Feb 25, 2024
पुरुषवादी

अंतरीच्या यातना भाग २

Read Later
अंतरीच्या यातना भाग २

अंतरीच्या यातना भाग २


मागील भागाचा सारांश: अनुजला शाळेत तीन स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळाली होती. अनुजला बक्षिसे बाबांना दाखवून नवीन सायकल घ्यायची होती. अनुज घरी गेल्यावर मात्र वेगळंच काहीतरी वाढून ठेवलं होतं. नियतीच्या पुढे कोणालाही जाता येत नाही तेच खरे. अनुजचे बाबा देवाघरी गेले होते. अनुजला वाटलं की, बाबा काही दिवसांसाठीचं गेले असतील म्हणून.


आता बघूया पुढे…


दुसऱ्या दिवशी अनुजचा मामा त्याला स्मशानभूमीत राख सावडण्यासाठी घेऊन गेला. अनुज विचार करत आजूबाजूला बघत एका ठिकाणी बसला होता. 


"काय रे अनुज, इतका कसला विचार करतो आहेस?" त्याच्या मामाने विचारले.


अनुज म्हणाला,

"मामा मी काही विचारले तर चालेल ना?" 


"हो विचार ना." मामाने सांगितले.


अनुज पुढे म्हणाला,

"मामा काल आपण बाबांना इथे जाळलं. आज आपण त्यांची झालेली राख नदीत सोडण्यासाठी घेऊन जात आहे. बाबा देवाघरी गेले कसे असतील? आजोबा देवाघरी गेले तेव्हा बाबांनी मला सांगितले होते की, आजोबांना घेऊन जाण्यासाठी विमान आले होते. बाबांना देवाघरी घेऊन जाण्यासाठी विमान तर आलेच नव्हते, मग बाबा कसे गेले असतील? आणि बाबांना देवाघरी जाण्याचा रस्ता कसा काय माहीत असेल? बाबांनी गुगलवर सर्च केलं असेल का?"


"अनुज काल रात्री तू जेव्हा झोपला होतास ना, तेव्हा विमान येऊन बाबांना घेऊन गेले. मी विमानाचा आवाज ऐकला होता. विमान देवाने पाठवले असल्याने रस्ता त्या पायलटला माहीतच असेल." मामाने उत्तर दिले.


अनुजला मामाचे उत्तर पटल्याने मामाला बरे वाटले. अनुज सर्वांसोबत घरी गेला. जवळपासचे नातेवाईक सोडून बाकीचे आपापल्या घरी निघून गेले होते. अनुज लांबून आईचे निरीक्षण करत होता. आई अनुजकडे बघून म्हणाली,

"अनुज इकडे ये बाळा. तू माझ्याकडे असा का बघतो आहेस?"


अनुज आईजवळ जाऊन म्हणाला,

" आई तुझ्या बांगड्या कुठे आहेत? तू टिकली का लावली नाहीस? आणि तू गळ्यात जे घालतेस, ते का घातले नाही? आई तू आज अजिबात चांगली दिसत नाहीये."


आई भरलेल्या आवाजात म्हणाली,

"अनुज बाळा तू अजून लहान आहेस. तुला सगळ्याचं गोष्टींचा अर्थ आत्ता कळणार नाही."


"आई तू म्हणते मी लहान आहे. काही वेळापूर्वी मामा म्हणत होता की, अनुज तू आता मोठा झाला आहेस, आईला त्रास द्यायचा नाही. शहाण्या मुलासारखे वागायचे." अनुजने सांगितले.


अनुजच्या आईने त्याच्या प्रिया मावशीला खुणावल्यावर ती अनुजला घेऊन गेली. दहा दिवसांत अनुज वेगवेगळे प्रश्न विचारुन सगळ्यांना निरुत्तर करत होता. अनुजला शाळेत जायचे होते, पण त्याला कोणीच शाळेत जाऊ देत नव्हते.


अनुजच्या बालमनाला बरेच प्रश्न पडले होते की, दशक्रिया विधीच्या वेळी टक्कल का करायची? आई स्वयंपाक का करत नाहीये किंवा आई घरातील कामे का करत नाही? मित्रांसोबत खेळायला जायचे का नाही? 


अनुजच्या बाबांचा दशक्रिया विधी झाल्यावर त्याचे मामा, काका, मावशी आणि सगळेजण सोबत चर्चा करत बसले होते. अनुजचे बाबा सरकारी खात्यात क्लार्क म्हणून नोकरीला होते. अनुजच्या बाबांचा अपघाती मृत्यू झाला होता. अनुजचे बाबा गेल्यावर त्याच्या आईला थोडीफार पेन्शन मिळणार होती. अनुजच्या काकांनी कागदपत्रांची पूर्तता केली होती. अनुजचे आई बाबा नोकरीच्या निमित्ताने या गावात रहायला आले होते. 


अनुजच्या काकांनी स्पष्टपणे सांगून टाकले की,

"आमचा भाऊ होता तोपर्यंत आमचा ह्यांच्याशी संबंध होता. आता आमचा ह्यांच्यासोबत कुठलाही संबंध राहणार नाही. आम्ही अनुज व त्याच्या आईची जबाबदारी घेऊ शकणार नाही."


अनुजचा मामा अनुज व त्याच्या आईला आपल्या सोबत घेऊन जायला तयार झाला. अनुजच्या मामाने आपले हे कर्तव्यचं आहे, असे सांगितले. अनुजच्या मामीला अनुज व त्याच्या आईला आपल्या घरी घेऊन जाण्याची अजिबात इच्छा नव्हती.  


तेराव्याचा विधी झाल्यावर अनुजचा मामा अनुज व त्याच्या आईला आपल्यासोबत घेऊन जाणार होता. आदल्या दिवशी अनुजचा मामा अनुजच्या शाळेत होऊन त्याचा दाखला घेऊन आला. अनुजला त्याची शाळा व गाव सोडून जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण अनुजचे कोणीच ऐकले नाही.


आपल्या घराशेजारी राहत असलेल्या मित्राला जाताना अनुज म्हणाला,

"मी आणि आई मामाकडे शहरात रहायला जात आहे. माझे बाबा देवाघरुन परत आले की, त्यांना आम्ही कुठे गेलो आहोत, हे सांग. नाहीतर बाबा आईला व मला शोधत बसतील."


घरातून निघताना अनुज व आई या दोघांचे डोळे भरुन आले होते.


अनुजच्या आयुष्यात पुढे काय होईल? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//