अनोळखी दिशा पर्व २ (भाग ४८)

Katha Anokhya Premachi
मागील भागात आपण पाहिले की, नेत्राला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. थोड्याच वेळात बाळाच्या रडण्याचा आवाज कानी पडला आणि सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलले.

आता पाहुयात पुढे..

थोड्याच दिवसांत घरात छोटेसे बाळ येणार म्हणून प्रत्येकजण तितकाच एक्साईट होता. अगदी एखाद्या सोनेरी स्वप्नाप्रमाणे दिवस जात होते.

नियमानुसार लेकीचे पहिले बाळंतपण तिच्या माहेरी होत असते, नेत्रा मात्र माहेर असूनही पोरकी होती जणू. पण सासरच्या बाबतीत ती खूपच नशीबवान होती.

आदित्यला मात्र प्रमिला ताईंचे वागणे अजिबात पटत नव्हते.

"अगं आई तू एकदा बोलून तरी बघ नयना काकूंसोबत. ताईची डिलिव्हरी आता जवळ येत आहे. तिला माहेरी आणण्याबाबत आपल्याला विचार करायला हवा."

"ते लोक थोडीच पाठवणार आहेत तिला इकडे. तेवढा विश्वास असावा लागतो आदित्य आणि त्यांचा अजिबात विश्वास नाहीये माझ्यावर हे माहीत आहे मला."

"समोरच्याने आपल्यावर विश्वास ठेवावा असं जेव्हा वाटतं ना तेव्हा आपण नेमकं कुठे चुकतो हे पाहायला हवं ना आणि त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रयत्नही करायला हवेत."

"आता तू नको शिकवू मला मी कसं वागायचं ते. तसंही बोलून काही फायदा होणार नाही हे आधीच माहीत आहे मला. मग कशाला उगीच बोलून आपलाच पचका करून घ्यायचा."

"पण आपलं काम आहे ते. त्यांनी तिला पाठवू अगर न पाठवू देत तो पुढचा प्रश्न झाला पण आधी आपण बोलायला तर हवं ना."

"कशासाठी? आणि इथे आल्यावर कोण करणार आहे तिचं सगळं? माझ्याच्याने नाही होणार."

"हे सांग ना मग. तसंही तुझीच इच्छा नाहीये ताईला इकडे आणण्याची. हे आधीच माहीत होतं मला."

"तुला जे समजायचे ते समज."

"आई मला एक सांग...ताई जर तुझी पोटची मुलगी असती तर तू अशी वागली असतीस?"

"आदित्य... तू जरा जास्तच बोलतोय असं नाही वाटत तुला?"

"अजिबात नाही वाटत. कारण जनाची नाही निदान मनाची तरी आहे मला."

"बरं बस झालं, तू म्हणतोस म्हणून मी करते फोन, पण ते लोक जर नाही म्हणाले तर मी जास्त मस्का मारत बसणार नाही."

"तशी अपेक्षाही नाही माझी, फक्त आपण जाणूनबुजून चुकू नये असं मला वाटतं."

आदित्यचे मन राखण्यासाठी प्रमिला ताईंनी नयना ताईंना फोन करून नेत्राला माहेरी घेऊन जाण्यासाठी विचारले.

"पण काहीही झाले तरी नेत्रा कुठेही जाणार नाही, एकट्या प्रमिला ताईंना नाही जमणार सगळं हँडल करायला."

खरे कारण वेगळे जरी असले तरी आजीने मात्र तिचे मत सांगितले.

असेच काहीतरी कारण सांगून त्यांनी मग नेत्राला माहेरी न पाठवण्याचा निर्णय अखेर फायनल केला. तसेही नेत्रासाठी सासर आणि माहेर जणू एकच होते. सासरच्या प्रेमापुढे माहेरची कमी तिला कधी भासलीच नाही आणि तसेही नेत्राच्या माहेरी न जाण्यामुळे प्रमिला ताईंना थोडीच ना काही फरक पडणार होता. सावत्र जरी असली तरी फक्त नावाला ती नेत्राची आई होती. आता नयना ताईच नेत्राची आई झाल्या होत्या. सासरच्यांच्या प्रेमात नेत्रा अगदी न्हाऊन निघाली होती.

"मी म्हटलं होतं ना आदित्य तुझ्या लाडक्या बहिणीच्या सासरचे लोक पाठवणार नाहीत तिला. पण तुला जास्त पुळका ना तिचा. कशाला रे मला फोन करायला सांगितला?" रागातच प्रमिला ताई आदित्यवर खेकसल्या.

"मग काय झालं? आपलं काम होतं ते आपण केलं आणि तसंही तुझ्या मनासारखं तर झालंच ना. मग कशाला उगीच टेन्शन आल्याचं नाटक करतीयेस."

"आदित्य तू तुझ्या आईसोबत बोलतोय हे विसरू नकोस."

"ते नाही विसरलो मी आणि पुढेही नाही विसरणार, काळजी करू नकोस." असे बोलून आदित्य तिथून निघून गेला.

"नेमकं काय झालंय ह्याला? आदित्य आधी मला घाबरत तरी होता पण आता माझ्या प्रत्येक शब्दाला त्याचं उलट उत्तर हे ठरलेलंच असतं. नक्कीच त्याची ती लाडकी बहिण आणि तिच्या सासरचे लोक भडकवत असणार त्याला. पण ह्याला कळायला नको. सख्खी बहिण असती तर ठीक होतं पण हा त्या सावत्र बहिणीसाठी मर मर करतोय." नयना ताई चरफडत बोलल्या.

नेत्राच्या सासरच्यांनी तिला बाळंतपणासाठी माहेरी पाठवले नाही आणि कोणत्या विश्वासाने पाठवणार हाही मोठा प्रश्नच होता. पण नेत्रा मात्र तिच्या सासरच्या माणसांसोबतच खूप खुश होती. त्यांच्यामुळे माहेरची कमी तिला कधी भासलीच नाही. आनंदाचा प्रत्येक क्षण ती भरभरून जगत होती.

जसजसा एक एक दिवस जात होता, तसतशी नेत्राच्या डिलिव्हरीची तारीख जवळ येत होती. घरात अगदी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. आजी आणि नयना ताई सुनेची खूप काळजी घेत होत्या. त्यांचे अनुभव तर नेत्राला पावलोपावली कामी येत होते.

अखेर तो आनंदाचा दिवस उजाडला. एके दिवशी सायंकाळच्या वेळी नेत्राला प्रचंड वेदना सुरु झाल्या. तात्काळ तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. नेत्राचा त्रास मात्र हर्षला पाहवेना.
'हा सगळा त्रास स्रीने एकटीनेच का सहन करायचा?' असे एक ना अनेक प्रश्न हर्षला सतावत होते.

तेवढ्यात आदित्य देखील हॉस्पिटल मध्ये आला. नेत्राला ॲडमिट केले तेव्हाच हर्षने त्याला फोन करून सांगितले होते. तासाभरात तो देखील तिकडे पोहोचला.

थोड्याच वेळात बाळाच्या रडण्याचा आवाज कानी पडला आणि सर्वांनीच मग सुटकेचा निःश्वास टाकला. फायनली सर्वांची प्रतिक्षा संपली.

बाळाच्या नुसत्या आवाजाने हर्षचे डोळे पाणावले. बाप झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.

"अभिनंदन भाऊजी...तुम्ही बाबा झालात."

"आणि तू मामा." असे म्हणत हर्षने आदित्यला कडकडून मिठी मारली.

"काकू तुमचेही मनापासून अभिनंदन... आजी म्हणून तुमचे प्रमोशन झाले." हसतच आदित्य नयना ताईंना म्हणाला.

"हो ना. पण अजून आतून कोणी बातमी घेऊन कसे नाही आले?" काळजीपोटी नयना ताई बोलल्या.

"येतील गं...आताच बाळाचा आवाज आला ना." हर्ष बोलला.

तेवढ्यात "अभिनंदन...मुलगी झाली. तुमच्या घरी लक्ष्मी आली." म्हणत सिस्टर धावतच बातमी घेऊन आल्या.

"सिस्टर, नेत्रा कशी आहे?"

"बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत."

हे ऐकून हर्षच्या जीवात जीव आला.

"आई..अगं तू आजी झालीस." म्हणत हर्षने नयना ताईंना मिठी मारली.

"घे तुलाही मुलगीच हवी होती ना. देवाने तुझे म्हणणे ऐकले बघ. बरं...आधी घरी फोन करून सांग."

हर्षने लगेचच घरी हर्षुला फोन केला. काही सेकंदातच हर्षुने फोन उचलला.

"दादा बोल ना रे."

"ओय चिमणे तू आत्या झालीस. छोटी हर्षु आली तुला जोडीला."

"काय... खरं सांगतोस दादा...कित्ती भारी ना." हर्षु तर आनंदाने उड्याच मारायला लागली.

"जरा जपून, आधी पाय सांभाळ."

"ये दादा मला बाळाला बघायचंय रे...मी येऊ तिकडे?"

"अगं लगेच नको येऊ. मी फोन करेल तुला मग ये. अजून आम्हीच बाळाला पाहिले नाही."

"बरं वहिनी कशी आहे रे?"

"तीही ठीक आहे. जस्ट सिस्टर सांगून गेल्या आणि लगेच तुला मी फोन केला. आजी आजोबांना पण सांग. मी ठेवतो आता नंतर करतो कॉल."

"बरं बरं चालेल, ठेव."

हर्षुने लगेचच आजी आजोबांना ही आनंदाची बातमी सांगितली. त्यांनाही खूपच आनंद झाला.

"बरोबर दिवे लागणीच्या वेळेलाच लक्ष्मी घरी आली बघ हर्षु. किती मोठा योगायोग आहे हा." आजी म्हणाल्या.

आजीने मग देवासमोर साखर ठेवली आणि दिवा लावला.

नेत्राची डिलिव्हरी अगदी सुखरूप झाली. गोरी गोरी पान, टपोऱ्या डोळ्यांची, गोबऱ्या गोबऱ्या गालाची परीच जणू इनामदारांच्या घरी जन्माला आली होती.

थोड्याच वेळात सिस्टर बाळाला घेऊन बाहेर आल्या आणि बाळाला तिच्या आजीच्या हाती सोपवले. नातीला पाहून नयना ताईंचा आनंद गगनात मावत नव्हता. हर्षला तर काय बोलावे काहीच समजेना. अलगद आपल्या लेकीला त्याने कवेत घेतले. इवल्याशा नाजूक पापण्यांची उघडझाप करत ती तिच्या बाबाला न्याहाळत होती. हर्षच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. लेकीच्या कपाळावर अलगद आपले ओठ टेकवत हर्षने देवाचे आभार मानले.

"आदित्य...बघ तुझी भाची."

"खूपच गोड आहे ही. तिच्या आत्यावर गेलिये का ओ ही." आदित्यने विचारले.

"हो ना...काय बाळाचे मामा... आताच इतकी पार्शलिटी! दिस इज नॉट फेअर आ." हसतच हर्ष बोलला.

"गंमत केली ओ भाऊजी. पण थोडी हर्षु सारखी दिसते बरं ती. म्हणजे मला तरी तसंच वाटतंय."

"अरे इतक्यात नका अंदाज बांधू काही. लगेच नाही सांगता येणार असं." नयना ताई म्हणाल्या.

काही वेळातच नेत्राला रुममध्ये शिफ्ट करण्यात आले. हर्षला आणि बाळाला पाहून नेत्राचा त्रास कुठच्या कुठे पळाला. सर्वांना असे आनंदीत पाहून 'आज आपण सर्वांना किती मोठा आनंद दिलाय' याची नेत्राला जाणीव झाली. त्यामुळे त्या सर्वांच्या आनंदापुढे तिला स्वतःचा त्रास काहीच वाटत नव्हता.

'इट्स अ बेबी गर्ल...लेकीचा बाप म्हणून मिरवण्याचा आनंद काही औरच...' म्हणत हर्षने लगेचच स्टेटस ठेवले आणि लगेचच हर्ष आणि नेत्रावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. खरंच खूपच आनंदाची बातमी होती ही सर्वांसाठी.

"खूप त्रास झाला ना?" नेत्राच्या डोक्यावरून हात फिरवत हर्षने विचारले.

चेहऱ्यावर एक गोड स्माईल आणत आणि पापण्यांची उघडझाप करत नेत्राने नकारार्थी मान डोलावली.

हर्षचा तो प्रेमळ स्पर्श तिच्या वेदनेवर जणू फुंकर घालून गेला.

त्याच क्षणी हर्षला जाणीव झाली, आई होणं इतकं कठीण असूनही बायका मात्र किती आनंदाने हा सगळा त्रास अगदी हसत हसत सहन करतात. हे फक्त एक स्रीच करू शकते.

थोड्याच वेळात हर्षु आणि माधवराव बाळाला आणि नेत्राला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले.

'कधी एकदा बाळाला भेटतोय,'असे झाले होते त्यांना.

"आई किती क्यूट आहे गं ही. आई मी पण अशीच असेल ना गं लहानपणी?" हर्षुने विचारले.

"हो गं अगदी अशीच होतीस तू."

नयना ताईंचे हे उत्तर ऐकून आदित्य आणि हर्ष एकमेकांकडे पाहून हसले.

"आई दे ना गं तिला माझ्याकडे. खूप लाड करावेसे वाटतात तिचे."

"हर्षु नको गं...खूप लहान आहे गं ती अजून. असं सारखं हात लावणं योग्य नाही. लांबूनच बघ ना. नंतर तुलाच सांभाळायचे आहे तिला."

"हो त्या बरोबर बोलत आहेत. जास्त उचलून घेऊ नका बाळाला आणि डायरेक्ट असं हात पण लावू नका. बाळाला इन्फेक्शन होईल." एवढे बोलून नर्स निघून गेल्या.

"म्हणजे काय? आपले बाळ आणि आपणच हात लावायचा नाही. आई हे काही योग्य नाही. मी घेणार आहे तिला."

"बरं बाई घे...पण सावकाश."

"वाव, आई...कसली कापसासारखी गुबगुबीत आहे गं ही."

"हर्षु... असं नाही बोलायचं गं. दृष्ट होते मग बाळाला."

"जे आहे ते बोलले त्यात काय एवढं. तू पण आई. असं काही नसतं बरं."

"अवघड आहे बाई तुमच्या आजच्या या पिढीचे." नयना ताई म्हणाल्या.

"दादा एक फोटो काढ ना आमचा." हर्षु म्हणाली.

"हर्षु नको गं इतक्यात फोटो काढूस तिचे. बाळ दृष्टावतं गं त्याने." नयना ताई म्हणाल्या.

"अगं घरी गेल्यावर आजी आजोबांना त्यांच्या पणतीचे फोटो दाखवायचे आहेत."

हो नाही हो नाही करत हर्षनेदेखील मग फोटो काढलेच आणि हर्षुने तिचा हट्ट पूर्ण करून घेतलाच.

"बघतोय ना आदित्य...किती हट्टी आहे ही. नाही म्हणजे तुला माहित असणं गरजेचं आहे बाबा."

"गप रे तू नको आग लावू आमच्यात." लटक्या रागातच हर्षु बोलली.

यावर आदित्यला मात्र खूप हसू आले.

"थँक्यू सो मच वहिनी. फायनली तू मला इतके सुंदर गिफ्ट दिलेस." बाळाच्या गालावर अलगद आपले ओठ टेकवत हर्षु बोलली.

हर्षुचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. माधवराव देखील दुरुनच नातीला पाहून खूपच खुश झाले.

दोनच दिवसांत नेत्राला डिस्चार्ज मिळाला. हर्षुने बाळाच्या आगमनाची घरी जय्यत तयारी केली होती. मोठ्या उत्साहात इनामदारांच्या नातीचे घरी स्वागत करण्यात आले.

बाळाच्या आगमनाने घराचे मात्र गोकुळ झाले. प्रत्येकजण घरात लहान होऊन फिरत होता. आजीच्या अनुभवरुपी शिदोरीचा आता नेत्राला रोजच फायदा होत होता.

एक एक दिवसाने बाळ मोठे होत होते तसे घरात आनंदाला, उत्साहाला उधाण येत होते.

बघता बघता बाळ आता सहा महिन्याचे झाले. पण अजूनही बाळाचे नाव काही फायनल झाले नव्हते. जो तो आपापल्या इच्छेप्रमाणे बाळाला हाक मारत होता.

पणजी आजीची होती ती 'माऊ'...नयना आजीची 'परी' तर निलम आजीची 'स्वीटी'.. सगळे आजोबा तर तिला चिमणीच म्हणत होते. बाळाचे आई बाबा तर पिल्लू शिवाय हाकच मारत नव्हते. राहिला प्रश्न आत्याचा तर आत्याबाई बाळाला 'आत्याची कार्बन कॉपी' म्हणून हाक मारायची. भलेही मग असो अगर नसो. तर अशाप्रकारे बाळाच्या नावाचा नुसता गोंधळ सुरू होता. बाळही कन्फ्युज होत असणार त्यामुळे, हे मात्र नक्की.

ठरल्याप्रमाणे मोठ्या थाटामाटात आणि धूमधडाक्यात बाळाचे बारसे करण्याचे अखेर फायनल झाले. कारण प्रत्येकाने ठेवलेल्या बाळाच्या टोपण नावाच्या गोंधळामुळे बाळाचे खरे नाव ठेवणे आता खूपच गरजेचे होते.

बाळाचे नाव ठेवण्याची जबाबदारी बाळाच्या आत्यावर होती, पण तरीही बाळाच्या आई बाबांचेच मत ग्राह्य धरण्यात येणार होते.

क्रमशः

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all