अंतरंग भाग 4

Due to sudden accident of Devi ka...Things started changing...What was Vivek's Behaviour do read in this blog

अंतरंग:- भाग 4

हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आल्यावरती तिला सगळ्यात पहिल्यांदा विवेक तिच्याजवळ बसलेला दिसला. तिला एक सेकंद कळेचना की ती कुठे आहे, इथे कशी आलिये? मग काही सेकंदात तिला आठवलं की आपण रडत होतो आणि मग खांबाला जाऊन धडकलो. तिने विवेक कडे बघितले तर तो तिच्याकडे पाहून हसला, ती काहीच बोलली नाही. आजूबाजूला बघितले तर कोणीच नव्हतं, हॉस्पिटलमध्ये हा एकटाच बसला होता, तिला उठायचं होत पण उठता येत नव्हतं. तिने विचारलं " माझी आई वगैरे कोणी आहेत का?"
"हो आहेत ना! सगळेजण आहेत, फक्त आता थोडावेळ घरी गेलेत थोड्या वेळाने येतील.सगळे जण इथेच बसून होते."
" अच्छा! काय  झालं होते मला?"
"काही नाही तू गाडी चालवताना पडली होतीस."
"मला इथे कोणी आणलं?"
" आपल्या कॉलेज मधील मुलांनी!"
"तू कसा काय इथे आलास? तू तर निघून गेला होतास ना!"
"मला जस कळलं तसा मी लगेच आलो.एक मिनिट न थांबता, हे माझ्यामुळे झालं ना?"
"का तू काय केलं होतेस?"
" मी तुला तसे बोलून निघाल्यामुळे तुला वाईट वाटलं आणि त्यामुळे हे असं झालं."
"तू बोलला आणि निघून गेलास त्यानंतर मला काहीही व्हावं असे चालू शकत ना! "
"अस नको म्हणू देविका हे माझ्यामुळे झालय आणि हे मला कळतंय. तू कुठेतरी मला चांगले सांगायला गेलीस आणि मी अडमुठेपणा केला आणि त्या गोष्टी इथे येऊन बसल्या. 
"ठीकआहे तुझा दोष तुला माहिती माझा दोष मला माहिती."
"दोष तर नक्कीच माझा आहे कारण तू मला मदत करत होतीस आणि त्यातून मी असा वागलो."
"माझे बाकीचे सगळे नातेवाईक कुठे गेलेत? कोणी आलेय की नाही आलेय आणि तू कसा काय इथेच बसून आहेस?"
"हे बघ माझ्या मनात हे दुःख आहे की माझ्यामुळे हे झालंय आणि माझं मन लागत नाही म्हणून तू शुद्धीवर येईस्तोवर मी इथे बसलोय."
" किती वेळ मी शुद्धीवर नव्हते?"
" 8 तास!"
" बापरे! आणि तू किती वेळ झाला इथे बसला आहेस?"
" जेव्हापासून तुला आणलं तेंव्हापासून मी इथेच आहे."
"आणि मग बाकीच्यांना काय सांगितलं?"
" हेच की मी थांबतो आणि तुम्ही घरी जाऊन तुमचं आवरून या असंच."
" कोणी काही म्हणलं नाही तुला इथे थांबतोस तर?"
" का म्हणावं? तुझ्या कॉलेज मधला तुझा फ्रेंड आहे आणि इथे थांबतोय!"
ती फक्त हलकेच हसली.
 त्याने विचारलं " तू शहाळ्याचे पाणी पिणार?" 
तिने मान डोलावली.
"काही खाणार?"
तिने पुन्हा मान डोलावली
 " काही आणून देऊ? तू पाणी पिणार?"
तिने फक्त हो म्हणलं. 
त्याने हळूच बेडच्या हँडल नॉब ला टर्न करून बेड वरती घेतला आणि त्यानंतर तिला पाणी दिले. तिच्या डोक्याला मोठं बँडेज बांधले होते.
उठल्यावर तिला एकदम अशक्त वाटायला लागलं आणि तिला चक्कर येऊन ती पुन्हा बेडवर पडली.
त्याला कळेना पाणी द्यायचं होत की नाही, काय झालं!
 त्याने एकदम धाडकन कॉल बेल दाबून डॉक्टर ला बोलावलं. डॉक्टर धावत आले तिला तपासलं, त्यांना कळलं की ती अशक्त झालीय त्यामुळे तिला चक्कर आली.
 डॉक्टर ने सलाईन लावलं, 15 मिनिटाने पुन्हा ती उठून बसली.
"कसली घाबरवतेस ग तू!"
"का घाबरलास तू?"
"अगं मागच्या वेळी माझ्यामुळे तू पडलीस यावेळी फक्त पाणी दिले तर  पुन्हा पडलीस. तू नक्की करते आहेस काय नक्की?"
"मी काय केलं ? मला चक्कर आली तर ती काय मी मुद्दामून आणली का?"
"अगं पण त्याच्यामध्ये पण पाणी देणारा मी होतो ना! मला माहिती नाही पाणी द्यायचं असत की नाही, मी आपलं दिले आणि तुला चक्कर आली. "
 ती हसली आणि एकदम कण्हली !
"हसू नको, तुला दुखलं असेल."
ती परत हसली.
"अग हसू नको, काहीतरी दुखतंय तुझे!"
तिला पुन्हा खूप हसायला आलं.
" तू हसू नको तुला दुखतंय मी सांगतो तरी तू पुन्हा हसतेय! तुझ्यासाठीच सांगतोय हसू नकोस."
तिने एक क्षण शांतपणे बघितले आणि पुन्हा जोरजोरात हसायला लागली. 
" ए बाई,तुला सांगतोय हसू नकोस तर तुझे काय चाललंय! परत काही झालं तर परत माझ्यावरती येईल. धडकली माझ्यामुळे, पाणी पिलं ते माझ्यामुळे आता परत काही झालं तर तेही माझ्यावर येईल."
शेवटी तिने कंट्रोल केलं आणि " गप रे" म्हणाली.
तो शांत बसला,त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर तिला परत हसू आलं , त्याने अळीमिळी गुपचिळी असे बोट केलं.
ते पाहुन 2 मिनिटे ती शांत बसली आणि नंतर काही बोलायला गेली तर ह्याने परत शशशश...असे केले.
तिने डोक्याला हात लावला आणि जोरात म्हणाली, 
" ए मला मस्त चहा हवा इथे मिळेल का?"
"अण्णाचा का?"
"अण्णा चा इथे कुठे मिळेल?"
" नाही मी विचारलं, तुला अण्णा चा चहा वडापाव आवडतो ना  म्हणून!" 
"इथला मिळालं तरी चालेल!"
"ठीक,  आणतो मी! थोडा वेळ एकटी बसशील?"
"हो बसते ना!"
सिस्टर ला लक्ष ठेवायला सांगून तो चहा आणायला गेला तेवढ्यात खालती कॉलेज मधल्या तिच्या दोन मैत्रिणी भेटल्या... त्यांनी त्याला विचारलं "ठीक आहे का आता?" 
"हो, रुम नंबर 203 आहे..."
जश्या त्या वर गेल्या तसा हा एक च्या जागेवर 4 चहा पार्सल करून वरती आला. त्या दोघीजणी तिच्याशी बोलत होत्याच. 
तो वरती आल्यावर त्याने सगळ्यांना चहा दिला.
मैत्रिणी म्हणाल्या" बर झालं तू थांबलास इथे!"
"त्यात काय बरं झालं?"
"अस नाही कोणीतरी लागत ना धावपळ करायला!काका काकूंना  पण काही गोष्टी साठी धावपळ करायला लागत आहे पण तू थांबला हे चांगलं केलं."
तो फक्त हसला, " ज्याच्यामुळे त्रास झाला त्याने थांबायलाच पाहिजे ना!" तो हळूच पुटपुटला.
त्यांनी विचारलं "अं काय?"
हा काहीच बोलला नाही.  देविकाने हळूच डोळे वटारून त्याच्याकडे पाहिलं. 
तो म्हणाला " काही नाही, काही नाही! तिला त्रास होत असेल असं मी म्हणतोय."
त्या दोघी तिच्याशी बोलत असताना अधून मधून तीचे लक्ष त्याच्याकडे जात होतं तो तिथल्या पडद्याशी हात लावून खेळत बसलेला. 
जस  त्याचे तिकडे लक्ष जायचं तास देविका मोठे डोळे करून बघायची, हा परत दुसरीकडे बघायचा असा यांचा खेळ सुरू होता आणि या सगळ्यामुळे देविका ला खूप हसायला येत होतं. 
तीचे हसणं मैत्रिणींना कळत नव्हतं की ती मधेच का हसतेय आणि याला कळत होत की ती आपल्यामुळे हसतेय पण आपल्या हसण्यामुळे जर तिला बरं वाटत असेल तर याने थोडं वेड्यासारखं वागायचं ठरवलं. 
तो तसाच पडद्याशी खेळत बसला.....

तेवढयात देविकाचे बाबा आले आणि त्यांच्यासोबत त्यांचा एक मित्र होता जो डॉक्टर होता.
"So my sweet girl how are you doing?" 
"छान आहे अंकल!" 
"काय होतंय काय?"
"काही नाही मस्त हसायला येतंय आता!" तिने हळूच विवेक कडे पाहून घेतले...
"Oh well done! Very good, very good!"

त्यांनी औषध बघितली तिथल्या सिस्टर बरोबर बोलले आणि म्हणाले" काही काळजी चे कारण नाही. 
दोन दिवस ऍडमिट राहू देत जरा काही फरक पडत नाही छानपैकी, नंतर बघू आपण."असे म्हणून ते निघाले आणि बाबा त्यांना सोडायला गेले.
निरोप घेऊन त्या दोघी मैत्रिणी पण निघाल्या तर हा दरवाज्या पाशी पोहोचला.
तिने हळूच विचारले " तू पण चाललास?"
"नाही मी आहे ना इथे, कुठे नाही जात आहे."
"मला वाटलं तू पण चालला आहेस!"
"नाही कोणीतरी आल्याशिवाय मी कसा जाईल."
"अरे वा मग अस कर कोणालाचं नका येऊ  म्हणावं....असे सांग... मी थांबतो इथे!"
"अरे वा वा, तिथे माझी आई माझी काळजी करेल त्याचे काय?" 
"अरे हो खरच की! किती वाजले रे आता?"
"रात्रीचे सव्वा आठ होत आहेत. तुझा जेवणाचा डबा येईल...तो आला  की मी जाईल."
तिने फक्त हो म्हंटल, तेवढ्यात बाबा आत आलेच ते तिच्याशी बोलत होते हा बाजुला उभा होताच. 
त्यांच लक्षात आलं ते म्हणाले" अरे तू किती वेळ थांबला आहेस, सकाळपासून तूच आहेस. मी आहे आता काही काळजी करू नकोस तू जा."
त्याने फक्त मान डोलावली, तिच्याकडे पाहिलं ती काहीच बोलली नाही.
तो म्हणाला " काकू डबा आणेस्तोवर मी थांबू का?"
"नको रे तू जा मी आहे इथे! तुझी पण घरी वाट पाहत असतील" तिचे वडील म्हणाले.
तेवढ्यात नाईट डॉक्टरांची राऊंड झाली...बाबा त्यांच्याशी बोलत असताना हिने हळूच विवेक ला म्हणले, "माझा नंबर आहे का तुझ्याकडे?"
"अं... हो आहे ना..."
"रात्री चॅट करणार का..?"
"तू झोपणार नाहीस का...?"
"तू चॅट करणार का नाहीस हे सांग...!"
"ओके...किती वाजता?"
"घरी जाऊन जेवण करून मला पिंग कर..."
"तू माझ्यासाठी जागी राहणार का...?"
"नाही...पण तू कर पिंग नक्की..."
तो ठीक आहे म्हणून, बाबांना सांगून हॉस्पिटलबाहेर पडला....
बाहेर पडल्यावर त्याने गाडी काढली आणि घराकडे निघाला... आणि नेमके हॉस्पिटल च्या पुढच्या वळणावर त्याची गाडी ऑइल वरून स्कीड झाली....
त्याला हाता पायाला खरचटले...शर्ट पण फाटला....
आता घरी आईला काय सांगायचे हा विचार करीत तो तसाच गाडी चालवायला लागला...
घरी पार्किंग ला गाडी लावत असताना नेमका side स्टँड पायाला लागला...
आता त्याने खरंच डोक्याला हात लावला.....
एकाच दिवसात एवढे काही घडू शकते... हा विचार करत आजची तारीख लक्षात ठेवली पाहिजे असे म्हणत स्वतःशीच हसला.....!

©®क्रमशः
अमित मेढेकर

🎭 Series Post

View all