अंतरीच्या वेदना (भाग/३)

This story is related to the life of women

भाग/३

 पुर्वसूत्र_

    चल आता , जास्त विचार करू नकोस. रात्री बोलू या...तसेही उद्या काहीच काम नाही शेतावर ... निवांत बसून बोलू..." शांता आजी. 

     रात्र होताच आजीची दारावर थाप पडली.

  लता, ए लता... "झोपली का ? " "नाही आजी... उघडते थांबा."

     चल, "जरा बाहेरचं बसू गारव्यात.... आणि बोलू या...." शांता आजी. लता बोलू लागली .....

     लताने तिच्या आयुष्याचे एक एक पान आजी समोर उलटवायला सुरूवात केली.

   काय आहे तिच्या आयुष्याचे पानं.... बघुया पुढच्या भागात....

क्रमशः 

   ती आणि आजी घराच्या बाहेर येऊन बसली. निरभ्र आकाशात चांदण्यांची चादर पसरली होती. वाऱ्याचा स्पर्श उगाचच बोचकारल्या सारखा वाटतोय. पानांची एकमेकांशी उगाचच कुजबुज सुरु झाली होती. 

    "माझ्या मनातली कुजबूज मात्र आजीला खरंच कळली असेल का? "

      या शांत वातावरणात फक्त त्या दोघीच होत्या. जवळच असलेल्या झाडाच्या पारावर बसल्या. रात्री नऊ नंतर महिला सहसा बाहेर बसत नसतं. कारण, दिवसभराच्या श्रमाने त्यांचे शरीर थकून जायचे‌ . कुठल्यातरी गल्लीत माणसा़ंची वर्दळ असायची. 

     अशा भयानक शुकशकाटाने तिच्या अंगावर काटा उभा राहायचा. आज तर शरीर जसे आजारी होते. तसे मनाचे झाले होते. 

     ' नवीन जेव्हा ती रहायला आली .तेव्हा आदिवासी पाड्यात रहात असल्यामुळे तिथल्या राहणीमानात, विचारांत बदल घडवून आणण्यासाठी ती कधी कधी प्रयत्न करायची. 

स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ ती कधी कधी पेटून उठायची. पण, लोकांची मानसिकता बदलण्यासाठी ती एकटी पुरेशी नव्हती. '

        शेवटी स्वतः ची सुरक्षा पण महत्वाची असते. पण, यशाच्या पहिल्या पायरीतच अपयशी ठरली. त्यामुळे तिने समाजसेवेचे भूत डोक्यातून काढून टाकले. 

      पण, लताच्या चेहऱ्यावरचे प्रश्न चिन्ह बघून आजीनेच पुढाकार घे. 

अगं, "लता बोल काही तरी? "

 "तुला कशाची चिंता सतावत आहे. " माझ्या मुलाची" लता.

  पण, "आजी तू माझी इतकी काळजी का घेते ग,"

अगं,"आजी म्हणते ना मला," मग सांग खरं खरं मला. 

 "आजी स्त्रीचं एकाकीपण किती कठीण असतं ना ?" अगं," माझ्या आईच्या गर्भात असतांना पासूनच मला त्रास होता. "

      माझी आजी आणि बाबा माझ्या आईला खूप त्रास द्यायचे. अगदी क्षुल्लक कारणावरून मारहाण करायचे. वाद घालायचे. 

     आधीच तिच्यावर कामाची जबाबदारी इतकी की स्वतः कडे लक्ष द्यायला वेळ नाही , त्यात दोन मुलींची जबाबदारी आणि मी आईच्या पोटात. 

     मी... मी.... नको होते ग. आजीला आणि माझ्या बापाला. त्यांना तर वंशाचा दिवा पाहिजे होता. आधीच दोन मुली असल्यामुळे त्याने आईला जबरदस्तीने गर्भलिंग निदान चाचणी करायला लावली. त्यात मुलगीच आहे हे समजले होते. तेव्हा मुलगी नको या विचाराने त्यांनी गर्भपात करायचा ठरवला. पण, नाजूक तब्येतीमुळे डॉक्टरांनी नकार दिला. 

    पण, "तरीही आजीने घरच्या घरी काही औषधे देण्यास सुरूवात केली. पण, माझं नशीब इतकं बलवत्तर की मी या जगात जन्माला आलेच. "

    "या सुंदर जगात माझे स्वागत तर दूरच पण मला हात सुध्दा लावला नाही. माझा तर चेहरा सुद्धा बघीतला नाही त्यांनी."

      आजी ," माझा जन्म झाला ना तेव्हा पासूनच माझ्या आयुष्याची घरघर सुरू झाली. 

आईचं दूध सुध्दा माझ्या नशीबी नव्ह्ते. तिला एवढी मारझोड झाली होती की तिला पान्हाच फुटला नाही. एवढेच कमी की काय . माझी आई ओली बाळंतीण असतांनाच तिला परत दिवस गेले. त्यामुळे माझ्याकडे तर फार दुर्लक्ष केले गेले. आईने सगळ्यांना खूप समजावून सांगितले."

पण," कोणी ऐकेल तर शप्पथ !"

    त्यांनी आईची गर्भ चाचणी केली त्यामुळे त्यांना माहित होते. आता तर तिला मुलाचे डोहाळे लागले होते. आजी आणि बाबा तर खूपच आनंदी होते. तिची इतकी काळजी घ्यायचे. की जणू तिला पहिल्यांदाच दिवस गेले आहे. माझ्या दोन्ही बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या. त्याच मला नेहमी सांभाळायच्या. आजी, बालपणी आपल्या मनावर पडलेले आघात किती घातक असतात ना. ते कायमचेच आपल्या सोबतीला असतात. कोणी असो किंवा नसो.  "आधीच घरात आम्ही मुलीचं.....त्यात आता घरात मुलगा होणार. म्हणून आम्ही दुर्लक्षित झालेलो. शिळपाकं अन्न आमच्या नशीबी.... ना घालायला नीट कपडे ना काही आनंद.... सतत दुःख... एकाकीपणा..... ! "

        आवंढा गिळून काही क्षण ती थांबली. तिच्या घशाला कोरड पडली होती. आजीने घरातून जाऊन तिच्या साठी पाणी आणले. तिने घोटभर पाणी पिले आणि ती पुढे सांगू लागली. 

        आमच्या घरात प्रथमेश आला. आमचा सख्खा भाऊ.... मग काय कौतुक सोहळा.... आजी आणि वडीलांनी तर सारे घर डोक्यावर घेतले. आईला मात्र फार वाईट वाटत होते. परंतु , काही बोलायची उजागरी नव्हती. मुलींची बाजू घेऊन बरेच दिवस तिने वाद घातला. पण, "रोज मरे त्याला कोण रडे " अशी आमची अवस्था झाली होती. जसजसे समजायला लागले. तसतसे परिस्थितीने शहाणपण दिले. रोज त्याच्या आवडीचे पदार्थ, त्यालाच नवीन कपडे, त्यालाच नवीन खेळणी .... आम्हाला तर हात लावायची सुध्दा परवानगी‌ नव्हती. तरीही त्याला आम्ही खेळवत होतो, सांभाळत होतो. त्याची काळजी आम्ही घेत होतो. आम्हांला काहीच मिळत नसूनही आम्ही आनंदी होतो. आमचे मन लहान सहान गोष्टींसाठी झुरत होते.‌  पण, "आमचे नशीब असे की आमची आई देखील या सगळ्यात पिळवटून निघत होती. "

       (लताला हुंदका दाटून आला.) 

   आजी," तुला माहीत नाही गं.... आमच्या वाट्याला आलेले भोग भोगण्यापेक्षा आम्ही मरून जावं ही आईची इच्छा होती. "

     पण, "कारट्या मरत पण नाही." म्हणून आमची आई आम्हांला मार मार मारायची. जेणेकरून आमची या नरकयातनेतून तरी सुटका व्हावी. पण, "मायेच रक्त.... असं आटणार थोडी आहे. असं कसं सांडू देईल. ती आम्हांला पोटाशी धरून ती हुमसून हुमसून रडायची. पण, आमच्या साठी ती काहीच करू शकत नव्हती. याचे तिला फार वाईट वाटायचे. पण, मुलींना घेऊन घर सोडावे अशी एवढी तिची हिंमत तिच्यात नव्हती. एक एक दिवस जात होता. जसजशा आम्ही मोठ्या होत होतो. तसतसे भेदभावाची संकल्पना स्पष्ट होत गेली. 'आमचे इवले इवले हात विहीरीवरून पाणी भरत होते. घरातील कपडे धुणे, भांडे घासणे, घरातील झाडलोट करणे. ही सर्व कामे ते आमच्या कडून करून घेत होते. 

      बाबांचा एक कटाक्ष आम्हांला खाऊ का गिळू एवढा भेदक वाटत होता. मुली जन्माला येणं म्हणजे त्यांच्या आयुष्यात फार मोठा गुन्हा केल्यासारखे वागत होते. आमच्या कोमेजलेल्या मनाला फुलासारखे उमलण्यासाठी कोणाच्या तरी भक्कम आधाराची गरज होती."तरीही आम्ही चौघेही भावंडे एकत्र खेळत होतो. मस्ती करीत होतो , मजा करीत होतो. आम्ही आमचं दुःख प्रथमेशच्या हसण्यात विसरून जात होतो. त्याला कसे शिकावायचे , कोणत्या चांगल्या ‌शाळेत टाकायचे. याचा विचार बाबा करत होते. 

    माझी मोठी बहिण सात वर्षांची झाली. दुसरी सहा. त्या दोघींना आईने शाळेत टाकले. प्रथमेश आणि माझ्यात जवळपास वर्षांचं अंतर.... तसं फार नव्हतं. पण, तो मुलगा असल्याने आणि घरात त्यांचे विशेष लाड करत असल्याने तो उलट उत्तरे द्यायला लागला. पण, त्याच्या या बोलण्याचे आजी कौतुक करीत असे. त्याच्या बालमनावर घडत असलेले संस्कार चुकीचे आहे. हे कळत असूनही आई काहीही करू शकत नव्हती. त्यामुळे तिने आम्हां तिघींनाच बळ दिले. 

    "आम्हांलाही वाटायचे आमच्या पण वडीलांनी आम्हांला जत्रेला न्यावे, छान छान बाहुली आणावी, आमचे खूप लाड करावे. आमचेही बालपण आनंदात जावे. पण, असे काहीच घडत नव्हते. " पण, आई मात्र आम्हांला चांगले शिक्षण मिळावे. चांगले कपडे घालण्यासाठी मिळावे. यासाठी ती खूप कष्ट करायची. पण, हे लोक तेही सुख आमच्या पर्यंत पोहचू देत नव्हते. एके दिवशी तर कहरच झाला. प्रथमेशचे खेळणे माझ्या ताईने खेळायला घेतले. त्यामुळे त्याने भोकाड पसरले. ते बघून बाबांना अतिशय राग आला. त्या रागाच्या भरात बाबांनी तिच्या कानशिलात भडकावली. पण, तिला एवढ्या जोरात फटका बसला की तिच्या कानातून रक्त येऊ लागले आणि ती जागीच बेशुद्ध झाली. अचानक झालेल्या या प्रकाराने आम्ही भांबावून गेलो. आई आणि बाबांनी तिला दवाखान्यात नेले. पण, ती आम्हांला सोडून गेली. 

 झालेल्या या मारहाणीत तिने या जगाचा निरोप घेतला होता. एवढं होऊनही माझा बाप पोलिसांच्या ताब्यात नव्हता. खेळता खेळता ती खाली पडली. असे सांगून तो मोकळा झाला होता. आईच्या हृदयाच्या आत होणाऱ्या वेदना कोणालाच दिसत नव्हत्या. आजी आणि बाबांनी तर एक ब्याद घरातून गेली. असं म्हणून दुःख झटकून टाकलं. तिचं ओक्साबोक्शी रडणं आम्हांला भेदक वाटत होतं. 

 या रडण्याचा आजी आणि बाबांना सतत त्रास वाटत होता. ते तिला मारझोड करायचे. पण एके दिवशी तिने रागाच्या भरात बाबांच्या गालफडात ठेवून दिली. आपल्या बायकोने आपल्याला मारले हे त्या पुरुषजातीला सहन झाले नाही. त्याचा अंहकार दुखावला गेला. तेव्हापासून बाबांनी आईशी बोलणे सोडून दिले. ते कायमचेच. 

       तेव्हापासून आई ,माझी एक बहीण आणि मी. आमचं इ एक वेगळं विश्व तयार झालं. आता तर आम्ही बाबांच्या नजरेला सुध्दा पडत नसायचो. बाबा यायचे , खायचे आणि ढोसायचे आणि मग आईला रात्री ओरबाडायचे. कामाचा ताण, पडला की आई जास्त चिडचिड करायची. आई आणि बाबांच हे वागणं आमच्या बालमनाला सलत‌ होतं. पण, "आईने हार मानली नाही. आमच्यासाठी सगळं सहन करीत होती. ती आम्हांला शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देत होती."पण, आमचं नशीबच फुटकं , त्याला कोण काय करणार ?असे म्हणतात, काळ प्रत्येक गोष्टीवर औषधीच काम करते. 

आमचाही एक एक दिवस पुढे सरकत होता. मोठ्या बहिणीच्या दुःखातून बऱ्यापैकी सावरलो होतो. 

 म्हणता म्हणता तीन चार वर्षं कशी निघून गेली कळलेच नाही. मी आठवीत शिकत होते. बहीण नववीत गेली. पण, त्याचवेळी माझ्या बाबांनी आमच्या लग्नाचा घाट घातला. म्हणे चांगली स्थळं आणली आहेत. 

पाहू या  पुढील भागात त्यांचे लग्न आणि संघर्ष....

क्रमशः

©®सौ.आश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all