अंतरीच्या वेदना (भाग/४)

This story is related to the life of women

भाग /४/

 (पूर्वसुत्र-)

     असे म्हणतात, काळ प्रत्येक गोष्टीवर औषधीच काम करते. 

    आमचाही एक एक दिवस पुढे सरकत होता. मोठ्या बहिणीच्या दुःखातून बऱ्यापैकी सावरलो होतो. म्हणता म्हणता तीन चार वर्षं कशी निघून गेली कळलेच नाही. मी आठवीत शिकत होते. बहीण नववीत गेली. पण, त्याचवेळी माझ्या बाबांनी आमच्या लग्नाचा घाट घातला. म्हणे चांगली स्थळं आणली आहेत. 

पुढे पाहू या त्यांचे लग्न आणि संघर्ष....

     बाबांनी आमच्या लग्नाचा घाट घातला. आजुबाजूच्या गावातील अनेक पाहुणे मंडळींना निरोप दिले गेले. आम्हांला हे मान्य नव्हतं. पण, आमची परवानगी तर दूरच... साधं आईला सुध्दा विचारावं वाटलं नाही त्यांना.

    (लताला अचानक हुंदका फुटला. तोंडातून शब्द फुटत नव्हते. 

     आजीच्या कुशीत शिरून खूप रडून घेतलं. 

  आवंढा गिळून ती परत बोलू लागली. )

     जेमतेम तेरा चौदा वर्षांच्या आम्ही. नकळत्या वयात आम्ही लग्नाच्या बोहल्यावर चढणार. हे ऐकूनच धस्स झालं. "लग्न म्हणजे काय? " याचा अर्थही नीट माहित नव्हता. पण, "लग्नानंतर एका स्त्रीवर अत्याचार होतात. हे मात्र चांगल्या पध्दतीने कळत होते. आधीच आईचे होत असलेले हाल आणि आमची होणारी पिळवणूक आता अधिकच वाढली होती. आमच्या बापाने आणि आजीने आमच्या साठी दुप्पट तिप्पट वयाचा जोडीदार शोधला. दोघी बहीणींना एकदम उजवले तर डोक्याची कटकट कमी होईल. हाच त्यांचा उद्देश. शिवाय खायचे दोन घास कमी होतील. पण, या गोष्टींमुळे आईच्या पोटात मात्र मोठा गोळा उठला. एवढ्या लहान वयात लग्न लावून दिले तर त्यांना भविष्यात खूप त्रास होऊ शकतो. हे आईने डोकं फोडून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, "दगडाचे काळीज असलेल्या माझ्या बापाला आणि आजीला काहीच फरक पडला नाही. कारण, आमच्या लग्नाच्या बदल्यात त्याला भरपूर पैसा मिळणार होता. त्याची अय्याशी पूर्ण करण्यासाठी हा पैसा उपयोगी पडणार होता. जसे की आम्ही एखादी वस्तू आहे."

     मी आणि ताई आईच्या कुशीत शिरून खूप रडलो. पण, हतबल झालेल्या माझ्या आईला एवढे निश्चल झालेले कधीच बघीतले नव्हते. असमर्थपणे तिने या गोष्टीला होकार दिला. चुलीवरच्या निखाऱ्यावर पाणी टाकून निववावे आणि थंड करावे. तसे आमचे आयुष्य झाले होते. मला आणि माझ्या बहिणीला बघायला पाहुणे आले. बहिणीसाठी तर एक वयस्कर व्यक्ती आला. त्याला बघताच ती घराच्या बाहेर पळून गेली. तिला वाटले सुटलो आपण. पण, बापाने मारत मारत घरात आणले. त्याच्या गळ्यात बांधण्यासाठी सज्ज झाली. 

      माझ्यासाठी देखील असेच स्थळ आले. मी तर बाबांच्या भितीने काहीच बोलण्याच्या मन: स्थितीत नव्हतीच. आईच्या पदराआड लपून बसली होती. अंगाचा थरकाप उडाला होता. मनातले शब्द ओठांवर येतच नव्हते. तो राकट चेहरा, त्याच्या आईचे ते मोठाले डोळे, मळवट भरलेलं कपाळ, त्याची ती सतत पानं खाणारी सोबत असलेली बहिण..... सोबत दोन तीन लेकरं होती. सगळेच कसे विचित्र वाटत होते. त्या लोकांना बघून किळस येत होती. त्यांचे ते हसणे, माझ्याकडे एकटक बघणे मला 'आपला नवरा असा आहे.' हे बघूनच माझी तर जीवाची घालमेल सुरू झाली. पण, ती कोणालाच कळत नव्हती. सोबत होती ती फक्त आई. आईने परत एकदा समजवायचा प्रयत्न केला. पण, आजीच्याही तोंडाचा पट्टा जोरात सुरू झाला. "

     "आई..."

   मला हे लग्न मान्य नाही गं. मला नाही करायचं हे लग्न." असं संपूर्ण ताकदीनिशी बोलले. तर त्या क्षणी माझ्या क्रुर बापाने एक लाथ माझ्या कंबरड्यात घातली. माझ्या शरीरावर होणारे हे घाव त्रासदायक होते. वेदनेने विव्हळत आणि तळमळत होती. 

      "मला नाही लग्न करायचे?" असे कितीतरी वेळा ओरडून ओरडून सांगितले. तरीही फरक पडला नाही. दोन दिवस पडून होती. पण, बापाच्या काळजाला झरे फुटले नाही. बापाच्या डोळ्यासमोर तर आम्ही मुली नकोच होतो. एकाच मांडवात दोघींना उभे केले गेले. आमचे शिक्षण सुटले आणि संसाराचा गाडा ओढण्यासाठी आम्ही सज्ज झालो. भातुकलीचा डाव संपून आता खऱ्या संसाराचा डाव मांडण्यासाठी आमच्या मनाची तयारी झाली.  

       असे वाटले होते की, बापाच्या जाचातून मुक्त झालो. आता तरी नवीन आयुष्य सुरू होईल. आनंद आणि समाधान मिळेल; तर कसले काय ? 

      म्हणतात ना... इकडे आड तिकडे विहीर !

    आमच्या दळभद्री नशीबाची रेषा आणखीनच घट्ट झाली. लग्नं झालं आणि उरली सुरली आशा मावळली. बहीण तिच्या सासरी गेली आणि मी माझ्या सासरी. आम्ही एकमेकींसाठी परके झालो होतो. 

      वाटले होते सासर म्हणजे एक आधारस्तंभ; एक हक्काचं घर.... कोणत्याही स्त्रीने पाहावे असे एक सुखद स्वप्न मी सुध्दा पाहीले. आता दोन घास तरी सुखाचे मिळतील. पण, झाले उलटेच. माझ्या पदरात सासू सासरे, नवरा, नणंदा, त्यांची पोर... मोठा लवाजमा... आणि खाणारी दहा बारा तोंड. मी घरात आली तेव्हा ना स्वागत, ना कौतुक. बरी मोलकरीण आली कामाला.... असे सगळ्यांना वाटत होते. 

     मी घरात आल्यापासून तर सगळ्यांनी कामे करणे सोडून दिले. मौज, मजा, मस्ती, गप्पा मारणे असा त्यांचा दिवस उजाडायचा आणि मावळायचा. मी मात्र रांधा, वाढा आणि उष्टी काढा.... अशा प्रकारे माझा दिवस निघून जात होता. माझ्या चिमुकल्या हातातली पाटी पेन्सिल कुठेतरी हरवली. त्याऐवजी धुणीभांडी आली. माझ्या इच्छा आकांक्षाचे गाठोडे मी वर माळ्यावर टाकून ठेवले. परत ते कधीही सापडणार नाही अशा ठिकाणी. कुठल्याही नात्यांचा गंध नसलेली मी अनेक नात्यांचा गोतावळ्यात येऊन पडली.‌  शिवाय एवढ्या लहान वयात कामे नीट जमत नव्हती. त्यामुळे सासू सासरे, जावा, नणंदा, नवरा सगळे मार मार मारायचे. बोलून बोलून खूप दुखवायचे. आमचे घरही जुन्या पध्दतीचे असल्याने शेणाने जमीन सारवणे, भिंती लिंपणे..... त्यातल्या त्यात चुलीवरचा स्वयंपाक, चुलीतल्या राखेने भांडे घासणे, बोअरचे, कधी कधी विहीरीचे पाणी आणणे.... अशी अनेक शारिरीक कष्टांची कामे माझ्याकडून करून घेतली जात होती. उरलेला वेळ मला शेतावर पाठवण्यात यायचे. दुपारची झोप, थोडा आराम माझ्या नशीबी नव्हताच. अंग मेहनतीने इतकी कामे इतकी होत होती की, शरीरात कोणताही त्राण उरत नव्हता. शरीर आणि मन या दोनहींचा मेळ साधणे शक्य नव्हतेच. मग अनेक चुकांची पुनरावृत्ती व्हायची. मात्र माझ्या विषयी ना कोणाला प्रेम, ना दया माया....खायला शिळेपाके अन्न. शिवाय रात्र झाल्यावर नवरा होताच शरीर ओरबाडून काढायला. दिवसभर आसूसलेला माझा वयस्कर नवरा जणू माझ्यावर विस्तवाची आग ओकत असायचा. वयाने मोठा असूनही समजूतदारपणा नव्हताच. माझं कोवळं शरीर आणि कोवळ्या मनावर असंख्य आघात होत होते. पण, कोणालाच त्याची किंमत नव्हती. मी या दुष्ट संसारात एका सुपारी प्रमाणे भरडली जात होती. 

      एक स्त्री एवढी हतबल, दुर्बल असू शकते. नव्हे तर तिला तसे बनवले जाते. तिच्या आवाजाला दाबले जाते. तिच्या भावभावनांचे कुंचले तिच्या आयुष्याच्या कागदावर न उमटता हृदयावर ओरखडे देतात. 

       आजी, "मी जे भोगलं आहे ना . ते कोणत्याही स्त्रीच्या वाट्याला येऊ नये गं..."

      दुःखाची थोडीशी मरगळ ओकावी म्हटलं तर हक्काचं असं कोणीच नव्हतं. माहेरी जाऊन आईच्या कुशीत शिरावं तर माहेरी जाण्यासाठी परवानगीच नव्हती."

  लताचे अश्रु पुसत आजी म्हणाली,

         "अगं बाळा, बसं कर आता. तू आता जास्त बोलू नकोस... शांत हो.... चल आता घरात. बाकीचं बोलू नंतर. बरीच रात्र झाली आहे. आपण निजायला हवं आता." 

 लता आणि आजी घरात गेल्या. 

     लताने आजीच्या मांडीवर डोके टेकवले. आजीचा तो मायेचा स्पर्श तिला आईच्या कुशीत झोपल्याचे जाणवत होता. आजी मायेने लताच्या डोक्यावरून हात फिरवत तिला जोजवीत होती. 

       तिने एक कटाक्ष बबलू कडे टाकला. मोहमयी दुनियेचा कसलाही गंध नसलेला.... चांगल्या वाईट परिणामांची कसलीही जाणीव नसलेला.... तिचा बबलू शांतपणे निजला होता. त्याला ना उद्याची चिंता, ना उज्ज्वल भविष्याची. त्याचं जग म्हणजे फक्त त्याची आई.....किती स्वच्छ मन आहे. कसलेही पाप नाही. कोणी कितीही चिडवले तरी चिडणार नाही. 

    आजी एवढे वय वाढत गेले. पण, त्यांचे बालपण मात्र अजूनही सरले नाही. आज बबलू पंचवीस वर्षांचा झाला. पण, त्याच्या या अवस्थेला कुठेतरी मीच जबाबदार आहे असे वाटते. मनातल्या भावनांना अलगद शिंपल्यात बंद करावे आणि मोती होऊन कोणाच्यातरी हाती पडावे. असे तिचे झाले होते. 

       रात्रभर आजी तिच्या कडेच झोपली. कारण, लताच्या सैरभैर झालेल्या मनाला वेसण घालण्यासाठी तिच्याजवळ राहणे आवश्यक होते. हळूहळू रात्रीचे बारा वाजत आले होते. लताने घट्ट डोळे मिटुन घेतले. तरीही कितीतरी वेळ या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती. 

     दिवसभराच्या कामाचा ताण कमी करणारी काळी रात्र किती छान वाटत असली तरीही तिच्या साठी ती क्लेशदायक ठरत होती. केव्हातरी तिला झोप लागली. सकाळी जाग आली ती घराबाहेर चाललेल्या भांडणाने.

क्रमशः

©®सौ.आश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all