Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

अनाकलनीय चौकट

Read Later
अनाकलनीय चौकट

ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

*कथेचे नाव:- अनाकलनीय चौकट
*विषय* - स्त्री ला समजून घेणं खर्च कठिण असतं का हो?
*फेरी :- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा*
लेखिका  ©® स्वाती बालूरकर,सखी
*जिल्हा - संभाजीनगर
अनाकलनीय ‌चौकट!

चौकट शब्दातच एक प्रकारचा बंदिस्तपणा आहे.
का कुणास ठाऊक असं वाटायला लागतं की चौकटीतला माणुस कुठल्या तरी सत्तेखाली आहे मग ते घरातलं माणूस असो की बाहेरचं!

खिडकी किंवा दरवाजा , त्याला एक चौकट असतेच काही रूढी प्रथा -परंपरा आपण स्वत वर घालून घेतल्या आहेत आणि हळूहळू त्या पण आपल्या नकळत मर्यादा किंवा चौकट बनत गेल्या आहेत.

ज्या दिवशी आपलीच मर्यादा आपण तोडतो तेव्हा कुठेतरी एक अपराधी भावना माणसाच्या मनात यायला लागते.

प्रत्येक वेळी त्या मर्यादा किंवा चौकट तोडण्यासाठी शिक्षा होतेच असं नाही पण अपराधी भावनेची बोच सर्वात वाईट असते ती राहतेच एक न संपणारी शिक्षा बनून!


आज केतकी अशीच निघाली पावसात!

निघाली होती छत्री घेवून पण मनातला सोसाट्याचा वारा बाहेरच्या वार्‍यापेक्षा जास्त तीव्र होता.
हातात अवसान राहिलं नव्हतं , छत्री सुटली, उडून गेली. . . तिनेही सोडून दिली.

आता काहिच धरून ठेवण्यात स्वारस्य नव्हतं.

तशीच भिजत- भिजत रस्त्याने येत होती, ती घरी परतत होती कुठलं घर ? व खरच तिचं घर होतं का ? तिलाच याचं उत्तर माहित नव्हतं.

दुपार संपून संध्याकाळ होत होती. . . पावसाने जशा दिवसा पडण्याच्या मर्यादा तोडल्या होत्या आज . . तसंच आज तिच्या मनाने जणू सगळ्या सीमारेषा व मर्यादा सोडल्या होत्या.
कदाचित त्या थकलेल्या किंवा विद्रोही मनाने शरीरालाही मोकळीक दिली होती.

तिने आज काहीतरी अनाकलनीय काम केलं होतं.

स्वत ची चौकट स्वतः ताेडली हाेती,हो पण का ? हे तिला देखील माहीत नव्हतं.

ती त्या गोष्टींचाच विचार करत आज घरी येत होती.

मनात विशेष इच्छा नसतानाही ती त्याला भेटायला गेली होती.

त्याचं गोड बोलणं , त्याची विनम्रता,त्याचा साधे सरळपणा आणि यादरम्यान त्याचं प्रेम व्यक्त करणं, तिला तिथे जाण्यास प्रवृत्त करत होतं.

" त्याचं प्रेम व्यक्त करणं यातल्या सुखापेक्षाही ज्या माणसाने तिच्याजवळ प्रेम व्यक्त करावं त्याने न करणं! " हे या गोष्टीचे मूळ कारण असू शकते.

आपली कुणालाच कदर नाही आणि ज्याला मी माझं मानते त्याच्या लेखी मी काहिच नाही या गोष्टीचा त्रास तिला अधिक होत होता .

तेरे जहाँ में ऐसा नहीं कि प्यार न हो
जहाँ उम्मीद हो उसकी वहाँ नही मिलता!

अशी काहीशी अवस्था होती. भरभरून प्रेम दिलं होतं पण प्रेम घेण्याची सवयच नव्हती जणु!

चालता चालता चित्रपटाप्रमाणे सगळा भूतकाळ नजरे समोरून जात होता.

नाकासमोर सरळ आयुष्य जगलेल्या तिला तो नवरा म्हणून मिळाला होता.

त्याला ती पसंत होती की नाही याचीही तिला कल्पना नव्हती. घरच्या लोकांनी संमतीने लग्न ठरवलं होतं. लग्न झालं.

चारचौघांप्रमाणे सगळं सरळ- सरळ होत गेलं. अन आता तिला जाणवत होतं की आपण माणुस -एक स्त्री किंवा एक पत्नी म्हणून कधी काय जगलोय?

लग्नाला दहा अकरा वर्षे झाल्यानंतर तिच्याही लक्षात आलं की ज्याच्यासाठी आपण दिवसरात्र झटतो त्याला आपल्या कष्टाची किंमत नाही, आपल्या असण्याची किंमत नाही, त्याला फक्त सवय झालीय किंवा त्याची सोय होतीय म्हणून आपण त्याच्यासोबत आहोत.

त्याच्या बोलण्यात वागण्यात असलेला ओलावा नष्ट झाला होता पण तिला कळालंही नाही.
तिचं मन किती कळंलं होतं त्याला? नाहीच.

घरातल्या जबाबदाऱ्या त्याने तिच्यावर टाकल्या होत्या, म्हणजे संसार तिच्यावर टाकून तो निर्धास्तपणे बाहेर पडलेला होता.

केतकी बाहेर पडू शकली नाही पण घरातल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून गेली होती.
आता मात्र मनात घुसमट व्हायला लागली होती .
नेमकी तिला मानसिक गरज किंवा शारिरीक ओढ असेल त्यावेळी तो नसायचा.

आजही उदास आताना त्याची गरज तिला होती पण तो नव्हता तिच्यासोबत .

त्याला मूड किंवा शारिरीक गरज असेल तेव्हा ती होती , गृहित धरलेली.

कदाचित रात्रीचा सोबत राहत असेलही तो पण भावनेनं किंवा शब्दाने तो तिच्याजवळ कधीच नव्हता.

त्या शारीरिक गरजे शिवायही सहज कधीतरी त्याने तिला जवळ घ्यावं, तू थकलीस का विचारावं, कधी स्वयंपाकघरात येऊन छेडून जावं, कधीतरी मस्त दिसतीयस म्हणावं, कधीतरी दोघेच सिनामाला जाऊयात ना अशी गळ घालावी असं काही बाही सोपं तिला वाटे पण ते कधी घडलंच नाही.

तो किती थकला आहे, तो परिवारासाठी किती त्रास घेतो आहे हे सततच्या ऐकवल्याने तिला न्यूनगंड निर्माण झाला होता.

म्हणजे तोच काम करतो व मी कुठल्याच दृष्टीने कामाची नाही, हळूहळू अशी एक भावना तिच्यामध्ये यायला लागली. घरात कधीकधी दुर्लक्ष व्हायला लागलं पण याचे परिणाम विपरीतही झाले.

तिच्या कामातल्या तरबेज पणामुळे हळूहळू \"नात्याने तिच्या नसलेल्या \" सर्कलमध्ये देखील तिचं नाव व्हायला लागलं.

अपार्टमेंटमधल्या बायकांमध्ये, गणपतीच्या महिला स्पर्धांमधे , मुलांच्या पेरेंट टीचर मिटींगमध्ये तिच्या वागण्याने, तिच्या दिसण्याने ,तिच्या बोलण्याने काही लोक इम्प्रेस होऊ लागले.

हे सगळं लवकर तिच्या लक्षात आलं नाही आणि एक दिवस कुठल्या तरी एका पीटीएम मध्ये मुलीच्या क्लासमधले समीक्षा भट्टचे वडील तिच्याशी बोलायला लागले.

स्टॉपवर मुलांना सोडायचं काम ती करायला लागली होती त्यामुळे स्कूल बसच्या ठरलेल्या वेळी त्यांच्याशी बोलणं होऊ लागलं.
ते मागच्या गल्लीत नवीन बिल्डिंग मधे शिफ्ट झाले होते व समीक्षा तिच्या मुलीची चांगली मैत्रिण होती.

हळूहळू त्याचं हे बोलणं वाढत गेलं आणि ते कधी मैत्रीत बदललं तिलाही कळलं नाही.

तिला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की एक पुरुष इतका हळवा असू शकतो. त्याच्या मनात इतका भावनिक कोपरा असू शकतो ,हे तिला माहीत नव्हतं.
ते तिने पहिल्यांदाच अनुभवलं होतं.

वडिल रागीट स्वभावाचे व सासरे फारच शांत व तटस्थ स्वभावाचे. नवरा तर एकदम प्रॅक्टिकल व यांत्रिक! असा पुरूष पसहण्यात नव्हता.

एक दोन वेळा त्यांचे शाळेत प्रत्यक्ष बोलणंही झालं होतं पण पुढे मैत्री होईल असं कधी वाटलं नाही.

एक दोनवेळा मुलांना कुठेतरी बर्थडे पार्टीला सोडण्याच्या निमित्ताने त्यांचं भेटणही झालं होतं.

तिच्या मनात हळुहळू त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला. तो सॉफ्ट कॉर्नर जेवढा गहिरा होत होता त्याच वेळेला तिचा नवरा अमित मात्र तिच्यापासून तितकाच दूर जात होता.

या नात्याला जे वेगळं वळण मिळालं ते एका अनपेक्षित घटनेने!

एके दिवशी तिच्या किट्टीच्या मैत्रिणींसोबत ती पिकनिकला गेली होती. मुलगी दोन दिवसांची सुट्टी म्हणून मावशीकडे गेली होती.

पिकनिकलाही तिने पहिले नकारच दिला होता.

पण तिने सगळी सोय करून मैत्रिणींसोबत दिवस घालवावा म्हणून त्यांनी खूप आग्रह केला.

सगळी तयारी करून आनंदाने ती सोबत गेली.
खूप आनंदी होती.

जेवण झालं आणि पिकनिकच्या मध्येच अवेळी अचानक पोस्ट पिरीयडस मुळे कदाचित तिला पोटात प्रचंड वेदना व्हायला लागल्या .
त्यामुळे ती तिच्या एका मैत्रिणींसोबत परत आली. वेदनेसाठी दवाखान्यात दाखवलं , औषध गोळ्या घेऊन ती घरी परतली.

तिने लॅचने कुलूप उघडले अन वेगळीच फीलिंग आली. घरात कुणी नसताना आणि असतानाचा फरक असतो, तो तिला जाणवला.
तिचा नवरा तर रोज रात्री साडेनऊ च्या आधी कधीच यायचा नाही.

संध्याकाळी सहा वाजता तो घरात होता, हो तो एकटाच नाही कुणीतरी आहे.
दबक्या पावलांनी बेडरूम पर्यंत गेली. तिने नवऱ्याला एका दुसर्‍या स्त्री सोबत अति संलग्न अवस्थेत पाहिल्यावर आणि ते लाडिगोडीचं बोलणं ऐकल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

त्याला काहीही न सांगता-बोलता ती हळूच बाहेर आली ,तिने तसेच दार लावले आणि पुन्हा त्या मैत्रिणीकडे जाऊन रडत बसली .

कुणाजवळ तरी हे सांगावं बोलावं तर नवऱ्याचा अपमान. . . त्यापेक्षाही तो तिचा अपमान जास्त वाटला. जीव गुदमरत होता. मैत्रिणीला वाटले की पोटशूळ असह्य झालाय.

मन विचारत होतं, "माझ्याकडून यांना काय कमी पडलं असेल जे नकोसं कृत्य करण्याची गरज पडली. माझ्याच घरात . . . माझ्याच खोलीत . . . आमच्याच बेडवर जर पुरुष चौकट तोडू शकतो तर माझी काय चूक?
त्याला हे सगळं माफ का?"

मन म्हणत होतं ,\"आईचं काळिज आहे ,मी त्या माणसापासून विभक्त होऊ शकत नाही कारण तो माझ्या मुलीचा बाप आहे.\"

\"विभक्त होण्याणं काय होईल? काही नाही, चारचौघात तेवढी त्याची नाचक्की होईल
एवढंच .\"

\"माझी फॅमिली तर तुटेलच मग कोर्ट कचेऱ्या करून मी काय साधणार आहे? शिवाय पुन्हा मला वेगळं व्हावं लागेल.\"

\"आईवडील थकलेत, निवृत्ती नंतर त्यांच्यावर भार कसा टाकू? तिथेही स्वाभिमान असला पाहिजेच! ती त्याच्यावर अवलंबून आहे फारतर स्वावलंबी होईल.\"

\"मग एकटीने संघर्ष करून त्याला मोकळंका सोडायचं ? का?\"

तिला ती स्टेप त्यावेळी योग्य वाटली नाही.

मनात विचारांचं काहूर अन कल्लोळ!

तिला त्या क्षणी फक्त एकच वाटलं की "तिला चौकटीत राहण्याची शिक्षा मिळालीच पाहिजे
किंवा मग त्याला चौकट तोडल्याची!"

त्या रात्री ती मैत्रिणीकडेच राहिली, घरी कुणी नाही असं कारण सांगितलं पण रात्रभर विचार करत राहिली.

आठवडाभर ती जणू एखाद्या मृत शरीरासारखी फिरत होती.

घरातल्या त्याला विशेष लक्षातही आलं नाही.

त्यादरम्यान एक दोन वेळेला मि.भट्ट यांची भेट झाली आणि त्यांनी विचारलं "काही प्रॉब्लेम आहे का? असेल तर माझ्यासोबत शेअर करा."

\"कसं शेअर करणार आणि काय शेअर करणार?\"

कुठल्याही मैत्रिणीला सांगितलं तर ती हेच सांगणार की त्याला सोडून दे , डिव्होर्स घे? घटस्फोट घ्यावा का?

एकटी उभी रहा वगैरे म्हणाले पण हा पर्याय नव्हताच.

बोलावं वाटलं म्हणून दोन वेळा मि. भट्ट यांना कॉल केला. पण बोलायला सुरू केला पण मग तिने कॉल कट केला .

तिसर्‍यांदा त्यांचा फोन आला आणि तिला विचारलं "तुम्ही नेहमीसारखा नाही आहात , काही अडचण आहे का?"

"मी ठीक आहे. मजेत."

"तुम्ही आतून खूप दु खी व एकट्या वाटताहात . काही झालंय का ?"

"नाही मि. भट्ट!"

"बघा केतकी मॅडम ,माझ्याकडून काही मदत हवी असेल तर एक मित्र म्हणून मी केव्हाही तयार आहे !"

इतक्या आपुलकीनं चौकशी करणारा तिला आयुष्यात कुणीच न भेटल्याने असेल कदाचित ती रडायला लागली.

त्याने विचारलं की "मी भेटायला येऊ का ?"

ती म्हणाली "नाही ,नको"

"बाहेर भेटूयात का ?"

" बाहेरही नको!"

" मग एक काम करा ,तुमची मनस्थिती बरोबर दिसत नाहीय ,तुम्ही माझ्या घरी या!"

संमोहित झाल्यासारखी ती निघाली, होती तशी त्याच साडीवर.

आयुष्यातली कदाचित ती तिची सर्वात सुंदर संध्याकाळ असेल.

एखाद्या मित्रासोबत इतकी सुंदर संध्याकाळ त्यांनी बनवून पाजलेली कॉफी, सोबतचे पकोडे, तसंच जिव्हाळ्याने चौकशी करून त्याचं इतकं अदबीनं मर्यादेत राहणं सगळंच तिला भावून गेलं.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला कळालं की तो एकटा आपल्या मुलीला घेऊन राहत होता.
बोलण्यात समजलं की त्याची बायको खूप भांडकुदळ होती. \"तिला हवा तितका पगार नाही व तुम्ही माझी हाऊस पुरवू शकत नाही\" या कारणाखाली ती त्याला सोडून गेली होती .

तिच्या घरच्या श्रीमंतीचं उदाहरण देऊन याला आणि मुलीला इथेच एकटं सोडून तिच्या एका मित्रासोबत निघून गेली होती.

चंदीगढहून तिने डिव्होर्स पेपर्सही पाठवले होते.

केतकी थक्कच राहिली.

इतक्यांदा शाळेत किंवा बस स्टॉपवर भेटल्यानंतर, फोनवर किंवा मेसेजमध्ये कधीच त्याने स्वत चं दुःख व्यक्त केलं नव्हतं.

आज तिला हिंमत देण्यासाठी त्याने हे सांगितलं, कुठल्याही तक्रारी शिवाय.

यावेळी तिला त्याचा खूप आदर वाटला.
ती घरी परत आली.

हीच तर अपेक्षा होती तिला जोडीदाराकडून ,अजून काय लागतं जीवनात?

एक भावनिक नातं, एक भावनिक बंध कुणीतरी तुमची काळजी करणारं ज्याला तुमची किंमत आहे, कदर आहे, असं कुणीतरी!

ती घरात तशीच यंत्रवत राहत गेली.

त्यादरम्यान सासू सासरे सुद्धा दिराकडे राहायला गेले होते .

त्यामुळे ती, तिची मुलगी आणि घरातला दिवसेंदिवस अनोळखी होत चाललेला तो!

एखाद्या कॉल तरी त्याच्याशी कल्पक भट्टशी व्हायचाच.
नुसतं त्याच्याशी फोनवर बोलून देखील तिला हलकं वाटायचं.

घरात कधीकधी ती नवर्‍याच्या स्पर्शाला आसुसलेली असली तरीही सांगू शकली नाही.

त्यांनेही यादरम्यान इंटरेस्ट दाखवला नाही किंवा मग हिनेही पुढाकार घेतला नाही .

कारण पुढाकार घ्यावा असं वाटलं की तिला ते बेडरूम मधलं दृश्य आठवायचं आणि आपण फसवलो गेलोय असं तिच्या मनात राहून राहून वाटायचं. मग या माणसाला कसा स्पर्श करायचा किंवा करू द्यायचा ? असं काहीसं द्वंद्व सुरु व्हायचं आणि इच्छाच मरून जायची.

त्याने ही तिच्याकडे विशेष लक्ष दिलं नाही.

सतत तिच्या मनात बदला घेण्याची भावना वाढत राहिली.

पण तो बदला तिला दुसऱ्यांसारखा घ्यायचा नव्हता.

ते त्याच्या प्रेयसीला रागावणे , दम देणे किंवा मारणे किंवा नवऱ्याला काही बोलणे, घटस्फोट देणे , अपमान करणे हे तिला करायचंच नव्हतं.
त्याच्यापासून विभक्त होणे, केस करणे वगैरे यातलं काहीही तिला काहीही करावच वाटलं नाही.

आता तर तिला असं वाटत होतं की अशा माणसावर विश्वास ठेवला म्हणून शिक्षा तिला झाली पाहिजे ,
किंवा
मग दोघांची बरोबरी झाली पाहिजे. . . त्याने फसवलं मग मी ही फसवेन!

तो भ्रष्ट झाला तर मी ही होईन!

म्हणजे मनात ही खंतच नको की आपण एकनिष्ठ आहोत आणि तो नाही! पण जगायचं सोबतच! संसार मोडायचा नाही.

हा आजचा दिवस होता! नवर्‍याला सकाळी कुणाशी तरी फोनवर हसून खेळून काहीतरी प्लान बनवताना ऐकलं. किती रोमँटिक सूर होता. तिने कधीच स्वतःसाठी न ऐकलेला.

बाहेर आभाळ भरून आलेलं होतं, तिच्या मनाचंही आणि बाहेरचं आभाळ बरसेल कधीही पण तिच्या भरलेल्या मनाचं काय?

एकाक्षणी मनातले हे सगळे विचार इतके तीव्र झाली की तिचा तिच्या मनावर आणि शरीरावर ताबा राहिला नाही.

तिने कल्पक भट्टला फोन केला आणि विचारलं "घरी आहात का?"

तो घरीच होता ,या म्हणाला.

ती सैरभैर होऊन निघाली, छत्री व पर्स घेतली.

रिक्षाने पोहोचली.
का कुणास ठाऊक त्याच्या घरातले सुगंधी वातावरण, मंद लागलेले संगीताचे मंजूळ सूर, तिथले रम्य वातावरण आणि शांतता तिच्या मनाला इतकी भावली की मनातला क्षोभ डोळ्यातून बरसला.
केतकी गेली आणि कल्पकला पाहता क्षणी घट्ट मिठी मारली.
किती वेळ तरी तिने त्याला सोडलं नाही.

\"आज मला सांभाळून घ्या, मी कोलमडलेय. \"

त्याने एक दोनदा विचारलं ,"काय झालंय?"

ती काहीच बोलत नव्हती आणि मग ती तशीच बिलगून खूप रडायला लागली.

त्याने तिला मनसोक्त रडू दिलं , मग शांत बसवलं .
" मी तुझ्यासाठी काय करू शकतो? सांग नक्की करेन!"

तिने तिचे दोन्ही हात आपल्या गालावर ठेवले आणि म्हणाली "आज या क्षणी मला एकटं पडू देऊ नकात कल्पक , मनाने आणि शरीरानेही!"
तो चरकलाच.
"केतकी काय झालंय सांगशील का? "

"माहित नाही पण या क्षणी असं वाटतंय की तुम्ही समुद्र आहात आणि मी नदी, तुमच्यात सामावून गेले तरी हरकत नाही. त्यामुळे तरी मला हलकं वाटेल."

कल्पक भट्ट ला कळेना कसे वागाबे. ती तचयाला आवडायची पण तो खूप सन्मानाने वागवायचा तिला.

" तू दुखी राहू नकोस , कितीदा सांगितलं तुला. तू मला आवडतेस पण तुझ्या मर्जी शिवाय मी तुला कधी स्पर्श करणार नाही,असं तुला मी अनेकदा सांगितलय. चांगली मुलगी आहेस विचार कर!"

"मित्रा तुम्ही एकटे पुरुष असूनही किती मर्यादित राहता हे मी पाहिलंय , अनुभवलंय! मी हात हातात दिल्याशिवाय तुम्ही कधी हातही मिळवला नाही. वासना तर तुमच्या स्पर्शात किंवा डोळ्यात कधीच दिसली नाही."
"मग काय झालंय केतकी?"

"तुम्ही आजूबाजूला असताना किती सेक्युलर व सुरक्षित वाटतं मला. म्हणूनच म्हणते मला प्रेम द्या कल्पक, खूप एकटं वाटतंय, मला आज सांभाळून घ्या."
कल्पकने तिला जवळ घेतलं. कितीवेळ तिच्या तळहातांना बोटाने चोळत राहिला. कपाळावर चुंबन घेतलं आणि घट्ट मिठी मारली. केतकी खूप शांत व आश्वस्त झाली.

त्याच्या छातीवर डोके ठेवून तिथेच सोफ्यावर पडली होती. त्याचे हात हळू हळू तिच्या केसातून फिरत होते. तान्या बाळाला थोपटतो तसे तिला थोपटत होता. किती प्रेमळ व हळूवार स्पर्श होता तो!
पण या सगळ्याने तिच्या शरीरात तिला नैसर्गिक हालचाल जाणवली अन संमोहन उतरल्याप्रमाणे ती भानावर आली.

केतकी आयुष्यात पहिल्यांदा नवरा सोडून दुसऱ्या पुरूषाच्या इतकी जवळ गेली होती.
त्याने कुठेच घाई न करता तिला वेळ दिला होता.

अजूनही मर्यादेच्या चौकटीत होती ती आणि हरवणार होती ,त्याचवेळी तिला भान आलं.

ती म्हणाली "मी इथे कशी आले? मी इथे काय करतीय? हे चूक आहे. " तिच्या लक्षात सगळा प्रकार आला व हात जोडून कल्पकची माफी मागायला लागली.

"सॉरी कल्पक इथेपर्यंत आले पण यापुढे माझी मर्यादा मी नाही सोडू शकत. संस्कारच नाहीत तसे!"

" हरकत नाही केतकी, काळजी घे व सांभाळ स्वतःला."

तो चटकन दूर झाला.

" माझ्यासाठी हा क्षण सगळ्यात कठीण होता आणि आहे . तू समजू शकतेस ! पण एक सांगू ? माझ्यात पुरुषापेक्षा एक बाप जास्त वसलेला आहे,समीक्षाचा बाबा आहे ना माझी ओळख! केतकी रडू नको , तुझ्या मर्जीशिवाय कधीच नाही. आणि हो मी आहे! नेहमीच आहे सोबत !"

केतकी लहान मुलाप्रमाणे त्याला बिलगली व त्याच्या हाताचे चुंबन घेवून सॉरी म्हणाली.

" काहीच प्रॉब्लेम नाही. घरी जाशील नीट? की मी ड्रॉप करू?"

" नाही , नको. मी जाईन!
आणखी एक-
मी असं का वागतेय त्याचं कारण फक्त मी जाणते कल्पक. . . ते माझ्यापुरतं बरोबरही आहे. फक्त मी समजाऊ शकणार नाही. माफ कराल?"

"यू आर अॉलवेज वेलकम केतकी! मी आहे, नेहमी सोबत आहे . ओके. घरी गेलीस की कळव. बाय!"

त्याच्या मनातला कल्लोळ तोच जाणत होता पण ते काही गूढ नव्हतं . स्पष्टच होतं.

तिने पटकन पर्स लटकावली, छत्री घेतली व निघाली.

बाहेर पाऊस बरसत होता, तिच्या डोळ्यातूनही!

चालता येत नव्हते, वारं सुटलेलं, छत्री उडत होती तिने ती सोडून दिली होती.

काहीही पकडून ठेवण्यात तिला आता स्वारस्य राहिलं नव्हतं.

आज तिलाच कळत नव्हतं की तिला नेमकं काय हवंय ?

घरी तर जायचंच, संसार मोडायचा नाही. पण हो मी नवर्‍याला शिक्षा दिली , हो मी स्वतःलाही शिक्षा दिली. . . . की प्रायश्चित्त घेतलं? कळत नव्हतं . घर जवळ आलं.

यांत्रिकपणे कल्पकला मेसेज पाठवला , "घरी पोहोचलीय."

कल्पक विचार करत होता स्त्रीला समजून घेणं खूप अवघड आहे, खरंच स्त्रीला समजणं खूप कठीण आहे !
स्त्री चरित्र गहन आहे!

समाप्त

लेखिका - ©® स्वाती बालूरकर, सखी
दिनांक ०६. ०८ .२०२२
जिल्हा संघ- संभाजीनगर टीम ईरा


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Swati Balurkar, Sakhi

Hindi teacher in CBSE school

I swati Balurkar, working as Hindi teacher in CBSE school in Aurangabad at present. Having 25 years of experience in teaching. worked 23 years in Hyderabad . 1990-1994 I wrote many stories n poems and got published. After break started writing in July 2018 again. I am published writer on PRATILIPI MARATHI and STORYMORROR.

//