Feb 25, 2024
पुरुषवादी

अंतरीच्या यातना भाग १

Read Later
अंतरीच्या यातना भाग १

अंतरीच्या यातना भाग १


काही दिवसांपूर्वी शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. आज त्या स्पर्धेचा निकाल लागणार होता, म्हणून शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मैदानावर जमले होते. आपल्याला एकतरी बक्षिस मिळावे, अशी अनुजची इच्छा होती. अनुजला एक नव्हे तर तब्बल तीन बक्षिसे मिळाली होती. निबंध, वादविवाद आणि चित्रकला स्पर्धेत अनुज पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये आला होता. घरी जाऊन ही तीन बक्षिसे बाबांना कधी दाखवू असं अनुजला झाले होते. बाबांना बक्षिसे दाखवून अनुजला नवीन सायकल घ्यायची होती. बाबांनी तसं अनुजला कबूल केले होते.


शाळा सुटल्यावर अनुज आनंदात नाचत बक्षिसे घेऊन पळत पळत घराच्या दिशेने सुटला होता. घराबाहेर मामा व काकांची गाडी बघून अनुजला अजूनच आनंद झाला. सगळ्यांनाच आपली बक्षिसे दाखवता येईल, म्हणजे सगळेच आपले कौतुक करतील, असे अनुजला वाटत होते.


अनुज घरात गेला, तर त्याच्या नजरेस पडले की, आई डोक्याला हात लावून बसलेली होती. आईच्या डोळयात पाणी आलेले होते. आईच्या शेजारी त्याची काकू बसलेली होती, तिच्याही डोळयात पाणी होते. शेजारच्या काकूही घरात आलेल्या होत्या. अनुज भांबवलेल्या नजरेने सर्वांकडे आश्चर्याने बघत होता. अनुज आईजवळ जाऊन काही बोलणार इतक्यात त्याची मावशी त्याला रुममध्ये घेऊन गेली.


"मावशी मला इकडे का घेऊन आलीस? मला आज तीन बक्षिसे मिळाले आहेत. मला आईला दाखवायचे होते." अनुज रागाने म्हणाला.


"अनुज बाळा आईला नंतर बक्षिसे दाखव. आता मी तुला दूध प्यायला देते, ते गुपचूप पिऊन घे. तोंड हातपाय धुवून कपडे बदल. आईला जरा बरं वाटत नाहीये, म्हणून तिला त्रास देऊ नकोस." मावशीने अनुजला समजावून सांगितले.


"अग प्रिया मावशी आई कितीही आजारी असली, तरी तिच्या डोळ्यात पाणी येत नाही आणि ती अशी शांत बसून राहत नाही. सतत काहीना काही काम करत असते." अनुजने सांगितले.


अनुजला काय आणि कसं समजावून सांगावे हे त्याच्या मावशीला कळत नव्हते. अनुज दहा वर्षांचाच होता, पण तो एखाद्या मोठ्या मुलाप्रमाणे बोलत होता. 

 

थोडा विचार करुन प्रिया मावशी म्हणाली,

"अनुज तू पटकन आवरुन घे. मी तुला माझा मोबाईल देते. तुझं आवडतं कार्टून बघत बस आणि मी सांगेपर्यंत बाहेर येऊ नकोस." 


प्रियाने अनुजला दूध प्यायला दिले, तसेच खाण्यासाठी चिप्स आणि मोबाईल हातात देऊन बाहेर निघून गेली. हातात मोबाईल मिळल्याने अनुज कार्टून बघण्यात दंग झाला होता. काही वेळ असाच निघून गेल्यावर अनुजला अँबुलन्सच्या सायरनचा आवाज आला आणि त्याच्या आईच्या जोरात ओरडण्याचा सुद्धा आवाज आला. अनुज घाबरतचं रुमच्या बाहेर आला, तर हॉलमध्ये बरेच जण जमलेले होते. अनुजला कळत नव्हतं की, आपले मामा, मावशी, काका, काकू, आत्या सगळे नातेवाईक असे एकत्र का जमले असतील?


अनुज सगळ्या लोकांमधून वाट काढत हॉलमध्ये आला, तर हॉलच्या मधोमध त्याची आई रडत बसलेली होती. अनुज आईजवळ जाऊन म्हणाला,


"आई बाबा असे इथे झोपले का आहेत? बाबांची बॅग कुठे आहे? बाबा ऑफिसमधून येताना बॅग घेऊन येतात ना. आई बाबांना काय झालंय?" 


आई अनुजला कवटाळून जोरात म्हणाली,

"अनुज बाबा आपल्या दोघांना सोडून गेलेत रे. बाबा आता कधीच उठणार नाही."


अनुज चिडून म्हणाला,

"आई माझ्या बाबांना जास्त वेळ झोपायला कधीच आवडत नाही. मी आवाज देतो, मग ते लगेच उठतील. बाबा उठा बरं. आई म्हणतेय की, बाबा कधीच उठणार नाहीत. बाबा तुम्ही आम्हाला दोघांना सोडून कधीच कुठे जात नाहीत ना. बाबा मला आज शाळेत तीन बक्षिसे मिळाली आहेत. बाबा आता तुम्ही मला सायकल घेऊन द्याल ना. तुम्ही मला तसं प्रॉमिस केलं होतं. बाबा पटकन उठा. मला आता राग येतोय. मी रुसून बसलो की, तुम्ही लगेच उठून मला चॉकलेट घेऊन द्याल. बाबा आईच्या डोळयात पाणी आलेलं तुम्हाला कधी आवडत नव्हतं ना. तुम्हीच मला सांगितलं होतं, की आईच्या डोळयात पाणी येईल असं आपण काहीच करायचं नाही, मग आई इतकी रडत आहे, तरी तुम्ही का उठत नाहीयेत?"


अनुजचं बोलणं ऐकून जमलेल्या सर्वांच्या डोळयात पाणी आलं. अनुजला कसं सांगावं? हेच कोणाला कळत नव्हतं. अनुजचा मामा त्याच्या जवळ येऊन म्हणाला,


"अनुज बाळा तुझे बाबा देवाघरी गेले आहेत. गणपती बाप्पाला तुझे बाबा खूप आवडले, म्हणून त्याने तुझ्या बाबांना त्यांना तिकडे बोलावून घेतले. बाबा त्यांच्या प्रवासाला निघाले आहेत, पण त्यासाठी त्यांना आपली मदत लागणार आहे, तर चल आपण त्यांची मदत करुयात." 


"मामा माझे बाबा परत कधी येतील? गणपती बाप्पा त्यांना लवकर परत पाठवेल ना?" अनुजने विचारले.


मामा त्याची समजूत घालण्यासाठी म्हणाला,

"तू दररोज गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत जा, म्हणजे तुझे बाबा लवकर परत येतील." 


स्मशानभूमीत अनुजच्या बाबांना घेऊन जाताना त्याच्या आईने टाहो फोडला. आईचा आक्रोश बघून अनुजच्या डोळयात सुद्धा पाणी आले होते. मामा सांगेल तसं अनुज सर्व काही करत होता. मामाने समजावून सांगितल्यावर अनुजने आपल्या बाबांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.


स्मशानभूमीतून परतताना अनुज मामाला म्हणाला,

"मामा तू सांगितले म्हणून मी बाबांना आग लावली, पण बाबांना किती वेदना होत असतील? एवढासा चटका बसला तरी किती दुखतं. बाबांना एवढी आग आपण लावली. बाबा माझ्यावर रागावले तर नसतील ना?"


अनुजच्या या प्रश्नावर मामाला भरुन आले, तो भरलेल्या आवाजात म्हणाला,

"अनुज बाबा तुझ्यावर अजिबात रागावणार नाही. तू तुझे कर्तव्य केलेस. आता प्लिज अजून काहीच विचारु नकोस. मला काहीच सांगता येणार नाही."


अनुजला बाबा देवाघरी गेले, याचा खरा अर्थ समजेल का? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//