अंतरीच्या वेदना (भाग/८)

This story is related to the life of women

भाग/८

   पुर्वसुत्र_

   आजीने लताच्या मनातील निराशेचं पान काढून टाकले. तिच्या मनात नवचैतन्य निर्माण केले. उन्हाच्या झळा तर लागणारच. पण, आपण कोठे सावली भेटते का हे मात्र शोधत राहायचे. 

     बरं पण ,"आता पुढे काय विचार आहे तुझा ? "

    काहीच सुचत नाही आजी.फक्त बबलूला सांभाळणारं एक हक्काचं माणूस पाहिजे गं. मगच मला शांतता मिळेल.....लता. 

        अगं हो, हो त्याच्याही आयुष्यात आनंद देणारं कोणीतरी असेलच. तू काळजी करू नको..... आजी.

      अगं , त्या बबलूकडे बघ जरा. किती कामं करतो आता. 

 पुढे पाहुया त्याच्या जीवनात काय होते....

  अगं आजी. पण," त्याला कोण देईल आधार ? माझ्या दोन्ही मुली त्यांच्या संसारात रममाण आहेत. "ना बबलूचे शिक्षण, ना त्याला काही नोकरी, किंवा काही काम ?"...लता.

   होईल सर्व नीट. काळजी करू नकोस..... आजी.

     दिवसांमागून दिवस सरत होते. एके दिवशी गावात शाळेच्या निमित्ताने या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांची भेट झाली. वस्तीत राहणारी मुले किती? मुली किती? मुले शाळेत का जात नाही ? या संदर्भात काही माहिती गोळा करीत होते. 

    त्या सर्वांमध्ये एक मुलगी होती. दिसायला अतिशय छान, हुशार वाटली. तिचे नाव ज्ञानदा. नावाप्रमाणेच ती ज्ञान दानाचे कार्य करण्यासाठी तिची नेमणूक केली होती आणि विशेष मुलांसाठी ती काम करीत होती. तिला अशा असामान्य मुलांचा विशेष लळा होता. त्यांना समजून घेणं आणि त्यांच्या वर नि:स्वार्थपणे प्रेम करणं. हे तिला आवडत होत. त्यासाठी तिने काही खास प्रशिक्षण घेतले होते. खरंतर तिच्या आई वडीलांना तिची ही गोष्ट खटकत होती. पण, तरीही ती शांतपणे हे काम करत होती.

     या पाड्यात ज्ञानदाचे पडणारे पाऊल दीपकसाठी फायद्याचे ठरणार होते. याची कोणालाच कल्पना नव्हती. ज्ञानदा आता काही दिवस पाड्यात राहणार होती. तिला राहण्यासाठी चांगली खोली देण्यात आली. वस्तीवरील मुलांना योग्य दिशा देण्याचे काम करणार होती. वस्तीवरील सर्व मुलांना ती स्वतः शाळेत घेऊन यायची आणि चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करायची. सुरवातीचे काही दिवस तिला त्रास होत होता. पण, ती जिद्दीने प्रयत्न करत होती. या पाड्यातील मुलांना ना शिक्षणाचा गंध होता ना व्यवस्थित राहण्याचा. मुलांना मी सुशिक्षित करणारचं. असा जणु निर्धार करून तिने येथे पाऊल‌ टाकले होते. काही दिवस एका झाडाखाली ती‌ शाळा भरवायची. निसर्गाच्या सान्निध्यात राहून मुलांना तिने निसर्गाने दिलेल्या वरदानाची माहिती देत होती. त्या ठिकाणी बबलू सुध्दा जाऊन बसू लागला. तो सुद्धा अभ्यास करू लागला. मुलांसोबत खेळू लागला. तो हुशार होताच. पण, डोक्यावर झालेल्या परिणामामुळे त्याची ही अवस्था झाली होती.‌ एके दिवशी शाळेतील काही लहान मुले बबलूला त्रास ‌देत होती. दगड मारीत होती. तर काही त्याला पळायला लावत होती. 

     ज्ञानदाला हे सर्व दुरूनच दिसले. तिला हे सहन होत नव्हते. तिने जाऊन त्या मुलांना थांबविले आणि कोणाच्याही असहाय्यतेचा आपण गैरफायदा घेऊ नये. असे सर्व मुलांना समजावून सांगितले. त्यावेळी मात्र सर्व मुले पळून गेली. पण, बबलू मात्र लहान मुलासारखा रडत होता. 

     आई, आई.... करीत होता. 

    बारीक दगड लागल्याने डोक्यावर खोच पडली होती. त्यातून येणारं रक्त पाहून तो जास्त घाबरला. त्याला भीती वाटू लागली. तो अचानक ज्ञानदाच्या जवळ गेला आणि तिचा हात हातात घेतला. 

  मी..... म....ला..... ला.....ग.....ल......

     म्हणून तो आणखी जोरात रडू लागला. 

   ज्ञानदाही थोडी अस्वस्थ झाली. अचानक बबलूने आपला हात हातात घेतलेला पाहून ती बैचेन झाली. क्षणभर काहीच सुचले नाही. तिने त्याची जखम पुसून त्याला औषध लावून दिले. 

      मग लगेच स्वतः ला सावरले... परंतु, त्यांचे रडणे काही थांबत नव्हते म्हणून तिने त्याचे घर शोधले आणि त्याला त्याच्या घरी पोहोचले. 

     घरी पोहोचताच , आ...ई...... असे म्हणत तो लताला चिकटला. 

     काय झाले? बबलूला कसे लागले ? 

   नक्कीच काही खोडकर मुलांनी त्रास दिला असेल. हो ना ... 

    लताच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न होते. 

          "तुम्ही इथल्या शाळेत शिकवायला आल्या आहात ना? या, बसा" .... लता.

       अहो, काकू. मला एकेरी नावाने हाक मारली तरी चालेल.....ज्ञानदा.

    पण, पण नाही.... लता.

     पहिल्यांदाच इतक्या प्रेमाने बबलूला कोणीतरी‌ आधार दिला होता. हे बघून लता मनोमन सुखावली होती. लताने ज्ञानदाला चहा, पाणी केले. बबलूला त्याच्या घरी सोडून ज्ञानदा निघून गेली. पण, लताच्या मनात आणखी काही तरी सुरू होते. ज्ञानदा सारखी मुलगी जर दीपकच्या आयुष्यात आली तर.... 

    छे, मी पण काय विचार करू लागले...

    पण, "नेमकं बबलूही तिच्या शाळेत रोज जाऊन बसू लागला. त्यालाही थोडीशी गोडी निर्माण झाली. ज्ञानदाला देखील त्याच्या विषयी कुतूहल निर्माण झाले. इतर मुलांपेक्षा तो वेगळा असल्यामुळे ती त्याला शिकविण्यासाठी जास्त ‌वेळ देऊ लागली. त्याला विशेष प्रशिक्षण देऊन सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करू‌ लागली. एकीकडे बबलूलाही तिचा सहवास आवडू लागला. आज पर्यंत त्याची एवढी आस्थेने चौकशी करणारे, जीव लावणारे आई शिवाय कोणीच नव्हते. आता बबलू ज्ञानदा जे शिकवत होती. ते आत्मसात करीत होता. "

   लतालाही ते बघून फार आनंद होत होता. कोणीतरी बबलूच्या आयुष्यात आली. हळुहळु बबलू आणि ज्ञानदा सतत भेटू लागले. ज्ञानदा बबलूला प्रत्येक गोष्ट नीट समजावुन सांगू लागली. अभ्यास आणि शाळेच्या व्यतिरिक्त ते दोघेही संपूर्ण गावात फेरफटका मारू लागले. 

ती त्याला जमेल त्या पद्धतीने शिकवू लागली. तिलाही बबलूचा सहवास फार आवडू लागला. तिचे ते प्रेमाने बोलणे , हाक मारणे, तिचे ते रेखीव डोळे बघून तर तो तिच्याकडे सारखा बघत रहायचा. ते दोघे कधी कधी दर्शनाच्या निमित्ताने गावातील गणपतीच्या मंदिरात जायचे , तर कधी मारोतीच्या मंदिरात......कधी दूर गावाच्या बाहेर असलेल्या शेतात....तर कधी झाडाखाली... त्या दोघांची शाळा भरे. तर कधी कधी चालत नदीच्या काठी येऊन बसत असतं .... ते दोघे तासनतास गप्पा मारत होते. ती त्याच्या मनाचा ठाव घेत घेत होती. ती त्याचा हात धरून त्याला शिकवू लागली. 

     जवळजवळ तीन महिन्यांचा कालावधी झाला होता. काही दिवसांचा सहवास एकमेकांना प्रेमात पाडण्यासाठी पुरेसा होता. तो जरी मंद असला तरीही तो दिसायला सुंदर होता. त्याला प्रेमाची परिभाषा जरी कळत ‌नसली. तरी आपुलकीने कोणी जवळ घेतलेले आवडत होते त्याला . 

                          म....ला....तू.....खू.....प....आ.....व....ड‌....ते...

      हे ऐकताच ज्ञानदाही म्हणायची. " आय लव्ह यू"

      या शब्दांचा अर्थ त्याला फारसा कळायचा नाही. पण, तरीही आपल्यावर कोणीतरी प्रेम करते. एवढेच कळत होते. त्यांच्या भेटीगाठी बद्दल सगळीकडे चर्चा सुरू होती. पण, ती शिक्षिका आणि तो विद्यार्थी म्हणूनच. 

    "हा प्रकार बरेच दिवसांपासून सुरू होता. लोकांच्या दोघांचेही मन निर्मळ होते. खरं तर ज्ञानदालाही कळले नाही की मी बबलूवर कधी प्रेम करायला लागले ते. एक दिवस जरी त्याला उशीर झाला तरीही ज्ञानदा अस्वस्थ होत होती. मग ती त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी देखील जाऊ लागली. त्यामुळे लताच्या ती जरा जवळ आली होती. लता आणि ज्ञानदा छान मैत्रिणीसारख्या गप्पा मारायच्या." 

      'लताला तर जणु एक आधारच मिळाला होता. शांता आजी प्रमाणेच तिही मनमिळाऊ स्वभावाची होती. ज्या ज्या व्यक्तींनी बबलूला नाकारले होते म्हणा किंवा दूर लोटले होते. तिथे या ज्ञानदाने त्याला समजून घेतले होते. त्याला प्रेम दिले होते.'

   पण, 'ज्ञानदा आपल्या मुलासाठी योग्य असली तरीही तिचे आयुष्य आपण असे पणाला नाही लावू शकत. आपण इतके स्वार्थी थोडीच आहोत.' 

         मनातल्या मनात लता विचारांच्या तंद्रीत गेली. मात्र लताने ज्ञानदाशी या विषयावर बोलायचे ठरवले. 

    ज्ञानदा, अंगं, माझा बबलू अशिक्षीत आहे. परत त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शिवाय तू शहरात वाढलेली. आमचे लहानसे घर तुझ्यासाठी पुरेसे नाही गं. परत मी काम करते त्यातून हे घर चालते. विशेष काही माझी कमाई नाही गं. त्यामुळे तू पुन्हा एकदा विचार करावा. असे मला वाटते. 

     पण, "ज्ञानदा तिच्या निर्णयावर ठाम होती. तिने लताला विश्वास दिला. की मीच बबलूशी लग्न करणार. "

      ज्ञानदाच्या घरचे लोक या गोष्टीला संमती देतील की नाही. ही जरा शंकाच होती. 

झालेही तसेच ज्ञानदा आणि बबलू उर्फ दीपकच्या मैत्री विषयी आणि भेटी विषयी ज्ञानदाच्या आई वडीलांना कळालेच होते आणि ते तिला भेटण्यासाठी येणार होते. हे कळल्यावर लताची परत घालमेल सुरू झाली होतीच. "पण, आता करणार काय ?"

      दोन दिवसांतच ज्ञानदाचे आईवडील गावात आले. त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी ज्ञानदाला बबलू पासून दूर राहण्याची ताकीद दिली. कारण, ते जर एकमेकांच्या प्रेमात वहावत गेले तर संपूर्ण आयुष्य कसे जगणार? तेही अशा एका मुलासोबत जो नीट बोलू शकत नाही. ज्यांचा मेंदू लहान मुलांसारखा आहे. जो अशिक्षित आणि गरीब आहे. 

       ज्ञानदा, "आत्ताच्या आत्ता चल या गावातून" ज्ञानदाची आई रागिणी आणि वडील शंकरराव ज्ञानदाला ओरडू लागले.. 

     पण, "मी सध्यातरी कोठेच येणार नाही. तुम्ही हवं तर परत जाऊ शकता.....मला बबलूची काळजी घ्यायची आहे"......ज्ञानदा. 

क्रमशः:

©®सौ.आश्विनी मिश्रीकोटकर

  

🎭 Series Post

View all