अंतरीच्या यातना भाग ६

Anuj Going To Gurukul For Further Study
अंतरीच्या यातना भाग ६

मागील भागाचा सारांश: अनुज सारिकाला घरातील कामांमध्ये मदत करु लागला होता. सारिकाची बहीण प्रिया अचानक एके दिवशी त्यांना भेटायला आली होती.

आता बघूया पुढे….

प्रिया अनुज व सारिकाची परिस्थिती बघून गेल्यावर ती या विषयावर तिच्या नवऱ्यासोबत म्हणजेच मनोजसोबत बोलली. प्रिया सारिकापेक्षा अनुजची जास्त काळजी लागून राहिली होती. अनुजचे भविष्य चांगले घडावे, अशी तिची इच्छा होती. प्रियाची काळजी मनोजला समजली होती, म्हणूनच मनोजने त्यावर सोल्युशन काढण्याचे ठरवले.

प्रिया व मनोज एका आठवड्याने सारिकाच्या घरी गेले. रविवार असल्याने सारिका त्यादिवशी घरीच होती. प्रिया व मनोजला आपल्या घरी आलेलं बघून सारिकाला आश्चर्य वाटलं. अनुजला मात्र आपल्या मावशी काकांना घरी आलेलं बघून खूप आनंद झाला होता.

"अनुज अभ्यास कसा सुरु आहे?" मनोजने विचारले.

"मस्त." अनुजने उत्तर दिले.

मनोजने अनुजला खाऊ आणि कपडे दिले. नवीन ड्रेस बघून अनुजला खूप आनंद झाला. मनोज म्हणाला,
"अनुज तुझ्या मित्राला ड्रेस दाखवून ये." 

अनुज रोहनला ड्रेस दाखवण्यासाठी निघून गेला. अनुज गेल्यावर सारिका म्हणाली,
"प्रिया, मनोजराव तुम्हाला राग येणार नसेल, तर स्पष्टचं सांगते. तुम्ही अनुजला भेटायला नेहमी येत जा, पण त्याला महागड्या कपड्यांची सवय लावू नका. अनुजला महागडे कपडे घेऊन देण्याची माझी आर्थिक परिस्थिती नाहीये."

प्रिया म्हणाली,
"सारिका तू चुकीच्या अर्थाने घेऊ नकोस. अनुज माझा कोणीतरी लागतोच ना, म्हणून मी त्याच्यासाठी कपडे आणले होते."

मनोज पुढे म्हणाला,
"तुमच्या बोलण्याचा मला राग आला नाहीये. सारिकाताई पण आपल्याला अनुजच्या भवितव्याचा विचार करावा लागणार आहे. तुमचा स्वाभिमान मला अजिबात दुखवायचा नाहीये. अनुज जर ह्या एरियात आणि ज्या शाळेत तो सध्या आहे, त्याच ठिकाणी जर राहिला, तर त्याचे भवितव्य मला अंधारात वाटते आहे. कितीही नाही म्हटलं तरी आजूबाजूच्या परिस्थितीचा प्रभाव त्याच्यावर पडेल. अनुज शहाणा मुलगा आहे, पण अजून तो खूप लहान आहे."

"मनोजराव मला तुमच्या बोलण्याचा हेतू कळतोय. मलाही ह्या एरियात किंवा त्या शाळेत अनुजला राहू देण्याची अजिबात इच्छा नाहीये, पण मी या पलीकडे काहीच करु शकत नाहीये. माझं शिक्षण झालं नसल्याने मला चांगली नोकरी मिळू शकणार नाही. परिणामी आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही. आजरोजी मी कसं सगळं भागवते, हे मलाच माहीत आहे. इच्छा असून सुद्धा मी यातून बाहेर पडू शकत नाहीये." सारिकाने सांगितले.

मनोज म्हणाला,
"माझ्याकडे त्याचसाठी एक आयडिया आहे. माझ्या माहितीत एक गुरुकुल आहे, तिथे कमी फी मध्ये उत्तम शिक्षण मिळते. अनुजला तिथे राहून शिक्षण घेता येईल. अनुजवर संस्कार सुद्धा चांगले होतील. गुरुकुलचे विश्वस्त माझ्या ओळखीचे आहेत, तर ते अनुजला स्कॉलरशिपही मिळवून देतील. आता सुरुवातीची जी काही फी असेल ती मी भरतो. तुमच्याकडे जेव्हा कधी पैसे येतील, तेव्हा मला परत करा."

"अनुज खूप लहान आहे. ह्या वयात त्याला इतक्या लांब ठेवायचं म्हणजे मला तरी पटत नाहीये." बोलताना सारिकाच्या डोळयात पाणी आले.

यावर प्रिया म्हणाली,
"सारिका मनावर दगड ठेऊन तुला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. हा निर्णय आपण अनुजच्या चांगल्यासाठीच घ्यावा लागणार आहे. अनुज गुरुकुलमध्ये गेल्यावर तू आमच्याकडे चल. हवंतर शेजारी फ्लॅट घेऊन रहा. टायपिंगचा किंवा एखादा कम्प्युटरचा कोर्स कर. तू बाहेरुन ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण करु शकतेस. अनुज तुझ्यापासून लांब राहिल्यावर तुला सगळं काही करता येईल. असं किती दिवस स्वयंपाकाचं काम करत राहणार आहेस. मला तरी वाटतं की, हाच निर्णय तुमच्या दोघांसाठी योग्य ठरेल."

प्रिया व मनोजने सारिकाला अनुजला गुरुकुलला पाठवण्यासाठी तयार केले. बराच वेळ विचार केल्यावर सारिकाला मनोज व प्रियाचे बोलणे पटले. दुसऱ्या आठवड्यात मनोज व प्रिया अनुज आणि सारिकाला गुरुकुल दाखवायला घेऊन गेले. अनुजला गुरुकुल खूप आवडल्याने तो तिथे शाळेत जाण्यासाठी तयार झाला. आईपासून दूर रहावे लागणार या कल्पनेने तो खूप रडला. प्रियाने त्याला समजावून सांगितल्यावर तो शांत झाला.

गुरुकुलमध्ये जाण्याच्या आधी तो सारिकाला म्हणाला,
"आई मी आता इथून पुढे रडणार नाही. मी गुरुकुलमध्ये मन लावून शिकेल. मला शिकून मोठं व्हायचं आहे. मला तुला सुखात ठेवायचं आहे. आई आता स्वयंपाकाचं काम करु नकोस. प्रिया मावशीने मला प्रॉमिस केलं आहे की, ती तुझ्यासाठी नवीन नोकरी शोधणार आहे. तू तुझी काळजी घे."

अनुजचं बोलणं ऐकून सारिकाचे डोळे भरुन आले होते. अनुजला लागणाऱ्या सर्व सामानाची खरेदी प्रिया व मनोजने करुन दिली होती. मनोज व प्रिया अनुजला गुरुकुलला पोहचवण्यासाठी गेले होते.

अनुजच्या आयुष्यात इथून पुढे काय होईल? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all