अनपेक्षित (वृषाली गुडे - आत्मचरित्र )

अनपेक्षित (वृषाली गुडे - आत्मचरित्र )
नमस्कार मी वृषाली

आज माझं आत्मचरित्र तुम्हाला सांगण्याचा अल्पमती प्रयत्न करणार आहे. तसंतर मी काही महान नाही त्यामुळे माझं आत्मचरित्र पण मसालेदार नाही. पण कधी कधी उत्तम लेखकांची चटकदार बिर्याणी सारखी आत्मचरित्र वाचून भारावल्यावर वाचकाने माझ्या सारखे नविदेत अश्या लेखकही असतात ज्यांचे आयुष्यही सपक खिचडी असते हे जाणून घेव्या आणि मग स्वत:ला आपण अगदी मिळमिळीत जगत नाही हे समाधान मानता यावं म्हणून हा प्रपंच.

तसं तरी जन्माने आणि कर्माने पक्की मुंबईकर. आयुष्यात सातव्या वर्षी माझ्या आई वडीलांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला कारण वडिलांचे दुसऱ्या बाईशी असलेले संबध. मला मुलगी म्हणून तसही वडीलांच्या परिवाराने कधीच स्वीकारले नाही नतंर तर साफ संबधच तुटला. खरतरं ऐशींच्या दशकात पुरुषाचा बाहेरख्यालीपणा सहन न करणारी आणि तेवढ्याच ताकदीने स्वत:च्या पायावर उभी राहून एकट्याने मला वाढवणाऱ्या आईबद्दल लिहायला आवडेल.

तिलाही खास माहेरचा असा सपोर्ट नव्हता. घरी विधवा आई आणि मतिमंद बहीण एवढाच काय तो तिला आधार. जसं मला मुलगी म्हणून माझ्या वडीलांच्या कुटुंबाने नाकारलं तसं आईच्याही वडिलांच्या कुंटुबाने विधवा सुनेची आणि दोन मुलींची जबाबदारी टाळली.

त्यामुळे आपली मुलगी बापविना वाढताना भरकटू नये म्हणून मला तिने खुपच धाकात मोठी केलं. त्यातही लोक एखाद्या आयुष्यात काही चमचमीत चघळायला मिळावं म्हणून माझे वडील कुठे आहे ,मला भेटतात का असे प्रश्न विचारायचे, पण आम्हाला मदत करणारं, वेळ प्रसंगी आजीच्या आजारपणात आईसोबत कोणीच उभं नव्हतं. अश्याच परिस्थितीने मी प्रचंड हळवी आणि काहीशी कणखर बनली.

मग यशावकाश नोकरी, लग्न असे टप्पे पार केले. अरेंज मॅरेज करताना मात्र लग्नाच्या बाजारात मात्र लोकांनी जाम ताप दिला हा राव..आता कसा ते सांगते.

माझे आई वडील सेपरेट आहे म्हणून मला न बघताच नकारणारी खुप स्थळ आली. आता पाठी वळून पाहीलं तर ज्यांच्या आई बाबांचा संसार वर्षानुवर्षे चालू असतो त्या मुली काय घटस्फोट घेणार नाही गँरटीपत्र घेऊन नांदायला येतात काय असा प्रश्न सतावायचा. असो आता मला त्याचं काहीच वाटतं नाही कारण लग्नाचा लाडू मी तरी मस्त एन्जॉय करतेय.

पर बोलते है ना ! भगवान जभी देता है छप्पर फाड के देता है. मला अगदी सुस्वभावी ,गुणी, उत्कृष्ट पगार असलेला आणि मुख्य म्हणजे स्वत:च घर असलेला समजुतदार ,सपोर्ट करणारा, मान देणारा, प्रेम करणारा, अगदी चांगला मित्र असलेला नवरा मिळाला. आता मात्र मी हा लेख लिहून त्याच्या आला बाला काढते. नाहीतर नजर लागायची कोणाचीतरी.

तर तब्बल बारा वर्षे आमचं अरेंज मॅरेज असूनही आम्ही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो. त्याच्या येण्याने प्रेम काय असतं ते मला समजलं..पण म्हणतात देव कधी सगळं देत नाही . हर किसीके नसीब में मुक्कमल जहाँ नही होता .कभी जमी तो कभी आसमाँ नही होता.


लग्नांनंतर दहा वर्ष मुलासाठी प्रयत्न केले. अक्षरक्ष: बाळासाठी रडलो. दोन आयवीएफ करताना एकात एकटॉपिक प्रेग्नेसीमुळे मरणाच्या दारातून परत आले. तेव्हा बाळ गेलं म्हणून प्रचंड डिप्रेशन आलेलं.
तेव्हाही नवऱ्याने मानसिकरीत्या मला खुप सपोर्ट केला.


कधीही माझ्यासमोर बाप न होऊ शकल्याची खंत व्यक्त नाही केली. माझ्या ऑपरेशनच्या वेळी जेव्हा डॉक्टरांनी मी वाचेन का नाही ह्याची गँरटी नाही असं म्हटल्यावर तो ढसाढसा रडला होता आणि ते ऐकून समजलं मला समजलं की त्याच माझ्यावर खुप खुप प्रेम आहे कारण हेरंब खुप पटकन आपल्या भावना व्यक्त नाही करतं..सो वाईटातून ही एक चांगली गोष्ट घडली.


तो प्रसंग खरचं टर्निंग पॉइंट होता माझ्यासाठी, त्या दिवशी असलेल्या यातना एवढ्या भयंकर होत्या की काही क्षण वाटलं..बसं नको हा संघर्ष. मरण बरं..मग दुसऱ्या मनाने म्हटलं, नाही आईसाठी व हेरंबसाठी जग. मग केली फाईट आणि आले परत..हा आईच्या व हेरंबच्या प्रेमाची साथ होती म्हणून लढा सोपा गेला हे मात्र खरं..

नंतर माझ्या हट्टाखातर अजून एक आय व्ही एफ करताना माझे होणारे माझे शारीरीक व मानसीक हाल पाहून बाळ दत्तक घ्यायचा निर्णय त्याने पहिला घेतला.

त्या मोठ्या ऑपरेशन नंतर माझी अशी अवस्थाच नव्हती की जॉब करेन. त्याने त्यालाही सपोर्ट केला आणि कारा ह्या कायदेशीर वेबसाईटवर दत्तक बाळासाठी आम्ही नंबर लावला. गंमत म्हणजे आम्हाला दिवलीच हवी होती म्हणजे मुलगी. त्याबद्दल आमच्यात वाद कधी नव्हताच. जे खुप लोकांसाठी एक आश्चर्य होतं कारण बहुतेक लोक अजुनही मुलगाच घेण्याबद्दल प्राधन्य ठेवतात.

काही बाबतीत माझ्या सासरची लोक खुपच आधुनिक आणि मोकळ्या विचारसरणीची आहेत, बाळ घरी येईंपर्यंत मला कधीही सासरी आम्हाला कोणीही, मुलं केव्हा होणार ,तुमचे प्रयत्न काय म्हणतात असे बोचरे प्रश्न नाही विचारले किंवा टोमणे मारणे, बारश्याला, ओट भरणी या समारंभाला न बोलावणं असा कोणताच त्रास दिला नाहीच.

काराच्या नियमानुसार, दत्तक बाळाचा निर्णय आम्ही आमच्या कुंटुबात व मित्र परिवारात आधीच जाहीर केला होता, त्यालाही खुप पाठींबा मिळाला. कोणीही दत्तक मुलं घेऊ नका .ते कसही निघू शकतं असं म्हणून मन कलुषित नाही केलं.आणि नंतरही पुर्ण परिवाराने माझ्या मुलीचं मनापासून स्वागतच केलं.

बाळाची वाट पाहत असतानाच लॉकडाऊन लागलं आणि आयुष्यात एक मोठं अनपेक्षित वळण आलं. ज्यामुळे मी तुमच्यासमोर आज माझी आयुष्याची छोटी झलक दाखवू शकले.

वाचनाची प्रचंड आवड होतीच, त्यामुळे लॉकडाऊनमध्ये टाईमपास म्हणून प्रतिलीपीवर वाचू लागले आणि लेखकांना समिक्षा देऊ लागले. अश्याच समिक्षांमुळे माझी दत्ता जोशी काका ह्या लेखकांशी ओळख झाली. त्यांनी माझ्यातल्या लेखकाला ओळखलं आणि प्रोत्साहित केलं.

त्यांच्यामुळेच मी गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या कथांचे अनुवाद लिहू लागले. मग मला हळूहळू हास्य भय कथा आणि रहस्यकथा,विनोदी लेखन श्रेणीत जमू लागलं. तसं मी सामाजिकही लिहिते पण फार कमी. गेली तीन वर्ष माझी साहित्य सेवा अवरीत चालू आहे.

मग आलं एक हवसं आणि दिर्घकाळ वाट पाहिलेलं वळण ते म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये माझ्या घरात माझ्या गोड परीचे म्हणजे हर्षालीचं आगमन आमच्या आयुष्यात झालं आणि खऱ्या अर्थाने आयुष्यात सुखांत आला.

दत्तक असलेली माझ्या नऊ महीन्याच्या परीने मला लगेच आपलसं केलं. आम्हाला मात्या पित्याच सुख दिलं. तिच्या तोंडून आम्ही ऐकलेला पहिला शब्द म्हणजे बाबाई.

माझा नवरा तेव्हा म्हणाला होता, " बघ दोघांवरही सेम प्रेम करते, म्हणून पहिला शब्द ना बाबा ना आई..डायरेक्ट बाबाई."

तिला पाहिलं की नेहमी वाटायचं, पहिलं आयविफ फेल झालं तेव्हाच दत्तक प्रोसिजरला जायला हवं होतं. असो पण तेव्हा ही गोंडस बाहुली नसती ना आली आमच्या आयुष्यात.

ही आल्यावरही लिखाण चालूच ठेवलं होतं.खुपच तारांबळ उडायची आमची. हिच सगळं नवीन , प्रत्येक रडणं ,हसणं, आजारपण म्हणजे कठीण कोडी वाटायची.

पण हळूहळू कोडी सुटायला लागली. नवीन आई झाल्यावर ज्या काही अडचणी, मजा ह्यांचा खुप मस्त अनुभव हर्षुने दिला. मला भरभरून आईपण जगायला दिलं. तिच सांगण, घोडा घोडा मग उभं राहणं ह्या बाललीलामध्ये माझी तारांबळ उडायची आणि अजूनही उडते..मी तर म्हणेन बाईपणापेक्षा आईपण भारी देवा..



पार्थ सरांनी मागच्या वर्षीच्या इरा चॅम्पियनशिप ट्रॉफीसाठी विचारलं आणि नवीन आईपणात होणारी तारांबळ होतानाही हेरंबने लिखाण करू नको..बंद कर, सगळे छंद म्हणून कधीच बोलले नाहीत म्हणूनच मी स्पर्धेत लिहू शकले मग त्याच फळही मिळालं

मला इराच्या पहिल्याच स्पर्धेत पहिल्यांदा एक लेखक म्हणून अधांतर लघूकथेसाठी ट्रॉफी मिळाली. त्यासाठी कॅप्टन म्हणून पार्थ सर,माझी मैत्रीण संध्या व इराच्या संचालक संजना मॅडम यांचे धन्यवाद.

त्यानंतर इरावर सतत स्पर्धेत भाग घेतेय. नवरा तर आहेच माझा प्रुफ रिडर. जिकडे बायकांना लपवून छंद पुर्ण करावा लागतो तिकडे माझा नवरा मला रोज विचारतो..काय आहे का आज प्रुफ रिंडीगला..?

तसं तर बेस्ट एम्प्लॉई एवॉर्ड दोनदा मिळवला होता दोन वेगवेगळ्या कंपनीत..पण तो भुतकाळ झाला. आता इरावर दोनदा आणि प्रतिलिपिवरती एकदा एवॉर्ड मिळाल्यावर लेखिकेची ओळख मिरवाविशी वाटते.

अनपेक्षित हाच शब्द योग्य ठरलं माझ्या आयुष्यतील बदलांकरता. कामानिमित्त लेखणी निमित्त भेटणाऱ्या वेगवेगळ्या माझ्या मैत्रिणींनी मला खुप घडवलं, इतकं ती वीस वर्षाची थोडशी अल्लड व तापट वृषाली आता खुप लांबून मला पाहत आहे असं वाटतं कधीतरी..

ह्या वाक्यावरून आणि फोटोवरून तुम्ही माझ्या वया बद्दल खुशाल अंदाज बांधू शकता.. आयुष्यात प्रत्येक टप्पा उशीराने पार करूनही, खुप वेळा निराश होऊनही अजून खुप उत्साहाने जगायचं मन आहे, हे आता माझं अल्पसं चरित्र वाचून मला उमगत आहे.

बोर झाला असाल ना! बस शेवटचा संदेश देऊन मी माझं आत्मचरित्र आटोपते घेते.

जर तुमचं बाळ असेल, आणि तुम्हाला दुसरं बाळ हवं असेल तर प्लीज दुसरं बायोलॉजिकल मुलं केवळ रक्ताचं मूल म्हणून जन्माला घालू नका.

त्यापेक्षा एक बाळ अनाथाश्रमातून दत्तक घ्या. माझ्या अनुभवावरून सांगते, ते बाळ जे सुख तुम्हाला देईल ना ! तुम्ही विसरून जालं की तुम्ही वेगळं असं दत्तक बाळाला आणलायं. बघा जमलं तर स्वार्थ नी परमार्थ एकाच बेचकीत होऊन जाईल.

आणि जे आमच्यासारखे वांझोटे आहेत, त्यांनी जास्त आयव्हीएफच्या नादाला न लागता सरळ दत्तक बाळ घ्यावं असचं म्हणेन मी.

तिकडे कितीही म्हटलं तरी बाळांची काळजी तेवढी नाही घेतली जात जेवढी तुम्ही आई बाबा म्हणून घेऊ शकता आणि ह्यात तुमचाच फायदा होईल.

तुम्ही जर स्त्री असाल सततच्या मानसिक शारीरिक त्रासातून सुटाल आणि पुरूष असाल तर आपल्या जोडीदाराला ह्या त्रासापासून मुक्त कराल आणि आई वडील होण्याच्या सुखात न्हाऊन जालं.

धन्यवाद
आपली लेखिका वृषाली गुडे.