अंतरीच्या यातना भाग १०

Anuj Knows Her Mother's Bitter Truth

अंतरीच्या यातना भाग १०


मागील भागाचा सारांश: सारिका शुद्धीवर आली होती, तिचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे तिला बरेच दिवस घरात बसावे लागले होते. परिणामी सारिकाचा स्वभाव चिडचिडा झाला होता. कालांतराने सारिकाचे कंपनीतील वर्तन सुद्धा बदलले होते. सारिकाची मानसिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत असल्याने तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. सारिकाच्या उपचारांसाठी अनुजने त्यांचे राहते घर विकले आणि तो प्रियाकडे रहायला गेला.


आता बघूया पुढे…..


एके दिवशी अनुज नेटकाच कॉलेजवरुन घरी आला होता, तो आपल्या रुममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला असतानाच त्याचा फोन वाजला. फोन सारिकाच्या हॉस्पिटल मधून आला होता. अनुजला हॉस्पिटलमध्ये त्वरित बोलावण्यात आले होते. मनोज घरी नसल्याने प्रिया व अनुज कॅब करुन हॉस्पिटलला गेले. वाटेत असताना प्रियाने मनोजला फोन करुन हॉस्पिटलमध्ये यायला सांगितले. 


अनुज व प्रिया हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्यांनी रिसेप्शनवर चौकशी केली, तर त्यांना मुख्य डॉक्टरांची भेट घेण्यास सांगण्यात आले. अनुज व प्रिया प्रचंड टेन्शनमध्ये होते. अनुज व प्रिया डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. डॉक्टरांनी त्यांना आपल्या समोरील खुर्चीत बसण्यास सांगितले.


"डॉक्टर आई बरी आहे ना? आम्हाला हॉस्पिटलमध्ये एवढं अर्जंट बोलावून का घेतलं?" अनुजने विचारले. अनुजच्या बोलण्यातून त्याला वाटणारी काळजी व भीती या दोन्ही जाणवत होत्या. 


डॉक्टर म्हणाले,

"अनुज थोडा शांत हो. मी जे काही आता सांगणार आहे, ते प्लिज शांतपणे ऐका. 

सारिकाची मानसिक स्थिती सुधारावी यासाठी आमच्या टीमने शर्थीचे प्रयत्न केले. सारिकाला कोणत्यातरी औषधांनी फरक पडेल, म्हणून मी वेळोवेळी औषधे बदलत होतो. तरीही सारिकात थोडीसुद्धा सुधारणा दिसून येत नव्हती. 


गेल्या आठ दिवसापासून सारिका कोणाशी काहीच बोलली नव्हती. पहिले तरी ती थोडंफार बोलायची, ओरडायची. सारिका स्वतःमध्ये मग्न राहत होती. आम्हाला वाटलं की, औषधांचा परिणाम म्हणून ती शांत झाली असेल आणि काही दिवसांनी ती पूर्वस्थितीत येईल म्हणून.


आज दुपारी जेवण झाल्यानंतर सारिका कुठेच दिसली नाही, म्हणून शोधाशोध सुरु केली, तर सारिकाने विहिरीत उडी मारली आणि हे आमच्या एका नर्सच्या लक्षात आले होते. वार्डबॉयने सारिकाला लगेच विहिरीतून वर काढले आणि आम्ही तिच्यावर उपचार सुरु केले. सारिकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही सारिकाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण सारिकाला आम्ही वाचवू शकलो नाही. सारिका हे जग सोडून गेली."


डॉक्टरांच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर अनुज व प्रियाला मोठा धक्का बसला होता. दोघांच्याही डोळयात पाणी तरळले होते. अनुज खूप हिंमत करुन म्हणाला,

"डॉक्टर आईने आत्महत्या का केली असेल? हे तुमच्या उपचारांमुळे झालं असेल की याचं अजून दुसरं काही कारण आहे."


"सुरुवातीला हे माझं अपयश आहे, असं मला वाटत होतं. आजवर माझ्या एकाही पेशंटने असं कृत्य केलेलं नव्हतं, म्हणून मीच स्वतः हादरलो होतो, पण त्यानंतर नर्सने सारिकाच्या बेडजवळ सापडलेली चिठ्ठी मला आणून दिली. ही चिठ्ठी मी वाचली आहे. ही चिठ्ठी तुझ्यासाठी तुझ्या आईने लिहिलेली आहे. तू ही चिठ्ठी वाचावीस म्हणजे तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील." डॉक्टरांनी सांगितले.


मनोज हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. मनोज हॉस्पिटलच्या सर्व फॉर्मलिटीज करत होता, तोवर अनुज व प्रिया वेटींग एरियात बसले होते. अनुजने सारिकाने लिहिलेले पत्र वाचायला सुरुवात केली,


"अनुज तू ही बातमी ऐकल्यावर हादरला असशील. बाळा पण प्लिज या सगळ्यातून सावर. माझ्यामुळे तुला खूप मनस्ताप सहन करावा लागला असेल. माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात अजून संकट येऊ नयेत, माझ्यामुळे तुला त्रास होऊ नये, म्हणून मी हे पाऊल उचलले. माझी मानसिक स्थिती हाताबाहेर जावी असं माझ्या आयुष्यात काहीतरी घडलं होतं. माझा माझ्या मनावर ताबा राहिला नव्हता.


प्रत्येकाच्या हातून काहीतरी चूक घडते, तसं माझ्या हातून एक चूक झाली होती. तू गुरुकुलमध्ये राहत असताना मी घरी एकटीच असायचे. आपल्यासोबत कोणीतरी आपल्या हक्काचं माणूस असावं असं कायम वाटायचं. तू कदाचित या गोष्टीसाठी मला माफ करणार नाहीस. प्रिया व मनोजने मला दुसऱ्या लग्नासाठी अनेकदा विचार करायला लावला होता, पण त्यावेळी माझं मन तयार होत नव्हतं. अशावेळी सर्वांत आधी तुझा विचार माझ्या मनात यायचा. तुला मी दुसरे लग्न केलेलं आवडणार नाही, असं नेहमी वाटायचं.


मी कंपनीच्या कामाच्या निमित्ताने नाशिकला जायचे. जेव्हा पहिल्यांदा मी नाशिकला गेले होते, तेव्हा माझी व शरदची पहिली भेट झाली होती. काही दिवसांनी शरद कंपनीच्या कामासाठी पुण्यात आला होता. आम्ही त्यावेळी डिनरसाठी म्हणून दोघेच गेलो होतो. आमच्यात बऱ्याच वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा झाल्या होत्या. शरदचा घटस्फोट झालेला होता. आमच्या दोघांचे विचार बऱ्यापैकी जुळत असल्याने आमच्यात मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले, हे आम्हालाही समजले नाही. 


मी महिन्यातून एकदातरी नाशिकला त्याला भेटायला जायचे आणि तोही मला भेटण्यासाठी पुण्यात यायचा. दिवसेंदिवस आमच्यातील भेटी वाढत गेल्या आणि आमच्यातील अंतरही कमी होऊ लागले होते. शरदसोबत लग्न करावे असं वाटत होतं, पण त्याला कुठल्याही बंधनात अडकायचे नव्हते. मीही त्याचा निर्णय मान्य केला. मी शेवटच्या वेळी नाशिकला गेले, तेव्हा आमची शेवटची भेट झाली होती. मी त्याच्याच घरी रहायला होते. माझा अपघात झाल्यानंतर मात्र त्याचा एकही फोन न आल्याने मला राग आला होता, म्हणून एके दिवशी फोनवर माझं आणि त्याचं खूप जोरात भांडण झालं आणि त्यानंतर माझी मानसिक स्थिती बिघडत गेली.


शरदने मला नाकारल्याने मला खूप त्रास झाला होता. परिणाम तुमच्या डोळ्यासमोर होता. डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असेलच की, मी काही दिवसांपासून शांत झाली होती. माझी मानसिक स्थिती सुधारली होती, पण मी हे सगळं तुला खरं सांगून तुझ्या डोळ्यातील तिरस्कार सहन करु शकले नसते. माझ्यामुळे तुला अजून त्रास व्हावा, ही माझी अजिबात इच्छा नव्हती, म्हणून मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शक्य झाल्यास अनुज मला माफ कर. प्रिया मावशी व मनोज काका तुला कधीही अंतर देणार नाहीत, याची मला खात्री आहे."


चिठ्ठी वाचल्यावर अनुजच्या पायाखालची जमिनचं सरकली. अनुजने प्रियाला ती चिठ्ठी वाचायला दिली. अनुजला एकाच वेळी दोन धक्के बसले होते. 


हॉस्पिटल मधून सारिकाच्या पार्थिवासोबत अनुज, प्रिया व मनोज थेट स्मशानभूमीत गेले. श्रीकांतही त्यावेळी उपस्थित होता. सारीकावर अंत्यसंस्कार करुन सगळेजण घरी निघून गेले.


अनुजच्या आयुष्यात पुढे काय घडेल? हे बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all