अंतरीच्या यातना भाग ७

Anuj In Tension

अंतरीच्या यातना भाग ७


मागील भागाचा सारांश: प्रिया व मनोजने अनुजला गुरुकुलमध्ये पाठवण्याबद्दल सारिकाला सुचवले. सारिकाला त्या दोघांचे म्हणणे पटल्यावर अनुजच्या भवितव्यासाठी ती अनुजला गुरुकुलमध्ये पाठवण्यास तयार झाली.


आता बघूया पुढे…..


प्रिया व मनोजच्या मार्गदर्शनामुळे सारिकाला काही दिवसांनी एका मसाल्याच्या कंपनीत सुपरवायझरची नोकरी मिळाली होती. सारिका प्रियाच्या शेजारील फ्लॅटमध्ये राहत होती. अनुज गुरुकुलमध्ये चांगलाचं रमला होता. सारिका, प्रिया व मनोज अधूनमधून अनुजला भेटायला जायचे.


वर्षामागून वर्षे जात होती. सारिकाची आर्थिक परिस्थिती सुधारली होती. सारिकाने स्वतः एक फ्लॅट विकत घेतला होता. अनुजचे शिक्षण पण व्यवस्थित सुरु होते. प्रिया व मनोजचा आधार असल्याने सारिकाचे आयुष्य सुखकर झाले होते. श्रीकांत सारिकाला अधूनमधून भेटण्यासाठी येत होता. सारिका आता पहिल्यापेक्षा खूप बदलली होती. सारिका आता मॉडर्न झाली होती. तिला पुण्यात बऱ्याच मैत्रिणी मिळाल्या होत्या. सारिका मैत्रिणींसोबत बाहेरगावी फिरायला जाऊ लागली होती. सारिकाचे आयुष्य मजेशीर चालले होते.


अनुज सुट्टीत घरी यायचा. आपण आपल्या हक्काच्या घरात राहू शकतो, ही कल्पनाचं त्याच्यासाठी खूप होती. अनुज सुट्टीत सुद्धा काहीना काही अभ्यास करत होता. आपल्याला शिकून खूप मोठे व्हायचे, हे एकमेव ध्येय त्याच्यासमोर होते.


बोलता बोलता अनुजने दहावीची परीक्षा दिली होती. अनुजला आता पुढील शिक्षणासाठी गुरुकुलमध्ये रहावे लागणार नव्हते. पुढील शिक्षण पुण्यातचं घ्यायचे असे अनुजने ठरवले होते. अनुज आता कायमस्वरूपी आपल्यासोबत राहू शकेल, या विचाराने सारिका आनंदून गेली होती.


अनुज घरी आल्यावर सारिका दररोज त्याच्यासाठी वेगळं काहीतरी खायला करायची. सारिका दिवसभर घरी नसताना अनुज ऑनलाईन व्हिडिओ बघून स्वयंपाक करण्याचे शिकला होता. अनुजने सारिकाच्या आवडता गाजराचा हलवा बनवून तिला सरप्राईज दिले होते.


"अनुज तू माझ्यासाठी गाजराचा हलवा करायला शिकलास. अनुज पण मी तुझी लहानपणीची इच्छा अजून पूर्ण करु शकले नाही." सारिका अनुजच्या डोक्यात हात फिरवत म्हणाली.


"आई कोणती इच्छा?" अनुजने विचारले.


सारिका म्हणाली,

"अनुज तुला तुझे बाबा सायकल घेऊन देणार होते ना. आपण उद्याचं सायकल घ्यायला जाऊयात. तुला सायकल घेऊन दिल्यावर माझ्या मनावरील ओझे हलके होईल."


यावर अनुज म्हणाला,

"आई मला सायकल नकोय. मी लहान असताना मला सायकल घेण्याची इच्छा होती, पण आता नाहीये. आई सायकल घेतल्यावर मला बाबांची आठवण येत राहील. तू मनावर ओझं ठेऊ नकोस. आई तू तुझ्या परीने माझ्यासाठी खूप काही केले आहे. तुला इथवर पोहोचण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागेल असतील, याची मला कल्पना आहे. तू माझी आई असल्याचा मला खूप अभिमान वाटत आहे."


"बरं, तुला सायकल नको असेल, तर मग काय पाहिजे? तुझा रिझल्ट लागल्यावर मला तुला काहीतरी घेऊन द्यायचेच आहे." सारिकाने सांगितले.


अनुज म्हणाला,

"आई त्यावेळेस मी सांगेल. रिझल्टला अजून तीन ते चार दिवस वेळ आहे."


"पुढील दोन तीन दिवस मी कामाच्या निमित्ताने बाहेर जाणार आहे. नाशिकला आमच्या कंपनीचे नवीन ऑफिस सुरु झाले आहे, तिथे थोडं काम आहे. तुझ्या रिझल्ट पर्यंत मी येईल." सारिकाने सांगितले.


"चालेल आई. तू तुझं काम करुन ये. मी तुझी वाट पाहिल." अनुज म्हणाला.


सारिका दुसऱ्या दिवशी नाशिकला गेली. अनुज प्रियाकडे रहायला गेला. तीन दिवसांनी अनुजचा रिझल्ट लागला. अनुज गुरुकुलमध्ये पहिला आला होता. अनुजने त्याचा रिझल्ट कळवण्यासाठी सारिकाला फोन लावला, पण तिचा नॉट रिचेबल येत होता. सारिका नाशिकवरुन पुण्याला यायला निघाली होती. नाशिकवरुन निघण्याच्या वेळी सारिकाने अनुजला फोन केला होता. फोनवर बोलणं झाल्यावर अडीच तासाने रिझल्ट लागला होता. सारिकाचा फोन बराच वेळ लागत नसल्याने अनुजला टेन्शन आले होते.


"अनुज सारिका एखाद्या घाटात असेल, घाटात रेंज नसते, म्हणून तिचा फोन लागत नसेल. तुझ्या काकांनी पेढे आणले आहेत, ते खाऊन तोंड गोड कर. रात्री सारिका आली की, आपण हॉटेलला जेवायला जाऊयात आणि रिझल्टचे मस्त सेलिब्रेशन करुयात." प्रियाने सांगितले.


अनुज म्हणाला,

"मावशी मी किती वेळेपासून आईचा फोन लावत आहे, पण लागतचं नाहीये. मनात वेगवेगळ्या शंका येत आहे. मन चिंती ते वैरी न चिंती अशी काहीशी अवस्था माझी झाली आहे. मी आईला मॅसेज केला आहे, पण त्याला सुद्धा तिने रिप्लाय दिला नाहीये. आई सुखरुप तर असेल ना?" 


"हो रे बाबा, तुझ्या आईला काहीच होणार नाही. तुझी आई वाघीण आहे. आयुष्यातील एवढ्या कठीण काळाला ती सामोरी गेलेली आहे. नाशिक पुणे प्रवास ती काय पहिल्यांदा करत नाहीये. रेंजमध्ये आल्यावर ती स्वतः फोन करेल. तू मनात काहीच शंका आणू नकोस." प्रियाने अनुजला समजावून सांगितले.


सारिका सुखरुप असेल का? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all