Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

अंतरीची वेदना

Read Later
अंतरीची वेदना

©️®️सायली जोशी
टीम कोल्हापूर
कथेचे नाव - 'अंतरीची वेदना'
विषय - स्त्रीला समजुन घेणं खरचं कठीण असतं का हो?
फेरी - राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

रात्रीचा प्रहर संपला आणि पहाट उगवली. वाड्यात कारभारी, सेवकांची लगबग सुरू झाली. दालनात सकाळची कोवळी सूर्यकिरणे प्रवेश करू पाहत होती. सूर्यदेवांना नमस्कार करून काशीबाई दर्पणासमोर बसल्या.
अंगावर हिरवंगार लुगडं नेसलेल्या, काळ्याभोर केसांचा खोपा घातलेल्या, कपाळावर रेखीव कुंकू, गळ्यात भरगच्च दागिन्यात उठून दिसणारे मंगळसूत्र, हातात काकणं, पायात नाजूक पैंजण आणि बोटात ठसठशीत जोडवी ल्यालेल्या काशीबाई गवाक्षातून बाहेरचे सौंदर्य पाहू लागल्या.

बघता बघता आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. हिरवाईने नटलेला परिसर क्षणात झाकोळला. हे पाहून काशीबाईंच्या चेहेऱ्यावर क्षणभर वेदना तरळली. त्यांच्या मनात विचारांची इतकी गर्दी झाली, की त्या अवघडलेल्या अवस्थेत त्या बराच काळ बसून राहिल्या.
ही 'आनंदाची बातमी' राऊस्वामींना कधी एकदा सांगते, असे झाले होते त्यांना! पण सांगावे तरी कसे?
बाहेर कुजबुज चालते म्हणे, "मस्तानीबाईंनाही दिवस गेलेत! खरंतर कानावर उडत आलेल्या या गोष्टी. काही समजतच नाहीत, ऐकल्या त्या खऱ्या की खोट्या?" राऊंची मूर्ती त्यांच्या नजरे समोरून जातच नव्हती. बाजीरावांच्या आठवणीने त्यांचा चेहरा लाजेने लाल झाला. त्यांचे राजबिंडे रूप, राजकारणातील मुत्सद्दीपणा, रणांगणावर गाजणारे त्यांचे शौर्य..'नशिबानेच मिळतो असा स्वामी. किती खुश होतो आम्ही आमच्या नशिबावर!
पण त्यांचे मन गुंतले ते एका..आता नकोच ती आठवण.' काशीबाईंनी डोळ्याला पदर लावला. 

'आज सगळी सुखं हात जोडून उभी आहेत आमच्यासमोर. त्याला गालबोट लागावं असं एकच कारण घडलं. आमची चूक काय ती अशी? स्वामींचे मन गुंतावे ते ही एका परधर्मीय, परस्त्रीत!
एका शूरवीराची पत्नी म्हणून मिरविणे अतिशय
अवघड असते आणि त्याहूनही एका पेशव्याची पत्नी असणे म्हणजे.. 
पेशव्यांच्या पत्नीस उघडपणे सगळ्याच भावना बोलून दाखवता येत नाहीत.'

काशीबाईंच्या मनात विचारांचं काहूर माजलं.  'मस्तानीबाई जाणून होत्या, आम्ही राऊ स्वामींच्या पत्नी आहोत! तरीही... त्यांचा जीव आमच्या स्वामींत अडकलाच कसा? हे काही आम्हास उमजत नाही.' एक अस्पष्टसा हुंदका त्यांच्या तोंडून बाहेर पडला. स्पुंदत राहिल्या त्या बराच वेळ. 
काही वेळाने स्वतः ला सावरून त्या हळूवारपणे उठल्या. इतक्यात त्यांची सेविका निरोप घेऊन आली, 'सासुबाईंनी बोलावल्याचा.' 

दालनात येताच राधाबाईंना नमस्कार करून काशीबाई त्यांच्या जवळ बसल्या. आपल्या सुनबाईंच्या चेहेऱ्यावरून राधाबाईंना त्यांच्या 'मनात काय चालले असावे,' याची कल्पना आली.

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर राधाबाई काशीबाईंना म्हणाल्या, "प्रसंगी कठोर व्हावं बाईच्या जातीनं. नुसती आसवं गाळून चालायचं नाही सुनबाई." 

सासुबाईंच्या बोलण्याचा मतितार्थ काशीबाईंच्या लक्षात आला. बोलावे की नाही बोलावे, मनात चलबिचल होऊ लागली. मग स्वतः ला सावरून त्या म्हणाल्या, "सासुबाई स्वामींना वाटतं, आम्ही त्यांना समजून घ्यावं आणि मस्तानीबाईंनाही. अन् आम्हास वाटते, बाईंनी आमचं मन समजून घ्यावं. आमच्या जागी राहून आमचा विचार करावा. असा प्रसंग जर त्यांच्यावर आला असता, तर त्यांनी काय केले असते? 'स्त्रीला समजून घेणं खरचं कठीण असतं का हो मातोश्रीबाई?'
आमचे मन त्यांना उमजत नाही, अन् त्यांचे आम्हास. काही उपाय सुचत नाही. त्यात हे असे 'अवघडलेपण.' म्हणतात, मन प्रसन्न असावे अशा वेळी. यास इलाज काय करावा आपणच सांगावे."
इतका वेळ रोखून धरलेली आसवं काशीबाईंच्या डोळ्यातून अखेर गळालीच.

राधाबाई समोरच्या गावक्षातून कुठेतरी दूरवर पाहत म्हणाल्या "सुनबाई.. स्त्रीचं मन समजून घेणं कठीण असतं, हे मात्र खरं आणि ते समजून घेण्याची ताकद असावी लागते, हेही तितकेच खरे. आता हेच पाहा ना..अनेक दिवसांपूर्वी राऊंसाठी त्या मस्तानीबाईंनी 'मृत्युंजयाला 'अभिषेक सांगावा आणि त्यासाठी तुम्ही परवानगी द्यावी!! नाही का?" हे ऐकताच काशीबाईंनी चमकून आपल्या सासुबाईंकडे पाहिले.

"स्त्रीच्या मागे अनेक व्याप असतात. सर्वांची मनं त्यांनाच सांभाळून घ्यावी लागतात. पुरुष जरी राज्य राखत असला, तरी स्त्रीच घरची कर्ती-धर्ती असते. घरच्या प्रत्येक व्यक्तींसोबत स्त्रीचे वागणे हे निरनिराळे असते. कारण तिला त्या व्यक्तीचे अनुभव वेगवेगळे आलेले असतात. प्रत्येक मनुष्याची वागण्याची पद्धत निराळी असते आणि प्रत्येक कृतीमागचा अर्थही निराळाच. मुळातच स्त्री सोशिक असते. सारं काही सहन करते आणि गोष्टी मनाला लावून घेते. 
सुनबाई, स्त्री ने हळवं असावं, तसं खंबीरही असावं. वेळ पडली तर प्रसंगाशी दोन हात करण्याची तयारी ठेवावी.
त्यात तुम्ही पेशव्यांच्या पत्नी, असं मुळमुळीत राहून चालायचं नाही. आज कारभारी आपणास मान देतात, तुमचे चिरंजीव 'नानासाहेब' पाठीशी उभे आहेत. त्यांना साऱ्याची उत्तम जाण आहे. त्यांच्या पत्नी गोपिकाबाई अजून पोरसवदा असल्या तरी, या सर्वांपुढे आपला चांगला आदर्श असावा, असे वागणे हवे आपले.

जीवनात असे अनेक प्रसंग येतात, जे आपल्याला कठीण वाटतात, ते स्वीकारण्यास मन तयार होत नाही. पण कधी कधी ते स्वीकारण्याविना पर्याय नसतो आपल्या जवळ. अशावेळी मन खंबीर असावं. आपल्यात प्रसंगानुरुप निर्णय घेण्याची क्षमता असावी.

आपल्या दरबारी रयत गाऱ्हाणी, समस्या घेऊन येते, दाद मागते. त्यासाठी खरं -खोटं जाणण्याची बुद्धी आपल्या जवळ असावी लागते. रयत आपल्याकडे एक 'आदर्श ' म्हणून पाहत असते. अशा वेळी आपणच माघार घेतली, तर रयतेचे प्रश्न कोण सोडविणार? त्यापुढे आपला आदर्श काय ठेवणार?
सुनबाई..जर प्रसंगाशी लढता येत नसेल तर ,जे समोर येईल ते स्वीकारण्याची तयारी ठेवावी. आता आणखी काय बोलावे आम्ही? "
इतके बोलून राधाबाईंनी आपली जपमाळ हाती घेतली. 
काशीबाई आपल्या सासुबाईंना निरखत होत्या. पतीच्या निधनानंतर न डगमगता त्या खंबीरपणे सर्वांच्या पाठीशी उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज आता थोडे कमी झाले असले, तरी किती तेजस्वी दिसत होत्या त्या! आजही त्यांच्या शब्दाला तितकाच मान होता. त्यांचा धाक, दरारा आजही कायम होता.

"सासुबाई म्हणतात ते खरेच, परिस्थिती कशीही असो, हार न मानता लढत राहावे. प्रसंगी स्त्रीला स्वतःचं दुःख बाजूला ठेवून, उभं रहाव लागतं, स्वतः साठी आणि आपल्या माणसांसाठी. स्त्रीच्या मनात नानातऱ्हेचे विचार असतात. पण त्यातल्या कोणत्या विचारांना बाजूस सारायचे अन् कोणत्या विचारांना योग्य मार्ग दाखवायचा हे तिनेच निश्चित करायचे.
"काशीबाई सासुबाईंना नमस्कार करून दालनातून बाहेर पडल्या आणि  राधाबाई आपल्या सुनेच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराचवेळ पाहत राहिल्या. काशीबाई आपल्या दालनात आल्या. त्यांनी गवाक्षातुन बाहेर नजर टाकली. काळ्या ढगांनी गर्दी केलेले आभाळ आता स्वच्छ दिसत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरील 'आत्मविश्वासाचं तेज' बरंच काही सांगून जात होत.

समाप्त

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sayali Joshi

Housewife

आपल्या मनातले शब्द जेव्हा कोणीतरी वाचतं, तेव्हा मिळणारा आनंद वेगळाच असतो.

//