अनोळखी दिशा पर्व २ (भाग ५१ अंतिम)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, ठरल्याप्रमाणे हर्षु आणि आदित्यचा साखरपुडा होतो. त्यानंतर तो ट्रेनिंगसाठी जातो. नऊ महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतरची लग्नाची तारीख फायनल करण्यात आली होती. त्यानुसार सगळे जण तयारीला देखील लागले.

आता पाहुयात पुढे...

"काय मग ॲडव्होकेट मिस हर्षिता इमानदार, फायनली तुम्ही आता बोहल्यावर चढणार... कसं वाटतंय मग आता? जरा दोन शब्दांत तुमचे मनोगत व्यक्त करा." हातातील वर्तमान पत्राची गुंडाळी हर्षु समोर पकडत गमतीच्या सुरात हर्ष बोलला.

"झालं याचं पुन्हा सुरू. वहिनी सांग बाई याला. सारखा हात धुऊन माझ्या मागे लागलेला असतो हा."

"काही नाही होत गं..तो म्हणतोय तर बोल ना दोन शब्द. अजून दोन महिन्यांनी मी तुमच्या दोघांची ही नोकझोक खूप मिस करणार आहे." बोलता बोलता नेत्राला भावना अनावर झाल्या.

"झालं.. रडवलंस ना माझ्या बायकोला. खडूस कुठची." लटक्या रागातच हर्ष बोलला.

"वहिनी अगं आहे मी अजून इथेच. आताच नको गं रडूस. तू पण ना." नेत्राच्या डोळ्यांतील पाणी अलगद टिपत हर्षु बोलली.

"पण जाणार हे ही तितकंच खरं ना." नाराजीच्या सुरात नेत्रा बोलली.

"वहिनी...नको ना गं इमोशनल होवूस. मलाही आता रडू येईल." नेत्राला मिठी मारत हर्षु बोलली.

दोघींना इतकं भावूक झालेलं पाहून हर्षला देखील भरुन आले. पण मूड चेंज करण्यासाठी त्याने दोघींचीही खेचायला सुरुवात केली.

"बरं नका रडू आता नाहीतर महापूर यायचा. लग्नाच्या दिवशीसाठी सुद्धा पाणी बचत करुयात का थोडी?" हसत हसत हर्ष बोलला.

"काय रे दादा... तुला काही काम नव्हतं का? सगळं वातावरण इमोशनल करून टाकलं. माझी मुलाखत घ्यायची म्हणे."

"तुम्हा बायकांना इमोशनल व्हायला थोडीच ना काही कारणं पाहिजे असतात."

"म्हणजे तुझ्यासाठी मी आता लग्न करून या घरातून निघून जाणार हा खूप आनंदाचा क्षण असणार आहे?" आश्चर्यकारकरित्या हर्षुने विचारले.

"हो मग..आमचं सगळं टेन्शन आता आदित्य स्वतःहून घेऊन जातोय तर मग आनंद नाही होणार?" हसतच हर्ष बोलला.

"वहिनी.. तुझ्या भाषेत समजाव हा ह्याला. खूप अति बोलतोय हा." रागातच हर्षु बोलली.

"हर्षु... अगं तो गम्मत करतोय, कसं कळत नाही तुला. तू लगेच चिडतेस. त्यालाही हेच हवं असतं गं राणी आणि एक गोष्ट माहितीये..."

"कोणती..?"

"तू ज्या दिवशी लग्न करून सासरी जाशील ना त्या दिवशी सर्वात जास्त हर्षला वाईट वाटणार आहे. तो सगळ्यांत जास्त रडेल बघ तुझ्यासाठी. अगं ह्या अशा लुटूपुटूच्या भांडणातच खूप सारं प्रेम दडलेलं असतं गं." समजावणीच्या सुरात नेत्रा बोलली.

"हर्षु बाळा असं काहीही होणार नाहीये. हिचं काही ऐकू नकोस. उलट तू लग्न करून सासरी गेल्यावर सर्वात जास्त आनंद मला होणार आहे."

"दादा...जा बोलूच नको माझ्याशी."

"मी नाही बोलणार पण तुझ्या लक्षात राहील ना हे?"

"हर्ष बस झालं रे आता...अजून किती छळशील तिला."

"जाऊ दे मीच जाते इथून." सवयीप्रमाणे हर्षु रागानेच तिच्या रूममध्ये निघून गेली.

आता हर्षुचे लग्न झाल्याशिवाय ह्या दोघांची अशी लुटुपुटूची भांडणं काही थांबणार नव्हती.

सगळेजण आता हर्षुच्या लग्नतयारीत बिझी होते.

थोड्याच दिवसांत आदित्यचे ट्रेनिंग कंप्लीट झाले आणि फायनली त्याच्या नावासमोर सी.ए ही पदवी लागली. अगदी सहज पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरले होते. त्यामागे आदित्यची खूप मेहनत होती. हर्षुने त्याला वेळोवेळी खूप सपोर्ट केला होता, त्याचे मनोबल वाढवले होते. त्यातच नेत्राने घातलेली अट देखील आदित्यने पूर्ण केली होती. त्याच्या कष्टाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले होते. सर्वांनाच खूप आनंद झाला. हर्षुचा आनंद तर गगनात मावत नव्हता. एक एक दिवस ती मोजत होती आणि अखेर तो दिवस उजाडला. येणारा सुखद असा भविष्यकाळ दोघांनाही खुणावत होता.

हर्षुचे लग्न तोंडावर आले असतानाच एक दिवस हर्षला राजचा फोन येतो.

"दादा मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे."

"अरे बोल ना मग आणि तू कधी निघणार आहेस? आठ दहा दिवस आधी तुला यावं लागेल आ. बाकी काही कारणं सांगू नको आता."

"हो मी येणार आहेच पण एकटा नाही."

"म्हणजे! कोणी मित्र येणार आहे का सोबत?"

"मित्र नाही... मैत्रीण आहे." थोडा पॉज घेत राज बोलला.

"मग असू दे की, त्याला काय होतंय."

"प्रॉब्लेम तो नाहीये दादा."

"मग... म्हणजे फक्त मैत्रिणीच आहे ना ती..की त्यापेक्षा वेगळे काही नाते आहे?" हर्षला राजच्या बोलण्यातून तसे जाणवले म्हणून त्याने स्पष्टच विचारले.

क्षणभर राज शांत झाला. पुढे काय बोलावे त्याला काहीच समजेना.

"राज अरे मी काहीतरी विचारलंय तुला."

"दादा स्नेहा...माझी मैत्रीण. म्हणजे तीही इंडियनच आहे. गुजरातची आहे. इथे आल्यावर आमची ओळख झाली. मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं ते कळलंच नाही रे."

"बरं ठीक आहे ना मग...एकदा का हर्षुचं लग्न झालं की मग आपण घरात सांगुयात आणि मला खात्री आहे महेश काका नक्की परवानगी देतील."

"आणि आईचे काय? तिने परवानगी दिली असती?"

"दिली असती म्हणजे? मी नाही समजलो."

"दादा मी आणि स्नेहाने  दोन महिन्यांपूर्वी लग्न केलंय."

"काय??? तुला वेड लागलंय का राज. अरे काय करून बसलास हे? निदान मला तरी कल्पना देतोस ना. कसं करणार आहोत आता आपण? त्यात आता हर्षुच्या लग्नाची गडबड. हे सगळं घरात समजल्यावर काय होईल याचा अंदाज तरी आहे का तुला?"

"सगळा काही अंदाज आहे दादा मला. बाकी कोणाचं माहीत नाही पण आई तमाशा करणार हे फिक्स आहे. त्यात स्नेहा गुजराती...मग तर आईने होकार देण्याचा प्रश्नच कुठे होता."

"म्हणून आई वडिलांचा असा विश्वासघात करायचा का राज? लग्न म्हणजे काय खेळ वाटतो का तुला? तुला समजतंय का तू किती मोठी चूक केली आहेस ते?"

"दादा मला सगळं समजतंय आणि मी इराच्या बारशाला आलो तेव्हाच आईला सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण तिने स्पष्टच सांगितले की माझ्यासाठी मुलगी तीच शोधणार. माझे काहीही ऐकून न घेता तिने आधीच ठरवून ठेवलं होतं मग मला दुसरा मार्गच दिसत नव्हता. शेवटी आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला."

"काय रे राज...पण असं नव्हतं करायला पाहिजे तू. प्रत्येक आई वडिलांची काही स्वप्न असतात रे."

"हो दादा मान्य आहे ना... पण मला परदेशात शिकायला पाठवण्याचा आईचा आग्रह होता. ठिक आहे मला बिझनेस मध्ये इंटरेस्ट नव्हता पण मला हवे तसे शिक्षण भारतातही मिळाले असतेच ना. मी एकटा इकडे आणि तुम्ही सगळे तिकडे. अशावेळी स्नेहा खूप जवळची वाटायची मला. हक्काचं कोणीतरी आहे इकडे असं वाटायचं. सोप्पं नाही रे दादा घरापासून इतक्या दूर राहणं. पण तरीही फक्त आईसाठी मी स्वतःला समजावलं. पण आता माझ्या आयुष्याचा निर्णय, तो तरी मला घ्यायचा होता आणि त्यात कोणताही अडथळा येऊ न देता. म्हणून मला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले."

"आणि स्नेहाच्या घरच्यांचे काय? त्यांची परवानगी तरी घेतली होती का?"

"त्यांना माहीत आहे. तिने घरी सांगितले होते. पण त्यांचा नकार होता. त्यांनीही तिची बाजू समजून घेतली नाही आणि आता खरं समजल्यावर तेही खूप नाराज आहेत तिच्यावर."

"राज...राज...राज सगळा गोंधळ घालून ठेवला आहेस तू. कसा निस्तरायचा आता तो?"

"दादा प्लीज तू कर ना काहीतरी आणि मला खात्री आहे तू आणि वहिनी दोघेच मला मदत करू शकता."

"राज...हेही तूच ठरवलं?"

"दादा मला हर्षुच्या लग्नाला यायचंय रे पण स्नेहाला मी एकटं नाही सोडू शकत आता इकडे."

"बरं बघतो मी काय करायचं ते. आपण बोलू नंतर. मी करतो तुला कॉल."

हर्षने हा सगळा प्रकार नेत्राला सांगितला. तिलाही धक्काच बसला. पण या सगळ्याला निलम काकी जबाबदार आहे. तिच्या आडमुठ्या स्वभावामुळे राजने हा इतका मोठा निर्णय परस्पर घेतला होता. यावर दोघांचेही एकमत होते.

हर्षुच्या लग्नाला अजून एक महिना बाकी होता. त्याआधीच हर्षने माधवराव आणि महेशरावांना विश्वासात घेऊन ही सगळी हकीकत त्यांना सांगितली. त्यांनाही हे ऐकून खूप मोठा धक्का बसला. पण या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत हे महेशरावांना देखील कळून चुकले होते. निलमच्या आग्रहास्तव आपण राजला परदेशात शिकायला पाठवले, तेव्हाच त्याच्या मनाचा विचार करायला हवा होता.

एकीकडे हर्षुच्या लग्नाची गडबड आणि दुसरीकडे राजच्या लग्नाचा गौप्यस्फोट त्यामुळे सगळेच अगदी गोंधळून गेले होते. सर्वात अवघड होते ते म्हणजे निलम काकीची समजूत काढणे.

एक दिवस रात्रीची जेवणं आटोपल्यावर महेश काकांनी राजच्या लग्नाचा विषय घरात सर्वांना सांगितला. सर्वांसाठी ही खूपच धक्कादायक बातमी होती आणि विशेष करून निलम काकीसाठी. लेकाच्या या अशा वागण्याने तिची खूप मोठी हार झाली होती आज. इतरांच्या वाईटाचा विचार करण्याची तिची सवय आज तिलाच नडली होती.

"मला हे अजिबात मान्य नाहीये आणि राजने जे काही केलंय त्यासाठी मी त्याला कधीही माफ करणार नाही." रडत रडत निलम काकी म्हणाली.

"तुझाच हट्ट होता त्याला परदेशात पाठवण्याचा मग आता सत्य देखील ॲक्सेप्ट कर. दुसरा पर्याय नाहीये आपल्याकडे." महेश काकांनी तिची समजूत काढली.

नयना ताई आणि आजीने देखील निलमला खूप समजावले.

माधवरावांच्या सांगण्यानुसार महेश काकांनी राजला फोन करून स्नेहाच्या वडिलांचा कॉन्टॅक्ट नंबर मागवून घेतला. माधवरावांनी स्वतः मग स्नेहाच्या घरी फोन करून हा सगळा गुंता सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तिच्या घरच्यांना मनवले आणि यातून मध्य साधला.

घरात सर्वांनी एकमताने चर्चा करून हर्षु आणि आदित्यच्या लग्नातच राज आणि स्नेहाचे देखील लग्न करण्याचा विचार पक्का केला. जरी त्यांनी आधी लग्न केले होते तरी आता सर्वांसमक्ष पुन्हा एकदा लग्न करणे गरजेचे होते.

स्नेहाच्या घरच्यांना त्यासाठी माधवरावांनी मनवले. कसेबसे त्यांना तयार केले. खूप आढेवेढे घेत का होईना पण फायनली ते तयार झाले हे महत्वाचं. त्यांच्या मुलीने त्यांचा केलेला विश्वासघात त्यांनाही खूपच त्रासदायक होता. त्यातून बाहेर पडायला त्यांनाही वेळ लागणारच होता. त्यात आपली मुलगी महाराष्ट्रीयन मुलाच्या प्रेमात पडली हाच खूप मोठा धक्का होता त्यांच्यासाठी. पण माधवरावांचा समजूतदारपणा आणि त्यांचे विचार त्यांनाही भावले. येत्या दोन दिवसांत माधवरावांनी त्यांना भेटायला त्यांच्या घरी बोलावले.

मुलीचे आईवडील जेव्हा इनामदारांच्या घरी आले तेव्हा मनोमन तेही सुखावले. आपली मुलगी चांगल्याच घरात गेली याचे त्यांना कौतुक वाटले. एखाद दुसरी गोष्ट सोडली तरी बाकी सर्व छानच होते.

ठरलेल्या तारखेच्या दहा दिवस आधी राज आणि स्नेहा भारतात परतले. लग्नाला फक्त आता आठच दिवस बाकी होते. स्नेहाच्या घरच्यांनी तिला घरी बोलवून घेतले. त्यांनी देखील लेकीच्या लग्नाची त्यांच्या परीने कमी वेळात जमेल तशी तयारी केली.

चार दिवस आधीच दोन्ही लग्नाचे वऱ्हाड एका भव्य दिव्य अशा हॉल वर पोहोचले. सर्वांना स्नेहाला बघण्याची खूपच उत्सुकता होती. तिला पाहताच सर्वांना ती खूपच आवडली. अगदी राजला साजेशी होती ती. निलम काकी मात्र मनातून खूपच नाराज होती. त्यामुळे ती शांत शांतच होती.

सर्वकाही घाईत जरी होत असले तरी छानच होते.

हर्ष आणि नेत्राच्या लग्नासारखाच ह्याही लग्नाचा थाट होता. आदित्य आणि हर्षु बरोबर राज आणि स्नेहा देखील आज तितकेच खुश होते. देवा ब्राम्हणांच्या साक्षीने दोन्ही लग्न अगदी थाटामाटात पार पडली.

राजचे लग्न सर्वांसाठी अनपेक्षित जरी असले तरी म्हणतात ना लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. आदित्य आणि हर्षुच्या बाबतीत देखील अगदी असेच म्हणावे लागेल. खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर आणि खूप अडथळे पार करून आज दोघेही एकत्र आले होते.

सगळे काही अगदी उत्तमरीत्या पार पडले होते. राज आणि स्नेहाने आता पुन्हा परदेशात न जाण्याचा निर्णय घेतला. हर्षु आणि आदित्य दोघेही त्याच्या नोकरीच्या ठिकाणी शिफ्ट झाले. त्यांनी प्रमिला ताईंना देखील सोबत नेले. हर्षुनेही आता स्वतःचे ऑफिस सुरू केले. खऱ्या अर्थाने तिची वकिली आता कुठे सुरू झाली. त्याबरोबरच दोन्ही जोडप्यांचे संसार देखील आनंदाने फुलले.

आज खऱ्या अर्थाने अनोळखी वाटेवर सुरू झालेला हा प्रवास एकरूप झाला होता. दोन अनोळखी दिशा पुन्हा एकदा एकत्र आल्या आणि नेत्रा व हर्षच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश मिळाले.

एक मुलगी लग्न करून सासरी गेली तर ध्यानी मनी नसतानाही दुसरी मुलगी लक्ष्मीच्या पावलांनी घरी आली. यालाच म्हणायचं का नियतीचा अनोखा खेळ?

समाप्त...

("अनोळखी दिशा" खरंतर मोठी कथामालिका लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. पर्व एक आणि पर्व दोन मिळून एकूण ८४ भाग लिहून पुर्ण झाले. याचा आनंद खूप मोठा आहे. मोठी कथा लिहिताना काय आणि कसे नियोजन करतात याचा शून्य अनुभव. त्यामुळे कोणतेही प्लॅनिंग न करता जे सुचेल आणि जसे सुचेल ते लिहीत गेले. फक्त स्वतःसाठी एक चॅलेंज म्हणून मी हा प्रयत्न करून पाहिला. त्याचा फायदा असा झाला की आता मोठ्या कथा लिहिण्यासाठी आत्मविश्वास नक्कीच निर्माण झाला आहे. त्यामुळे कथेला प्रतिसाद जरी कमी मिळाला असला तरी मनाला वेगळेच समाधान वाटत आहे. काही वाचकांनी अगदी सुरुवातीपासून कथेला छान प्रतिसाद दिला. कदाचित अशा मोजक्या वाचकांसाठी का होईना पण मला लिहायचे आहे ही भावना मनाला आनंद देत होती. त्यासाठी सर्व वाचकांचे अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.
ज्यांनी सुरुवातीपासून कथा वाचली आहे त्यांनी कथा कशी वाटली हे अभिप्रायद्वारे नक्की सांगावे.याचा पुढील लिखाणासाठी नक्कीच उपयोग होईल.)

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all