अंतरीचे काहूर! भाग -२ (जलद ब्लॉग लेखन स्पर्धा)

Disturbance in mind with memories.

अंतरीचे काहूर ! (भाग -२)

- लेखिका  -©®स्वाती बालूरकर , सखी

कथा पुढे -


"अनु झालेलं काहीच नाही पण तसं होऊ नये अशी इच्छा आहे म्हणून तर सांगते. बरं एक सांग अनु, तुझं लग्न झालं, कुठल्या गोष्टीवरून तूझे व प्रसादचे छोटे-मोठे वाद होत असतील, एखाद्या वेळी भांडणही होत असेल मग तेव्हा कसं करता तुम्ही?"

" करण्याचं काय असतं ? कधी ते पडतं घेतात कधी मी पडतं घेते! आमच्या दोघांच्या बाहेर ते भांडण कधी गेलं नाही आणि आमचा राग जास्त वेळ राहतही नाही. आम्ही दोघेही सारखेच, लगेच बोलायला लागतो ."

अनघा सहज म्हणाली पण खरंच होतं ते! तिच्या लग्नाला दोन अडीच वर्षे झाली होती पण अवंतिकाने कधीच तिच्याकडून प्रसादची किंवा प्रसादकडून तिची तक्रार ऐकली नव्हती.

"पहा अद्वैत, हे असं हवंय , असंच व्हायला हवंय हेच सांगायचं होतं तुला. गौरी खूप सरळ मनाची आहे, तिच्यावर रागावत जाऊ नकोस. आमच्यासारखं काही होऊ नये एवढीच भीती वाटते म्हणून सांगतेय."

" तुमच्यासारखं म्हणजे कसं ?इम्पॉसिबल !अगं तुझ्यात आणि बाबांमध्ये कधी कुरबुर झालेली ही मी पाहिली नाही, भांडण तर लांबच. मी तर मित्रांशी शर्यत लावत असतो की आमच्या आई-बाबांचं कधी भांडण होत नाही . . म्हणजे होणे शक्यच नाही. दोघे एकमेकांना किती छान टेक करतात, ऍडजेस्ट करतात."

\" पुरे पुरे! तिला ते मनातून ऐकायलाही नको वाटलं अर्थात समाजापुढे ते खरंच होतं.

" पण अद्वैत, बाळा हे सगळं तुमच्या समोरचं आमचं रूप झालं."

" म्हणजे आमच्या माघारी तुम्ही दोघे भांडता की काय ? हे म्हणजे तू . . माझ्या आई बाबांनी आमच्यासमोर थोडा मुखवटा धारण करायचा आणि कुणी नसताना मग भांडायचं! काय असं ?" अद्वैत वेगळ्याच सुरात म्हणाला.

" आई मी प्राचीला आत झोपवून येते." अनघा प्राचीला घेवून आत गेली आणि झोपवून लगेच बाहेर आली.

" आई, तू काय एखादा "रहस्य भेद " रहस्योद्घाटन वगैरे करणार आहेस की काय ? तसं असेल तर एवढी प्रस्तावना पुरेशी आहे."

अनघाच्या या वाक्याने ती पुन्हा भानावर आली.

" हे पहा ,तुम्हा दोघांना एकत्र व एकटं पाहूनच मी हा विषय काढला आहे. एक शब्द द्या की आज मी हे सांगितल्यानंतर हा विषय तुम्ही मनातून पुसून टाकायचा ,फक्त यातून काय धडा घ्यायचा तेवढेच पहा. शिवाय आजच्या या घटनेचे पडसाद तुमच्या वागण्यावर पडता कामा नये. आम्हा दोघांपैकी कुणा बद्दल काही ही विचारात बदल होता कामा नये. हे प्रॉमिस कराल तरच सांगते!"

"हो गं आई मान्य! सांग ना आई, लवकर! किती ताणून धरतेस ?" अद्वैत खरंच उतावळा आहे तिला वाटलं , त्याला मुळी धीर धरवतच नाही.

" आई आपण किचनमध्ये बसूयात ना म्हणजे माझं कामही होईल आणि तुझं मनही मोकळे होईल.

" ठीक आहे!"

ते तिघेजण डायनिंग टेबल च्या खुर्च्या अलीकडे घेऊन बसले .

तिने विषयाला सुरुवात केली.

" माझं लग्न झाल्यापासून मी पाहत होते की मनोहरचा तुझ्या बाबांचा स्वभाव खूप तापट होता, शॉर्ट टेम्पर! म्हणजे ते मला फुलासारखे जपत आणि एखाद्यावेळी कसल्याशा गोष्टीवरून राग आला की खूप घालून पाडून बोलत. मला तर असं व्हायचं त्यावेळी वाटायचं की हे सगळं ते बोलत नाहीत ,कुणीतरी त्यांच्यात शिरून बोलतोय की काय ? इतकं ते वेगळं आणि रौद्ररूप असायचं.
मी पूर्वीपासूनच खूप स्वाभिमानी ! माहेरी उगीचच कोणीही बोललेलं मी खपवून घेत नसे, पण सासरी आल्यावर माझ्या स्वभावात मी पुष्कळ बदल करून घेतले.
त्यांचा तो तापट राग वगळता एरवी ते खूप हळवे असायचे. मला कमाल वाटायची की एकाच माणसाची दोन रूप कसली विरोधी. पण त्यांच्याशी बोलताना सतत माझ्या मनात एक धाकधूक असायची किंवा जणू कुठल्या गोष्टी वरती त्यांना राग येईल किंवा ते चिडतील.

आमचं लग्न झाल्यावरती वर्षभरातच मला पहिल्यांदा दिवस गेले , म्हणून खूप आनंदी होते. तुमचे बाबा माझी खूप काळजी घ्यायचे, हवं नको ते बघणं ,पौष्टिक खाऊ घालणं, अगदी काहीही खावं वाटलं तर ते आणून द्यायचे. त्यावेळी आम्ही दोघेच राहत होतो .
नवव्या महिन्यात मी आईकडे जाणार होते , ते दिवस कसे घालवायची या विवंचनेत मनोहर होते. आणि मग. . "

" आणि मग? काय झालं आई?"

अद्वैत पटकन बोलला.

" आणि एका रात्री आठव्या महिन्यात अचानकच माझ्या पोटात दुखायला लागलं . शेजारच्या सिंधुबाई व त्या रानडे काकू दोघींनी व त्यांच्या कुटुंबीयांनी धडपड करून मला रात्री दवाखान्यात नेलं . येणाऱ्या बाळासाठी मनोहरनी आणि मी खूप स्वप्न रंगवले होते. . . त्याच्यासाठी काय काय आणायचं? त्याचं नाव काय ठेवायचं? तो कसा असेल? कसा बघेल? पण दुर्दैव! दवाखान्यात पोहोचेपर्यंत पोटात माझा बाळ दगावलं!" तिने सुस्कारा सोडला.

" काहीतरीच काय ? आई म्हणजे मी पहिल्यांदा जन्मलो नाही तुला ?"
अद्वैत च्या चेहऱ्यावरचं तेवढं आश्चर्य अवंतिकाला अपेक्षितच होतं.
" नाही अद्वैत , ते बाळ गेल्यावर तू झालास."

" पण तू कधीच बोलली नाहीस, अगदी मलाही काही म्हणाले नाहीस?" अनघा नाराजीने.

" अनु ,अगं चांगल्या गोष्टी पटकन सांगाव्याशा वाटतात , पण हे असं सांगावसं वाटत नाही. आम्ही दोघांनी मुद्दामच हा विषय कधी काढला नाही ."

"बाबांना खूप वाईट वाटलं असेल नाही?"

" वाईटच काय विचारतोस? अरे मनोहर इतके रडले की सगळेजण समजावून थकले. मी तर रडणं साहजिकच होतं पण त्यांचं तसं मनाने कोसळणं मला अपेक्षित नव्हतं. अगदी पूर्ण रंगवलेले एखादा चित्र नजरेसमोर फाटून जावा तसं झालं होतं. अगोदरच दोघांचं बोलणं आठवायचं आणि सारखे डोळ्यात पाणी यायचं.
मनोहर ना लहान मुलाचे छोटे- छोटे कपडे आणण्याची खूप हौस होती . सगळं कसं कोसळल्यागत झालं. त्यानंतर माझीआई आणि सासूबाई दोन-तीन महिने येऊन राहिल्या.
माझ्यातलं आणि मनोहर मधलं बोलणं खुंटल्यासारखं झालं होतं. काय बोलणार? एकमेकांकडे पाहिलं तरी पूर्वीचे सगळे आठवायचं त्याच्यातही त्यांनी मला खूप जपलं .स्वतः दुबळे असूनही मला समजवायचे."

" मग मी ? कधी जन्मलो ?" अद्वैत मध्येच म्हणाला.

क्रमशः 

लेखिका  - स्वाती  बालूरकर, सखी 

दिनांक  १९. १०.२२

🎭 Series Post

View all