Mar 01, 2024
प्रेम

अंतरंग भाग अंतिम

Read Later
अंतरंग भाग अंतिम

अंतरंग:- (भाग अंतिम)

तो कॅन्टीनमधून सगळं घेऊन आला तेव्हा ती आणि तिचे बाबा त्याचीच वाट पाहत होते.  तो आल्यावरती ते म्हणाले " थांब राहू दे, आपण घेऊ या ते थोडयावेळाने.....
तोपर्यंत मला तुझ्याशी बोलायचे आहे...असे म्हणून त्यांनी ते पार्सल ठेवले. 
त्यांनी विवेक ला काही गोष्टी विचारायला सुरवात केली
 " कुठे राहतो?
"शंकर नगर ला"
" घर स्वतःच आहे का ?"
"नाही भाड्याचे..."
" आई काय करते? 
"ट्युशन घेते"
" तुझ्या काय ईच्छा आहेत ?"
"आईला आनंदी ठेवायचे आहे"
" तुला काय करायचं आहे पुढे?" 
"काही वर्षे जॉब नंतर एंटरप्रेनर शिप"
"B. SC ला कुठले स्पेशलायझेशन ठेवायचा विचार आहे?"
"इलेक्ट्रॉनिकस"
"आणि पुढे?"
"M. Sc"

त्याची ही उत्तरे ऐकल्यावर ते म्हणाले " विवेक, माझी एक स्वतःची फॅक्टरी आहे आणि तिथे मी काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी बनवतो. 
तू B. SC करतोय, जर B. SC इलेक्ट्रॉनिक्स पुढे घेणार असशील आणि त्यानंतर तू M. SC करणार असशील तर तू बिनधास्त कर....माझी तुझ्यासाठी खास एक ऑफर आहे...

"काय?" त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते....

 तू आत्तापासून या फॅक्टरी ला जॉईन होऊ शकतोस. 
माझा तुला शब्द आहे की जर तू काम चांगले केलेस तर तुला या कंपनीच्या टॉपमोस्ट पोझीशन ला घेऊन मी जाईन.  
त्याकरीता तू फक्त चांगले काम करणं एवढेच मला अपेक्षित आहे बाकी काही नाही."

" पण...."

"तुझ्या बाबतीत बाकी काहीच तू बोलू नको जे काही बोलायचं, जे काही ऐकायचं आणि जे काही पाहायचं ते मी ऑलरेडी ठरवले आहे....
तु फक्त काम कर छानसं काम कर ! जमेल का?"

विवेक ला कळेचना की काय बोलावं ते. त्याला 'निला'च्या डोळ्यात प्रचंड चकाकी दिसली आणि चेहऱ्यावर अतिशय उत्साह! 
तिने भुवया उंचावून विचारले " काय जमेल का ?" 
 
त्याने तिच्या वडिलांकडे पाहिले तर ते पण त्याच्याकडे बघून फक्त हसत होते. 
तो म्हणाला " मी तर फक्त पार्ट टाइम जॉब शोधत होतो!"

"तू आता पार्ट टाइमच कर! काही आता फुल्ल टाइम करू नकोस आणि जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू फुल्ल जॉईन कर आणि सुरवातीला मी तुला ग्रॅज्युएशन नाही तर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या मुलाची सॅलरी देईन...त्यामध्ये तुझे, तुझ्या आईचे सगळे भागेल आणि शिवाय काही  पैसा शिल्लक ही उरेल......

मला हवाय की तू आता फक्त 18 वर्षाचा आहेस आणि वयाच्या 25 व्या वर्षी स्वतःच्या घरामध्ये आईला घेऊन शिफ्ट झाला पाहिजे....तुझ्या आईला जे तुला आनंदी ठेवायचे आहे त्यात तू हे स्वप्न पूर्ण करून तिला अर्पण कर..."

आता पहिल्यांदाच विवेक च्या डोळ्यांत पाणी तरळलं! 
खूप प्रयत्न करुनसुद्धा ते पाणी काही परत जाईना आणि ते धाडकीने खाली ओघळलेच.....

तिच्या बाबांनी त्याच्या खांद्यावरती थोपटले आणि म्हणले 
"You are a bright boy!   तुझं भविष्य आपण सुपर ब्राईट करूयात."

ते ऐकल्यावर विवेक एकदम हमसाहमशी रडायला लागला. त्याच्या भावना तिथे थांबेनात, खूप जड झालेलं त्याचे जे अंतरंग होते ते त्याने तिच्यापाशी व्यक्त केलं होतं आणि ते मोकळं केल्यावरती लगेच एवढी मोठी संधी मिळेल हे त्याला चुकूनही वाटलं नव्हतं.....

अंतरंग इतके दिवस जड ठेवल्याने त्याच्यावरती जो परिणाम झाला होता त्या परिणामांची सीमा ही आज त्याच्या भावनेतून बाहेर पडली होती....

त्याच्या भावनांचा वेग ओसरेस्तोवर दोघेही काही बोलले नाही.....

 तो थोडा सावरल्यानंतर तिच्या बाबांनी तिघांसाठी त्याने ज्या खाण्यासाठी आणलेल्या गोष्टी होत्या त्या एका मोठ्या प्लेट मध्ये घेतल्या आणि आवडीने त्यांनी डोसा खायला सुरवात केली आणि त्या दोघांनाही आग्रह केला. 

"मस्त आहे डोसा..."
"तू पण घे ना विवेक" नीला त्याला म्हणाली...
"घे रे...सँडविच आणि फिंगर चिप्स पण वाट पाहत आहेत तुझी.." ते हसत म्हणाले..

प्रचंड लाजत त्याने हळू हळू खायला सुरवात केली....
त्याच्या लाजून खाण्याच्या पद्धतीला पाहून नीला हसायला लागली...
बाबांना पण थोडे थोडे हसू येत होते....
त्या दोघांचे हसणे पाहून तो पण थोडासा हसायला लागला...
शेवटी सगळेच जण हसायला लागले...
त्याचे अनेक वर्षांचे जे दडलेलं हास्य होत ते हळूहळू बाहेर पडायला लागले..... 

या हसूमध्ये त्याला विश्वास होता स्वतःबद्दल चा, त्याच्या खात्रीशीर भविष्याचा, आणि विश्वास होता की तो आयुष्यात पुढे जाणार याचा.
 तिच्या बाबांच्या डोळ्यात त्याच्या भवितव्याबद्दल कुठलीच चिंता नव्हती आणि नीला आपण आपल्या एका मित्राचे आयुष्य बदलू शकण्यामध्ये काहीतरी हातभार लावू शकतो  या भावनेने अत्यंत प्रेरित झाली होती...

तिच्या दृष्टीने तिचा झालेला अक्सिडेंट ही खरोखर योग्यच गोष्ट होती कारण या अक्सिडेंट ने तिला बऱ्याच गोष्टी मिळवून दिल्या होत्या.....

हळूहळू विवेक च्याही लक्षात आलं की अपेक्षाविरहित मैत्री हीअसू शकते आणि यालाच कदाचित निखळ आणि निस्सीम मैत्री म्हणतात ......
या मैत्रीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अगदी सहजतेने घडतात..... आणि अशी सहज सुलभ झालेली मैत्री ही चिरकाळ टिकते....
 प्रत्येक व्यक्तीला आपण एकाच फ्रेम मधून पाहून बंद केलं तर माणसे ओळखाण्यात आपण चूक करू शकतो...

त्याने त्याचे डोळे नीट पुसून पाहिले तर आज हॉस्पिटलच्या त्या प्रायव्हेट रूम मध्ये त्याला खऱ्या माणसांची ओळख पटली होती कारण त्याच्या मनाचं अंतरंग इथंच ओपन झालं होतं....ज्यातून त्याला इतरांची अंतरंगे स्पष्ट वाचता येत होती ज्यामध्ये त्याला स्वतःचा चेहरा प्रचंड उजळलेला दिसत होता! 

आणि का नसावा, त्याच्या उजळलेला चेहऱ्याच्या मागे दडले होते एक उज्ज्वल भविष्य....आणि हीच तर खरी सुरुवात होती त्याच्या निखळ मैत्रीची-असामान्य कर्तृत्वाची-आणि येणाऱ्या चांगल्या दिवसांची!

समाप्त
©®अमित मेढेकर


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Amitt Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!

//