Feb 25, 2024
पुरुषवादी

अंतरीच्या यातना भाग ५

Read Later
अंतरीच्या यातना भाग ५

अंतरीच्या यातना भाग ५


मागील भागाचा सारांश: अनुज व सारिका दुसऱ्या घरात रहायला गेल्या होत्या. शेजारी राहणाऱ्या पवार काकूंनी अनुज व त्यांच्या नातवाची ओळख करुन दिल्याने अनुजला खेळण्यासाठी मित्र मिळाला होता, तसेच सारिकाला काम मिळवून देण्यासाठी पवार काकूंनी मदत केली होती.


आता बघूया पुढे….


अनुज शाळेत गेल्यावर सारिका बचत गटात कामाला जाऊ लागली होती. सारिका वाटेल तेवढे कष्ट करायला तयार होती. शाळेतून आल्यावर सारिका घरी आलेली नसेल तर अनुज पवार काकूंच्या घरी थांबायचा. पवार काकू त्याला खाऊपिऊ घालायच्या. पवार काकू आजीप्रमाणे त्याच्यावर माया करायच्या.


पवार काकूंमुळे अनुज व सारिका नवीन घरात रुळले होते. कोणत्याही मुलाची सायकल बघितल्यावर अनुजला आपल्या बाबांची आठवण यायची. एके दिवशी सारिका कामावरुन घरी परतली, तर तिच्या हाताला बँडेज होते. बँडेज बघून अनुजने विचारले,


"आई तुझ्या हाताला काय झालंय?"


"अरे बाळा भाजी चिरता चिरता माझा हात कापला गेला. थोडंसं लागलं आहे. दोन तीन दिवसांत हात बरा होईल. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते." सारिकाने उत्तर दिले.


यावर अनुज म्हणाला,

"आई मी घरातील सर्व कामे करेल. तू आराम कर. सकाळच्या पोळ्या उरलेल्या आहेत. मी तुला मिरची आणि कांदा चिरुन देतो. तू पोळ्यांचा भुगा कर. तोपर्यंत मी घर झाडून घेतो. आपलं जेवण झालं की, भांडे घासून घेईल."


सारिका नाही म्हणत असताना अनुजने सर्व कामे केली. अनुजकडे बघून सारिकाला भरुन आले होते. सगळी कामं झाल्यावर अनुज अभ्यास करत बसला होता. सारिकाला अनुजचे खूप कौतुक वाटायचे. अनुज घरातील सर्व कामांमध्ये सारिकाची मदत करु लागला होता. 


सारिकाला कामाचे तुटपुंजे पैसे मिळत होते. अनुजच्या बाबांच्या पेन्शनमध्ये घरभाडे जायचे आणि सारिका जे पैसे कमवायची, त्यात घरखर्च भागायचा. सारिकाला अजून पैसे कमवायचे होते, पण तिला मार्ग सापडत नव्हता. 


एके दिवशी संध्याकाळच्या वेळी प्रिया म्हणजे अनुजची मावशी आली, तेव्हा अनुज घराबाहेर रोहनसोबत खेळत होता. मावशीला बघून अनुजला खूप आनंद झाला. अनुज तिला बघून आनंदाने ओरडला,


"मावशी तू आज कशी काय आलीस?" 


"तुझी खूप आठवण येत होती, म्हणून तुला भेटायला आले. आई कुठे आहे?" प्रियाने विचारले.


"आई कामावर गेलेली आहे. चल मी तुला आमचं घर दाखवतो." अनुज म्हणाला.


प्रियाला अनुज आपल्या घरात घेऊन गेला. अनुजने प्रियाला पाणी दिले. छोटं घर आणि त्यातील तुटपुंजे सामान बघून प्रियाला वाईट वाटले होते. ती काहीच न बोलल्याने अनुज म्हणाला,

"मावशी तू कसला विचार करत आहेस?"


प्रिया म्हणाली,

"काही नाही असंच. बरं तुझी शाळा काय म्हणतेय? आणि आई कुठे कामाला जाते?"


यावर अनुज म्हणाला,

"मावशी माझी शाळा मस्त चालू आहे. मला ह्या शाळेत पहिले करमत नव्हते, पण आता ही शाळा आवडू लागली आहे. आई स्वयंपाकाची कामे करते. मावशी एकदा तर आईचा हात कापला गेला होता आणि आईच्या हाताला चटके तर नेहमीच बसत असतात. मावशी तू आईसाठी दुसरं एखादं काम शोधशील का?"


प्रिया काही बोलणार इतक्यात सारिका घरात येऊन म्हणाली,

"प्रिया तू कधी आलीस? तुला आमच्या घराचा पत्ता कोणी दिला?"


सारिकाकडे बघून प्रियाला भरुन आले होते. डोळ्यातील पाणी बाहेर पडू न देता प्रिया म्हणाली,

"श्रीकांत कडून तुझा पत्ता मिळाला. तू फ्रेश होऊन ये, मग आपण बोलूयात."


प्रियाला सारिकासोबत बोलायचे असल्यामुळे तिने अनुजला खेळण्यासाठी पाठवून दिले. सारिका फ्रेश होऊन आल्यावर म्हणाली,

"प्रिया तुला कोरा चहा चालेल ना? घरात दूध नाहीये म्हणून विचारलं."


सारिकाच्या डोळ्यातील अगतिकता प्रियाला कळली होती. 

"मला चहा नकोय. तू इथे बस. मला तुझ्यासोबत बोलायचं आहे." प्रियाने सांगितले.


सारिका प्रियाजवळ बसत म्हणाली,

"बोल काय म्हणतेस?" 


प्रिया म्हणाली,

"सारिका तू स्वतःची काय अवस्था करुन घेतली आहेस? ह्या कसल्या घरात राहतेस. घरात मोजकेच सामान आहे. तू श्रीकांतकडे राहत नाही, हे एकदाही तुला सांगावे वाटले नाही. सारिका घरात दूध नाहीये म्हटल्यावर तुझ्या आर्थिक परिस्थितीची कल्पना मला आली आहे. तू मला तर परकं करुन टाकलंस. अनुजच्या चेहऱ्यावर अजिबात तेज राहिलेलं नाहीये. बिचारा उन्हात बाहेर खेळत होता."


बोलता बोलता प्रियाच्या डोळयात पाणी आले होते. सारिका म्हणाली,

"प्रिया तू तुझ्या संसारात बिजी राहतेस. तुला त्रास देण्याची इच्छाच झाली नाही. जिथे सख्ख्या भावाच्या घरी राहणे शक्य झाले नाही, तिथे तुझ्याकडे कुठल्या तोंडाने मदत मागणार होते. अनुज व मला आता ह्या परिस्थितीची सवय करुन घ्यावी लागणार आहे. प्रिया आम्ही इकडे रहायला येऊन तीन महिने झाले असतील, पण एकदाही श्रीकांत आमची चौकशी करायला आला नाही. शीतलकडून ती अपेक्षा नव्हतीचं, पण श्रीकांत न आल्याने मला जास्त वाईट वाटलं. दररोज नवीन काम शोधण्यासाठी धडपड करते आहे, पण शिक्षण कमी असल्याने तेही मिळत नाहीये."


"तू स्वयंपाकाचं काम करते म्हणजे काय?" प्रियाने विचारले.


"बचत गटाच्या बायकांना स्वयंपाकाच्या ऑर्डर मिळतात, त्यांनाचं मदत करत असते. कामाचा मोबदला हवा तितका मिळत नाही, पण मला दुसरं काही येतही नाही." सारिकाने उत्तर दिले.


प्रिया म्हणाली,

"आईसाठी दुसरं काम शोध, असं अनुजने मला सांगितलं आहे. तुझ्या हाताला ह्या कामात इजा होत असतात, ते त्याला आवडत नाहीये."


"प्रिया माझा अनुज अचानक खूप मोठा झाला आहे ग. कोणत्याच गोष्टीसाठी हट्ट करत नाही. मला अनुजला खूप शिकवायचे आहे." सारिकाने सांगितले.


प्रिया म्हणाली,

"मी आज रात्री इथेच थांबणार आहे, मग बाकीच्या गप्पा मारुयात. आज आपण तिघेही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाऊयात. अनुजला तेवढंच बरं वाटेल आणि तुला एक दिवस सुट्टी मिळेल."


सारिका नाही म्हणत असताना प्रिया त्या दोघांना घेऊन बाहेर जेवायला गेली.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//