्या वेळ शांत बसलेला अनुज म्हणाला,

"मामा आम्हाला जाऊदेत. मामीला आम्ही इथे राहिलेलं आवडत नाही. सौरभ दादाची सायकल चालवलेली पण तिला आवडत नाही. मला हे घर आमचं वाटतंच नाही. मामा मी लहान राहिलेलो नाहीये. मी आईची काळजी घेईल."


अनुजचं बोलणं ऐकून श्रीकांतच्या डोळयात पाणी आलं. शीतलचं वागणं, बोलणं अनुजलाही खटकत होतं, हे जाणवत होतं. अनुज फक्त दहा वर्षांचा होता, पण त्याच्या बोलण्यातून आज तो खूप मोठा वाटत होता. परिस्थिती सगळं काही शिकवते, ते काही खोटे नाही. परिस्थितीमुळे अनुज मोठा झाला होता.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all