अनपेक्षित वळण

एका बाईपेक्षा एक 'आई' ही नेहमीच स्ट्रॉंग असते आणि आयुष्यातील एक वळणं हे संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारं असतं.

"राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा"


विषय- स्त्री आणि परावलंबित्व


शीर्षक - अनपेक्षित वळण


        आजही दिवसभर तिची पोरगी तापाने फणफणलेली. दिवस सरून सायंकाळने पाठ फिरवलेली . तिचा जीव काळजीने खालीवर होत होता . तिची पोरगी निपचीत पडून होती . पोरीला भाताची पेज तरी करावी म्हणून ती उठली .  


तांदळाच्या डब्याच झाकण काढून 

पाहिलं तर आत मध्ये तांदळाचा एक दाणा सुद्धा शिल्लक नव्हता. तिने एकदा डबडबलेल्या डोळ्यांनी तांदळाच्या डब्याकडे पाहिलं . पुन्हा आपल्या निपचित पडलेल्या मुलीकडे पाहिलं. तिला तिच्या गरिबीची घृणा वाटली . तिने डबा ठेवून दिला आणि लंगडत लंगडत पुन्हा आपल्या मुली जवळ येऊन बसली . 



     तिने गुडघा पाहिला तर गुडघ्याची वाटी अजूनही काळी निळी होती . आठ दिवसापूर्वी उपासमारीने कंटाळून ती चोरून पॅकिंगच्या कामावर गेलेली . 

लग्न झाल्यापासून तिच्या नवऱ्याने तिला कामासाठी बाहेर जाऊ दिलं नव्हतं . तो नेहमी तिच्या काम करण्यामध्ये आडकाठी घालायचा . 

पण तिने बाहेर जाऊन काम केलं, हे त्याला कुठून कळलं काय माहित...!


बायकोने बाहेर जाऊन काम केल्यामुळे त्याचा पुरुषी अहंकार दुखावला आणि त्याने घरी येऊन दारूच्या नशेत तिला बेदम मारहाण केली .


आजही तो क्षण आठवूण तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि नवऱ्याचा प्रचंड राग आला .


"मा ऽ य ऽ ऽ "

मुलीच्या आवाजाने ती भानावर आली आणि डोळे पुसत बोलली .


"सोने ऽ माझी बाय...माझ पाखरू....."

ती बोलतच होती तोपर्यंत तिच्या पोरीने पुन्हा मान टाकली . 


मग ती आपल्या सहा वर्षाच्या तापाने फणफणलेल्या पोरीच्या पट्ट्या बदलत नवर्याची वाट बघत बसली . आज तरी कामावरून घरी येताना पोरीला औषध आणेल या आशेवर ती होती.. पोरगी आजारी पडल्यापासून तिच्याही डोळ्याला डोळा नव्हता . 


पण आजही नवरा रोजच्या सारखा डुलत डुलत घरी आला . हे बघून तिची सहनशक्ती संपली .

त्याला डुलताना पाहूनच कमरेला पदर खोचून डोळ्यातलं पाणी पुसत ती रागाने बोलली ,


" पोटची पोर तापाने फणफणतीये आणि तुला ढोसायघी पडलेली का ?"


" चल हट ...माद #####.."

तिला आईवरून शिवी हासडून तो तिथेच नेहमीच्या सारखा उताना पडला .


"आर नरकात बी जागा भेटणार न्हाय तुला ..जन्माचा स्वार्थी आणि नालायक माणूस हायेस तू.."

तिने रडत रडतच तिची भडास काढली .


" पोर चार दिस गोधडिला धरून हाय ... दवागोळी करायला बी पैका न्हाय ... काय करू मी ? 

काय करू ?" 

ती रडत पदराने डोळे पुसत पुन्हा पोरीच्या शेजारी बसली . 


 तिच्या गळ्यातले दोन सोन्याचे मनी सोडले तर अंगावर खिडूक मिडूक असं काही नव्हतं .  


पोटाला चिमटा काढून जमलेले पैसे सुद्धा नवऱ्याने मागेच कधी गुडूप केलेले . त्यामुळे तिच्या जवळ शिल्लक असं काहीच राहिलं नव्हतं .


तिची पोर "आय... आय.." कण्हत होती .. पोरीची अवस्था पाहून तिचा जीव नुसता  खालीवर होत होता .


 'पोरी साठी काय करावं ? ' 

या विचाराने ती नुसती कावरीबावरी झालेली . चार दिवसात पोरीचा चेहरा पूर्ण सुकलेला .. डोळे खोलवर गेलेले .


'आता आपली एकुलती एक पोर ताप घेऊन जातो की काय ? '

या विचाराने ती वेडीपिशी झालेली . 


ती त्या पोरीला मांडीवर घेत स्वत:च रडण लपवत.. पुन्हा मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या करत... तिला ऐकायला जाईल अशा रडवेल्या आवाजात प्रेमाने बोलत होती .


" उद्या तुझी माय तुला दवाखान्यात घेऊन जाईल हा बाळा .. आपण उद्या मोठ्ठ्या दवाखान्यात जाऊ या .. मग डॉक्टर काका तुला बरं करतील .. आपण येताना कॅडबरी पण् घेऊया ."

.. हे बोलताना सुद्धा ती रडत होती.. तिच्या डोळ्यातून पाणी टपटप खाली गळत होतं .. कारण तिच्या बोलण्याला काहीच अर्थ नव्हता हे तिलाही माहीत होतं . पोरीच्या तापाने तिची मांडी भाजत होती . तसे तिचे डोळे अजूनच वाहत होते .

ती पोरीला मांडीवर घेऊनच बराच वेळ पट्ट्या बदलत , पोरीला बरं वाटाव , ताप उतरावा म्हणून देवाकडे गयावया करत होती .


काही तासांनी तिने पोरीला व्यवस्थित गोधडीत झोपवलं आणि ती आपल्या छोट्याशा खिडकीत येऊन उभी राहिली . तेव्हा समोर रस्त्यावर तिला दोन त्यांच्याच चाळीतल्या झगा मगा साडी नेसलेल्या बायका दिसल्या . 

त्या कशाला उभ्या राहिलेल्या हे पण तिला माहित होतं . त्या बायकांसमोर एक गाडी थांबली . त्या गाडीवाल्याने त्यातील एका बाई पुढे पैसे केले.. ते पैसे घेऊन ती बाई गाडीवाल्या सोबत निघून गेली . हे पाहताना त्यावेळी तिला फक्त त्या माणसाच्या हातातील पैसे दिसत होते . 


     तिने डोळ्यातील पाणी पुसल.. मनाशी काहीतरी ठरवून एकदा पोरीकडे पाहिलं आणि साडी नीट करत ती सुद्धा घराबाहेर पडली . आयुष्यात तिने कधीच विचार केला नव्हता , ती सुद्धा एक दिवस हे काम करेल . 


तिचा आत्मा ओरडून सांगत होता ,

'नको जाऊस तू .'


पण तिच्यातील आई बोलत होती ,

' तुझ्या पोरीला जगायचं असेल तर तुला हे काम करावच लागल.'

 आणि ती डोळ्यातील पाणी पुसत मनामध्ये द्वंद्व घेऊनच रस्त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली की , लगेच समोर एक फोव्हिलर येऊन थांबली.

 त्याने पाचशे पाचशे च्या नोटा काढून तिच्यापुढे केल्या आणि गाडीत बसायला खुणावलं .


        त्याक्षणी तिला काहीही कळत नव्हतं , तिला फक्त त्याच्या हातातले पैसे दिसत होते आणि तिची तापाने फणफणलेली पोरगी दिसत होती . तिच अंतर्मन अजूनही हे करायला धजत नव्हतं . मनात विचारांचं काहूर माजलेल आणि अचानक तिला ओळखीचा आवाज आला,


" माय ऽ "


तिने डोळ्यातील पाणी पुसून पाहिलं तर तिची पोरगी तिचा पदर ओढत तिच्या शेजारी उभी होती .


ती भांबावल्या सारखी खाली गुडघ्यावर बसून तिच्या कपाळाला हात लावून बोलली ,


" सोनू तू कशाला आली ?

आणि कशी हाय माझी बाय ?.. ताप गेला का तुझा ?"


" मी तुला बाहेर जाताना बघितलं,

 म्हणून मी पण आले ."

सोनू आईच बोट पकडत बोलली.


 त्या माणसाने सोनूला न्याहाळून अजून पाचशे पाचशेच्या नोटा एकत्र केल्या आणि रगेल आवाजात बोलला ,

" तुझ्या पोरगी ला पण घेऊन चल . "


त्याचं बोलणं ऐकून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली . तिने रागात त्याच्याकडे पाहिलं . त्याच्या डोळ्यातील लालसा पाहून तिच्यातील आई पेटून उठली . आपल्या पोरी वरून खालीवर फिरणारी नजर पाहूनच ती त्याच्या तोंडावर थुंकली आणि पेटलेल्या आवाजात बोलली ,


" तुझ्या घरी जाऊन तुझ्या लेकीला बाजूला घे काळतोंड्या ...भाड####..."


तिच अनपेक्षित बोलणं ऐकून तो माणूस सुद्धा रागात तोंडातल्या तोंडात शिव्या घालत तिथून निघून गेला .


तो गेल्यावर घाबरलेली सोनू आईला बिलगली. 

"आई तू कुठे निघाली .. मला पण घेऊन चल ."


तिने पटकन पोरीच्या ओठांवर बोट ठेवल 

आणि रडत बोलली,

" मी कुठच न्हाय जात आणि माझ्या जीवात जीव हाय तोवर मी तुला बी तिथं जाऊ देणार न्हाय.. देवासारखी  आलीस ! 

आज तू आली नसतीस तर मी तुला सुधा तोंड दाखवायच्या लायकीची राहीली नसते... चल "


तिने पोरीला उराशी कवटाळलं आणि घरी जायला निघाली . ती स्वतःशीच गहिवरल्या स्वरात डोळे 

 पुसत बडबडत होती ,


" मी लय कष्ट करीन...लोकांची धुणीभांडी करीन पर तुला शिकवीन .. तुला लय मोठ्ठा साहेब करीन ..तुला तुझ्या पायावर उभं करीन , पर तुला तुझ्या नवऱ्यासमोर हात पसरायची येळ मी तुझ्यावर येऊ देणार न्हाय. "


समाप्त


©® प्रियांका (सुभा) "कस्तुरी"


जिल्हा -

सातारा, सांगली.